सुमित्रा भावे: सिनेमाला समाजाचा आरसा बनवणाऱ्या चित्रकर्मी

२१ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले.

अत्यंत समृद्ध आणि तृप्त असं आयुष्य जगून सुमित्राताई गेल्या. तब्बल ३५ वर्षांची त्यांची कारकीर्द. सुरवातीचं दशक जवळपास शॉर्टफिल्मला वाहिलेलं. त्यानंतरच्या २६ वर्षांमधे तब्बल १६ आशयघन सिनेमांचं लेखन-दिग्दर्शन. शॉर्टफिल्म आणि सिनेमांना मिळून एकूण सात राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार.

एवढ्या संख्येनं पुरस्कार पटकावणारी ही बहुदा पहिलीच मराठी व्यक्ती असावी. मुख्य म्हणजे पुरस्कारांच्या पलीकडचा आनंद सुमित्राताईंच्या कलाकृतींनी दिला. ज्या विश्वासार्हतेनं, प्रामाणिकपणानं त्या स्वतःचं आयुष्य जगल्या, तोच भाव त्यांच्या सिनेमांनी दिला. म्हणूनच त्यातल्या बहुतेक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालून बसल्यात.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

वेगळ्या वाटांनी घडवलेलं बालपण

माणसाचं मोठेपण हे तो ज्या स्थित्यंतरांमधून जातो, त्याच्यातून बऱ्यापैकी स्पष्ट दिसतं. सुमित्राताईंचा प्रवासही खूप वेगवेगळ्या वाटांनी झाला. त्यांचा जन्म अत्यंत पुढारलेल्या घरातला. वडील उच्चशिक्षित. घरात वेगवेगळ्या विषयांवरची शेकडो पुस्तकं. साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास. संगीताचीही आवड. हे सुमित्राताईंमधेही कुठंतरी कळत नकळत झिपरत गेलं.

एक माणूस म्हणून उत्तम जडणघडण कशी व्हावी, याचं आदर्श उदाहरण म्हणून सुमित्राताई आपल्या बालपणाकडे पाहतात. वडलांसोबत त्यांनी लहानपणीच देशविदेशातले सिनेमे पाहिले. फ्रेंच तत्त्ववेत्त्यांच्या साहित्यकृती त्यांना वडलांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. त्यामुळे खूप कमी वयात त्यांच्या जाणीवा समृद्ध झाल्या.

त्या मुळात उत्तम चित्रकार. नृत्याची चांगली जाण. पं. रोहिणी भाटे यांच्याकडे तब्बल दशकभर त्यांनी नृत्याची तालीम घेतली. त्यामुळे कारकीर्दीसाठी खूप वेगवेगळी क्षेत्रं त्यांच्यासाठी खुली होती. पण आपला समाज हा कायमच त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या अग्रस्थानी राहिला.

दादा धर्माधिकारींकडून प्रेरणा

दिल्लीतल्या आकाशवाणीवरच्या मराठी बातम्यांचं वाचनही त्यांनी केलं. पण, त्यात त्यांचं मन फार काळ रमलं नाही. मग त्यांनी एक दिवस शिक्षक म्हणून काम सुरू केलं. सामाजिक कार्य हा समजून घ्यायला आणि अंमलबजावणी करायलाही अवघड असणारा विषय त्यांनी अगदी आवडीनं शिकवला.

पण, केवळ शिकवून समाज जागा होणार नाही, याची त्यांना खूप लवकर जाणीव झाली. म्हणून त्या समाजात मिसळायला लागल्या. त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली ती दादा धर्माधिकारींकडून. म. गांधींचं सामाजिक योगदान हा त्यांच्या पीएचडी प्रबंधाचा विषय होता. तो त्यांनी पूर्णही केला. परंतु, त्याचं सादरीकरण त्यांनी केलं नाही.

प्रत्यक्ष काम करण्याचा धर्माधिकारींचा सल्ला मानून सुमित्राताई दीन-दलित, गरिबांचं दुःख समजावून घ्यायला लागल्या. कोणत्याही सोप्या गोष्टीकडे त्यांची नजर वळायची नाही. म्हणूनच ग्रामीण भागातली शाळा सोडलेली मुलं, अविवाहित माता, महिला गुन्हेगारांना शिकवण्याचं अवघड काम त्यांनी स्वतःकडे घेतलं.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

चाळीशीत पहिली शॉर्टफिल्म

कुमारी मातांचा अभ्यास करताना त्या जवळपास ३०० महिलांना भेटल्या. गुन्हेगारी स्त्रियांची मानसिक अवस्था समजावून घेण्यासाठी तुरुंगात जाऊन त्यांनी खून सिद्ध झालेल्या अनेक महिलांची भेट घेतली. या सगळ्या अभ्यासातून सुमित्राताईंच्या मनातली स्त्रियांची प्रतिमा आणखीनच ठळक झाली. स्त्रियांच्या समस्यांवर काम करणाऱ्यांचा आपल्याकडे सहज ‘स्त्रीवादी’ म्हणून उल्लेख केला जातो. पण सुमित्राताईंना ‘स्त्रीवादी’मधला ‘वादी’ शब्द मान्य नव्हता.

