धुळ्यात भाजप का विजयी झाली? 

११ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे. 

राज्याचं लक्ष लागलेल्या धुळे महानगर पालिका निवडणुकीचे निकाल लागले. भाजप आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ही निवडणूक स्पेशल झाली होती. गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या कारणाने अनिल गोटे यांनी स्वपक्षावर कठोर टीका केली होती. अनिल गोटे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र त्याला यश आलं नाही. गोटेंनी त्यानंतर मुख्यमंत्री, रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजनांविरोधात तोफ डागली. 

त्यानंतर मात्र भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी धुळ्यात यावं लागलं. तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे धुळ्यातच ठाण मांडून बसले होते.

या निवडणुकीनंतर धुळ्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असे सर्वसामान्य कयास होता. मात्र मतदान मोजणीनंतर भाजपच्या हातात एकहाती सत्ता आलीय. या निवडणुकीत भाजपाला ५० जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळालंय. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळून १४, एमआयएमला ४, शिवसेनेला आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी २, बहुजन समाज पक्षाला १ अशा जागा मिळाल्यात. तर अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला अवघी एक जागा मिळालीय. या यशाचं श्रेय गिरीश महाजन यांना दिलं जातंय. 

गुन्हेगारीचा मुद्दा चालणार नव्हताच

अनिल गोटे यांनी ज्यांच्यावर गुंडगिरी पार्श्वभूमीचे उमेदवार म्हणून टीका केली. ते  उमेदवार याआधीही सतत निवडून येत होतेच. त्यांच्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीची धुळेकरांना माहिती होतीच. तरीही हे उमेदवार निवडून येत होते. त्यामुळे गुंडगिरीच्या मुद्द्यामध्ये निवडणूक जिंकण्या हरण्याच्या दृष्टीने काहीही दम नव्हता. 

यातले निम्म्याहून अधिक उमेदवार हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून येत होते. भाजपने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेतही हे स्पष्ट झालं होतं की ते पुन्हा निवडून येणार आहेतच. त्यामुळे भाजपने त्यांची निवडणून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच त्यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. त्यामुळे भाजपला त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचाही रोष ओढवून घ्यावा लागला होता. तरीही ते आता भाजपच्या तिकीटावर पुन्हा निवडून आलेच. 

राष्ट्रवादीला सर्वाधिक नुकसान

कोरी पाटी असलेले उमेदवार देऊ अशी घोषणा अनिल गोटे यांनी केली. मात्र अनिल गोटे यांच्याकडे मोजके दोनतीन चेहरे वगळता तगडे उमेदवार नव्हतेच. त्यामुळे या निवडणुकीत अनिल गोटे यांचा प्रभाव पडणार नाही, हे स्थानिकांना माहीत होतंच. अर्थात ते विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांची बंडखोरी हा चर्चेचा आणि बातम्यांचा विषय होताच. 

प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी असे स्टंट करण्याची गोटे यांची सवय आहेच. मागच्या निवडणुकीच्या वेळेस गोटे यांनी महिलाराज आणणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र तेव्हाही धुळेकर जनतेने गोटेंना आतासारखीच एक जागा दिली होती.

गोटेंकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं नाही. सगळ्यात मोठं नुकसान राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावं लागलंय. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने ३४ जागा जिंकल्या होत्या. त्या राष्ट्रवादीला यंदा अवघ्या नऊ जागांवर समाधान मानावं लागलंय. राष्ट्रवादीच्या तगड्या उमेदवारांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीवर ही परिस्थिती ओढवलीय. यात महापौर, सभापती यासारखी प्रतिष्ठेची पदं उपभोगलेले उमेदवारही होते. त्यामुळे यात महाजनांचा करिष्मा किती आणि आयात रेडीमेड नगरसेवकांचा किती, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

शिवसेनेने घालवली अब्रू 

धुळ्यात मराठा क्रांती मोर्चानंतर राष्ट्रवादीचे माजी शहरप्रमुख मनोज मोरे यांचा कल हिंदुत्ववादी विचारांकडे गेल्याचं दिसत होतं. धुळ्यात त्यांनी काढलेल्या मोर्चानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षाशी त्यांची जवळीक वाढली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचा मुस्लिम मतदार नाराज होता. त्याचाही फटका या निवडणुकीत राष्ट्रवादीला बसला असण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीने शिवसेनेने स्वतःची अब्रू घालवलीय. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोघा महानगर प्रमुखांना अपयशाचा सामना तर करावा लागलाय. शिवसेनेच्या पदरात केवळ दोन जागांचं दान पडलंय. एमआयएमलाही शिवसेनेच्या दुप्पट जागा मिळाल्यात. कधीकाळी महानगर पालिकेवर पहिला महापौर बसवून भगवा फडकवणाऱ्या शिवसेनेची परिस्थिती केविलवाणी झालीय. अंतर्गत दुफळी, अधिकार लालसा, एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण यामुळे शिवसेनेच्या निष्ठावंतांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपचे बळ आपसूकच वाढत गेलं. 

पैशांची मुक्तहस्ते उधळण

कधीकाळी महानगर पालिकेत अवघे तीन सदस्य असलेल्या भाजपने ५० जागांपर्यंत मजल मारलीय. त्यामागे आयात केलेले उमेदवारांच्या प्रभाव हे महतत्त्वाचं कारण आहेच. सोबतच निवडणुकीत मुक्त हस्ताने झालेली पैशांची उधळण हेही कारण असल्याचं सांगितलं जातं. गिरीश महाजनांनी जामनेर आणि जळगावमधून दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते आणले होते. त्याचबरोबर नीट प्लानिंग करून महाजन, भामरे, रावल या तिघांनी प्रचंड मेहनत घेतली, हे नाकारता येत नाहीच.

धुळे महानगर पालिकेत भाजपने शहराला अच्छे दिन आणणार, असं आश्वासन दिलंय. तसं मुख्यमंत्र्यांनीच धुळ्यात येऊन सांगितलंय. सध्या तरी महापालिकेत भाजपलाच अच्छे दिन आलेत. आता धुळे शहराला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा मात्र धुळेकरांना फारशी नाही.