दानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट

२२ जुलै २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


रॉयटरचे मुख्य फोटोग्राफर पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधे फिल्डवर असताना तालिबान्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कॅमेरात जे टिपलं ते प्रचंड अस्वस्थ करणारं होतं. रोहिंग्या शरणार्थींचं दुःख दानिश यांच्या फोटोंनी जगभरात नेलं. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. तो मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.

दानिश सिद्दीकी. फोटोग्राफर आणि रॉयटरच्या भारतातल्या 'रॉयटर पिक्चर मल्टीमीडिया टीम'चे प्रमुख. जगभरातल्या व्यथा, वेदनांना त्यांनी निर्भयपणे आपल्या कॅमेरात टिपलं. ते जगभर पोचलं. दिल्लीतली हिंसा, लॉकडाऊन, कोरोनाचं संकट अशा प्रत्येक वेळी जे भयाण वास्तव त्यांच्या फोटोंनी टिपलं ते अस्वस्थ करणारं होतं. अफगाणिस्तानमधे तालिबान्यांच्या हल्ल्यात दानिश शहीद झाले. या बातमीनं जग हळहळलं. एकाच वेळी राग, चीड, संताप सगळं काही व्यक्त झालं.

पुलित्झर मिळवणारे एकमेव भारतीय

दक्षिण दिल्लीतल्या फादर अग्नेल शाळेतून दानिश यांचं सुरवातीचं शिक्षण झालं. पुढे दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. २००७ ला जामियाच्या एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून मास कम्युनिकेशनमधे मास्टर्स केलं. त्यानंतर हिंदुस्थान टाइम्समधून रिपोर्टर म्हणून त्यांच्या करियरला सुरवात केली.

२००८ ते २०१० दरम्यान दानिश यांनी इंडिया टुडेत काम केलं. २०१० ला ते रॉयटर या जगप्रसिद्ध न्यूज एजन्सीशी जोडले गेले. तिथं इंटर्न म्हणून काम सुरू झालं. २०१६-१७ मधे इराक मधलं दुसरं मोठं शहर असलेल्या मोसुल इस्लामिक स्टेटनं ताब्यात घेतलं होतं. ही मोसुलची लढाई फोटो जर्नालिस्ट म्हणून तिथं जाऊन कवर करायची संधी दानिशना मिळाली.

अफगाणिस्तान आणि इराक युद्ध, २०१५ ला नेपाळमधला भूकंप, रोहिंग्या शरणार्थींचा मुद्दा, २०१९ - २० चं हॉंगकाँग लोकशाही आंदोलन अशा अनेक गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कवर केल्या. तसंच दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि युरोपमधल्या इतर अनेक बातम्या कवर केल्या होत्या. रोहिंग्या शरणार्थींच्या मुद्यासाठी म्हणून त्यांना सहकारी अदनान अबीदी यांच्यासोबत फिचर फोटोग्राफीसाठी २०१८ ला पुलित्झर मिळाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

हेही वाचा: रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार

अस्वस्थ करणारी फोटोग्राफी

दानिश यांची फोटोग्राफी हेच त्यांचं काम होतं. तेच बोलायचं. हे फोटो सोशल मीडियातून वायरल झाले. त्यांनी अस्वस्थ केलं. विधायक चर्चा घडवून आणली. तसा सरकारला जाबही विचारला गेला. मागच्या वर्षी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया सीएएविरोधात आंदोलन चाललं होतं. तिथं गोपाळ शर्मा नावाच्या एका अल्पवयीन मुलानं आंदोलकर्त्यांवर बंदूक रोखली होती. दिल्ली दंगलीवेळी त्यांनी काढलेले फोटोही वायरल झाले होते.

रोहिंग्या शरणार्थींचा मुद्दा दानिश यांनी आपल्या फोटोंमधून जगभर पोचवला. ११ सप्टेंबर २०१७ ला बांगलादेश - म्यानमार सीमा पार केल्यावर एक महिला समुद्राच्या किनाऱ्याला स्पर्श करत असल्याचा एक फोटो. पुलित्झर मिळवून दिला त्यापैकी तो एक. शरणार्थींचं हे दुःख जगाच्या वेशीवर पोचवणारं होतं.

कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनच्या काळात भारतातले न्यूज चॅनेल जे दाखवत होते त्यापलीकडे ते कितीतरी भयावह होतं. मजुरी करणारे लाखो लोक मजल दरमजल करत आपापल्या गावी पोचले. तेही हजारो किलोमीटरचं अंतर पार करत. कुणाच्या डोक्यावर ओझं. कुणाच्या खांद्यावर आपलं लहान मूल. असाच एका मजुरानं आपल्या मुलाला खांद्यावर घेतलेला दानिश यांचा फोटो खूप वायरल झाला होता.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर स्मशानात जागा नसणं, त्यामुळे दिल्लीतल्या स्मशानभूमीत दाटीवाटीने जळणाऱ्या चिता, एकाचवेळी एका बेडवर ऑक्सिजन लावलेले दोन पेशंट, शेतकरी आंदोलना दरम्यान काढलेले असंख्य फोटो हे जितकं अस्वस्थ करणारं तितकंच आपल्या फसव्या धोरणांचं आणि जुमलेबाजीचं दर्शन घडवणारं. कोल्हापूरातल्या कुस्ती आखड्यांचे त्यांनी काढलेले फोटोही चर्चेत राहिले. दानिश आज आपल्यात नाहीत पण हे फोटो त्यांना कायम जिवंत ठेवतील.

मृत्यूही स्टोरी कवर करताना

अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य माघारी घेतल्यावर तिथं तालिबान अधिक ऍक्टिव झालंय. तालिबाननं अफगानच्या उत्तर, दक्षिणेतले अनेक भाग आपल्या ताब्यात घेतलेत. सरकारी कार्यालयं उध्वस्त केली जातायत. त्याला अफगाणिस्तानच्या विशेष सुरक्षा दलाकडून प्रतिकार केला जातोय. त्यांच्यासोबत फोटो जर्नालिस्ट म्हणून दानिश हा सगळा संघर्ष कवर करत होते.

दानिश यांनी आपल्या ट्विटरवरून अफगानमधल्या हल्ल्यांचे अनेक फोटो, वीडियो शेयर केले होते. १३ जुलैला ते ज्या गाडीतून जात होते त्याला खेटून एक रॉकेट गेलं होतं. तालिबान्यांनी अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं. या हल्ल्यातून दानिश बचावले. पण रॉकेटला त्यांनी आपल्या कॅमेरात टिपलं होतं. तो वीडियोही त्यांनी शेयर केला होता.

कंदहारमधल्या स्पिन बुलडाक भागातलं मुख्य मार्केट तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यावर १६ जुलैला अफगान सैन्य आणि तालिबान यांच्यात चकमक झाली. दानिश हे त्यावेळी तिथल्या दुकानदारांशी बोलत असल्याचं एका अफगानी कमांडरनं रॉयटरला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय. त्यावेळी झालेल्या चकमकीत वरिष्ठ अफगान अधिकाऱ्यासोबत दानिश यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: 

नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?

बातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय

प्रबोधनकारांच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय माहितीय?

पहिल्या वृत्तपत्रापासूनच मीडियाचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आजही सुरूच