भाव नसल्याने दूध सांडणारे शेतकरी लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?

०६ मे २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट.

स्वातंत्र्योत्तर काळातल्या हरितक्रांती नंतर डॉ. वर्गीस कुरीयन यांनी केलेल्या प्रयत्नांनी दुधाचं उत्पादन दुप्पट करणारी धवल क्रांती भारतात साकार झाली. या दुधाच्या महापुराने महाराष्ट्रातलं शेतीचं अर्थचक्रही गतिमान झालं. अनेक शेतकऱ्यांसाठी त्यांचं उत्पन्न दुप्पट करणारं ठरलं. मुबलक प्रोटीन, कॅल्शिअम, विटॅमिन बी २ आणि बी १२ आणि विटॅमिन डी असणाऱ्या दुधाला आपल्या पारंपरिक आहारशास्त्रात पुर्णान्न मानण्यात आलंय.

नव्वदीच्या दशकात बालपणात 'दूधभात', तारूण्यात 'सुहागरात' आणि वृद्धावस्थेत 'संधिवात’ यासाठी दूध हेच हमखास देशाचं एनर्जी ड्रिंक होतं. मुक्त अर्थव्यवस्थेनंतर क्रिकेट प्लेअर आणि सेलिब्रिटींनी कोका कोला, पेप्सी यांच्या जाहिरातींचा तोफखानाच डागला. आणि दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या ग्राहकांना कोल्ड ड्रिंक्स कडे वळवण्याचा 'मल्टीनॅशनल प्लॅन' भलताच यशस्वी झाला.

हेही वाचा: महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं

दुधाविषयी असंख्य वाद प्रतिवाद

आधुनिक आहारतज्ञांनी दुधाला बाधक आणि अपायकारक घोषित करत, त्याला मांसाहाराच्या बरोबरीचं ठरवलं. दुधात लोह नसल्यानं त्याला पूर्णअन्न मानायला नकार दिला. नंतरच्या काळात दूध प्यावं की नको? चांगलं दूध कोणतं गाईचं की म्हशीचं? विदेशी गाईचं की देशी गाईचं? फूल क्रीम, टोन्ड की स्किम्ड? होमोजिनाइज का पाश्चराइज? असे अनेक संभ्रम निर्माण झाले. न्यूझीलंडचे संशोधक केथ वुडफोर्ड यांच्या 'डेविल इन द मिल्क' या ग्रंथाने जगभरात चांगलीच खळबळ माजवली.

ए-१ दुधाने मधुमेह, हदयविकार आणि ऑटीझम अर्थात स्वमग्नतेचा धोका उद्भवतो, असा वादग्रस्त दावा करण्यात आला. युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटीने आपल्या अहवालात ए-१ दुधावरचे बरेच आरोप फेटाळले. मात्र दुधाविषयी इतके वाद प्रतिवाद होऊनही ‘दूध का दूध और पाणी का पाणी' कधीच झालं नाही. लॉकडाऊनमुळे हॉटेल, स्वीट मार्ट वगैरे सर्व बंद असूनही शेतकरी कुठेच दूध मातीमोल भावाने विकताना किंवा रस्त्यावर फेकताना दिसत नाहीत.

भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणात वापरलं जातं असा मेसेज सोशल मिडियावर प्रचंड वायरल होतोय. यात काही प्रमाणात सत्य असलं तरी त्याला खरं मानणं अर्धसत्यच ठरेल. आंदोलनात टोकाची भूमिका घेत रस्त्यावर दुधाचे टँकर ओतल्यामुळे दूध उत्पादकांनी जनसामान्यांची सहानुभूती गमावली. मात्र काही लोकांचा गैरसमज असा झाला की रस्त्यावर फेकलं जाणारं दूध जास्तीचं असतं.

लॉकडाऊनमुळे बिघडलं गणित

लॉकडाऊनच्या अगोदर राज्यात ३५० डेअरी ब्रँडच्या माध्यमातून दररोज दीड कोटी लिटरच्या आसपास दूध संकलन व्हायचं. तर सव्वादोन कोटी लिटरच्या आसपास दूध विकलं जायचं. गुजरातमधून अमूलचं आणि शेजारच्या इतर राज्यातून ३० लाख लिटरच्या दरम्यान दूध येतं. तरीही दूध संकलन आणि वितरण यामधलं साधारण ४० लाख लिटर तफावतीचं गौडबंगाल कायम राहतं. त्यामुळेच महाराष्ट्रात भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री होते. हा शेतकरी संघटनेचा आरोप खरा ठरतो.

