लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

१९ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


सातत्याने काळ बदलतोय. त्या अनुषंगाने शिवकाळातली कुठली स्थिती-परिस्थिती आज आहे? त्याकाळातले प्रश्न आज नाही, तसा समाज नाही. ना तशी आदिलशाही आहे, ना निजाम न मोगलशाही. सारंच इतिहास जमा झालेलं असताना आजही शिवचरित्राची, त्याच्या अभ्यासाची गरज का असावी? त्याचा आजच्या ‘टेक्नोसॅवी’ पिढीला काय फायदा? हा प्रश्न वरकरणी योग्य वाटेलही. पण ते खरं नाही.

पूर्वीची सामाजिक, राजकीय, भौगोलिक परिस्थिती बदलली. तरी त्यांच्या मुळाशी असणाऱ्या मानवी प्रवृत्ती मात्र त्याच आहेत. ज्या प्रेरणेनं शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या प्रेरणा आजही अनेक मानवी समूहात आहेत. स्वातंत्र्य हिरावून घेत आपलं वर्चस्व निर्माण करण्याची प्रवृत्ती आजही कायम आहे. अशा वेळी शिवकालीन संघर्ष आणि प्रेरणेची वृत्ती यांचा अभ्यास उपयोगी ठरतोय. आणि उद्याही तो ठरेल.

परकीय आक्रमणापासून मुक्तता, म्हणजेच स्वराज्याची निर्मिती हे छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट होतं. आपल्या अफाट कष्टातून त्यांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. केवळ गड किल्ले जिंकणं, लष्करी सामर्थ्य वाढवणं आणि स्वत:चं राजकीय महत्त्व तयार करणं एवढ्यावरचं त्यांची कर्तबगारी मर्यादित नव्हती. अत्यंत आदर्श असं लोकाभिमुख प्रशासन त्यांनी निर्माण केलं. सामान्य रयतेचे संरक्षण आणि कल्याण हे त्यांच्या शासन काळाचं मुख्य सूत्र असल्यानं ते जनतेचे ‘जाणता राजा’ झाले.

अनेक राजवटींशी थेट मुकाबला

शिवपूर्व जवळ जवळ ३०० वर्षांपूर्वी मुस्लिम आक्रमणातून देवगिरीच्या यादवांचं मराठी राज्य नष्ट झालं. तेव्हापासून महाराष्ट्रावर परकीय सत्ता होती. त्यात उत्तरेत मुघलशाही, दक्षिणेत आदिलशाही, निजामशाही होती. त्यांनी केवळ भूमी व्यापली नव्हती तर इथल्या रयतेवर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक गुलामगिरी लादली. या सर्वांना आव्हान देत शिवाजी महाराजांनी गुलामीची मानसिकता तोडत, परकीय सत्तेचं वर्चस्व गाडून टाकलं. ‘हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची’ न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली.

सोळाव्या आणि सतराव्या शतकात मोगल साम्राज्याचा सूर्य भारतात तेजाने तळपत होता. त्यांना आव्हान देण्याचं सामर्थ्य तेव्हा कुठल्याही हिंदू राजामधे नव्हतं. अशावेळी शिवाजीराजांनी मुगल, आदिलशाही यांच्या राजवटीना आव्हान दिलं. हे करणं सोपं नव्हतं. त्याकाळातलं ते फार मोठं काम होतं. म्हणूनच शिवाजी महाराजांचं कार्य प्रवर्तक देखील ठरतं.

बळीराजाचं प्रशासन

जनतेचं कल्याण हेच शिवशाहीचं प्रधान सूत्र होतं. सामान्य रयत म्हणजे शेतकरी वर्ग. राज्यातला शेतकरी हा सुखी आणि संरक्षित राहावा, त्याचं कल्याण व्हावं ही शिवाजी महाराजांची मनशा होती. त्यासाठी ते प्रचंड जागरूक होते. शिवपूर्व काळात देशमुख-देशपांडे-कुलकर्णी हे वतनदार लोक मनात येईल तसा महसूल गोळा करत. आणि निजाम, आदिलशहाकडं देत. त्याबदल्यात त्यांना काही इनाम मिळायचा. शिवकाळात रयतेकडून जमा होणारा जमीन महसूल हेचं उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं.

शिवाजी महाराजांनी वतनदारांची ही मनमानी सर्वात आधी बंद केली. त्यांनी पिकावर महसूल गोळा करण्याची पद्धत सुरु केली. त्या कामासाठी खास कारकूनांची नेमणूक केली. वतनदारांच्या जुलुमातून शेतकऱ्यांची सुटका केली. बखरकार कृष्णाजी अनंत यांनी याचे वर्णन केले आहे. शिवशाही ही वतनदारांची नव्हे तर सामान्य रयतेची, बहुजनांची असेल अशीच प्रशासकीय व्यवस्था त्यांनी निर्माण केली. इडा, पिडा टळू दे, बळीराजाच राज्य येऊ दे  हा जगतगुरु तुकोबारायांनी दिलेला संदेश शिवरायांनी खरा केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कणव

शेतकऱ्यांच्या आंबे, फणस अशा झाडांना कुठलीही हानी पोचू नये, असा त्यांचा आदेश होता. कारण ही झाडं वाढण्यास वेळ लागतो, तेव्हा त्यांचं संवर्धन हे महत्त्वाचं आहे अशी त्यांची दूरदृष्टी होती. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी अनेक आदेश वेळोवेळी दिलेत. आपल्या राज्यातील शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी ते अत्यंत जागरूक असायचे.

त्यावेळी शेतीमधे ज्या पिकाचं उत्पन्न व्हायचं त्यावर वस्तूच्या रूपानेच महसूल गोळा करण्याची पध्दत होती. पण वतनदार, सुभेदार हा महसूल रोख रकमेच्या स्वरुपात वसूल करायचे. वस्तू रुपात गोळा झालेला महसूल हा सरकारी भांडारात ठेवणं आणि त्याचं संरक्षण करणं हे कटकटीचं होतं. ते काम वतनदार, सुभेदारांना नकोसं वाटायचं. शिवाजी महाराजांना वतनदारांची ही बनवेगिरी अचूक माहीत होती. त्यावर त्यांनी आदेश काढला. शेतकऱ्यांकडून वस्तू स्वरूपातच महसूल गोळा करण्यात यावा, त्याची योग्य साठवणूक करण्यात यावी, तसंच बाजारात योग्य दर येतील तेव्हाच त्या विकण्यात याव्यात.

महाराजांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. ज्या कुणा शेतकऱ्याजवळ शेत आहे पण शेती करायला साधनं नाहीत, अशांना बैल, बी बियाणे, साधने घेण्यासाठी पैसे द्यावेत. ते पैसे लगेच वसूल न करता हप्त्याहप्त्याने वसूल करण्यात यावेत अशा सूचना त्यांनी त्यांच्या आज्ञापत्रात दिलेल्या आढळून येतात. शेतकऱ्यांची काळजी घेतानाच रोजगारही उपलब्ध करून दिला.

अंधश्रद्धेला लाथ मारत आरमारची उभारणी

कारभार करताना केवळ राजा म्हणून सत्ता गाजवण्याची वृत्ती शिवाजी महाराजांची कधीच नव्हती. स्वराज्य उभारतानाच त्यांनी लोकाभिमुख शासन निर्मितीची पाळंमुळं रुजवण्यास सुरवात केली. स्वराज्यातल्या रयतेचं संरक्षण, प्रगती आणि सुशासन ही त्रिसूत्री त्यांनी प्रत्यक्षात आणली. अत्यंत कडक आणि न्याय देणारी प्रक्रिया त्यांनी स्वराज्यात उभारली होती. सरकारचा नियम जो मोडेल त्याला अत्यंत कडक शिक्षा शिवशाहीत होती. त्यातून कुणालाही सुट नव्हती. प्रसंगी जवळच्या नातलगालाही त्यांनी कडक शिक्षा केलीय.

हिंदुस्थानात राज्य मुस्लीम राजवटींच असलं तरी इथल्या समुद्र किनाऱ्यावर मात्र त्यांची हुकुमत नव्हती. इथला अफाट समुद्र किनारा हा डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या ताब्यात होता. हज यात्रेसाठी सुध्दा मुघलांना या शासकांना विनवणी करावी लागत असे.

या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी पश्चिम किनाऱ्यावर आरमाराची भक्कम उभारणी केली. पश्चिम किनाऱ्यावर पकड निर्माण करून समुद्रावर आपलं वचर्स्व निर्माण केलं. त्यावेळी हे फार मोठं आणि प्रचंड अवघड काम होतं. त्याकाळी समुद्र ओलांडून जावू नये अशी हिंदू समाजात अंधश्रद्धा होती. त्यानं इथल्या हिंदू राजांचं फार नुकसान देखील केलंय. या अंधश्रद्धेला नाकारत शिवरायांनी आरमार उभं केलं. सागरावर स्वराज्य निर्माण करणारा या मराठा राजाचे वर्णन डॉ. बाळकृष्ण यांनी ‘द फादर ऑफ मराठा नेवी अँड क्रिएटर ऑफ द इंडियन मर्चंटाईल मरीन’ असं केलय. 

जाती-जातींमधे एकसंध भावना

शिवाजी महाराजांनी मुस्लिम शत्रूंशी संघर्ष केला. कडवा लढा दिला. पण हा संघर्ष करत असताना मुस्लिम समाजाशी त्यांनी कधीही वैर धरलं नाही. शिवशाहीत मुस्लिम समाजाकडे कधीही शत्रू म्हणून पाहिलं गेलं नाही. शिवरायांच्या राजवटीत त्यांना समान वागणूक होती. आपल्या सैन्यात, आरमारात इतकेच नाही तर आपल्या प्रशासनात देखील त्यांनी मुस्लिम समाजाला समाविष्ट केलं. इब्राहीम खान, दौलतखान ही प्रातिनिधिक उदाहरणं. महाराजांच्या ३१ अंगरक्षकांपैकी २१ अंगरक्षक हे मुसलमान होते.

 यासोबतच सर्व जातीच्या लोकांना त्यांनी सैन्यात समाविष्ट केलं. तिथ जातीय भेदभाव नव्ह्ता. आपल्या समाजात आज आपण ज्यांना कनिष्ठ म्हणतो अशा अनेक जातीतल्या लोकांना सरदार, सेनापती पद त्यांनी दिलं. जातीपेक्षा माणसाच्या कर्तबगारीला अधिक महत्त्व होतं. त्यामुळे जाती-जातींमध्ये संघर्ष झाला नाही.

स्वधर्म,  स्वभाषा, स्वसंस्कृतीमधला वेगळेपणा

प्रत्येक समाजाला स्वत:च्या धर्म संस्कृतीचे पालन आणि रक्षण करण्याचा अधिकार आहे. शिवाजी राजांनीही ते केलं. हिंदू या स्वधर्म रक्षणाचं कार्यही केलं. पण स्वत:च्या धर्माचं पालन आणि रक्षण करताना त्यांनी अन्य कोणत्याही धर्माचा छळ केला नाही की तिरस्कार केला नाही. हिंदू धर्म रक्षण करताना त्यांनी स्वराज्यात सर्वधर्म समभावाची मुल्यं रुजवली.

लोकशाही व्यवस्थेत असंच कार्य अपेक्षित असतं. राष्ट्रातील प्रत्येक समाजाच्या धर्माच्या नीती मुल्यांची जबाबदारी ही तिथल्या शासन व्यवस्थेवर असते. शिवाजीराजांनी आपल्या शासनाद्वारे याचा एक आदर्श पाठच तयार केला होता. 

शिवपूर्व काळ हा हिंदू धर्मावरच्या असंख्य अत्याचारांनी भरलेला होता. अशावेळी शिवाजी महाराजांना अन्याय करणाऱ्यांचा कत्तली करून सूड घेता आला असता. पण त्यांनी तसं न करता स्वधर्म रक्षण तर केलंच शिवाय इतर जाती धर्माचं देखील रक्षण केलं. धर्माच्या नावानं राष्ट्र मोठं होत नाही तर सुशासनानं ते होतं हे त्यांनी सिध्द करून दाखवलं. महाराजांनी केवळ स्वराज्य निर्माण केलं नाही तर स्वत:ची संस्कृती, भाषा, इतिहास, समाज म्हणून असलेली अस्मिता यांचं संवर्धन आणि पुनरूज्जीवन केलं. फारसी-अरबी भाषेचा प्रभाव कमी करून मराठीचा राजकोष त्यांनी निर्माण केला.

शिवशाहीच्या अभ्यासातला आपलेपणा

आजवर जगभरात अनेक राजे झाले. पण शिवरायांच्या राज्यव्यवस्थेची चिकित्सा, अभ्यास आजही जगभर होतोय. जगात आदर्श असणाऱ्या अशा भारतीय लोकशाही व्यवस्थेत आजही शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेचं चिंतन होतय. व्याख्यानं होतायत. ३५० वर्षांनंतरही त्या राजाचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही. पुन्हा इथे ‘शिवशाही’ अवतरावी अशी इथल्या सामान्यांची इच्छा आहे. यातच शिवशाही व्यवस्थेचं आणि शिवाजी राजाचं महत्व, वेगळेपण, त्यांची आदर्शवृत्ती अधोरेखित होते.

आज भारत म्हणून आपण स्वतंत्र लोकशाही राष्ट्र आहोत. ७० वर्षांच्या कठीण कालखंडातून जातानाही आम्ही लोकशाहीची मुल्यं जपली. भारताच्या मागे पुढे स्वतंत्र झालेल्या अनेक देशांतली लोकशाही व्यवस्था मोडकळीस आली. पण आपण मात्र सर्वात मोठी लोकशाही म्हणून नावारूपास आलो. हे का शक्य झालं असेल, कारण आपल्या गतकाळातील पिढ्यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ चारित्र्य निर्माण करून ठेवलंय.

आपल्या शासन काळात शिवाजीराजांनी घालून दिलेली नीती मुल्यांची वृत्ती ही पुढील अनेक शतकं आदर्श ठरणार आहे. दुसऱ्याला पराभूत करून त्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याची मानवीय वृत्ती प्राचीन काळापासून आजतागायत बदलेली नाही, बदलणारही नाही. म्हणूनच शिवशाहीचा अभ्यास क्रमप्राप्त ठरतो.

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)