गौतम गंभीर: यशाचं श्रेय त्याला कधीच मिळालं नाही

०७ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. बराच काळ टीमबाहेर असणाऱ्या गंभीरची निवृत्ती अनपेक्षित नव्हती. तरीही क्रिकेटरसिकांच्या या दोनेक पिढयांना ती चटका लावून गेली. त्याने केलेल्या जिगरी विजयी खेळी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. थँक्यू गौतम गंभीर म्हणत सोशल मीडियावरून क्रिकेट रसिकांना त्याला अलविदा म्हटलं.

तारीख २ एप्रिल २०११.

वेळ रात्रीचे आठ.

साऱ्या देशाचा श्वास रोखला गेला. जे २८ वर्षात घडलं नव्हतं ते करण्याची संधी दार ठोठावत होती. पुन्हा इतिहास रचण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम सज्ज होता. मात्र त्याच वेळी त्या वर्ल्ड कपच्या फायनलमधे श्रीलंकेविरुद्ध भारताची परिस्थिती नाजूक होता. सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे भारताचे अगदी भरवशाचे बॅट्समन तंबूत परतले होते.

इतका दबाव असताना एक जण मात्र मैदानात खंबीरपणे उभा होता. त्याने अजूनही हार मानली नव्हती. काहीही करून टीमला या बिकट परिस्थितीतून बाहेर काढायचा निश्चय त्याने केला होता. तो बॅट्समन म्हणजे गौतम गंभीर. दिल्लीचा डावखुरा चिवट क्रिकेटपटू. शेवटपर्यंत लढत राहायचं असं जणू त्याच्या रक्तातच भिनलं होतं.

त्यामुळे नवोदित विराट कोहलीला घेऊन अडचणीत सापडलेल्या भारतीय टीमच्या डावाला त्याने आकार दिला. कोहली बाद झाल्यानंतरही त्याने आपला लढा सुरूच ठेवला. पुढे अधिक विकेट जाऊ न देता कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसह गौतमने महत्त्वाची भागीदारी रचली. भारताला विश्वचषक विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं.

वर्ल्डकपमधली ऐतिहासिक खेळी

गौतमने ९७ रनसह या वर्ल्ड कप स्पर्धेतली सगळ्यात महत्वाची खेळी केली. त्याच्या खेळीने भारताच्या विजयाचा पाया रचला. २८ वर्षांनतर भारताने वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली. या विजयानंतर हा धोनीचा वर्ल्डकप असं अनेकांनी म्हटलं. कारण धोनीने अखेरपर्यंत संघर्ष करत ९१ धावांची ऐतिहासिक खेळी केली. हे खरं असलं तरी या विजयात गौतम गंभीरचाही सिंहाचा वाटा होता, हे कुणीला नाकारू शकत नाही. 

तो सचिनसारखा देव नव्हता. तो युवराज किंवा धोनीसारखा सेलिब्रेटी नव्हता. तो सेहवागसारखा अतिआक्रमकही नव्हता. तरीही त्याने टीम इंडियाला गरज होती, तेव्हा अशक्य ते शक्य करून दाखवलं. त्याच्या दोन खेळी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहल्या जातील. एक, २०११ ची वर्ल्डकप फायनल आणि दुसरी, २४ सप्टेंबर २००७ रोजी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये गौतम केलेली ७५ धावांची खेळी.

त्याच्या याच खेळीमुळे भारत पाकिस्तानपुढे कडवं आव्हान उभं करू शकला. त्यादिवशी भारताने विश्वविजयाला गवसणी घातली. मात्र त्या फायनल मॅचमधील विजयानंतर इरफान पठाण आणि जोगिंदर शर्माच्या नावाची चर्चा जास्त झाली. दोन वर्ल्डकप विजयात सिंहाचा वाटा असूनही गौतम गंभीर हे नाव कायमच पडद्याआड राहिलं. यशाचं श्रेय त्याच्या वाट्याला फारसं आलं नाही.

हार मानेल तो गंभीर कसला

२२ यार्डाच्या पीचवर कायमच आक्रमक, कधीही हार न मानणारा, जिगरबाज आणि कुशल लीडर ही गौतम गंभीरची ओळख होती. मात्र भारतीय टीममधे त्याने एंट्री केली तेव्हा त्याच्या खेळीत अनेक दोष असल्याचं सांगितलं गेलं. त्याची बॅटिंग  तंत्रशुद्ध नव्हती. तरीही बॅकफूट नज, ऑफ साईड स्लॅश आणि फ्लिकच्या जोरावर त्याने खोऱ्याने धावा कुटल्या. यात त्याची मैदानात टिकून राहण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती याचंही तितकंच महत्वाचं योगदान होतं.

कुणीही परफेक्ट नसतो. अगदी गंभीरसुद्धा. सुरवातीच्या काळात त्याच्याकडून अनेक चुका होत होत्या. याच चुकांमुळे तो टीममधून आत बाहेर होत होता. मात्र हार मानेल तो गंभीर कसला. पुन्हा नेटमध्ये जाऊन आपल्या चुका सुधारत त्याने वेळोवेळी भारतीय टीममधे दमदार पुनरागमन केलं.

कधीही खचून जायचं नाही आणि साऱ्यांना पुरून उरायचं, असा स्वाभिमान त्याच्याकडे होता. त्यामुळेच आक्रमक सलामीवीर म्हणून त्याने भारतीय टीममधे स्वतःचं स्थान कमावलं. इतकंच नाही तर सेहवागसोबत भारतीय क्रिकेट इतिहासातील सगळ्यात यशस्वी सलामीवर जोडी म्हणून त्याने नाव कमावलं.

आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध

बॅटिंगची आक्रमक शैली आणि मुळात त्याचा आक्रमक स्वभाव यामुळे गंभीरने वनडे क्रिकेटमध्ये स्वतःची जागा निश्चित केली. तरीही त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतली महत्वाची खेळी होती, ती २००९ साली न्यूझीलंड दौऱ्यातली. त्याच्याकडे कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक असं तंत्र नाही, असं दिग्गज सांगत असताना त्याने ६३२ मिनिटांची मॅरेथॉन खेळी करत नेपियर कसोटी वाचवली.

त्याच्या या चिवट खेळीमुळेच न्यूझीलंडचा विजयाचा घास हिरावण्यात भारताला यश आलं. त्याच दौऱ्यातील अखेरच्या कसोटीतल्या दुसऱ्या डावात १६७ धावांची खेळी करत गंभीर भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. २००२ मधे एकाच टेस्ट सीरिजमधे दोन डबल सेंचुरी झळकावण्याचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर आहे. तरीही टेस्ट क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये जवळपास चाळीसची सरासरी असणाऱ्या गौतमच्या वाट्याला म्हणावं तसं यशाचं श्रेय आलं नाही.

बॅटिंग करताना तो आडनावापेक्षाही जास्त गंभीरपणे खेळायचा. विजयासाठी अखेरपर्यंत झुंज द्यायची, हे त्याने मनाशी पक्क केलं होतं. टीमचा विजय हेच त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं. त्यामुळे त्यासाठी वाट्टेल ते करायचं आणि लढा द्यायचा, अशी त्याची वृत्ती होती. त्याच्या याच स्वभावामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंशीही त्याचे मैदानात अनेक वाद रंगले. मग तो पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी असो किंवा मग कामरान अकमल.

मैदानातही तितकाच वादग्रस्त

अरे ला का रे म्हणत उत्तर देण्याची खुमखुमी गंभीरमध्ये होती. आफ्रिदी आणि कामरान अकमलसोबत झालेला गंभीरचा वाद क्रिकेट रसिक कधीच विसरू शकणार नाहीत. केवळ प्रतिस्पर्धी टीमचे खेळाडूच नाही तर भारतीय क्रिकेटरसोबतही गंभीरचे मैदानात वाद रंगले. रणजी सामन्यात मनोज तिवारीसह दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानातील त्याची तू तू मैं मैं टोकाला गेली होती.गंभीरने तिवारीला शाम को मिल असं म्हणण्यापर्यत हा वाद टोकाला गेला होता. दोघांचा हा वाद रणजी मॅचपर्यंतच राहिला नाही तर आयपीएलमधेही दोघं भिडले.

भारताचा सध्याचा कॅप्टन विराट कोहलीसोबतही गंभीरचा वाद झाला. आयपीएलच्या एका मॅचमधे गंभीर आणि कोहली आमनेसामने उभे ठाकले. या सगळ्या वादांत गंभीरचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ किंवा शत्रुत्व नव्हतं, हेही तितकंच खरं. टीमच्या विजयासाठी काहीही करण्याची जिद्द आणि नेतृत्व गुणांमुळे गंभीर मैदानात वादही अंगावर ओढवून घ्यायचा. हे वाद त्याच्या खेळाचा भाग होते. पण त्यातून त्याचं कायम नुकसानच झालं. 
 
