डायना राजमुकुटाची गरज नसलेली राजकन्या

३१ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


असामान्य सौंदर्य लाभलेली डायना स्वतंत्र विचारांची होती. आजच्याच दिवशी ३१ ऑगस्ट १९९७ मधे कार अपघातात तिचा मृत्यू झाला. अवघ्या विसाव्या वर्षी डायना ब्रिटनच्या राजघराण्याची युवराज्ञी झाली आणि ती एकाएक प्रकाशझोतात आली. अखेरपर्यंत मीडिया आणि फोटोग्राफीच्या प्रकाशातच वावरली. शेवटी त्यानेच तिचा घातही केला. फोटोग्राफर्सना चुकवतानाच जीव गमवावा लागला.

पॅरिस शहरातल्या एका हॉटेलातून ते दोघं वेगाने बाहेर पडले. त्या दोघांचा एकत्रित फोटो काढण्यासाठी पॅपाराझींची गडबड सुरू होती. त्यांना टाळण्याचा ते दोघं आटोकाट प्रयत्न करत होते. त्यांच्या गाडीच्या ड्रायवरने हे ओळखलं. त्यानं गाडी जरा वेगानं पुढे नेली. यानंतरही पॅपाराझी दोघांचा फोटो काढण्यासाठी ते दोघांच्या गाडीचा पाठलाग करू लागले. त्यांना टाळण्यासाठी ड्रायवरने ती आलीशान मर्सिडीज गाडी अधिक वेगाने समोर नेली, पण नियंत्रण सुटल्याने एका बोगद्यात गाडीला भीषण अपघात झाला.

या अपघातात त्या वाहनातली महिला जागीच ठार झाली. काही वेळातच जगभरातल्या मीडियात त्या अपघाताची बातमी झळकायला सुरवात झाली. कारण त्या अपघातात ठार झाली होती ब्रिटनच्या युवराजाची घटस्फोटित बायको युवराज्ञी 'डायना'. ३१ ऑगस्ट १९९७ हा तो दिवस. जिवंत असताना आणि मृत्युनंतरही तिचं आयुष्य हे सामान्यांसाठी कुतूहल होत, आजही आहे.

सर्वसामान्य घरातली मुलगी

ती होती तेव्हाही मिथक होती आजही मिथक आहे. डायना एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली, असामान्य सौंदर्य लाभलेली एक मदनगंधा. तिच्या सौंदर्यावर भाळूनच ती प्रकाशझोतात यायला लागली. ब्रिटिश राजघराण्यातून तिला लग्नासाठी पसंती आली. ब्रिटिश युवराजाच्या लग्नासाठी जी नऊ स्थळं आली होती त्यात डायनाचंही नाव होतं. तेव्हाच सर्व मीडियाचं तिच्याकडे लक्ष गेलं.

ब्रिटिश नागरीकांनी तेव्हा नाकं मुरडली. डायनाचं माहेर राजघराण्याशी संबंधित नव्हतं किंवा युरोपातलं अतिश्रीमंतही नव्हतं. तरीही अवघ्या २० वर्ष वयाच्या डायनाची निवड युवराज्ञी म्हणून झाली आणि ती एकाएक प्रकाशझोतात आली. तेव्हांपासून ते अखेरपर्यंत ती मीडिया आणि छायाचित्रांच्या प्रकाशातच वावरली. शेवटी त्यानेच तिचा घातही केला. ज्या मीडियाने जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली त्याच मीडियातल्या फोटोग्राफर्सना चुकवताना तिला जीव गमवावा लागला.

राजघराण्याच्या सभ्यतेचा बुरखा फाडला

आयाळ झडलेल्या साम्राजाच्या राजघराण्याची सून म्हणजे डायना. तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली ती केवळ इतक्या मोठ्या राजघराण्यातली सून म्हणूनच नाही तर स्वतःचे स्वतंत्र विचार घेऊन जगणारी एक परी म्हणूनही. सासूच्या धाकात आणि नवऱ्याच्या दराऱ्यात ती राहिली असती तर कदाचित डायनाला इतकी प्रसिद्धीही मिळाली नसती. राजवाड्याच्या चार भिंतीत राजघराण्याचे नियम पाळत स्वतःच्या विचार आणि स्वप्नांना मुरड घालत ती आदर्श सून झाली असती तर तिच्याभोवती इतकं वलय निर्माण झालं नसतं.

डायनाने राजघराण्याच्या भिंतीत आपल्या स्वत्वाला, स्वतंत्र विचारांना तिलांजली दिली नाही. आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा ठसा समाजात निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न अखेरपर्यंत चालू ठेवला. तिच्या आकस्मिक मृत्युमागे बकिंगहॅम पॅलेस आहे, असं ब्रिटिश नागरिकांच म्हणणं आहे. कारण ज्या प्रखरपणे तिने ब्रिटिश राजघराण्याच्या सभ्यतेचा बुरखा फाडला होता त्यात त्या राजघराण्याची खानदान की इज्जत मिट्टी में गेली होती. तिच्या मृत्युनंच ती प्रतिष्ठा परत येऊ शकली असती असं राजघराण्यातल्या लोकांना वाटत होतं.

ब्रिटिश राजघराणं आणि कठोर विक्टोरियन संस्काराच्या घराण्यातील चालीरितींची नियमावली माणसाचं मन कसं करकचून बांधून टाकते, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डायना होती. या राजघराण्याच्या कर्मठ चालीरितींची अनेक उदाहरणं इंग्रजी साहित्यात आहेत. पण तरीही सामान्य ब्रिटिश जनतेत या राजघराण्याविषयी, त्यांच्या चालीरिती, भानगडी हे सगळ माहीत असूनही त्यांच्या मनातील राजघराण्याचं अप्रूप आहेच.

हेही वाचा: विद्या सिन्हाचं मन सुंदर होतं म्हणून ती सुंदर होती

स्वतंत्र विचार आणि स्पष्टवक्तेपणा

डायना स्वतंत्र विचारांची होती. आपल्या विचारांची राजवाड्यात मुस्कटदाबी होतेय, हे लक्षात यायला लागल्यावर तिने बंड पुकारलं. खरंतर तिला राजघराणं लोकाभिमुख करायचं होतं. अमाप संपत्ती, ऐश्वर्य उपभोगत असलेल्या राजघराण्यातल्या लोकांनी सर्वसामान्यात मिसळावं, असं तिचं मत होतं. कदाचित ती राजघराण्यातून किंवा युरोपातल्या अतिश्रीमंत घराण्यातून आली नव्हती म्हणून असेल. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तिने ही भूमिका मांडली होती.

मीडियाला दिलेल्या मुलाखतींमधे तिने आपली वेदना बोलूनही दाखवली. बंडखोरीचं ते पहिल पाऊल होत. ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्ती उघडपणे त्या राजवाड्यातल्या उणिवांवर जाहीरपणे बोलतेय हे ब्रिटिश समाजव्यवस्थेसाठी धक्कादायक होतं. पेपर आणि न्यूज चॅनल्सनी त्याची प्रचंड दखल घेतली. ज्यातून डायनाभोवती वलय निर्माण व्हायला सुरवात झाली. तिच्याभोवती प्रचंड वलय निर्माण झालं. अत्यंत निरागस पण स्पष्टपणे आपलं मत मांडणारी ती अल्पावधीत युरोपात नावारूपाला आली.

फोटोग्राफर्सचा तिला असाही त्रास

तिच्या विलोभनीय व्यक्तीमत्वाचं आकर्षण इतकं होतं की लोकप्रियतेत युवराज चार्ल्स, राणी एलिझाबेथही कधी कधी मागे पडत. लग्नानंतर काही महिन्यातच पतीच्या वागणूकीतून दोन तीन वेळा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. धैर्याने त्याला घटस्फोटही दिला आणि आपला स्वतःचा मार्ग निवडला. त्याची फार मोठी किंमत तिने आयुष्यभर दिली. तिच्या आयुष्याशी संबंधित सगळं काही न्यूज मटेरियल झालं होतं.

डायनाच्या लग्नापासून तिच्या वैवाहिक जीवनात आणि घटस्फोटानंतरही तिला खासगी जीवन जगूच द्यायचं नाही, असा विडाच फोटोग्राफर्सनी उचलला होता. तिच्या खासगी आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यांना शूट करायचा होता. त्यासाठीची कमाल मर्यादा त्यांनी केव्हाच ओलांडली होती. आपल्या शूट करण्याच्या नादात आपण कुणालातरी खरंचं शूट करतोय, याच भान त्यांना तेव्हा नव्हतं, त्यातच तिचा अपघातात जीव गेला. डायनाच्या वैयक्तिक आयुष्यातले फोटो काढण्यासाठी पॅपाराझीमधे चढाओढ लागली होती. तिचं म्हणून एक खासगी आयुष्यच नष्ट करण्याच्या मार्गावर सगळे छायाचित्रकार होते. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने अशा फोटोग्राफर्सना हिंस्त्र म्हणून संबोधलं होतं.

हेही वाचा: कंदील बलुच: पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

पॅपाराझी म्हणजे कोण?

१९६० मधे जगप्रसिद्ध इटालियन डायरेक्टर फेडरीको फेलीनी यांचा डोल्च व्हीटा हा सिनेमा आला होता. हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमातल्या नायकाचं नाव होतं पॅपारोझा. त्याचा अपभ्रंश झाला तो पॅपाराझी. ताझियो सेचियारोली या एका गुणी फोटोग्राफरवर हा सिनेमा बेतलेला होता. सेचियारोली हा वृत्तपत्रांना फोटो विकून पोट भरत असे. पण रोज विकाण्याजोगे फोटो मिळत नसल्याने तो नट-नट्या, उद्योगपती, राजकारणी यांचे बेसावध क्षणी फोटो काढायचा.

ही मंडळी कधी रागात, कधी मनमोकळी, कधी प्रियकर प्रेयसीसोबत असायची. असे फोटो काढण्यासाठी सेचियारोली मोठ मोठ्या फाईवस्टार हॉटेलबाहेर किंवा कार्यक्रमांच्या ठिकाणी दबा धरून बसायचा आणि ते क्षण टिपायचा. त्या फोटोंची मग समाजात फार चर्चा व्हायची. अशा फोटोंना किंमतदेखील चांगली मिळायची. कारण असे फोटो पाहण्यासाठी वाचक तो पपर विकत घ्यायचे, पेपरचा खप वाढायचा. गेल्या दोन, तीन दशकात युरोप, अमेरिकेत ही पॅपाराझी संस्कृती प्रचंड रूजलीय. आज भारतातही पेज थ्री कल्चर रूळलंय.

इंग्रजी पेपरपुरतं मर्यादीत असलेल्या या क्षेत्राने मराठी पेपरांची विश्वही व्यापून टाकलंय. इंग्रजीप्रमाणे मराठीतही आता नट नट्यांच्या खासगी आयुष्याचे फोटो झळकतात. शब्दांचा मसाला लावून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा केली जाते. वाचक ते वाचतातही, खास करून तरूण पिढी. डिजिटल मीडिया, सोशल मीडियातही सेलिब्रिटींचे फोटो मोठ्या आकर्षणातून लाईक केले जातात.

ती खरंच मिथक होती?

डायना युवराज्ञी होती तेव्हाही आणि घटस्फोट घेतल्यानंतरही जगातील लाखो महिलांना तिच्याबद्दल प्रचंड आपुलकी वाटते. त्यांना ती परी असूनही त्यांच्यासारखीच कुचंबनेत अडकलेली दिसली. त्या असंख्य महिलांना तिच्या बंडखोरीत स्वतःचं बंड दिसलं. ती आजही शेकडो महिलांच्या बंडखोरीचं प्रेरणास्थान आहे. चूल आणि मुल या व्यापात अडकलेल्या महिलांना घरात साधा विरोध करता येत नाही तिथं डायनाने युवराज्ञी पदाला लाथ मारली आणि स्वतःच्या कुटुंबाला घेऊन राजवाड्याबाहेर पडली, ही सामान्य गोष्ट नव्हतीच. आणि आजही नाही.

स्वतःच्या मुलांना स्वतःच्या हिंमतीवर वाढवण्याची जिद्द घेवून, आपल्या मनाप्रमाणे वागण्याची, हव्या त्या व्यक्तीवर प्रेम करण्याची उर्मी मनात घेवून ती राजवाड्याबाहेर पडली. घटस्फोट घेतल्यानंतर लब्ध प्रतिष्ठित लोकांच्या वर्तुळात राहून पुढचं आयुष्य तिला आनंदात घालवता आलं असतं. पण तसं न करता तिने वंचितांच्या सेवेचं कार्य सुरू केलं. आपल्या कुवतीप्रमाणे तिने अनेक अनाथ मुलांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: अरुण जेटलींच्या मृत्यूचं कारण वेट लॉस सर्जरी?

डायना लोकांच्या मनात राहिली

इंडोनेशियातल्या झोपडपट्टीत जाऊन तिथल्या मुलांचे अश्रू पुसले. बोस्नियातल्या मुलांना आधार दिला. वांशिक वादात होरपळत असलेल्या युगोस्लावियात जाऊन सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एड्सबाधित रूग्णांना आधार द्यायचा प्रयत्न केला. हे सर्वकाही तिने प्रसिद्धीसाठी केलंय, असं काहींचं मत आहे. पण तिला हे सर्व प्रसिद्धीसाठी करण्याची गरज नव्हती. ती मुळात प्रसिद्धीच्या उंच शिखरावर आरूढ होती.

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या मते, डायनाला लोकांच्या मनात स्थान मिळालं ते तिच्यातील सुसंस्कृतपणातून, तिच्यातील माणुसकीतून, मनाच्या उमदेपणातून आणि बंडखोरीतून. तिच्या डोळ्यांत, चेहऱ्यात, व्यक्तिमत्वात, जे चैतन्य होतं, उत्साह होता, नितळपणा होता तोच लोकांच्या जीवनात आशा, उमेद निर्माण करणारा होता. असंख्य लोकांच्या मनात ती अजून बराच काळ एक मकँडल इन द विंडफ तेवत राहील अशी ती होती.

मृत्यूला जबाबदार कोण?

ब्रिटिश राजघराण्यातली युवराज्ञी म्हणून तिच्या सामाजिक वावराला एक राजकीय परिमाण होतं. हे मान्य केलं तरी लग्नापूर्वी आणि लग्नानंतर तिनं कुणावर प्रेम केलं, तिच्या आयुष्यात आता कोणता व्यक्ती आहे हा तिचा अत्यंत खासगी प्रश्न होता. पण ती राजकीय पार्श्वभूमी असलेल्या राजघराण्यातली व्यक्ती आहे, त्यामुळे तिच्या खासगी जीवनात डोकावण्याचा पत्रकारांना हक्क आहे असा पवित्रा काही पत्रकारांनी घेतला होता.

तो रास्त असेलही पण कुणाच्या जीवनात किती डोकावायचं याच्या मर्यादा न पाळल्या गेल्यामुळे डायनाला आकस्मितपणे जीवनाला मुकावं लागलं. डायनाच्या मृत्युला जबाबदार कोण या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतला तर तिच्या खासगी आयुष्यात आक्रमण केलेला मीडिया, सातत्यानं तिच्या मागावर असलेले पॅपाराझी, ब्रिटिश राजघराणं, तिचा डोडी नावाचा मुस्लिम प्रियकर आणि इतर काही लोकांवर संशयाची, आरोपाचे बोट उचलले जाते. खरंतर त्यातलं एक बोट समाज म्हणून आपल्याकडेही येतं.

कुणाच्या तरी खासगी आयुष्यातल्या घडामोडीत आपण इतका रस दाखवतो की त्यात त्या व्यक्तीचा खासगीपण आपण संपवून टाकतो. पॅपाराझी काढत असलेले फोटो काल पेरपमधे आणि आज सोशल मीडियावर चवीने पहायला आपल्याला आवडतं. आज तर सोशल मीडियाच्या महाप्रचंड जाळ्यात जाणते अजातेपणाने आपण सगळेच पॅपाराझीचे प्रतिनिधी होत आहोत. काल डायना गेली. कदाचित उद्या आपण असू.

हेही वाचा: 

चला यंदा इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया!

मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!

शॉशांक रिडीम्पशन: कारागृहातल्या घुसमटीचं अस्वस्थ करणारं चित्रण