जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी.
‘माझ्या मनात सतत एक रिकामंपणाची भावना यायची. प्रचंड वाईट वाटायचं. हातापायांना अचानक घाम फुटायचा. मधूनच घाबरायला व्हायचं, कासावीस व्हायचं. असं वाटायचं की आपण कशाततरी अडकलोय. तिथून बाहेर पडावं आणि मोकळा श्वास घ्यावा,’ मनानं आजारी असलेल्या व्यक्तीचा हा अनुभव आहे. आणि मनानं आजारी असणारी व्यक्ती दुसरी, तिसरी कुणी नाही तर आपली दीपिका पादुकोन आहे.
तिला आपली म्हणण्याचं कारण जागतिक स्तरावरच्या एका परिषदेत भारतकन्या दीपिका तिची आपबिती सांगत होती. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेने तिला मानसिक आरोग्य या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केलं होतं. तिला बोलावलं होतं, बॉलिवूड अॅक्ट्रेस म्हणून नाही तर 'लीव, लव, लाफ' या एनजीओची संस्थापक म्हणून. ही एनजीओ मानसिक आजारावर काम करते.
वर्ल्ड इकोनॉमिक फोरम म्हणजेच वेफ ही १९७१ मधे स्थापना झालेली एक एनजीओ आहे. वेफची वार्षिक परिषद दरवर्षी जानेवारी महिन्यात स्वित्झर्लंडमधल्या दावोस शहरात भरते. या परिषदेला जगभरातून २५०० पेक्षा जास्त लोकांना आमंत्रित केलं जातं. ‘जगाच्या सद्यस्थितीत सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध’ हे वेफचं ब्रीदवाक्य. असं असलं तरी जगाच्या कल्याणापेक्षा एलिट वर्गाचे खिसे फुगवून त्यांचं कल्याण कसं साधायचं यावरच वेफनं लक्ष दिलं, अशी टीकाही वेफवर होते.
हे आरोप खोडून काढण्यासाठीच जणू वेफने यंदाच्या परिषदेचा उद्देश फक्त अर्थकारण आणि कॉर्पोरेटिझमपर्यंत मर्यादित ठेवला नाही. यंदाच्या ५० व्या परिषदेत ग्रेटा थुनबर्गपासून ते एँजेला मर्केल या जर्मनीच्या चॅन्सेलरपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना यंदाच्या परिषदेचं निमंत्रण देण्यात आलंय.
याच परिषदेत मंगळवारी २१ जानेवारीला आपली दीपिका मानसिक आरोग्य या विषयावर बोलली. यावेळी जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रॉस आधानोम यांनी तिची मुलाखत घेतली. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. आपल्या आजूबाजूच्यांना सांगितली पाहिजे.
हेही वाचा : #बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?
२०१३-१४ च्या आसपास दीपिका क्लिनिकल डिप्रेशन म्हणजेच नैराश्याने ग्रस्त होती. ‘मला डिप्रेशनचा त्रासही अशावेळी होऊ लागला, जेव्हा मला त्याची अजिबात अपेक्षा नव्हती. माझं करिअर एकदम भन्नाट चाललं होतं. माझे एक से बढकर एक सिनेमे थेटरात गाजत होते. माझं रिलेशनशिपही मस्त चाललं होतं. माझे आई वडील, बहीण सगळेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मी प्रसिद्धीच्या उंच शिखरावर होते. आणि अशावेळी मला हळुहळू डिप्रेशनचा त्रास होऊ लागला,’ असं सांगत दीपिकाने आपल्या मुलाखतीला सुरवात केली. आयुष्यात काहीतरी वाईट गोष्ट घडली तरच डिप्रेशन येतं, हा एक गोड गैरसमज असल्याचं दीपिकाच्या उदाहरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.
ताप, सर्दी, खोकला यासारख्या शारीरिक आजारांसारखी डिप्रेशनची सुरवात काही एका दिवसात, एका तासात होत नसते. पण हे सगळं कुठून सुरू झालं याचा विचार करायला गेलं तर दीपिकाला एक सकाळ आठवते. एका दिवशी सकाळी दीपिकाला जोरात चक्कर आली आणि तिची शुद्ध हरपली. घरातल्या फरशीवर दीपिका तशीच पडून होती. तेव्हा ती एकटी राहायची. नशीबाने घरकाम करणाऱ्या बाई घरी होत्या. त्या बाईंनी दीपिकाला उचललं. पाणी दिलं.