त्यांना स्त्रीची प्रतिमा बदलत्या संदर्भांनुसार चितारायची होती. एखाद्या पुस्तकातुन त्यांना ती समाजासमोर आणता आली असती. पण, ज्या अशिक्षित स्त्रियांच्या दुःख, वेदना आपण जाणून घेतल्या, त्या त्यांनाच वाचता आल्या नाहीत तर, मग या सगळ्या प्रयोगाचा काहीच उपयोग नाही, हे त्यांना जाणवलं. त्या अशा माध्यमाच्या शोधात होत्या की, जे माध्यम कोणालाही पटकन समजेल. असं एकमेव माध्यम म्हणजे शॉर्टफिल्म, सिनेमा.

सिनेमा माध्यमाचं कोणतंही प्रशिक्षण न घेता १९८५ मधे सुमित्राताईंनी ‘बाई’ नावाची शॉर्टफिल्म बनवली. यावेळी त्यांच्या वयानं चाळीशी पार केली होती. एवढ्या उशीरा सिनेमा क्षेत्रात येऊनही या माध्यमावर आपला ठसा उमटवणाऱ्या सुमित्राताई एकमेव असाव्यात. तिथून तब्बल ३५ वर्षं सातत्यानं त्या या माध्यमाशी एकरूप होऊन राहिल्या.

समांतर सिनेमांची वाट

सुमित्राताईंचा पहिला सिनेमा येण्यासाठी १९९५ हे साल उजाडलं. पण ‘दोघी’नंतर सुमित्राताईंनी जवळपास दर दोन वर्षांनी एक तरी सिनेमा प्रेक्षकांसमोर आणलाच. अनेकांना सुमित्राताईंचे सिनेमे हे १९८० च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत आलेल्या समांतर सिनेमांसारखे वाटतात.

हिंदीतल्या समांतर सिनेमा चळवळीतले दोष टाळून सुमित्राताईंनी त्याला समांतर अशी आपली स्वतःची वेगळी अशी वाट बनवली आणि त्यावर त्या अगदी अखेरपर्यंत चालत राहिल्या. २०१९ मधला ‘दिठी’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा.

गेल्या वर्षीच्या ‘द डिसायपल’ या सिनेमात त्यांचा वाइसओवर आहे. एवढं कमालीचं सातत्य केवळ भारतीय सिनेसृष्टीतच नाही तर जागतिक सिनेसृष्टीतही अपवादानेच पाहायला मिळेल.

हेही वाचा: लॅक्मेचा फॅशन वीक किती दिवस बघायचा, आता आपणही उतरलं पाहिजे

सहाय्यकांचं काम सोपं व्हायचं

सिनेमा माध्यमात येण्यापूर्वी स्त्रियांच्या अनुषंगानं संपूर्ण केलेल्या समाजाचा अभ्यास त्यांना उपयोगी ठरला. त्यांच्या सिनेमांवर ‘सबकुछ सुमित्रा भावे’ ठसा असायचा. त्यामागचं कारण म्हणजे त्यांना आपला सिनेमा अगदी स्पष्ट दिसायचा. ठरलेल्या चाकोरीप्रमाणे त्यांनी अपवादानेच कागदावर सिनेमा लिहिला असेल. त्या आपल्या मनातली गोष्ट लेखनिकाला सांगायच्या. त्यामुळेच ती अत्यंत बारकाव्यानिशी मांडली जायची.

त्यामुळे सुमित्राताईंच्या सहाय्यकांचं काम सोपं व्हायचं. कारण मूळ कथा-पटकथेच्या ड्राफ्टमधेच सगळे बारकावे लिहिलेले असायचे. म्हणूनच सुमित्राताईंच्या पटकथेवर कालांतरानं पीएचडी प्रबंधही लिहिला गेला. पुण्याच्या ‘फिल्म अँड टेलिवीजन’ संस्थेत दिग्दर्शनाचा अभ्यास केलेल्या सुनील सुकथनकर यांची त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ लाभली.

