रोलर कोस्टर राईडचा अनुभव देणारा शहरनामा

१३ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा.

अलीकडे मुंबईत कुठंही फिरायला बाहेर निघालं की, हमखास महामार्गांच्या दुतर्फा सुंदर चित्रांनी रंगवलेल्या भिंती दिसतात. मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या. 'दास्तान-ए-बड़ी बांका'चा रौप्यमहोत्सवी प्रयोग पाहण्याचा काल योग आला. त्यावेळी या भिंतींचीच राहून राहून आठवण येत होती. रुढार्थाने हे नाटक नाही. ही मराठीतली पहिली दास्तांगोई आहे.

मुंबई शहराची दास्तान

दास्तांगोई म्हणजे कथा, किस्से सांगणं आणि ते सांगणारे म्हणजे 'दास्तांगो'. हे सगळं प्रयोगाच्या सुरवातीलाच अक्षय शिंपी अगदी सहजसोप्या शब्दांत समजावून सांगतो, तेव्हाच आपण निर्धास्त होतो. एवढं बोजड शीर्षक असलेला प्रयोग म्हणजे काहीतरी शब्दबंबाळ, अवघड, अमूर्त काहीतरी समोर येईल, या आपल्या कल्पनेला इथंच सुरुंग लागतो.

त्यानंतर जवळजवळ दोन तास मंचावर फक्त गादीवर वज्रासनात बसलेले दोन कलाकार आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. 'मुंबई नगरी बड़ी बांका' असं ज्या शहराबद्दल बोललं जातं, त्या मुंबई शहराची ही दास्तान असल्यामुळे ही 'दास्तान-ए-बड़ी बांका' आहे. प्रयोगाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहे.

हेही वाचा: ऑनलाईन रिव्यू वाचून फिरायला चाललात, मग सांभाळून

संमिश्र भावनांचं दर्शन

पूर्वार्धात आपल्याला रोजच्या जगण्यातली मुंबई दिसते. रुटीनमधली धावणारी मुंबई, जी कधीही झोपत नाही. यात आपल्याला मराठी शाळा, इंग्रजी शाळा, त्यातले विद्यार्थी, शिक्षक, त्यांचा सकाळचा पाठ, वेगवेगळ्या विषयांचे तास हे सगळं भेटतं.

त्यासोबत कॉलेजचे तरुण-तरुणी, 'सोबो'ची इंग्रजाळलेली एलिट वस्तीतली मुलंमुली, मरीन ड्राइव्हवरची जोडपी, नवीन जोडप्यांमधलं अवघडलेपण, टॅक्सीमधून फिरणारे बहुभाषिक स्त्री-पुरुष, झोपडपट्टीतली वस्ती, चाळींमधली वस्ती, ट्रेनची गर्दी, ट्रेनमधले भिकारी, तृतीयपंथी, मेट्रोमधल्या अनाऊन्समेंट्स हे सगळं भेटतं. 'लेडीज ट्रेनमधलं ब्युटी पार्लर' हा किस्सा तर निव्वळ भन्नाट आणि बरंच काही नवीन देऊन जाणारा.

हे सगळं सादर होतं किश्श्यांच्या, संवादांच्या, गाण्यांच्या, कवितांच्या रूपात. त्यात बा. सी. मर्ढेकरांच्या 'पितात सारे गोड हिवाळा' या कवितेपासून शाळेत असताना एका मित्राच्या तोंडून ऐकलेल्या 'सुन मेरी अमीना दीदी'पर्यंत बरंच काही येऊन जातं. हा सगळा ऐवज एखाद्या पबमधल्या डिस्कोलाईट्सच्या झपझप बदलणाऱ्या रंगीत प्रकाशाप्रमाणे आपल्यावर कोसळत राहतो. खऱ्या अर्थाने मुंबई शहराचा केऑस जिवंत करतानाच त्या केऑसच्या धमन्यांतून वाहणारा रोमान्स, त्यातली शांतता, अगतिकता या सगळ्या भावनांचं दर्शन घडवत जातो.

अंतर्मुख करणारं बरंच काही

उत्तरार्ध आपण जाणूनबुजून नजरेआड केलेल्या, दुर्लक्षिलेल्या मुंबईबद्दल शांत, संयत, धीरगंभीर स्वरात भाष्य करतो. यात वेश्यावस्ती येते, दारूचे अड्डे येतात, पोलीस येतात, हिजड्यांचा गणपती येतो, मुंबईत झालेले बॉम्बस्फोट येतात, दंगली येतात. गिरणी कामगारांचा संप येतो. मुंबईचे आद्य रहिवासी, जे कोळी लोक, त्यांच्या गोष्टी येतात.

मधेच अक्षय आणि धनश्री प्रेक्षकांनाही त्यांच्या सुरांत सूर मिसळून 'ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ' हे गाणं म्हणायला लावतात, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. या भागात येणाऱ्या कविता, वर्णनं ऐकून डोळे पाणावतात. आपण नकळत आपल्या सुखासीन आयुष्याची तुलना या जगाशी करू लागतो. कधी लाज वाटते, कधी राग येतो. या भागात नारायण सुर्वेंची 'कामगार आहे, मी तळपती तलवार आहे' ही गाजलेली कविता येते. सआदत हसन मंटो यांचे किस्से येतात. अंतर्मुख करणारं बरंच काही येतं.

हेही वाचा: ‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

कलाकारांची एनर्जीटीक कमाल

अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर हे दोन्ही कलाकार ज्या तुफान एनर्जीने हा प्रयोग सादर करतात, त्याला तोड नाही. दोघेही सादर करत असलेल्या पूर्वार्धातल्या पात्रांमधलं ट्रान्झिशन एवढी स्मूथ आहेत की बऱ्याच ठिकाणी सादरीकरणाला फास्ट ट्रेनचा वेग असला तरी प्रेक्षक म्हणून आपल्याला कुठेही गोंधळायला होत नाही.

अक्षयने रंगवलेली स्त्रियांची आणि हिजड्यांची पात्रं जेवढी मोहक, तेवढीच धनश्रीने रंगवलेली पुरुष पात्रं दमदार. कवितांचं, गाण्यांचं सादरीकरणही उत्तम. पूर्वार्धातलं मुंबई दर्शन इतकं फक्कड जमलं आहे की एका तासात रुटीनमधला मुंबईतला गर्दीचा एक संपूर्ण दिवस अनुभवल्याचा फील येतो. तोही वेगवेगळ्या ठिकाणचा, वेगवेगळ्या लोकांसोबतचा.

उत्तरार्ध संध्याकाळच्या समुद्राची गाज, उशिरा घरी परतताना अनुभवाला येणारी शांतता, पण त्या शांततेला असणारी दुःखाची, पेंगुळलेपणाची, असहाय्यतेची किनार, हे सगळं अनुभवास आणून देतो. थकून लास्ट लोकलने घरी आल्यावर डोक्यात होणाऱ्या विचारांच्या गर्दीचा आणि तरीही कितीही असुरक्षित आणि नकोसं वाटलं तरी 'उद्याही हे असंच असणार आहे' हा फील देतो.

प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स

हे अफाट शहर दोन तासांत गुंफणं, हे शिवधनुष्य उचलण्यासारखंच आहे. त्यासाठी भाऊ पाध्ये, बा. सी. मर्ढेकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे आणि इतर अनेक दिग्गजांच्या साहित्यातले तुकडे या दोघांनी वापरलेत. सोबत अक्षयच्या स्वतःच्या थेट भाष्य करणाऱ्या आणि भिडणाऱ्या कविताही आहेत.

या सगळ्यामुळे या संपूर्ण प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स मिसळून एक सुंदर कॉकटेल तयार झालं आहे, जे अर्थातच मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक असल्यासारखं जाणवत राहतं. फार मर्यादित साधनांसह या दोन्ही कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग चुकवण्यासारखा नाहीच.

प्रत्येक प्रयोगागणिक बदलणारं स्क्रिप्ट, त्यात येणारे नवीन किस्से, हे हा प्रयोग पुनःपुन्हा पाहण्याचं आणखी एक कारण. एका मंत्रमुग्ध करणाऱ्या या अद्भुत प्रयोगाला मनापासून शुभेच्छा.

हेही वाचा: 

मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून

डिसले गुरुजींकडून आपली शिक्षणव्यवस्था काय शिकणार?

बहिरं व्हायचं नसेल तर डब्ल्यूएचओचा कानमंत्र आताच ऐकायला हवा