नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?
डॉ. महिप सिंग हे भारतीय साहित्यातलं एक खूप मोठं नाव. लेखक, समीक्षक आणि संशोधक म्हणून हिंदी आणि पंजाबीमधे त्यांचं स्थान खूपच वरचं. भारतीय लेखकांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं प्रतिनिधित्व करण्याचा मानही त्यांना अनेकदा मिळालाय. असे हे थोर लेखक २०१२ मधे चंद्रपूर इथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे होते.
डॉ. महिप सिंग यांची मूळ वृत्ती संशोधकाची. महत्त्वाच्या भारतीय भाषांमधील विविध प्रवाहांवरचे ते अधिकारी विद्वान मानले जातात. अर्थातच त्यात मराठीही आहे. त्यांचा मराठी साहित्याशी चांगला परिचय आहे. तरीही त्यांनी मराठीतल्या नव्या कोणत्याही लेखकाचा उल्लेख आपल्या भाषणात केला नाही. त्यांना आठवले ते जवळपास आठशे वर्षांपूर्वीचे संत नामदेव.
आंतरभारती संवादाचा आग्रह मांडताना डॉ. सिंग यांना महाराष्ट्रातल्या नामदेवांच्या परंपरेशिवाय अन्य कोणाचाही उल्लेख करावासा वाटला नाही. सगळं आश्चर्यकारक असलं तरी इथे इतर कोणतंही मोठं नाव दिसत नाही. कारण महाराष्ट्रीय संस्कृतीच्या इतिहासात नामदेव महाराजांइतकं सबंध भारतावर प्रभाव टाकणारं एखाद दुसरंच नाव असावं. तरीही संत शिरोमणी नामदेवांच्या पारड्यात त्यांच्या कर्तृत्वाइतकं श्रेय महाराष्ट्रीय सारस्वताने कधीच टाकलेलं नाही.
शिखांचा पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथसाहेबात नामदेवांची पदं असल्याचा उल्लेख महिप सिंगांनी केला. फक्त शिखांवर नाही तर सगळ्या जगावर प्रभाव टाकणारा हा ग्रंथसाहेब. त्यात नामदेवांची एकदोन नाहीत तर तब्बल ६१ पदं आहेत. त्यातही नामदेव हे गुरू नानकांच्याही आधीचे.
नानकांच्या आधीच्या फक्त तिघांच्याच रचना ग्रंथसाहेबात आहेत. उरलेले दोघे शेख फरीद आणि जयदेव. या दोघांच्या फक्त पाच पाचच रचना यात आहेत. म्हणजे नानकांवरचा नामदेवांचा प्रभाव सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट आहे. फक्त नानकच नाहीत, तर रामानंद, कबीर, रोहिदास, दादू दयाळ, मीराबाई, नरसी मेहता अशी उत्तरेतली संतांची सगळी मांदियाळी नामदेवांनी प्रभावित झालेली आहे. यापैकी अनेकांच्या काव्यात नामदेवांचा उल्लेख स्पष्टपणे आणि अनेकदा आलेत. विशेषतः कबीरांवरचा प्रभाव तर जबरदस्तच.
हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?
नाना वर्ण गऊआ, उनका एक वर्ण का दूध
तुम कहां के बम्मन, हम कहां के सूद
असा कडक सवाल विचारणारे नामदेव विद्रोही कबीरांचे खरे पूर्वसूरी ठरतात. संत कबीरांचा वारकरी परंपरेशी असलेला ऋणानुबंध हा भारतीय संस्कृतीतलं एक सोन्याचं पान. वारकरी कीर्तनात वारकरी परंपरेबाहेरच्या अगदी समर्थ रामदासांसहित मराठी संतांच्या रचना वापरल्या जात नाहीत. पण कबिरांचे दोहे वापरण्याची परंपरा इथे आहे.
पंढरपूरच्या वारीतल्या पालखी सोहळ्यात विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कबीरांची दिंडी वाराणसीहून हजारो मैल चालत येत होती. उत्तर दक्षिणेतला हा पूल सगळ्यात आधी बांधला तो नामदेवांनी. तेराव्या शतकात ते सबंध भारतात खूपदा फिरले. ते गेले तिथे त्यांनी आपल्या विचारांची पताका मोठ्या डौलानं फडकवली. परकीय आक्रमणाला हिमतीनं तोंड देण्याची ताकद नामदेवांच्याच संतपरंपरेने देशाला दिली.
हिंदी साहित्यातले संतकवींचे मूळपुरूष म्हणून नामदेवांचाच आदराने उल्लेख होतो. त्याआधी हिंदीत नाथपरंपरेपासून संतकाव्याची परंपरा आहेच. पण नामदेवांनी हिंदी संतकाव्याला भक्कम प्रवाहाचं रूप दिलं. फक्त हिंदीच नाही. तर नामदेव महाराज जिथे गेले तिथली लोकभाषा आपली मानली. त्यांनी मराठी, गुजराती, पंजाबी, अवधी, खडी, व्रज अशा सहा भाषांतून रचना केल्या. असा दुसरा कोणी झालाय का?