या जोडीनं एकत्रितरित्या मग कमाल केली. या दोघांनाही आपापल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे वाटून घेतल्या. सुकथनकर कॅमेरा, गीतलेखन, कलाकारांची निवड याकडे लक्ष द्यायचे तर सुमित्राताईंनी पटकथा, वेशभूषा, संगीत या आघाड्यांवर लक्ष दिलं. त्यामुळेच त्यांचे सिनेमे कसल्याही वादंगाविना झटपट पूर्ण होत आणि प्रेक्षकांपर्यंत पोचत.

सुमित्राताईंचे सिनेमे वैश्विक ठरले

सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. परंतु, सुमित्राताईंचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले.

महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याआधीच ते विदेशी सिनेमा महोत्सवात पोचून गाजू लागले. सुमित्राताईंमधे चांगला कलाकार दडलेला होता. पण, सिनेमा ही कला असली तरी तिला तंत्राची जोड मिळाली तरच ती प्रेक्षकांचं मन जिंकू शकते. ही गोष्ट खूप आधीच माहिती असल्यामुळे सुमित्राताईंनी आपला सिनेमा तंत्राच्या बाजूनं कमी पडणार नाही, याची काळजी घेतली.

हेही वाचा:  भानू अथैय्या : भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी

बदलत्या तंत्रज्ञानाची जाणीव

तंत्र चांगलं असणं म्हणजे भरपूर पैसा खर्च करणं नाही. किंबहुना पैसा हा शब्द त्यांच्या सिनेमा निर्मिती प्रक्रियेत कधी आलाच नाही. इतरांना निर्माते मिळण्यात अडचणी येत असताना सुमित्राताईंना त्यांच्या मनाप्रमाणे सिनेमा बनवू द्यायचे निर्माते मिळाले. अर्थात, सुमित्राताईंच्या सिनेमांना सिनेमागृहात जेवढा प्रेक्षकवर्ग मिळायला हवा होता, तो काही मिळाला नाही. याबाबत आपण प्रेक्षकवर्ग कृतघ्न आहोत.

अलीकडच्या काळात तर प्रेक्षकसंख्येअभावी सुमित्राताईंच्या सिनेमांचे शोज काही मल्टिप्लेक्समधून रद्द होण्याचेही दुर्दैवी प्रकार घडले. सुमित्राताईंसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाबाबत असा प्रकार घडणं ही लाजीरवाणीच गोष्ट आहे. पण या प्रकाराला सुमित्राताई संयमानं, संयतपणे सामोऱ्या गेल्या. मराठी प्रेक्षकांना याबद्दल फार दोष न देता त्यांनी केरळ, बंगाल आणि कर्नाटकमधे आपल्या सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळतो, एवढंच सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

बदलत्या तंत्रज्ञानाचीही त्यांना जाणीव होती. गेली काही वर्षं नेटफ्लिक्स, अमेझॉन यावर मराठी सिनेमे दाखवले जातायत. त्यामुळे आपली कलाकृती पुढील अनेक वर्षं यासारख्या इतर माध्यमांद्वारे प्रेक्षकांशी जवळीक राखून ठेवण्यात यशस्वी होईल याची त्यांना खात्री होती.

समाजाचं प्रतिबिंब सिनेमात

सुमित्राताईंच्या सिनेमांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामधली नामवंत कलाकार मंडळी. मराठी सिनेसृष्टीतल्या बहुतेक सर्व मान्यवर कलावंतांनी त्यांच्या सिनेमात उपस्थिती लावली. या मागचं कारण म्हणजे सुमित्राताईंच्या सिनेमात आपण असायलाच हवं, असं त्यांना मनापासून वाटायचं. महेश एलकुंचवारांसारखा श्रेष्ठ लेखकही सुमित्राताईंमुळे आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाला.

सुमित्राताई मूळच्या शिक्षिका. पण प्रगल्भतेमुळे आता त्या नवीन कलाकारांसाठी एक चालतं बोलतं विद्यापीठच बनल्या होत्या. एवढी गुणवत्ता असूनही त्यांनी कधीही स्वतःचा बडेजाव मिरवला नाही. कोणत्याही कारणामुळे त्या वादग्रस्त ठरल्या नाहीत.

खरं तर त्यांचीही पात्रता दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्याइतकी निश्चित आहे. पण, असे विषय त्यांच्या दृष्टीनं नगण्य होते. सिनेमा माध्यमाला समाजाचा आरसा म्हणून मानणाऱ्यांपैकी त्या होत्या आणि या आरशात त्यांनी आपल्या समाजाचं प्रतिबिंब अगदी तंतोतंत दाखवलं. म्हणूनच सुमित्राताईंचा सिनेमा हा आजचा, आपला आणि आश्वासक होता.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

(लेखक ज्येष्ठ पत्रकार तसेच तारांगण मासिकाचे संपादक असून लेख त्यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार)