कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?

११ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोना येऊन इतके दिवस झाले तरीही यामुळे होणाऱ्या आजारात नेमकं काय होतं हे आपल्याला कळालेलं नाही. आता कोरोनाची लागण झालेल्या पेशंटच्या पायाच्या बोटांवर जांभळे डाग आणि सूज येत असल्याचं समोर आलंय. यालाच वैज्ञानिकांनी कोविड टो असं नाव दिलंय. या डागांसोबतच काही पेशंटना अंगावर पुरळ आल्याचंही दिसून आलंय.

जगाने कोरोना वायरसचं नाव पहिल्यांदा ऐकलं ते जानेवारी महिन्याच्या सुरवातीला. आता कोरोना वायरस येऊन काही महिने उलटून गेले. वर्ल्डओमीटर या वेबसाईटवरच्या आकडेवारीनुसार आजघडीला जगभरातल्या जवळपास ४० लाख लोकांना कोरोना वायरसची लागण झालीय. त्यातले १४ लाख लोक बरे होऊन घरी परतलेत. दोन लाख लोक मृत्यूमुखीही पडलेत. तरीही कोरोना वायरस आपल्या शरीरात जाऊन नेमकं काय काय करतो याचा अजूनही नीट शोध घेणं सुरू आहे.

कोरोना वायरस शरीरात गेला की पहिल्यांदा श्वसनसंस्थेतले वरच्या भागातले अवयव म्हणजे नाक, घसा यावर हल्ला करतो आणि तिथून खालती फुफ्फुसांपर्यंत जातो, असं सुरवातीच्या संशोधनात समोर आलं होतं. मात्र, कोरोना वायरस फक्त फुफ्फुसच नाहीत तर हृदय, जठर, आतडं, किडनी आणि मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांवरही हल्ला करतो हे हळूहळू समोर आलं. आता तर हा कोरोना वायरस शरीरातल्या सर्वात मोठ्या अवयवाला आपल्या त्वचेलाही इजा पोचवतोय, असं समोर आलंय.

हेही वाचा : लॉकडाऊन संपल्यावर खासगी वाहनं कायमची ‘लॉकडाऊन’ करा!

कोरोनाच्या काळात त्वचारोगतज्ञांचं काय काम?

अमेरिकेतल्या बॉस्टनमधे डर्मेटोलॉजिस्ट म्हणजे त्वचारोगतज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. इस्थर फ्रीमन यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या एका मुलाखतीत आपला अनुभव सांगितला. लॉकडाऊनमुळे आपल्याकडेही फारसे पेशंट येणार नाहीत, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्या निवांत होत्या. पण त्यांचा हा निवांतपणा फार काळ टिकलाच नाही.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना इमरजन्सी कॉल येऊ लागले. अनेक लोकांच्या पायावर हिमबाधा झाल्यासारखे जांभळे फोड दिसू लागले होते. काहींच्या पोटावर किंवा छातीवर पुरळं आले होते. अनेकांना त्यातून खाज येत होती. किंवा जळजळ होत होती. आणि विशेष म्हणजे कोणताही उपचार न घेता हे डाग दोन तीन आठवड्यांनी आल्या पावली परत जात होते. पण अशा बहुतांश पेशंटची कोरोना वायरस टेस्ट पॉझिटिव आलीय हे कळाल्यावर डॉ. फ्रीमन यांना खरा धक्का बसला.

पायावर येणाऱ्या या डागांना आता ‘कोविड टो’ असं नाव देण्यात आलंय. या ‘कोविड टो’च्या प्रश्नानं चीन, इटली, फ्रान्स अशा कोरोना वायरसच्या हॉटस्पॉट असणाऱ्या देशातल्या डॉक्टर आणि संशोधकांनाही हैराण करून सोडलंय. या रॅशेसचा म्हणजे पुरळांचा नेमका अर्थ काय, ते कशामुळे येतायंत आणि त्याचा आणि वायरसचा संबंध कसा जोडायचा याबाबत अजूनही पूर्ण संशोधन झालेलं नाही.