एक बॅट्समन म्हणून गंभीर जितका यशस्वी ठरला तितकच यश त्याला कॅप्टन म्हणूनही मिळालं. सहा मॅचमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची संधी गंभीरला मिळाली. या सहाही मॅचमधे विजय मिळवण्याचा पराक्रम गंभीरने करून दाखवला. आयपीएलमधेही गंभीरने आपल्या नेतृत्वगुणांची छाप पाडली. कोलकाता नाईट रायडरचा कॅप्टन म्हणून स्वतः खोऱ्याने धावा करत टीमसमोर त्याने आदर्श घालून दिला. कोलकाता नाईट रायडर टीमला त्याने दोनदा जेतेपद मिळवून दिलं.

स्वतःहून कॅप्टनशिपला रामराम

परिस्थिती कशीही असो, त्याच्या खेळण्यात आणि वागण्यात कधी नकारात्मकपणा नव्हता. कुशल नेतृत्वगुणांद्वारे टीम सहकाऱ्यांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचा गंभीरने प्रयत्न केला. गेल्या आयपीएलच्या हंगामात त्याची म्हणावी तशी कामगिरी होत नव्हती. त्यामुळे स्वतःहून टीमची कॅप्टनशिप सोडली. असा गंभीरसारखा दुसरा खेळाडू होणे नाही.

गौतम गंभीर खेळाडू म्हणून जितका यशस्वी तितकाच तो माणूस म्हणूनही ग्रेट आहे. विविध सामाजिक मुद्यांवर परखडपणे बोलायला तो मागे पुढे बघत नाही. मग तो काश्मीरचा मुद्दा असो किंवा दिल्लीचं प्रदूषण. या विषयांवर संबंधितांना खडे बोल सुनावताना त्याने कधीच मागेपुढे पाहिलं नाही. भारतीय लष्कर आणि जवानांविषयी त्याची आत्मीयता तसंच तळमळ कधीही लपून राहिली नाही.

गाजावाजा न करता देशसेवा

क्रिकेटर झालो नसतो तर भारतीय सैन्य दलाचा जवान होऊन देशाची सेवा केली असती, असं गंभीरने वेळोवेळी म्हटलंय. देशप्रेमाची भावना गंभीरच्या नसानसात भिनलीय. त्यामुळेच की काय सुकमाच्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या २५ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च त्याने उचलला. आशा नावाच्या सामाजिक संस्थेद्वारे दिल्लीत दररोज गरजू आणि गरीबांना मोफत अन्न देण्याचं काम गंभीर करतो. मात्र या कार्याचा त्याने कधीच गाजावाजा केला नाही.

गेल्या काही वर्षात फॉर्म गमावल्याने गौतमला टीम इंडियाचं दार बंद झालं. इंटरनॅशनल क्रिकेटमधून एखादा क्रिकेटर गायब झाला म्हणजे तो संपला असा समज आपल्याकडे आहे. मात्र इथेही गौतम गंभीर सगळ्यात वेगळा ठरला. अखेरपर्यंत रणजी क्रिकेट खेळत त्याने उद्योन्मुख क्रिकेटरना मार्गदर्शन केलं. क्रिकेटच्या मैदानात १५ वर्षे एखाद्या लढवय्याप्रमाणे तो खेळला. 

इतिहासाला दखल घ्यावी लागणार

आपल्या खेळीने त्याने क्रिकेट रसिकांना अनेकदा सेलिब्रेशनच्या संधी दिल्या. हे सेलिब्रेशन होत असताना त्याचं नाव कुठेही घेतलं गेलं नाही. आणि त्याच्याशी त्याला काही देणंघेणं नव्हतं. त्यामुळेच गौतम तू संपलास, अशी प्रांजळपणे स्वतःलाच कबुली देत क्रिकेटला अलविदा करणारा गंभीर विरळाच म्हणावा लागेल. मात्र त्याने आपल्या खेळातून दिलेला आनंद काही संपलेला नाही. क्रिकेटच्या इतिहासालाही गौतम गंभीर या नावाची नोंद नक्कीच घ्यावी लागेल.