संकलित दुधापैकी व्यावसायिकांना ६० लाख लिटरच्या आसपास होणारा पुरवठा लॉकडाऊनमुळे ठप्प झालाय हे वास्तव आहे. पश्चिम महाराष्ट्रात दररोज १ कोटी १० लाख लिटरच्या आसपास दूध संकलन होणाऱ्या ५ जिल्ह्यात ९० लाख लिटरच दूध संकलन होतंय. गोकुळ, वारणा, कृष्णा, शाहू, चितळे यासारख्या हिशेबाच्या टीटीएलएल म्हणजेच 'टू द लास्ट लिटर' या काटेकोर प्रणालीवर चालणाऱ्या मोठ्या डेअरींचं गणित लॉक डाऊनमुळे पार बिघडलंय.

पुणे प्रादेशिक दूध व्यवसाय विकास कार्यालयाच्या माहितीनुसार, दररोज साधारणपणे ८० लाख लिटर दूध पावडर निर्मितीसाठी पाठवलं जातंय. इंदापूरच्या सोनाई दूध संस्थेचे दशरथ माने यांच्या मते, सध्या दूध पावडरचे दर कोसळत असल्याने आम्हाला नुकसान सहन करावं लागणार आहे. राज्यातलं पहिलं खवा क्लस्टर म्हणून घोषित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कुंथलगिरी परिसरात साधारणपणे ५०० भट्ट्या बंद आहेत. त्यांच्या माध्यमातून ६० टन खवा हैदराबाद, पुणे यासारख्या मोठ्या शहरात पाठवला जायचा. ते काम आता ठप्प आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा: 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

भेसळीमागचं ‘काळंशास्त्र'

या भागातलं जास्तीच दूध अक्षरशः फळबागांना ओतलं जातंय. दूध स्वस्त विकलं तर काळ सोकावेल या दूरदृष्टीने हा 'घाटे का सौदा' पार पडतोय. या क्षेत्रातल्या जाणकारांनुसार, गायी, म्हशी पाळणाऱ्यांच्या घरी खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसवण्याची चिंता तर कधी अधिक नफा कमवण्याची हाव यामुळे दुधाचा वापर कमी होता. त्यामुळे दूध उत्पादकांच्या घरातच मोठ्या प्रमाणात दुधाचं कुपोषण असल्यानं हा दूध पिण्याचा कित्येक दशकांचा बॅकलॉग भरून काढला जातोय.

पशुसंवर्धन विभागानुसार, २००७ च्या तुलनेत २०१२ च्या पशुधनात महाराष्ट्रात ९ टक्क्यांची घट झाली. २० व्या राष्ट्रीय पशुगणनेनुसार, राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या माध्यमातून प्रयत्न करूनही, महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत घट झालीय. सततचा दुष्काळ, पाणी टंचाई, चारा पिकं सोडून नगदी पिकं घेण्याचं वाढलेलं प्रमाण आणि शेतीबद्दलची तरूणाईची उदासीनता त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षातही दुधाच्या बाबतीत आपण स्वावलंबी होऊ शकलो नाही.

हा 'बिजनेस स्कोप' लक्षात आल्यानेच रामदेव बाबांचा पतंजली ग्रुप आणि नॅशनल डेअरी बोर्ड सारखे मोठे ब्रॅण्ड महाराष्ट्राच्या या 'मिल्क वॉर' मधे पूर्णशक्तीने उतरलेत. सणासुदीच्या काळात दुधाची मागणी कितीही वाढली तरी पुरवठा कमी होत नाही. असं हे अर्थशास्त्रातलं मागणी पुरवठा सिद्धांताचं सूत्र खोटं ठरवणारं दुधाच्या भेसळीचं ‘काळंशास्त्र' आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडींमधे आणि चॅनेलच्या विविध स्टिंग ऑपरेशनमधला हा गोरखधंदा, 'पब्लिक मेमरी इज शॉर्ट' असल्यानं आपण विसरतो.

दुधाच्या भेसळीमुळे अनेक आजार

प्राचीन काळातल्या ऋग्वेदामधल्या अन्नस्तुती सुक्तामधे अगस्त्य ऋषींनी दुधाचं गुणगान केलंय. महाभारत काळात दुधाची विपुलता असूनही गरिबीमुळे द्रोणपुत्र अश्वत्थाम्याला दूध म्हणून पाण्यात पीठ कालवून दिलं जायचं. ही प्राचीन काळातली सौम्य पण अपायकारक नसल्याने क्षम्य अशी दूधभेसळ! सद्यस्थितीत भेसळयुक्त दूध बनवताना मेलामाईन, पॅराफीन, वे परमिट पावडर, युरिया आणि वॉशिंग पावडर ही धोकादायक द्रव्यं वापरली जातात.

भेसळयुक्त खवा बनवण्यासाठी मल्टोडिस्ट्रीन, टी कॉफी प्रिलिक यांचाही वापर होतो. यामुळे टीबी, कॅन्सर, हायपर टेंशन, किडनी आणि लिवर निकामी होणं आणि मुलांमधे शरीराची वाढ खुंटणं असे घातक आजार होण्याची शक्यता असते. या संदर्भात सुप्रीम कोर्टानं कठोर भूमिका घेऊन डिसेंबर २०१७ मधे एक शिफारस केली. सर्व राज्यांना दूधभेसळीसाठी सध्याची ६ महिन्यांच्या शिक्षेची तरतूद ३ वर्ष ते जन्मठेप अशी करण्यात आली.

