कोरोनाः विटॅमिन डीची कमतरता वाढत्या मृत्यूदराला कारणीभूत आहे?

१३ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोना वायरसबद्दल रोज नव्यानव्या गोष्टी समोर येताहेत. रंगबदलू कोरोनाच्या अनेक गूढ गोष्टींचा उलगडा शास्त्रज्ञ करताहेत. कोरोनानं मृत्यूमुखी पडलेल्या बहुतांश पेशंटमधे विटॅमिन ‘डी’ची कमतरता आढळलीय. देशोदेशीच्या वेगवेगळ्या मृत्यूदरामागं विटॅमिन डी कारणीभूत असल्याचं असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. कोरोनापासून बचावासाठी आपण कसं मिळवू शकतो विटॅमिन डी?

अमेरिकेतल्या नॉर्थवेस्टर्न युनिवर्सिटीनं एक संशोधन केलं. या संशोधनात चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, इराण, दक्षिण कोरिया, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेतल्या हॉस्पिटलमधली आकडेवारी जमा केली आणि कोरोना वायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांमधला समान धागा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आरोग्य व्यवस्था दर्जेदार असलेल्या देशांतला मृत्यूदर कमी आहे, हे गृहीतक पटण्याजोगं नाही, असं या संशोधन करणाऱ्या टीमचं म्हणणं होतं. तसंच, देशात तपासण्या जास्त होत असल्याने किंवा लोकसंख्येत वृद्धांची संख्या जास्त असल्याने देशातला मृत्यूदर वाढतोय हेही त्यांना मान्य नव्हतं.

डीडब्ल्यू न्यूजला दिलेल्या मुलाखतीत या रिसर्च प्रोजेक्टचे प्रमुख वादिम बॅकमॅन म्हणतात, ‘यामधलं कोणतंही कारण मृत्यूदरात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत नाही. इटलीच्या उत्तर भागात जगातली सगळ्या दर्जेदार आरोग्यसेवा पुरवली जाते, असं सांगितलं जातं. अनेक वृद्ध माणसंही आपण ठणठणीत बरी झालेली पाहतो. कोरोना वायरसची तपासणी केलेल्यांची संख्या काही देशात सारखी आहे. पण तिथेही मृत्यूदर वेगवेगळा दिसतो.’

मग नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे कोरोना वायरस जीवघेणा ठरू शकतो, असा प्रश्न आपल्याला बॅकमॅन यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर पडतो. याचं उत्तर बॅकमॅन यांच्या संशोधन टीमनं दिलंय आणि ते म्हणजे ड जीवनसत्व अर्थात विटॅमिट डीची कमतरता असल्यामुळे. इटली, स्पेन आणि ब्रिटनमधे कोरोना वायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्या जवळपास सगळ्या लोकांमधे विटॅमिन डीची कमतरता दिसून आलीय.

हेही वाचा : कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

विटॅमिन ‘डी’ म्हणजे काय?

आपल्या शरीरातल्या पेशींना त्यांच्या वाढीसाठी, विकासासाठी आणि आपलं काम व्यवस्थित करण्यासाठी काही पोषक घटक लागतात. हे पोषक घटक म्हणजेच जीवनसत्व. त्यालाच इंग्रजीत विटॅमिन असं नाव आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या पेशींना वेगवेगळे पोषक घटक पुरवणाऱ्या अनेक विटॅमिनची आपल्याला गरज असते. हे विटॅमिन आपण खातो त्या अन्नातून मिळत असतात.

विटॅमिन डी मात्र थोडं वेगळं आहे. चीज, मासे, अंडी, सोया दूध अशा अन्नपदार्थांतून तर ते मिळतंच. पण विटॅमिन डी मिळवण्याचा स्रोत म्हणजे सूर्याची किरणे. आपली त्वचा सूर्याच्या संपर्कात आली तर ती स्वतः हे विटॅमिन डी तयार करू शकते. लहानपणी विज्ञानाच्या पुस्तकात आपल्याला कोवळ्या उन्हात बसण्याचा सल्ला दिला जायचा तो याचसाठी.

या विटॅमिन ‘डी’मुळे आपल्या हाडांना आणि दातांना बळकटी मिळते. शरीरातल्या साखरेचं प्रमाण विटॅमिन डी नियंत्रित करतं. त्यामुळे डायबेटीस असणाऱ्यांसाठी तर हे फारच महत्त्वाचं असतं. फुफ्फुसालाही आपलं काम व्यवस्थित करण्यासाठी याची गरज लागते. शरीरातलं विटॅमिन डी कमी झालं तर कॅन्सर होण्याचाही धोका असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे विटॅमिन डी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीलाही मदत करत असतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा:

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

रोगप्रतिकारक शक्तीवर नियंत्रण

कोरोना वायरस शरीरात आला की आपली रोगप्रतिकारक शक्ती हात धुवून त्याच्या मागे लागते. ही रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे शरीरातल्या पांढऱ्या पेशी. हेल्थलाईन या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, या पांढऱ्या पेशींवर विटॅमिन डीचे रिसेप्टर म्हणजे चेतातंतू सापडतात.

कोरोना वायरस बाहेरून शरीरात आला की आपली रोगप्रतिकारक शक्ती त्या वायरसशी युद्ध करू लागते. अनेकदा हे युद्ध इतकं टोकाला जातं की वायरसला नष्ट करायच्या नादात रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरातल्या चांगल्या पेशींनाही मारू लागते. रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रणाच्या बाहेर जाते. त्याने किडनी, हृदय अशा अवयवांना इजा पोचते. आणि हे महत्त्वाचे अवयव काम करायचं थांबतात. यामुळे माणसावर मृत्यू ओढवतो.

अशावेळी विटॅमिन डी आपल्या मदतीला धावून येऊ शकतं. विटॅमिन डीमुळे रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रणात राहते. थोडक्यात, वायरसशी लढायला रोगप्रतिकारक शक्ती कमी पडत असेल तर तिला प्रोत्साहन देणारंही हे विटॅमिन डीचं असतं. आणि अतिप्रमाणात काम करत असेल तर तिचा लगाम खेचण्यातं हे विटॅमिनच मदत करतं.

हेही वाचा : कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?

वृद्धांमधे विटॅमिन डीची कमतरता

बॅकमॅन म्हणतात, ‘अशाप्रकारे विटॅमिन डी आणि कोरोना वायरसचा संबंध लावून कोरोना वायरसबाबतीतल्या अनेक गूढ गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती हाताबाहेर जायची शक्यता उद्भवत नाही. म्हणूनच कोरोना वायरसमुळे लहान मुलांवर मृत्यू ओढावत नाही. 

तर, पृथ्वीच्या उत्तरेला असलेल्या देशांमधे  फार कमी वेळा सूर्यदर्शन घडतं. त्यामुळेच इथल्या लोकांमधे विटॅमिन डीची कमतरता सहज जाणवते. त्यामुळे या देशांची आरोग्य व्यवस्था कितीही चांगली असली तरी त्यांच्यात विटॅमिन डीची कमतरता असल्याने तिथं मृत्यूदर जास्त असतो. शिवाय, कुठल्याही देशातल्या वृद्धांची त्वचा वयानुसार व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे त्यांच्यातही विटॅमिन डी कमी असतं. 

आता याचा अर्थ आपण दिवसभर उन्हात जाऊन बसायचं किंवा फक्त विटॅमिन डी देणारं अन्न खायचं असा होत नाही. ‘विटॅमिन डीची कमतरता धोकादायक असली तरी लोकांना विटॅमिन डी वाढवणाऱ्या गोळ्या द्याव्यात असा सल्ला मी देणार नाही,’ असं बॅकमॅन यांनीही म्हटलंय. शरीरातली कुठलीही गोष्ट अशी एका दिवसात तयार होत नसते. आपण राहतो त्या वातावरणाचा, रोज खातो त्या अन्नाचा असा सगळा परिणाम शरीरावर होत असतो.

इतर वैज्ञानिकांचं म्हणणं काय?

ब्रीघममधल्या हॉस्पिटलमधे काम करणारे आणि हार्डवर्ड मेडिकल स्कूलच्या साथरोग विभागाचे प्रमुख जॉन मॅनसॉन यांनी इनवर्स या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं  की बॅकमॅन यांनी लावलेला विटॅमि डी आणि रोगप्रतिकारक शक्तीचा संबंध कौतुकास्पद आहे.   

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा स्रोत म्हणून विटॅमिन डीकडे नेहमीच पाहिलं गेलंय. पण या संकटकाळात त्याची कुणाला पटकन आठवण झाली नाही. मात्र, ‘बॅकमॅन यांच्या संशोधनात आवश्यक ते पुरावे दिलेले नाहीत,’ असंही मॅनसॉन यांनी म्हटलंय.

स्वतः बॅकमॅनही हे मान्य करतात. माझा अभ्यास परिपूर्ण नाही. आमच्या टीमने अजून विटॅमिन डीची रक्तातली पातळी थेटपणे तपासलेली नाही. किंवा डायबेटीस, हृदय रोग आणि कॅन्सरसारखे आजार असलेल्या आणि वर कोरोना वायरसची लागण झालेल्या पेशंटबाबतही विटॅमिन डी काम करू शकतं का, हेही कळालेलं नाही.

असं असलं तरी बॅकमन यांनी या महत्त्वाच्या संशोधनाचा पाया घालून दिलाय, हेही कमी म्हणता येणार नाही. या पायावर इतर वैज्ञानिकांना कोरोना वायरसविरोधाच्या उपचाराची इमारत उभी करता येईल, यात शंका नाही.

हेही वाचा : 

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या ८ इंटरेस्टिंग गोष्टी

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच, एका कोरोना योद्ध्याला पत्र

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?