कोरोना वायरसचं प्राथमिक लक्षण

अनेक पेशंटना कोविड १९ या आजाराची कोणतीही प्राथमिक लक्षणं दिसत नाहीत. घसा खवखवणं, श्वास घ्यायला त्रास होणं असं काहीही होत नाही. मात्र, हे असे रॅशेस येतात आणि त्यानंतर दोन दिवसांनी सर्दी, ताप भरतो तेव्हा त्यांना कोरोना वायरसची लागण झाल्याची शंका डॉक्टर घेऊ लागतात.

अनेकांमधे पुरळं आल्यानंतरही अगदी सौम्य लक्षणं दिसतात. अन्नावरची वासना उडते, कुठल्याच गोष्टीचा वास येत नाही. त्यामुळेच या पेशंटना असिम्टोमॅटिक असं म्हणतात. अशा असिम्टोमॅटिक किंवा वायरसची लक्षणं न दिसणाऱ्या पेशंटना आपल्याला कोरोना वायरसची लागण झालीय हेच माहीत नसतं. त्यामुळे त्या वायरसचा प्रसार याप्रकारच्या पेशंटकडून जास्त प्रमाणात होतो, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननंही स्पष्ट केलंय.

सुरवातीला खसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होणं ही कोरोना वायरसची प्राथमिक लक्षणं असल्याचं मान्य करण्यात आलं होतं. मात्र, अलिकडेच अन्नावरची वासना उडणे, वास न येणं, अंगदुखी अशी कोरोना वायरसची आणखी ६ नवी लक्षणं असू शकतात, असं अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेनं जाहीर केलं. रॅशेस येण्याला कोरोना वायरसचं लक्षण म्हणून अजून अधिकृत मान्यता मिळाली नसली तरी ते कोरोना वायरसचं प्राथमिक लक्षण असू शकतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

पाच प्रकारची पुरळं

‘पुरळं आलेल्या या पेशंट्समधे तरुणांची संख्या अधिक होती. आणि पुरळं सोडली तर ते कुठल्याही अंगानं आजारी वाटत नव्हते,’ असं फ्रीमॅन सांगतात. मात्र, वेगवेगळ्या वयोगटातल्या माणसांना वेगवेगळ्या प्रकारचे रॅशेस येतात, असंही एका संशोधनातून समोर आलंय.

मार्च महिन्याच्या अखेरिस प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी या संस्थेनं कोरोना वायरसमुळे होणाऱ्या कोविड १९ या आजारात ५ प्रकारचे रॅशेस येऊ शकतात, असं जाहीर केलंय. ते असे, 

१. थंडीमुळे हातापायांची बोटं, कान यांना सूज येते तशा प्रकारचे रॅशेस. याला ठराविक रंग, आकार नसतो. या रॅशेसला खूप खाज येते आणि वेदना होतात. तरूणांमधे हे रॅशेस जास्त प्रमाणात दिसून येतात. जवळपास १२ दिवसांनी ते पुसट होतात आणि जातात. कोरोना वायरसची लागण झालेल्या आणि अंगावर रॅश येणाऱ्या १९ टक्के पेशंटमधे याप्रकारचे रॅशेस दिसले.

२. छोटे छोटे अनेक फोड छाती आणि पोटाच्या भागावर येतात. शक्यतो मध्यमवयीन म्हणजे चाळीशीतल्या पेशंटमधे ही लक्षणं दिसली. १० दिवसांत ते पुसट होतात. फक्त ९ टक्के पेशंटना असे फोड आले होते.

३. अंगावर पित्त उठताना जसं होतं त्याप्रकारचे पांढरे किंवा लाल फोड तळहातावर दिसतात. काही पेशंटच्या अंगावरही दिसले होते. १९ टक्के पेशंटमधे ही लक्षणं दिसली.

४. सगळ्यात जास्त म्हणजे ४७ टक्के पेशंटच्या अंगावर लाल चट्टे उठले होते. ७ दिवसांत हे चट्टे नाहीसे झाले. कोरोना वायरसची इतर लक्षणंही या बरोबर दिसत होती.

५. उरलेल्या ६ टक्के पेशंटमधे नेक्रोसीस या प्रकारातले रॅश आले होते. एखादी जाळी टाकल्यासारखे त्वचेवर निळे किंवा लालसर डाग दिसत होते. रक्त प्रवाह होत नसल्याचं हे लक्षण आहे. या प्रकारचे रॅशेस वृद्ध लोकांमधे दिसले. कोरोना वायरसची तीव्र लक्षणंही त्यांच्यात दिसत होती. 