नामदेवांचं आराध्यदैवत असणाऱ्या पांडुरंगापेक्षाही नामदेवांचीच महाराष्ट्राबाहेर जास्त मंदिरं आहेत. आजच्या पाकिस्तानातही त्यांची मंदिरं आहेत. महाराजांनी पंजाबात जिथे वास्तव्य केलं ते घुमान हे मोठं तीर्थक्षेत्र बनलं. शिवाय बसी पठाना, मरड, भट्टिवाल, तपियाना साहिब, भूतविंड, सखोवाल, धारिवाल अशा पंजाबातल्या बऱ्याच ठिकाणी मोठी मंदिरं आणि शेकडो लहान मंदिरं आहेत.
राजस्थानात तर त्यांची दीडशे मंदिरं आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली अशा उत्तरेकडच्या सगळ्या राज्यांत नामदेवांची स्मृतिस्थळं आहेत. स्वतःला नामदेव म्हणवून घेणारे शिंपी समाजातले अनेक पोटघटक तर जम्मूपासून तामिळनाडूपर्यंत सर्वत्र आहेत.
हेही वाचा: वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे
नामदेवांबद्दल आज आपल्यापैकी किती जणांना याची माहिती आहे? शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडण्याची अपेक्षाच नाही. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात? नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. अशावेळेस
प्रस्तराचा देव बोलत भक्तांतें
सांगते ऐंकते मूर्ख दोघें
असं सांगणारे नामदेव कधीच का मांडले जात नाहीत? महाराष्ट्रातल्या सर्व जातीतल्या, सर्व धर्मांतल्या, सर्व स्तरांमधल्या संतांना एकमेकांशी जोडून क्रांती घडवणारे नामदेव कुणीतरी आम्हाला सांगायला हवेत ना. संत चोखामेळा, त्यांची पत्नी सोयराबाई, बहिण निर्मळाबाई, भावोजी बंका, मुलगा कर्ममेळा जातिव्यवस्थेने पायदळी तुडवूनही महान तत्त्वज्ञान मांडणारं संतकुटुंब हे नामदेवांनी घडवलेला सर्वात मोठा चमत्कार नव्हता का?
त्यामुळे प्रस्थापित मराठी समीक्षक, संशोधकांनी वारकरी परंपरेतल्या संतांना कितीही झाकून ठेवलं. त्यांचा सामाजिक आशय कितीही दडपून ठेवला. तरीही कुणीतरी महिप सिंग पुढे येऊन त्यांचीच आठवण काढत राहणार.
हेही वाचा: ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू
‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड एका साहित्यिक कार्यक्रमासाठी फ्रान्समधे गेले होते. तिथे त्यांना मराठी म्हणजे कोणती भाषा हे समजावून सांगायचं होतं. त्यांनी कालच्या आजच्या अनेक नामवंत लेखकांची नावं सांगून पाहिली. पण तिथे कुणालाच हे मान्यवर माहीत नव्हते.
शेवटी गायकवाड बरेच मागे गेले. त्यानी संतश्रेष्ठ तुकारामांचा उल्लेख केला. उत्तर आलं, असं सांगा ना तुम्ही तुकारामांच्या भाषेकडून आले आहात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाठीचा कणा असलेल्या वारकरी परंपरेला कुणी कितीही अनुल्लेखाने मारलं. त्यांची बदनामी करण्याचा पिढयानपिढ्या प्रयत्न केला. आपले संस्कार त्यावर लादण्याचा प्रयत्न केला तरीही याचं मोठेपण वर्षानुवर्ष अधिकच अधोरेखित होत राहणार आहे.
महाराष्ट्रात आधुनिक प्रबोधनाची सुरवात करणार्या प्रार्थना समाजाने तुकारामांना आपला आधार मानलं. त्यामुळे पोटदुखी झालेल्या काही जातिभिमानी मूर्खांनी तुकारामांच्या बदनामीची मोहीम राबवली. समर्थ रामदासांच्या चरित्रात नको त्या गोष्टी घुसडल्या. जुन्या घुसडलेल्या गोष्टींना नव्याने झळाळी दिली. त्यातून काही कारण नसताना तेढ आणि द्वेष निर्माण झाले.
आजही दासनमवीच्या निमित्ताने आलेल्या काही विशेषकांमध्ये तीच वृत्ती दिसून येते. समर्थ रामदास मोठेच आहेत. पण त्यांना मोठे मांडण्यासाठी इतर संतांना निरिच्छवादी आणि पुरुषार्थहीन असल्याची मांडणी करणं, हा समर्थांचाही अपमान आहे. त्याचा निषेध व्हायला हवा.
हेही वाचा:
आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट़
गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला