मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील

२४ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून तात्पुरती निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. मानसिक ताण आल्यामुळे क्रिकेट सोडणारा मॅक्सवेल एकटा नाही. आतापर्यंत अनेक खेळाडूंना असा अनुभव आलाय. दोन मालिकांच्यामधे विश्रांती घेणं हाच त्यावरचा उपाय असू शकतो.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मानसिक आरोग्य ठीक नसल्यानं श्रीलंकेच्या दौऱ्यातून माघार घेतली. त्याच्या या निर्णयाने खेळाडूंवर असलेल्या ताण तणावाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मॅक्सवेलची अलीकडची कामगिरी चांगली होती. तरी विश्वचषक क्रिकेटस्पर्धेत त्याने अपेक्षाभंग केला होता. त्यातून तो सावरत असल्याचं चित्र होते. पण त्याच्या मनाने कौल घेतला. आणखी एक दडपण सहन करणं कठीण जातंय. आणि त्याने काही काळ थांबायचं ठरवलं.

त्याच्या या निर्णयाला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने पाठींबा दिलाय. तर संघ प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनीही मॅक्सवेलनं योग्य निर्णय घेतल्याचं म्हटलंय. मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त होऊनच आता मॅक्सवेल मैदानात उतरेल. मंडळ यासाठी त्याला लागेल ते सहाय्य करायला तयार आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

अवघ्या २५ व्या वर्षी घेतली निवृत्ती

विशेष म्हणजे या निर्णयाला जेमतेम आठवडा उलटत नाही तोच ऑस्ट्रेलियातल्याच निकोलस मॅडीन्सन या होतकरू फलंदाजानेसुद्धा अशाच प्रकारचा निर्णय जाहीर केला. त्याची पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात निवड झाली होती. या सामन्यात तो चमकला असता तर त्याला ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख संघात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित होतं. 

पण बहुधा याच गोष्टीचं दडपण आल्यानं मॅडीन्सनने माघार घेतली. तीन कसोटी सामने खेळलेला मॅडीन्सन वास्तविक ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक होता. मात्र त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांसाठी मनानं तो आत्ताच थकलाय.

याआधीही नेमक्या ऑस्ट्रेलियात अशा तऱ्हेच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ठळकपणे जाणवणारी एक घटना वेगवान गोलंदाज शॉन टेट याची. टेट हा ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान जेफ थोम्सनसारख्या शैलीत गोलंदाजी करायचा. फलंदाजाचा कर्दनकाळ अशी त्याची ओळख जुनियर स्तरावर असतानाच झाली होती. गाजावाजा करत त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं.

दर ताशी १५५ मैल वेगानं बॉल टाकायचा त्यानं सपाटा लावला होता. शोएब अख्तरने आखलेल्या विक्रमाच्या तो अगदी जवळ होता. त्याचा इंग्लंडमधल्या एका सामन्यातला चेंडू १६१.१ दर ताशी मैलाच्या वेगाने पडला होता. जो शोएबच्या विक्रमाच्या अगदी नजीकचा होता. पण जेमतेम चारेक वर्ष तो ऑस्ट्रेलियाकडून खेळला. २००८ मधे त्यानं आपण काही काळ निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. तेव्हा तो अवघा २५ वर्षाचा होता. त्याच्या या निर्णयानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

‘व्यावसायिक क्रिकेटने मला शारीरिक आणि मानसिक थकवा आणलाय’ असं तो सांगतो. यानंतर थोडं फार आंतरराष्ट्रीय क्रिकेट तो खेळला. पण लवकरच २०११ मधे तो पूर्णतः निवृत्त झाला. आयपीएसमधे खेळताना त्याचे माशूम या भारतीय मॉडेलशी प्रेम जुळले आणि दोघं विवाहबद्ध झाले. सध्या टेट भारतातच रहातो. पण त्याचं तसं अवचित, अकाली निस्तेज होणं अपेक्षित नव्हतं.

हेही वाचा : फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?

आणि तो धायमोकलून रडला!

ऑस्ट्रेलियातले व्यावसायिक क्रिकेटपटू जीव तोडून खेळतात यात शंका नाही. ते शिवीगाळ करतात. खडूस वागतात. याचं कारण ते जिंकण्यासाठीच खेळत असतात. पण एवढं सर्वस्व देऊन खेळत असल्यानं त्यांची दमछाक होते, असा एक निष्कर्ष काढता येतो. 

असाच एक खेळाडू किम युजेस पॅकर सर्कस ही क्रिकेट लीग संपल्यावर फार प्रसिद्ध झाला. पॅकर सर्कसनंतर तो कर्णधार झाला. तेव्हा त्याच्या हाताखाली बहुतेक नवोदित खेळाडू होते. पण १९८० नंतर पॅकर सर्कशीत अनुभवी खेळाडूही सामील झाले. त्याचबरोबर ग्रेग चॅपेल, रॉडनी मार्श, डेनिस लिली या तीन महान खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं. मात्र मंडळानं संघाचं नेतृत्व किम युजेसकडेच ठेवलं. 

याचा मार्श-लिली यांना राग होता. तर ग्रेग चॅपेल आपल्या मर्जीनुसार कधी उपलब्ध व्हायचा कधी नाही. मात्र मार्श-लिली जाणून बुजून किम युजेसचा पाणउतारा करायचे. त्याला सहकार्य द्यायचे नाहीत. शेवटी ऍशेस मालिकेच्या वेळी युजेसनं आपण नेतृत्व सोडत आहोत असं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तेव्हा तो धायमोकलून रडला होता. या घटनेवरून खेळाडूंवर किती तऱ्हेचे ताणतणाव असतात याची कुणालाही कल्पना येईल.

ताण विसरण्यासाठी शेती करणारा खेळाडू

इंग्लंडचा मार्क ट्रेसकोथिक यानंही कारकीर्द ऐन बहरात असताना मनःस्वास्थ्य ठीक नसल्यानं काही काळ निवृत्ती घेतली होती. नंतर तो क्रिकेट खेळला पण त्यात पूर्वीचा दम उरला नव्हता. प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू फ्लिनटॉफ यानंही असंच मधेच क्रिकेट सोडलं होतं. यात इंग्लंडचा फलंदाज थोर्पे वेगळा ठरतो. पत्नी गरोदर राहिल्यानंतर थोर्पेनं क्रिकेट सोडणार असल्याचं जाहिर केलं. त्याला कुटुंबाला वेळ देणं महत्वाचं वाटलं.

म्हणजे केवळ ऑस्ट्रेलियाच्याच नव्हे तर इतरही देशाच्या खेळाडूंना ताण जाणवतो. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जाणवणाऱ्या समस्या अधिक असाव्यात. म्हणून त्यांची संख्या याबाबत लक्षणीय आहे. पण त्यांचा फलंदाज फिलीप युसेज याचं उदाहरण वेगळंच आहे.

त्याला कधी ऑस्ट्रेलियन संघाच्या आत तर कधी बाहेर रहावं लागायचं. याचा ताणा त्याला जाणवायचा. पण खूपच ताण आला की तो सरळ आपल्या घरी जायचा आणि आपल्या मोठ्या बागायती शेतीत काम करायचा. त्यानं त्याला क्रिकेट विसरायला व्हायचं. मन ताजंतवानं झालं की तो फिरून क्रिकेटच्या मैदानावर उतरायचा. दुदैवानं टेस्ट मॅट खेळताना त्याच्या डोक्याला बॉल लागल्यानं त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा :  इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

कोहलीलाही आलाय ताण

आपणही मॅक्सवेल सारख्याच्या मनोवस्थेतून गेलोय असं परवा भारताचा कर्णधार विराट कोहलीनंही मान्य केलं. २०१४ मधला इंग्लंड दौरा विराटला फलदायी ठरला नव्हता. तो धावा काढण्यात अपयशी ठरला. त्यानं तो एवढा निराश झाला होता की क्रिकेटच सोडून द्यावं असं त्याला वाटायला लागलं होतं. मोठ्या हिंमतीनं तो या मनोवस्थेवर मात करू शकला.

जेव्हा प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या, क्रिकेट समीक्षकांच्या अपेक्षा वाढतात तेव्हा त्याचं ओझं क्रिकेटपटूला जाणवू लागतं. थोडंसं अपयशही चर्चेचा विषय ठरलं की खेळाडू दबून जातो. बऱ्याचदा दुखापती, कौटुंबिक समस्या यासुद्धा त्याला बेजार करून असतात. पण याचा विचार कुणी करत नाही.

महान सचिन तेंडूलकर टेनिस एल्बोमुळे हैराण होता. तेव्हा त्यालाही क्रिकेट सोडावं लागणार या विचारानं कासावीस केलं होतं. सुदैवानं पत्नी अंजलीनं साथ दिल्यानं तो त्या मोठ्या दुखण्यातून बरा झाला होता. त्याला तर मैदानावर उतरताना नेहमीच चाहत्यांचे अपेक्षांचं मोठं ओझं घेऊन उतरावं लागायचं. पण तो त्याखाली कधीच दबला नाही. राहुल द्रविड सारखा फलंदाज म्हणूनच त्याला मान देतो.

अति क्रिकेटमुळे खेळाडू खचतात

जेव्हा वारंवार दौरे करावे लागतात, कुटुंबापासून दूर रहावं लागतं, दुखापती सतावतात, तेव्हा कुणीही मनानं खचतो. क्रिकेटचे सामने लागोपाठ ठेवले जातात याबद्दल खरंतर मंडळाला दोषी मानायला पाहिजे. अति क्रिकेटमुळे आज खेळाडू खचताना दिसत आहेत. पैसा, प्रसिद्धी यासाठी जीवतोड मेहनत करायची हे ज्यानं त्यानं आपलं मनोबल लक्षात घेऊन ठरवायला पाहिजे. 

सध्या भारतीय निवड समिती प्रमुख खेळाडूंना अधनंमधनं विश्रांती मिळेल हा दृष्टीकोन ठेऊन संघनिवड करते. आत्ता तीन तीन संघ तयार होतील एवढे गुणी खेळाडू उपलब्ध असल्यानं ही कसरत जमणारी आहे. पण जिथं अशा तऱ्हेचं संख्याबळ नाही तिथे काही मोजक्या खेळाडूंवरच भार पडतो.

दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट मंडळ त्यांचा गोलंदाज आलन डोनाल्ड याला दोन मालिकांच्यामधे कुटुंबासह कुठेतरी सहलीला पाठवत असे. या सहलीचा सगळा खर्च मंडळाकडून केला जायचा. हा डोनाल्ड जगातला सर्वात वेगवान गोरा गोलंदाज म्हणून नावाजला होता. आता डोनाल्डसारखे खेळाडूही त्यांच्याकडे नाहीत आणि मंडळाकडे तेवढे पैसेही नाहीत.

बऱ्याच क्रीडातज्ञांनी सर्व खेळाडूंना सल्ला दिलाय, मोबाईल आणि एकूणच सोशल मीडियापासून दूर रहा. म्हणजे येणाऱ्या उनाड, अतिरेकी प्रतिक्रियांचा परिणाम होणार नाही. हे खरंय. मन ताजंतवानं हवं. तरच हातून चांगली कामगिरी होऊ शकते. मन चंगा तो यश की गंगा!

हेही वाचा :  

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

भरकटलेल्या समाजात राहणाऱ्या भटक्यांची एक गोष्ट

सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा

अश्विनची मुरलीधरनशी बरोबरी, आता कुंबळेंचा रेकॉर्ड मोडणार?