रॅश येणं चांगलं आहे

अमेरिकन अकेडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या एप्रिलच्या मासिकात बेल्जियममधल्या एका २३ वर्षीय तरूणाबद्दल माहिती देण्यात आलीय. त्याच्या पायावर जांभळे डाग आले होते. सोबत कोरडा खोकला आणि थोडासा ताप अशी लक्षणं त्याला दिसत होती. तो कोरोना पॉझिटीव होता. पण ही लक्षणं सोडल्यास अगदी ठणठणीत होता.

कर्टीस थॉमप्सन या संशोधकाने त्याची बायोप्सी केली. बायोप्सी म्हणजे इन्फेक्शन झालेल्या भागातला थोडा तुकडा काढून त्याची तपासणी करणं. या बायोप्सीमधे रॅश असलेल्या भागातल्या पेशींना सूज आली असल्याचं लक्षात आलं. त्वचेच्या आतमधे असणाऱ्या डर्मिस नावाच्या थरावर वायरसनं हल्ला केल्यामुळे असं झालं असावं. ल्युपस म्हणजे त्वचाक्षय या रोगात रोगप्रतिकारक शक्ती निरोगी पेशींवर हल्ला करते तसंच इथं झाल्याचं थॉमप्सन यांनी द वॉशिंग्टन पोस्टला सांगितलं. ते ओरीगन हेल्थ अँड सायन्स युनिवर्सिटीत प्राध्यापक म्हणून काम करतात.

फक्त ल्युपस रोगात हे रॅशेस कधीच बरे होत नाहीत. मात्र, कोविड १९ आजार ते आपोआप बरे होत असल्याचं समोर आलंय. थोडक्यात हे रॅशेस म्हणजे वायरसविरोधात आपलं शरीर युद्ध करत असल्याचं लक्षण आहे, असं थोमप्सन यांना वाटतं.

या तर आपल्या अँटीबॉडी

‘वायरस इन्फेक्शन झालेल्या पेशंटना रॅश किंवा डाग येणं ही काही दुर्मिळ गोष्ट नाही. हे श्वसनसंस्थेशी निगडीत सगळ्या वायरल इन्फेक्शनमधे होतं. त्या वायरसच्या अँटीबॉडीमुळे असं होण्याची शक्यता असते,’ असं डॉक्टर हम्बोर्तो चोई यांनी हेल्थ इसेन्शियल या वेबपोर्टलसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलंय. चोई हे पल्मोनोलॉजिस्ट म्हणजे श्वसनविकार तज्ञ आहेत.

थोडक्यात, अंगावर रॅश येणं हे कोरोना वायरसचं खास असं लक्षण नाहीय, असं आत्तापर्यंतच्या संशोधनातून समोर आलंय. प्रत्येक संसर्गजन्य आजारात अशा प्रकारचे रॅश, खास, जळजळ होतच असते. गोवर असो किंवा कांजण्या, असे संसर्गजन्य आजार बरे होत असताना त्याला खाज येणं, रॅश येणं होतंच असतं. डेंग्यू हा संसर्गजन्य आजार नसला तरीही तो बरा होत असताना पेशंटच्या हातापायांना अशा प्रकारची खाज येते. त्यातलंच हेही प्रकरण असावं असं अनेक संशोधकांना वाटतं.

मात्र, कोविड १९ मधे येणारे रॅशेस हे वेगळ्या प्रकारचे असल्याने ते जास्त गंभीर आहेत, असं काहींचं म्हणणं आहे. कोरोना वायरस फुफ्फुसांवर हल्ला करत असल्याने रक्तात पुरेसा ऑक्सिजन पोचत नाही. आणि त्यामुळे रक्त गोठून अशा प्रकारचे रॅश किंवा डाग येत असावेत असं अनेक डॉक्टरांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे किडनी किंवा यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवांजवळही रक्त गोठण्याची प्रक्रिया होऊ शकते. असं झालं तर ते अत्यंत गंभीर असेल अशीही भीती व्यक्त केली जातेय.

हेही वाचा : 

‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच

विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

आपण खरेदी करत असलेल्या पेट्रोलवर सरकार लावत १७५% टॅक्स

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

सरकारनं आपल्या मदतीला पाठवलेला 'आरोग्य सेतू' स्वतः सुरक्षित आहे का?

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी