या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

१९ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा.

प्रबोधनकार ठाकरे फर्डे वक्ते होते. वक्तृत्वावरचं पुस्तक लिहिणारे अभ्यासू वक्ते. महाराष्ट्र गाजवणारी ठाकरी शैलीही त्यांनीच जन्माला घातली. महाराष्ट्रभर त्यांची व्याख्यानं होतं. १९२६ मधे वसंत व्याख्यानमालांमधे भोर इथं व्याख्यान झालं. विषय होता, ‘दगलबाज शिवाजी’. हे ठाकरी शैलीतलं अत्यंत प्रक्षोभक शीर्षक आहे. तरी त्यात शिवरायांचा सन्मान आणि अभिमानच आहे. इथे दगलबाज या शब्दाचा अर्थ दगाबाज असा नाही तर डिप्लोमॅट, मुत्सद्दी असाय.

कोल्हापूरच्या दासराम बुक डेपोने प्रकाशित केलेल्या दगलबाज शिवाजी SHIVAJI THE DIPLOMAT या चाळीस पानांच्या छोट्या पुस्तिकेत शिवरायांवरचे सगळे आरोप तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढलेत. दोन अडीच आणे किंमतीचं हे पुस्तक त्या काळी खूपच लोकप्रिय झालं होते. त्याच्या अनेक आवृत्त्या काढाव्या लागल्या होत्या.

आज जवळपास शंभर वर्षांनंतरही प्रबोधनकारांचे दगलबाज शिवाजी फार महत्त्वाचे आहेत. म्हणूनच आपण ते समजून घ्यायला हवेत. मूळ लेखातलं व्याकरण जुन्याच वळणाचं ठेवलेलं आहे. तसंच लेख मोठा असल्यामुळे वाचकांच्या सोयीसाठी संपादित केलाय.

 

`There is always a sacred veil to be drawn over the beginnings of all governments.’ Edmund Burke

महाराष्ट्रापुरताच विचार केला, तर आज हिंदूंची तेहतीस कोटी देवांची फलटण पेन्शनींत निघून, त्या सर्वांच्या ऐवजी एकटा शिवाजी छत्रपती परमेश्वर म्हणून अखिल मऱ्हाठ्यांच्या हृदयासनावर विराजमान होऊन बसला आहे. शिवाजी म्हणजे मऱ्हाठ्यांचा कुळस्वामी आणि महाराष्ट्राचा राष्ट्रदेव. `गॉड सेव दि किंग’ या राष्ट्रगीताचे सूर बॅडमधून निघताच इंग्रेज लोकांत जे एक वर्णनीय चैतन्याचें वारे चट्कन् थरारते. तेच चैतन्य एका शिवाजी या नामोच्चारांत अवघा महाराष्ट्र अनुभवतो.

वंदे मातरम् या राष्ट्रगीतालासुद्धा अजून मऱ्हाठ्यांची अंत:करणे काबीज करतां येत नाहीत; याचे कारण शिवाजी शिवाय इतर कसल्याहि भावनेला तेथे जागाच उरलेली नाही. एवढे ज्या शिवरायाचे महात्म्य, त्याला `दगलबाज’ हे विशेषण लावणेचे धाडस प्रबोधनकारासारख्या जातीवंत म-हाठ्याने करावे, ही वस्त्रगाळ निमकहरामी होय! अशा शंकेचे काहूर वाचकांच्या वृत्तीत उठल्याशिवाय खास राहणार नाही. शिवरायासारख्या राष्ट्रवीराची कुचेष्टा करून, आपली प्रतिष्ठा वाढविणेचा प्रबोधनकाराचा हा बाष्कळ प्रयत्न तर नसेल? असाही कित्येक तर्क बांधतील.

सर्व शंकितांना आम्ही आगाऊच ग्वाही देवून ठेवतो की प्रबोधनकाराच्या खाणीच्या इतिहासात निमकहरामी आणि आत्मप्रतिष्ठा आजपर्यंत कोणालाही आढळलेली नाही. लेखन-संस्काराच्या गंधाक्षता प्रथम वाहून शिवचरित्राला चिरंजीव करण्याची आद्य कामगिरी याच खाणीतल्या बखरकारांनी बजावलेली आहे.

कालौघाने शिवरायाच्या शिवचारित्र्यावर लौकिकी कल्पनांनी जर भलभलत्या रंगांचा मारा करून, त्याचे खरे उज्वल रूप विकृत केले असेल, अगर ते तसे झाले असेल, तर त्याचा सप्रमाण मुद्देसूद निरास करून, लोकमताच्या वाजवी प्रबोधनासाठी प्रबोधनकाराने आपले शिवप्रासादिक कलमास्त्र परजणे, त्याचे कर्तव्यच आहे. हे कटु कर्तव्य आहे. कल्पनेने किंवा अंधश्रद्धेने काढलेले शिवरायाचे चित्र बाजूला सारून, त्या राष्ट्रवीराची खरीखुरी प्रतिमा धिटाईने लोकापुढे मांडणे, म्हणजे लोकक्षोभाला बळेच आव्हान देण्याइतकेच भयंकर काम आहे. पण ते कोणी तरी केव्हा तरी करणेच प्राप्त असल्यामुळे, लोकक्षोभाची पर्वा न बाळगतां हौसेने ते आम्ही आपल्या शिरावर घेतले आहे.

हेही वाचा : शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

शिवरायास आठवावे का आठवावे? आम्हाला तो नित्य आठवतोच का? विसरू म्हटले तरी तो का विसरला जात नाही? शिवरायाने केले तरी काय, की त्याचे महाराष्ट्राने आमरण स्मरणच करावे? माणसांची माणुसकी त्यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याने होत असते. ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही, परकीयांच्या राजसत्तेखाली जे जगत असते, त्या राष्ट्रांतल्या माणसांना `ह्युमेन कॅटल’ माणशी गुरेढोरे हीच संज्ञा यथायोग्य शोभते. शिवाजीच्या हृदयांत राष्ट्रधर्माच्या या तीव्र भेदाची विद्युल्लता चमकेपर्यंत, सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत, महाराष्ट्रातला हिंदू म्हणजे ह्यूमन कॅटल बनलेला होता.

तोंड असून मुका, कान असून बहिरा, डोळे असून आंधळा आणि माणूस असून परकीय मुसलमानी सत्तेच्या पखाली वाहणारा बैल होऊन राहिला होता. गुलामगिरीचा पेंड कडबा खाऊन खाऊन हा बैलसुद्धा इतका मस्तवाल बनला होता, की इस्लामी मानपानाच्या नक्षीदार झुली घुंगुरमाळांनी नटलेल्या त्याच्या अनेक पुढारी नंदीबैलांनी शिवाजीच्या राष्ट्रीय प्रबोधनकार्यांत शेकडो वेळा शिंगे खुपण्यास कमी केले नाही.

महाराष्ट्राला माणुसकी देण्याच्या महत्कार्यांत विरोधाचे जितके जितके बाण शिवाजी गरुडाच्या काळजात घुसले, तितक्या तितक्या बाणांचा पिसारा स्वकीयांच्याच पंखाचा होता. दारच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षां घरच्या विरोधकांशी झगडण्यातच शिवाजीच्या अर्ध्याअधिक हिंमतीचा होम करावा लागला. अशा अवस्थेतही शक्तियुक्तिची पराकाष्ठा करून, शिवाजीने महाराष्ट्राला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा सोहळा दाखवून, मराठ्यांना पशूवृत्तीतून माणसांत आणून बसविले. जी गोष्ट एका काळी अखिल महाराष्ट्राला अशक्य वाटत होती, आजही जी पुन्हा अशक्य अशक्य अशक्य म्हणून परिस्थिती आम्हाला दटावून बजावीत आहे, ती नेमकी गोष्ट शिवाजीने शक्य करून दाखविली. 

या एकाच कारणासाठी महाराष्ट्राने शिवरायाला अखंड आठवले पाहिजे आणि तसा तो आठवीतही आहे. परंतु, शिवरायाच्या चरित्राकडे महाराष्ट्र आज ज्या दृष्टीने पहात आहे ती आमच्या हाडीमासी भिनलेल्या अवतारकल्पनेने आरपार बुरसटून गेलेली असल्यामुळे, शिवरायाच्या विकृत चरित्र-चित्राच्या भजनी आमची टाळकुटी भावना फुकट खर्ची पडत आहे. इतकेच नव्हे, तर त्यामुळे शिवाजीच्या राष्ट्रोद्धारक विराट व्यूहाबद्दल आम्हाला फारसा गंभीरपणाही वाटेनासा झाला आहे.

शिवाजीचा स्वराज्योपक्रम म्हणजे ईश्वरी संकेताने आणि `समर्थांच्या’ कृपेमुळे सहजगत्या घडून आलेला एक नवलाईचा चमत्कार, इतक्या हलक्याफुलक्या भावनेने आम्ही त्या प्रचंड प्रबोधनाकडे पहात आहो. पुराणांच्या पारायणाने पंगू बनलेल्या आमच्या मनोवृत्तीला, शिवचरित्राची कमावणी कसकसल्या भयंकर दिव्व्यातून होत गेली, याची जाणीवही होईनाशी झालेली आहे. शिवचरित्रातील मोठमोठे प्रसंग म्हणजे बाल-कृष्णाच्या पूतनाकर्षणाप्रमाणे `ईश्वरलीला’ वाटतात. कोणत्याहि पुरुषोत्तमाच्या चारित्र्यावर एकदा का अवतार कल्पनेचा सफेदा चढला आणि त्याची सर्व लहानमोठी बरीवाईट कृत्ये `ईश्वरीलीला’ सदरात पडली की त्या चरित्रापासून आत्मोद्धारार्थ लागणारे स्पिरिट मनुष्याला केव्हाही प्राप्त होत नसते. 

रामकृष्णांची उज्वल चरित्रें आज आमच्या व्यवहारांत कवडीमोल होऊन बसली आहेत, याचे तरी कारण हेच. रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप हे ग्रंथ म्हणे चातुर्मासांत सोवळ्याने वाचायचे आणि श्रोत्यांनी झोपांच्या डुलक्यात ऐकायचे. का? तर म्हणे तेवढेच पुण्य गाठी! मराठी महाभारत कपाटाच्या शोभेला. टिळकांचे गीतारहस्य देवघरात फक्त पूजेला. का तर टिळक म्हणे शेषशायी चतुर्भुज भगवान! टिळकांना भगवान बनविल्याशिवाय आम्हा नादान हिंदूंच्या भाविकपणाचा भाव कसा वाढणार? जिकडे पहाल तिकडे पौराणिकी दृष्टीचा अडथळा.

हेही वाचा : लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

शिवाजीचा काळ होऊन आज अडीचशे वर्षे झाली, तरी देखील त्याच्या चारित्र्याला जगाची एकमुखी मान्यता अजून मिळालेली नाही. महाराष्ट्राला तो परमेश्वरावतार वाटत असला, तरी एकट्या हिंदूशिवाय इतर सर्व जगाला तो दगलबाज, डोंगरांतला उंदीर, उपटसुंभ असाच वाटतो. पुण्यात कै. शाहू महाराज करवीरकरांनी शिवाजी मेमोरियलचा धाडशी प्रयोग केल्या दिवसापासून राज्यकर्त्या इंग्रेजी नोकरशाहीची शिवाजीविषयी भाषा किंचित नरमलेली आहे. निदान ओठांवर तरी बरीच साखर चमकते, मग पोटात काय असेल ते पोट जाणे! 

परंतु शिवछत्रपतीची जगमान्यता अजून जवळजवळ साशंकावस्थेतच आहे, असे कबूल केल्याशिवाय सुटका नाही. याचे कारण काय? राष्ट्रवीरांची कीर्ती जगविश्रुत करण्याची कामगिरी वास्तविक इतिहासकारांनी करावयाची असते. परंतु आमचे मऱ्हाठी इतिहासकार अथपासून इतिपर्यंत एकजात पुराणिक. पौराणिकी साच्याशिवाय त्यांची विद्वत्ता कशांतही ठाकठीक बसायची नाही. प्रथम शिवाजीला ते परमेश्वराचा अवतार बनवतील, कौसल्येप्रमाणे जिजाबाईला दिल्लीपति मोंगलाच्या वधाचे डोहाळे पाडतील, तेव्हां कोठे त्यांना `शिवसंभव’ दिसायचा. 

थोडासा सत्याचा धागा, त्यांवर यांच्या कल्पनेच्या कोलांट्या उड्या! ना त्यांत विवेक, ना चिकित्सा, ना साक्षेप. येथून तेथून भावनावशतेचा खरकटवाडा, शक्याशक्यतेचा विचार नाही, परिस्थिती परीक्षणाची दृष्टी नाही, फार काय पण, मानवी स्वभाव ओळखण्याचीहि अक्कल नाही. काय म्हणे. `शिवाजी सोळा वर्षांचा झाला नाहीं तोच त्याने आडदांड लोकांची संगत धरून देशांत पुंडाई आरंभिली.’ ही आमच्या शिवरायाच्या चरित्राची सुरुवात आणि ती क्रमिक इतिहासपुस्तकातून आमच्या मुलांना पढवायची. आडदांड लोकांची संगत धरून देशात पुंडाई आरंभणाऱ्याला जर स्वराज्य स्थापन करता येते, तर आज गावोगावचे गुंड राष्ट्रवीर का बनत नाहीत?

या सर्व दोषामुळे आमच्या जुन्या बखरी आणि सध्याचे इतिहासग्रंथ शिवाजीच्या जगमान्यतेच्या कामी नालायक ठरलेले आहेत. आमच्या लाडक्या हीरोबद्दल कोणी वाईट बोलला तर त्याच्या विधानाला समर्पक प्रत्युत्तर देण्याऐवजी आम्ही नुसत्या शिव्याश्रापांवरच आमच्या इतिहासविषयक प्राविण्याचे प्रदर्शन करतो. नाहीतर आमचा हीरो ईश्वरावतारच असल्यामुळे त्याच्या सर्व बऱ्यावाईट कृत्यांना पुराणांच्या पोतड्यातील राम कृष्णांच्या तत्सम कृत्यांचा पाठपुरावा दाखवून, `या देवाच्या लीला, माणसांना कसच्या कळणार!’ म्हणून शेरा ठोकून स्वस्थ बसतो. 
शिवाजीला कोणी दगलबाज म्हटले की आमच्या नाकाचा शेंडा फुरफुरू लागतो. पण शिवाजी दगलबाज कसा नव्हे? का असू नये? याचा मात्र विवेकशुद्ध विचार आम्हाला कधी सुचायचा नाही. रूढ पौराणिकी मताची पर्वा न करता हा विचार खुलासेवार आज चर्चेला घेतला आहे.

पुढे वाचाः दगलबाज शिवाजी : भाग २

हेही वाचा : 

असा झाला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा

महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?