असं अचानक कसं झालं हे दीपिकाच्या लक्षात आलं नाही. तिने लगेचच डॉक्टरांची वेळ घेतली आणि त्या दिवशीची सगळी कामं थांबवून ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासलं. अतिकामामुळे ताण आला असेल किंवा तुझं ब्लडप्रेशर वाढलं असेल, असं सांगत डॉक्टरांनी तिला आराम करायचा सल्ला दिला. दीपिकाने तो अख्खा दिवस झोपून काढला.
या घटनेनंतर दीपिकानं पुन्हा काम चालू केलं. पण त्यानंतर मनात सतत एकप्रकारची रिकामंपणाची भावना यायची. त्याला दुःखाची किनार असायची. अचानक घामाघूम व्हायला लागायचं. जीव कासावीस व्हायचा. बाहेर पडून मोकळा श्वास घ्यावा असं वाटायचं. उगाच रडू यायचं.
काहीही कारण नसताना रडावंसं वाटायंच. कुणी काही बोललं नाही, रागावलं नाही, काही वाईट झालं नाही, तरी रडू यायचं. एका रूममधे ती बसलेली असेल तर अचानक रडावं आणि स्वतःला व्यक्त करावं असं वाटायचं. उठू नये, काही करू नये, असं वाटायचं. समोर आलेल्या वास्तवापासून, मनातल्या वाईट भावनांपासून पळून जाण्याचा झोप हा मार्ग होता. म्हणून दिवसभर झोपूनच रहावसं वाटे. काही खावंप्यावं वाटत नसे. कामावर जावसंही वाटायचं नाही. काम करण्यामागचं सगळं मोटिवेशन गेलं होतं.
त्याच सुमारास एकदा दीपिकाचे आईवडील तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आले. चार दिवस राहिले. मग परत जाण्यासाठी सामानाची बांधाबांध सुरू असताना दीपिका आईकडे एकटक बघत बसली. आणि अचानक तिच्या मनाचा तोल सुटला. ती अचानक ओक्साबोक्शी रडू लागली.
आईनं जवळ घेतलं. विचारपूस केली. काही प्रॉब्लेम आहे का, विचारलं. कामावर कुणी त्रास देतं का, रिलेशनशिपमधे काही बिघडलंय का, हेही विचारून घेतलं. पण नेमकं काय बिघडलंय हे बोटं ठेवून दीपिकाला सांगताच येत नव्हतं. मग आईने ’दीपिका तुला काऊन्सिलरकडे जाण्याची गरज आहे,’ असं तिच्या लक्षात आणून दिलं.
हेही वाचा : दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!
आईच्या सांगण्यावरून दीपिकाने ऍना चॅण्डी या प्रसिद्ध मानसोपचारतज्ञाची भेट घेतली. त्यांच्या आणि इतर काही डॉक्टरांच्या मदतीने शेवटी तिच्या डिप्रेशनचं निदान झालं. दीपिका सांगते, ‘लोकांच्या संपर्कात येणं, वेगवेगळ्या इवेण्टमधे बोलणं, रोज शूटला जाणं, माझं अक्टिंगचं काम करणं हे सगळं मी करत होते. पण मनाने मी तिथे नव्हतेच. माझ्या आजाराचं निदान झालं, तेव्हा मला फार हायसं वाटलं. जीवात जीव आला.’
डिप्रेशनमधे आपल्याला नक्की काय होतंय, हे कळणंसुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावतं, असं दीपिका सांगते. हे निदान होणं हा तिच्या बरं होण्याच्या प्रवासातला पहिला टप्पा होता. दीपिकाचा प्रवास फार महत्त्वाचा आहे. तू काऊन्सिलरकडे जावं असं तिच्या आईनं तिला सुचवल्यानंतर दीपिका तिचा सल्ला धुडकावून लावू शकत होती. मला काही वेडबीड लागलेलं नाहीय, असं म्हणू शकत होती. किंवा तिची आईही तिला काऊन्सिलरकडे जाण्यापासून रोखू शकली असती. पण असं झालं नाही.
आपलं शरीर आजारी पडतं तसंच आपलं मनही आजारी पडतं आणि त्यालाही डॉक्टरांची गरज असते हे आपण स्वतः मान्य करणं मानसिक आजारातून बाहेर येण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. एका अर्थाने मानसिक आजारातून बाहेर पडण्याची हीच पहिली आणि महत्त्वाची पायरी असते. त्याचसोबत कुटुंबाची साथही हवी, हे दीपिकाच्या प्रवासातून दिसून येतं. म्हणून दीपिकाचा प्रवास महत्त्वाचा आहे, असं म्हणता येईल.
आपल्याकडे भारतात मानसिक आजारांविषयी अनेक गैरसमज आहेत. काऊन्सिलरकडे जावं लागतंय म्हणजे माणूस वेडा झालाय असंच आपल्यापैकी अनेकांना वाटतं. मनाने आजारी असणाऱ्या माणसाकडे आपण लोकही वेगळ्याच काटेरी नजरेनं बघतो. ही भीती दीपिकालाही होती. आपण काऊन्सिलरकडे जातोय ही गोष्ट कुणाला कळू नये याची काळजी दीपिकालाही होती.
चारचौघांमधे गेल्यावर कुणी ‘कशी आहेस?’ असं विचारलं तर दीपिकाही सर्वसामान्य माणसांसारखंच खोटं सांगायची. आपण मानसिक आजारी आहोत हे सांगणं तिला बरोबर वाटत नसे. पण ही गोष्ट नंतर लक्षात आली. मानसिक आजारांबाबत आपल्याच मनात किती टॅबू आहे याची तिला जाणीव झाली. आणि त्यानंतर आपण डिप्रेशनमधे होतो हे दीपिकानं जगजाहीर केलं. आपलं डिप्रेशन कबुल केलं.
डिप्रेशनमधून बाहेर पडल्यावर आता दीपिका ‘लिव लव लाफ’ नावानं एक एनजीओ चालवते. तिच्यासारखा प्रवास करणाऱ्या, डिप्रेशनमधून जाणाऱ्या लोकांना आधार देऊन, त्यांना त्यातून बाहेर काढण्याचं काम ही एनजीओ करते. एनजीओकडून तुम्ही एकटे नाहीत म्हणजेच `यू आर नॉट अलोन` हे कॅम्पेन चालवलं जातं. मानसिक रूग्णांसोबत आम्ही उभे आहोत. तुम्ही एकटे नाही, हा विश्वास त्यांना देण्यासाठी हे कॅम्पेन चालवलं जातं.
हेही वाचा : सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी
सॅडनेस किंवा दुःखी असणं आणि डिप्रेस्ड असणं यात फरक असतो. मनात दुःख असेल तर थोड्याफार काळात त्याचा निचरा होतो. पण हेच दुःख फार काळ घर करून राहत असेल तर ते निव्वळ दुःख नसतं. ती डिप्रेशनची सुरवात असते. दोन आठवड्यांहून जास्त काळ दुःखी वाटत असेल तर काहीतरी गडबड आहे हे ओळखून आपण काऊन्सिलरकडे गेलं पाहिजे, असा सल्ला दीपिका देते.
मानसिक आजारातून बाहेर येणं सहज शक्य आहे. काऊन्सिलरची मदत आणि त्यासोबत आपली लाईफस्टाईल बदलणं एवढंच करावं लागतं. शारीरिक व्यायामासोबत मेडिटेशनसारखे मानसिक व्यायाम करणं, स्वतःच्या मानसिकतेत बदल करणं आणि त्यात सातत्य ठेवणं गरजेचं असतं, असं दीपिका आपल्या मुलाखतीत सांगते.
चांगलं आरोग्य म्हणजे फक्त आजारी नसणं एवढाच अर्थ नसतो. तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुदृढताही आरोग्याच्या संकल्पनेत येते. पण यामधे आपलं मानसिक आरोग्य सगळ्यात जास्त दुर्लक्षित राहतं. मानसिक आरोग्याबाबतीत आधीच लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. त्यातही जवळपास ८० टक्के मानसिक रोग्यांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. अशा परिस्थितीत वेफने मानसिक आरोग्याचा विषयावर बोलणं नक्कीच महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :
रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?
आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती