डेस्मंड टुटू: दक्षिण आफ्रिकेच्या सद्‌सद्विवेकबुद्धीचं प्रतीक

२९ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचं गेल्यावर्षी डिसेंबरमधे निधन झालं. आंतरधार्मिक सौहार्दाशी असणारी त्यांची बांधिलकी भारतालाही शिकण्यासारखी आहे. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधे नैतिक अधिकार प्राप्त झालेली टुटू शेवटची व्यक्ती असं इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांचा साधना साप्ताहिकातला लेख इथं देत आहोत.

गेले काही आठवडे मी दक्षिण आफ्रिकेबद्दल बराच विचार करतोय. तिथे सध्या सुरू असलेली टेस्ट क्रिकेटची मालिका, हे यामागचं एक छोटं कारण आहे. पण मुख्यत्वे आर्चबिशप डेस्मंड टुटू यांच्या निधनानिमित्ताने हे विचार माझ्या मनात येत आहेत. टुटू यांच्या निधनामुळे वर्णद्वेषविरोधी चळवळीतला अखेरचा थोर नेता जगाने गमावला आहे.

दक्षिण आफ्रिकेत केलेल्या कार्यासंदर्भात ते अधिक ओळखले जात असले, तरी त्यांच्या मायभूमी व्यतिरिक्त इतर देशांमधल्या अन्यायाबद्दल आणि दडपशाहीबद्दल ते बोलत असत, त्यामुळे त्यांना सर्वत्र आदराचं स्थान मिळालं होतं. जगाच्या सद्‌सद्विवेकबुद्धीची धुरा त्यांच्या इतर समकालीनांपेक्षा त्यांनी अधिक प्रमाणात वाहिली.

ताठ कण्याचा नर्मविनोदी माणूस

मी जानेवारी १९८६ला डेस्मंड टुटू यांना पहिल्यांदा टीवीच्या पडद्यावर पाहिलं. त्या वेळी मी अमेरिकेत अध्यापनाचं काम करत होतो, आणि आर्चबिशप टुटू तिथे दौऱ्यावर आले होते. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेष्ट्‌या राजवटीला अमेरिकेचा आणि अमेरिकी लोकांचा छुपा आणि काही वेळा उघड पाठिंबा मिळत असताना त्यांना खडबडून जागं करावं, हा टुटू यांच्या दौऱ्यामागचा उद्देश होता.

पाश्चात्त्य राष्ट्रांकडून आर्थिक दबाव आला तर दक्षिण आफ्रिकेतल्या सत्ताधाऱ्यांना वांशिक भेदभाव संपवण्यासाठी पावलं उचलणं भाग पडेल, अशी त्यांची धारणा होती. ते अमेरिकेतल्या उद्योगविश्वातल्या धुरीणांना भेटले. यात जनरल मोटर्सच्या प्रमुखांचाही समावेश होता. तिथल्या सर्वोत्तम ज्ञानसंपन्न विद्यापीठांच्या प्रमुखांनाही भेटले. दक्षिण आफ्रिकेतल्या सघन आणि नफादायी गुंतवणुकी काढून घ्याव्यात, अशी आग्रहाची विनंती त्यांनी या मंडळींकडे केली.

अमेरिकेच्या या दौऱ्यामधे टुटू यांचं भुरळ घालणारं आणि धाडसी व्यक्तिमत्व सर्वांना पाहायला मिळालं. ते ताठ कण्याचे असले तरी त्यांचा वावर आकर्षक आणि नर्मविनोदी होता. अमेरिकेतल्या श्रीमंत आणि सत्ताधारी लोकांच्या भेटी घेत असतानाच टुटू यांनी १९६०च्या दशकात नागरी अधिकारांच्या चळवळीमधे भाग घेतलेल्यांशीही संवाद साधला.

वारंवार त्यांची तुलना मार्टिन ल्यूथर किंग यांच्याशी केली जात होती. तेव्हा, अशी तुलना करणं रास्त नसल्याचं सांगत टुटू स्वतःच्या ठेंगण्या, लठ्ठ शरीराकडे आणि अस्ताव्यस्त केसांकडे निर्देश करत पत्रकारांना म्हणाले होते की, ‘बाकीचे मुद्दे आहेतच, शिवाय मार्टिन ल्यूथर किंग माझ्यापेक्षा खूपच जास्त देखणे होते.’

हेही वाचा: लिटल मास्टर गावस्करच्या सत्तरीनिमित्त हे तर वाचावंच लागेल

टुटू विद्यार्थ्यांच्या आंदोलनात

दक्षिण आफ्रिकेत गुंतवणूक केलेल्या अमेरिकी विद्यापीठांमधे येल विद्यापीठाचाही समावेश होता, आणि मी त्या वेळी येलमधेच होतो. टुटू यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमधे, तसंच काही शिक्षकांमधेही चैतन्य निर्माण झालं, आणि त्यांनी येल कॉर्पोरेशनला संपर्क साधला आणि दक्षिण आफ्रिकी कंपन्यांमधला समभाग काढून घ्यावेत अशी विनंती केली.

कॉर्पोरेटरांनी असं करायला तुच्छतेने नकार दिला, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाबाहेरच्या मोकळ्या चौकाचा ताबा घेतला, तिथे लाकडाच्या नि पत्र्याच्या झोपड्या उभारल्या आणि ते तिथेच बसून गाणी गाऊ लागले, घोषणा देऊ लागले, भाषणं करू लागले. विद्यार्थ्यांनी तिथं नेल्सन मंडेला यांची चित्रं लावली होती. वीस वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असलेले मंडेला वर्णभेदविरोधी संघर्षाचे आणि चळवळीतल्या त्यागाचे मूर्त प्रतीक झाले होते.

वर्णभेदी बातम्यांची दखल नाही

येलमधल्या या काळात पहिल्यांदाच मी भारताबाहेर होतो. त्या वेळी मी विशीच्या उत्तरार्धात होतो, पण अमेरिकन टीवीवर बिशप टुटू यांचं बोलणं ऐकेपर्यंत मला दक्षिण आफ्रिकेतल्या घडामोडींची फारशी बातमी नव्हती. मी न-राजकीय होतो असं नाही, पण माझ्याच देशातले वाढते जातीय आणि धार्मिक तणाव माझं लक्ष खेचून घेत होते.

विएतनाम, इराण आणि इतर ठिकाणच्या वादळी राजकीय घडामोडींवर मी लक्ष ठेवून होतो. पण का कुणास ठाऊक, दक्षिण आफ्रिकेतल्या घडामोडींबाबत मी अनभिज्ञ होतो. याचा दोष कदाचित भारतीय मीडियालाही देता येईल. ही माध्यमं क्वचितच दक्षिण आफ्रिकेविषयीच्या बातम्या देत असत. तिथल्या वर्णभेदी राजवटीशी भारताचे राजनैतिक संबंध नसल्यामुळेही बहुधा तसं झालं असेल.

आता टीवीवर टुटू यांचं बोलणं ऐकल्यावर आणि त्यांच्या भाषणांच्या बातम्या वाचल्यावर, तसंच येल विद्यापीठात बहुतांश गोऱ्या विद्यार्थ्यांवर पडलेला प्रभाव पाहिल्यावर मला दक्षिण आफ्रिकेमधे उशिरा का होईना रुची वाटू लागली.

हेही वाचा: भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग

वर्णद्वेष्ट्‌या राजवटीचे टीकाकार

भारतात परतल्यावर मी दक्षिण आफ्रिकेतल्या राजकारणावर अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवून राहिलो. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेवर निर्बंध टाकण्यासाठीची चळवळ जोर धरू लागली होती. आधी वर्णद्वेष्ट्‌या राजवटीवर टीका करायला अनिच्छुक असलेले मार्गारेट थॅचर आणि रोनाल्ड रेगन आता काही प्रमाणात निषेधाचा सूर नोंदवू लागले होते.

नेल्सन मंडेला अजूनही तुरुंगात होते, पण अधूनमधून परदेशी पाहुण्यांना भेटण्याची मुभा त्यांना देण्यात आली. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान माल्कम फ्रेझर यांनीही त्या काळात मंडेलांची भेट घेतली होती. त्या वेळी मंडेलांचा पहिला प्रश्न होता- ‘डॉन ब्रॅडमन अजून हयात आहेत का?’

१९९१ला मी लंडनला होतो, तिथे गोपाळकृष्ण गांधी यांच्या घरी मला अँग्लिकन धर्मोपदेशक ट्रेवर हडलस्टोन भेटले. त्यांना १९५०च्या दशकात वर्णद्वेष्ट्‌या राजवटीवर टीका केली म्हणून दक्षिण आफ्रिकेतून हद्दपार करण्यात आलं होतं. जोहान्सबर्गमधे धर्मोपदेशक म्हणून काम करत असताना हडलस्टोन यांनी अनेक लक्षणीय तरुणांना मार्गदर्शन केलं. डेस्मंड टुटू हे त्यांपैकीच एक होते आणि जॅझ संगीतकार व्यू मासेकेला हेसुद्धा त्याच तरुणांमधून पुढे आले.

हडलस्टोन १९९१ला सत्तरीत होते. एके काळी वर्णद्वेषाविरोधात जोरदार मोहीम चालवणारं त्यांचं शरीर आता अशक्त आणि स्पष्टपणे आजारी वाटत होते. गांधी यांच्या घरी भोजनसमारंभावेळी उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या एका पाहुण्याने तब्येतीची चौकशी केल्यावर हडलस्टोन म्हणाले, ‘माझ्या मृत्यूआधी वर्णद्वेष्ट्‌या धोरणाचा शेवट पाहायला मिळेल, अशी मला आशा आहे.’ हडलस्टोन यांची इच्छा पूर्ण झाली. त्यांना १९९४ला नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्ष झाल्यावर थोड्या कालावधीसाठी दक्षिण आफ्रिकेला जाता आलं.

बहुवांशिक लोकशाहीचे पुरस्कर्ते

मी स्वतः १९९७ ते २००९ या काळात पाच वेळा दक्षिण आफ्रिकेला गेलो. यावेळी मला वर्णद्वेषाविरोधात संघर्ष केलेल्या काही विलक्षण व्यक्ती भेटल्या. त्यात कवी माँगाने वॅली सेरोते यांचा समावेश होता; कला आणि संस्कृती यांची जोपासना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संसदीय समितीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तसंच, समाजवैज्ञानिक फातिमा मीर यांनासुद्धा मी भेटलो; वृद्धत्व आणि शारीरिक अशक्तपणा असूनही त्या अजूनही सक्रिय व सजग होत्या.

कायदेतज्ज्ञ अल्बी सच्स यांचा एक हात आणि एक डोळा दक्षिण आफ्रिकी सुरक्षा दलांच्या हल्ल्यात निकामी झाला, तरीही ते उत्साहाने आणि उमदेपणाने मला भेटले. इतिहासकार रेमंड सटनर यांना तुरुंगात रानटी छळाला सामोरं जावं लागल्याच्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर असतानाही ते समर्पणभावाने एक अकादमिक नियतकालिक चालवत होते. या सर्वांनी आणि त्यांच्यासारख्या इतरांनी इतिहासाच्या जखमा निधडेपणाने बाजूला सारल्या होत्या आणि आता ते सामूहिकपणे पूर्णतः बहुवांशिक लोकशाही उभी करण्यासाठी प्रयत्नशील होते.

या व्यक्तींचं शौर्य, त्यांचा निग्रह, त्यांची बुद्धिमत्ता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे- त्यांच्यातला द्वेषाचा पूर्ण अभाव, हे सगळंच लक्षणीय होतं. या सर्वांची वांशिक पार्श्वभूमी वेगवेगळी होती- कोणी आफ्रिकी होतं, कोणी भारतीय, कोणी मिश्रवर्णीय, तर कोणी गोरं होतं. एक ‘रेन्बो नेशन’ अस्तित्वात येत असताना त्याचं प्रतिनिधित्व ही मंडळी करत होती. ‘रेन्बो नेशन’ हा शब्दप्रयोग डेस्मंड टुटू यांनी चलनात आणला.

भारतामधे १९४० च्या दशकाअखेरीला १९५०च्या दशकारंभी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, प्रशासकीय अधिकारी, न्यायाधीश असण्याचा अर्थही असाच राहिला असेल; त्यातही अशीच आदर्शवादाची प्रेरणा असेल आणि आपल्याहून उत्तुंग थोर नेत्यांकडून स्फूर्ती घेतली जात असेल, असं मला वाटलं.

हेही वाचा: ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!

टुटू यांची भारतभेट

दक्षिण आफ्रिकेतल्या माझ्या दौऱ्यांमधे मी बहुतांशाने लेखकांशी आणि अभ्यासकांशी संवाद साधला, पण आर्चबिशप टुटू यांचं मला कधी दर्शनही होऊ शकलं नाही. २००५ला टुटू एका खाजगी भेटीसाठी बंगळुरूला आले, तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या लहानशा भोजनसमारंभात मलाही निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी मला त्यांच्याशी सुमारे वीस मिनिटं बोलायला मिळालं.

सुरवातीला आम्ही सचिन तेंडुलकरबद्दल बोललो. खेळताना होणारी सचिनच्या पायांची कुशल हालचाल आणि दक्षिण आफ्रिकी वेगवान गोलंदाजांविरोधातली त्याची थरारक तडाखेबंद फलंदाजी, यांबद्दल टुटू यांना अतिशय कौतुक वाटत होतं. मग मी त्यांना ट्रेवर हडलस्टोन यांच्याशी झालेल्या माझ्या भेटीबद्दल सांगितलं. तेव्हा टुटू शोकाकुलपणे आणि प्रेमाने म्हणाले, ‘आफ्रिकी माणसासारखं ट्रेवर यांचं अख्खं शरीर हसायचं.’

सद्‌सद्विवेकबुद्धीचं प्रतीक

डेस्मंड टुटू यांच्यापासून स्फूर्ती घेतलेल्या विद्यार्थ्यांची अमेरिकेतली आंदोलनं मला पाहायला मिळाली आणि मागची दोन दशकं मी राहतो त्या शहरात टुटू यांच्याशी ओझरती भेट झाली. पण हे तुरळक वैयक्तिक दुवे नसते, तरीही डेस्मंड टुटू यांच्या निधनाने मी दुःखी झालोच असतो. कारण, त्यांच्या देशात आणि इतर देशांमधेसुद्धा नैतिक अधिकार प्राप्त झालेले ते बहुधा शेवटची व्यक्ती असावेत.

ते दक्षिण आफ्रिकेच्या सद्‌सद्विवेकबुद्धीचं प्रतीक होते, त्यांनी वर्णद्वेष्ट्‌या राजवटीमधील वंशवादी क्रौर्याचा थेट सामना केला होता, आणि या राजवटीची समाप्ती झाल्यानंतर आफ्रिकन नॅशनल काँग्रेसकडून चालवल्या जाणाऱ्या सरकारमधल्या भ्रष्टाचार आणि साट्यालोट्याचे व्यवहार, यावरही त्यांनी उघडपणे टीका केली.

ज्यू वसाहती उभ्या करणाऱ्यांनी आणि इस्राएली राज्यसंस्थेने पॅलेस्टिनी लोकांवर केलेले अन्याय असोत, किंवा म्यानमारमध्ये नोबेलविजेत्या आँग सान सू की यांच्या नेतृत्वाखालच्या राजवटीने रोहिंग्यांवर केलेले अन्याय असोत, प्रत्येक वेळी टुटू यांनी या घटनांचा विरोध केला. खुद्द त्यांच्या अँग्लिकन चर्चने समलिंगींविषयी दाखवलेल्या तिरस्काराचाही त्यांनी निषेध केला.

टुटू यांच्या जीवनातून आणि त्यांच्या वारशामधून आपल्या देशालाही काही धडे घेण्यासारखे आहेत. विशेषतः आंतरधार्मिक सौहार्दाशी असणारी त्यांची उत्कट बांधिलकी भारतामधे प्रस्तुत ठरणारी आहे. ते धर्मोपदेशक होते, नंतर ते बिशप झाले आणि त्यानंतर आर्चबिशप झाले, पण स्वतःच्या ख्रिस्ती धर्माचं आचरण करण्यात ते अजिबातच पोथिनिष्ठता पाळत नसत. इतर धार्मिक परंपरांमधल्या आदर्श व्यक्तींची प्रशंसा करताना ते स्वतःच एकदा म्हणाले होते, ‘ईश्वर ख्रिस्ती नाहीये.’ तसंच ईश्वर हिंदूसुद्धा नाहीये.

हेही वाचा: 

अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे

बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

अमेरिकेला हवं असणारं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?

(साधना साप्ताहिकातल्या या लेखाचा अनुवाद प्रभाकर पानवलकर यांनी केलाय)