दिल्लीच्या इंदिरा आयवीएफ हॉस्पीटलचे वंध्यत्व विकार तज्ञ डॉ. अरविंद वैद यांच्या मते, 'ऑक्सिटोसिन'चा अंश असलेल्या दुधामुळे वंध्यत्वाचं प्रमाण वाढतंय. आयुर्वेदाने बल आणि वीर्यवर्धक मानलेलं दूध आज वंध्यत्वाला कारणीभूत ठरतंय. काही तज्ञांच्या मते, कच्चं दूध पिल्यानं टीबीसारख्या आजारांचा धोका वाढतो. तर 'रॉ मिल्क मुवमेंट'च्या मते, दूध तापवल्याने जीवनसत्त्वांचा ऱ्हास होतो, म्हणून ते कच्चं प्यावं.

हेही वाचा: महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

गुजरातची 'मार्केटिंग स्ट्रॅटेजी' स्वीकारायला हवी

गोरक्षणाचा आग्रह धरणारे गोप्रेमी दूध पिण्याबाबत जागृती करताना दिसत नाहीत. 'अवेरनेस अगेन्स्ट मिल्क कँपेन' करणारे दूध तज्ञ प्रचंड हानीकारक अशा 'कोल्ड ड्रिंक' विरुद्ध जागृती करताना दिसत नाहीत. 'जो दिखता है वो बिकता है' हाच कंज्युमर मार्केटचा मूलमंत्र आहे. सांगली जिल्हा हळदीचा प्रमुख निर्यातदार आहे. दुधाची मुबलक उपलब्धता सांगली, कोल्हापूर पट्ट्यात आहे. पण कोरोनाफिवर मधे इम्युनिटी पॉवर वाढवणारे हळदीचे दूध पहिलं गुजरात राज्यातल्या अमूलने लाँच केलंय.

लॉकडाऊनमधे रामायण आणि महाभारताच्या दरम्यान 'अमूल दूध पिता है इंडिया' चा घोष चांगलाच दुमदुमतोय. पण प्रत्यक्षात 'अमूल'च्या जाहिरातीतले वडील आपल्या बायकोशी खोटं बोलत मुलीला दुधाऐवजी भरपूर आईसक्रीम खाऊ घालताना दाखवलंय. दुधाच्या बाबतीतली विसंगती जाहिरातीत पण पाठ फिरवताना दिसते. पण उन्हाळा नजरेसमोर ठेऊन असा बदल करण्याची गुजराती मार्केटिंग स्ट्रॅटेजी राज्यातल्या डेअरी ब्रॅण्डनी अंगीकारण्याची गरज आहे.

दुधाच्या बाबतीतलं पूर्णसत्य जगासमोर यायला हवं

फ्लेवर्ड मिल्क, ताक, लस्सी या सारख्या 'ओरिजनल हेल्दी ड्रिंक्स'ची जाहिरात करताना डेअरी ब्रँड कमी पडत आहेत. नॅशनल डेअरी बोर्डच्या, मदर डेअरीने आणि पराग मिल्क फुड्सचे देवेंद्र शहा यांनी उन्हाळ्यामुळे दुधाच्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याच सांगितलंय. त्यामुळे हे पदार्थ बनवण्यासाठी दुधाची गरज वाढल्याने दूध उत्पादकांची चिंता बऱ्याच प्रमाणात मिटलीय.

जोपर्यंत दूध रस्त्यावर फेकलं जात नाही तोपर्यंत ते एक्स्ट्रा ठरत नाही, किंवा दुधाचे 'शॉर्टेज' होत नाही म्हणजे ते सर्व भेसळयुक्त आहे. ही दोन्ही विधानं पूर्ण सत्य नाहीत. अन्न हे पूर्णब्रह्म या तत्त्वाने आरोग्यदायी दुधाला अर्धब्रह्म म्हणणं कदाचित वादग्रस्त ठरेल. मात्र आर्थिक उन्नती करणारं दूध शेतकऱ्यांसाठी अर्थब्रह्म ठरणारं आहे, हे मात्र नक्की. पूर्णअन्न मानल्या जाणाऱ्या दुधाच्या अनेक बाबतीतलं पूर्णसत्य जगासमोर येणं गरजेचं आहे. नाहीतर अश्वत्थामासारखंच समोर आलेल्या दुधाच्या पारंपरिक अर्धसत्यावरच आपल्याला तृप्तीची ढेकर द्यावी लागेल.

हेही वाचा: 

‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र

यशवंतराव सांगतात, महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीय

भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईलः यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता

यशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच