खरंच संत नामदेव चमत्कार करायचे?

३० जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


संत नामदेवांच्या नावावर अनेक चमत्कार नोंदवले गेलेत. पंजाबमधल्या समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूवर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यात आलेत. त्यात या सगळ्या प्रसंगांचा समावेश आहे. खरंच नामदेवांनी असे कोणते चमत्कार घडवून आणले का वादाचा मुद्दा आहे. इतकंच नाही तर त्यांची समाधी, आणि पुण्यतिथीचं नेमकं साल कोणतं याबद्दलही मतमतांतरं आहेत.

महाराष्ट्रातल्या संतपरंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण वार्षिकांकाने २०१२ मधे संत नामदेव विशेषांक प्रसिद्ध केला. या विशेषांकात पत्रकार आणि सध्या ओआरएफ संस्थेत रिसर्च फेलो असलेल्या निलेश बने यांनी पंजाबमधील घुमान इथे जाऊन रिपोर्ताज केलाय. त्या रिपोर्ताजचा हा संपादित अंश.

 

संत नामदेव यांच्या घुमान इथल्या समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूवर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यात आलेत. यात मजेशीर आणि चमत्काराने भारलेल्या गोष्टी आहेत. या गोष्टी भाई काश्मीर सिंहांनी सविस्तर सांगितल्या. महाराष्ट्रात जशा ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखे वदवलेले वेद, चालविलेली भिंत, तुकारामांचे वैंकुठगमन अशा कथा सर्वांना माहीत आहेत, तसंच नामदेवांच्या या कथा इथल्या प्रत्येकाला पाठ आहेत.

या कथा ऐकताना, संतमहात्म्यामधे या चमत्कारांच्या गोष्टी अपरिहार्य असतात का? असा प्रश्न डोक्यात भूणभूण करत होता. पण लोकांमधे संतविचारापेक्षा या कथाच अधिक लोकप्रिय असतात. त्या किती खर्‍या किती खोट्या हे सिद्ध करायला कोणताच पुरावा नाही. पण या कथांमधून संत अधिकाधिक लोकांपर्यंत पोचले हे मात्र नाकारता येत नाही.

अशीही एक कथा?

नामदेवांच्या या कथांमधून चमत्काराचा भाग काढला तरी त्यातून त्यांच्या पंजाबमधल्या स्मृती नोंदल्या गेल्या आहे, हेही आवर्जून समजून घ्यायला हवं. याच घुमटावरच्या चित्रांचा संदर्भ देत काश्मीर सिंग सांगत होते, एकदा नामदेवांची लोकप्रियता पाहून दिल्लीच्या बादशाहाने त्यांना दरबारात बोलावलं. त्यांच्यापुढे एक मेलेली गाय आणली आणि सांगितलं की, तुम्ही स्वतःला तपस्वी म्हणवता ना? मग ही मेलेली गाय जिवंत करा. 

नामदेवांनी बादशाहाला सांगितलं, जीवन आणि मरण परमेश्वराच्या हातात आहे, माझ्या हातात नाही. या गाईला जिवंत करणं मला शक्य नाही. नामदेवांच्या या उत्तरावर बादशाह चिडला. त्याने नामदेवांना सांगितलं तुम्ही गाय जिवंत केली नाहीत, तर तुम्हाला हत्तीच्या पायी देईन. नामदेव आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर राजाने पिसाळलेला हत्ती बोलावला. पण ध्यानस्थ बसलेल्या नामदेवांजवळ हत्ती आल्यावर तो शांत झाला. त्याने मारण्याऐवजी नामदेवांपुढे डोकं झुकवलं. 

नामदेवांची ही शक्ती पाहून राजा आवाक् झाला आणि त्याने नामदेवांची माफी मागितली. या कथेतला हत्तीचा चमत्कार सोडला तरी, दिल्लीवरून नामदेव अमृतसरजवळच्या भूतविंड गावात आले, असं काही संशोधकांचंही म्हणणं आहे.

हेही वाचाः साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

औंढा नागनाथाचं मंदिर फिरवलं?

या कथांमधूनही नामदेवांच्या उत्तरेतील प्रवासाचे संदर्भ सापडतात, असंही म्हणता येतं. याच घुमटावरील चित्रांमधे नामदेवांची महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली औंढा नागनाथाचे मंदिर फिरवल्याच्या कथेसह बादशाहाची आणखी एक कथा चितारली आहे. काश्मीर सिंहांनी तीही कथा सांगितली. म्हणाले, एकदा बादशाहानं बाबा नामदेवांना झोपायला बिछाना पाठवला. तर बाबाजींनी समोरच्या नदीमधून हात फिरवला आणि अनेक बिछाने तरंगत येऊ लागले. 

ते पाहताच बाबाजी बादशाहाला म्हणाले, माझ्यासाठी अनेक बिछाने आहेत. पण माझ्यासारख्या साधकाने बिछान्याचा मोह बाळगून कसं चालेल? त्यामुळे मला तुमचा हा बिछाना नको. नामदेवांच्या अनासक्त संन्यस्त जीवनाचं दर्शन घडविण्यासाठी कथाकारांनी ही कथा रचली असणार, हे कोणत्याही सूज्ञ माणसाला मान्य होईल. पण या कथांनीच भारतीय संस्कृती पिढ्यानपिढ्या पुढे सोपवली आहे, हे विसरून चालणार नाही.

वाघासोबत खेळणारे नामदेव

नामदेवांच्या या चित्रमालिकेत बालपणी वाघासोबत खेळणारे नामदेव तसेच चुलीमधे जाऊनही काहीही न होणारे नामदेव असे चमत्कारही दाखवण्यात आले आहेत. या सर्व चित्रांमधे आणखीही एक चित्र आहे. ते चित्र पाहिले आणि आत खोल खोल कुठेतरी काहीतरी जाणवले. मराठी मन शहारून उठले. ते चित्र होतं, विठ्ठल कीर्तनात तल्लिन झालेल्या नामदेवांचं. लहानपणापासून नामदेवांचं जे चित्र पाहत आलो ते हेच चित्र. आपण ज्या ‘आपल्या’ नामदेवांच्या शोधासाठी इथपर्यंत आलो ते हेच, ही खूणगाठ पटली आणि हात आपोआप जोडले गेले.

जोडलेल्या हातांसोबत डोक्यात विचारांचे कल्लोळ सुरू होते. नामदेव जन्मले ते महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी कुठे? नामदेवांचा निजध्यास असलेले पंढरपूर कुठे? आणि नामदेवांनी आपल्या अमोघ वाणीने जिंकेलेलं पंजाब कुठे? भूगोलाच्या भाषेत पाहायचं तर सुमारे दीड हजार किलोमीटरचं हे अंतर. आजही घुमानमधे येण्यासाठी करावा लागणारा प्रवास खूप मोठा आहे. चौदाव्या शतकात कोणतीही दळणवळणाची साधनं नसताना नामदेवांनी हा प्रवास कसा केला असेल? अशी काय प्रेरणा असेल जी त्यांना इथवर घेऊन आली.

हेही वाचाः 

आपापल्या प्रबोधनाची एकादशी

आज देहूत संत तुकारामांचा तारखेनुसार जन्मोत्सव

मग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच