दारिद्र्याची शोधयात्राः आपल्या अवतीभवतीच्या छळछावण्यांचं कथन

२७ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


शेतकरी दारूच्या व्यसनाने आत्महत्या करतात का? हेरंबच्या शोधयात्रेत त्यांना उलटं चित्र दिसलं. कर्जबाजारी शेतकरी अगतिकतेने आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं धैर्य नसतं. दारूचा वासही सहन न होणारे तरणेताठे शेतकरी विष पिण्याचं धाडस होत नाही म्हणून ते दारू पिऊन आत्महत्या करतात.

सुरेश भटांनी म्हटलंय,

‘ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले!’

सारं जग विकासाच्या बुलेट ट्रेनमधे बसून भविष्यातल्या महाशक्तीच्या प्रवासाला निघाले असताना काहीजण त्यात अडथळा आणतात. ते मागे किती लोक राहिले’ असं पाहत असतात आणि ‘विकासाच्या फुग्याला’ टाचणी लावतात. त्यात सध्या हेरंब कुलकर्णी हे मला माहीत असलेलं नाव आहे.

नुकताच त्यांचा ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ हा अहवाल प्रसिद्ध झाला. दारिद्र्य हा खरं तर अर्थशास्त्राचा विषय. किंवा योजना आयोग आताचा नीती आयोग वगैरेचं कार्यक्षेत्र. पण त्या सगळ्यावर विकासाचं घोडं स्वार झालंय. आणि ते इतक्या वेगाने धावतंय, की त्यांना ‘मागे कितीजण राहिले’ हे पाहायला वेळच नाही.

महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात तिथल्या माणसांचं दारिद्र्य पाहताना आणि नोंदवताना हेरंबच्या समोर प्रश्न होता की संशोधनाच्या अंगाने तो रिपोर्ट लिहावा की पत्रकाराच्या?

पण प्रत्यक्षात तो रिपोर्ट आपल्या हाती येतो तो एखाद्या कवीच्या काव्यासारखा. इतकं भगभगीत वास्तव काव्य म्हणून आपल्या मनावर फुंकर घालणारं नाही. तर हेरंब जणू महाराष्ट्रातल्या सव्वाशे गावातल्या गरिबांच्या चुलीवर तापलेल्या तव्यावर वाचकांचा तळवा दाबून धरतात. आणि कुलरच्या गार हवेत मी त्यांच्या शोधायात्रेवर लिहिताना मला शरम वाटून जाते.

या अर्थाने हेरंबचा ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ हा रिपोर्ट मला कवितेसारखा अस्वस्थ करणारा वाटतो. कारण अलीकडे संशोधक आणि रिपोर्टर आता ‘प्रोफेशनल’ झालेत. खरा कवी कधीच प्रोफेशनल होत नाही आणि खरं काव्य कधी जाहिरातीचं सोंग घेत नाही. ती कायम अस्वस्थतेचे खिळे मस्तकावर धारण करूनच बुद्धाचं कारुण्य प्राणपणाने जपत असते.

हेरंब कुलकर्णी हे कवी आहेत, हा योगायोग नाही. उलट ते कवी आहेत म्हणूनच त्यांनी हा ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ रिपोर्ट आपल्यापुढे मांडलाय. अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांच्या अच्छे दिनची जाहिरात करायला सगळा मीडिया सज्ज झालाय. आणि सत्तेच्या खेळात गरिबांनाच विसरलेले विरोधी पक्ष ‘कोणता घेऊ मी अजेंडा’ म्हणून संभ्रमित झालेत.

सुदैवाने हेरंब यांच्या या अहवालाची दखल ज्यांना विषमतेची चाड आहे, असे महाराष्ट्रातले सामाजिक कार्यकर्ते  आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक घेताहेत. त्यांनी अहवालात वेगवेगळ्या पद्धतीने तळगाळातल्या माणसांचं जिणं आपल्यापुढे मांडलंय. ते काहीसं कोलाजसारखं आहे. त्याला वर्गीकरण, आकडेवारी, टक्केवारी आणि अर्थशास्त्राच्या परिभाषेची फोडणी नाही. पण म्हणूनच हा अहवाल आहे रे आणि नाही रे या वर्गातली वाढलेली दरी अधिकच परिणामकारक शब्दांत आपल्यापुढे मांडतो.

मूळ प्रश्न विषमतेचा आहे. जगातल्या सर्व आधुनिक विचारधारा तत्त्वतः समतेचा कैवार घेणाऱ्या आहेत. पण जॉर्ज ऑरवेल म्हणतो तसा काही लोक अधिक ‘समता’वादी आहेत. आणि त्यांना वाटतं की आमच्या अच्छे दिनमधून, आमच्या स्मार्ट सिटीमधून आणि आमच्या बुलेट ट्रेन किंवा मेट्रोमधूनच गरिबांच्या उद्धाराचा मार्ग जातो. त्यांनी फक्त अंधविश्वास ठेऊन भक्त बनावं. विषमता लवकरच दूर होईल.

पोट भरण्यासाठी गरीब लोक कोणतं काम करतात, हेही आपल्याला धड ठाऊक नसतं. हेरंबने अशा कामांची आणि त्या कामाचा मोबदला यांची अशी चित्रं आपल्यापुढे ठेवली आहेत की काळजात चर्र व्हावं. त्यांची घरं, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य हे तर आणखी पुढचे प्रश्न आहेत. या शोधयात्रेत हेरंबची माझी दीर्घ भेट झाली. आमच्या अवतीभवतीच्याच सामाजिक छळछावण्या त्यांनी मला कथन केल्या. ज्या मला अजिबात माहीत नव्हत्या.

नागपूर जिल्ह्यातच मिरच्यांचं देठ खुडण्याचं काम मोठ्या प्रमाणावर मुली आणि महिला करतात. सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत काम करतात. ४०० मिरच्या खुडून झाल्या तर त्यांना ६ रुपये मिळतात. एका किलोत साधारणत ४०० मिरच्या बसतात. त्यासाठी त्यांना दिवसभर अवघड स्थितीत दोन पायावर बसावं लागतं. हातांची बोटांची आग तर सांगताच येणार नाही. ती पोटाच्या आगीपुढे सुसह्यच वाटते.

शेतकरी दारूच्या व्यसनाने आत्महत्या करतात का? हेरंबच्या शोधयात्रेत त्यांना उलटं चित्र दिसलं. कर्जबाजारी शेतकरी अगतिकतेने आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचे धैर्य नसतं. दारूचा वासही सहन न होणारे तरणेताठे शेतकरी विष पिण्याचं धाडस होत नाही म्हणून ते दारू पिऊन आत्महत्या करतात.

इथे आपण निरुत्तर आणि निशब्द होतो. काय बोलावं?
 

(लेखक हे नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत.)