जादूची कांडी फिरवणारा रणनीतिकार काँग्रेसच्या पचनी पडेल?

२७ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यावरून काँग्रेसमधे विरोधाचे सूर उमटलेत. पक्षात प्रवेश न देता सल्लागार म्हणून त्यांची सेवा घ्यावी; आघाडी, उमेदवारांची निवड, जागा याबाबत त्यांची कोणतीही भूमिका नसावी, असा मतप्रवाह आहे. त्यामुळे जी-२३ वरून निर्माण झालेलं वादळ अद्याप शमलेलं नसतानाच आता प्रशांत किशोर यांच्यामुळे काँग्रेसमधे नवं वादळ निर्माण होताना दिसतंय.

बहुचर्चित निवडणूक रणनीतिकार ‘पीके’ ऊर्फ प्रशांत किशोर जर काँग्रेसमधे दाखल झाले, तर ते पक्षासाठी कितपत उपयुक्त राहील की त्यांचं ओझं होईल, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत. गांधी कुटुंबीयांच्या निर्णयाची ते आतुरतेने वाट पाहतायत.

पीकेंचा काँग्रेससाठी रोडमॅप

२०१४ पासून चर्चेत आलेल्या प्रशांत किशोर यांनी देशातल्या बहुतांश सर्वच प्रमुख पक्षांसाठी निवडणूक रणनीतिकार म्हणून काम केलंय. त्यांची राजकीय निष्ठा एखाद्या पक्षासाठी फार काळ राहिलेली नाही. अशा वेळी त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, यावरून काँग्रेसमधे जोरात चर्चा सुरू आहे.

प्रशांत किशोर यांनी एकाच आठवड्यात वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत दोन बैठका घेतल्या. गेल्या आठवड्यात तब्बल चार तास चाललेल्या बैठकीत प्रशांत किशोर सहभागी झाले होते. त्यात त्यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक रोडमॅप तयार केला. यामधे त्यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या उणिवांची माहिती दिली.

पाच विधानसभा निवडणुकांमधे काँग्रेस कुठं कमी पडली, काही राज्यांतून काँग्रेसचं अस्तित्वच कशामुळे संपलंय याचे तर्क मांडले. त्याचवेळी भविष्य काळातला कृतिआराखडाही सांगितला. ही बैठक पाच राज्यांत काँग्रेस पक्षाला पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर, सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी, १० जनपथ इथं आयोजित केली होती.

हेही वाचा: काँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडण्याची रिस्क का घेत नाही?

काँग्रेसमधे अंतर्गत धुसफूस

पंजाब आणि उत्तर प्रदेशमधला पराभव काँग्रेसच्या चिंतेत भर घालणारा होता. काँग्रेसचं नेतृत्व दोन लोकसभा निवडणुका आणि काही विधानसभा निवडणुकांमधे सातत्याने पराभवाचा सामना करत आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत काँग्रेसला आपली प्रतिमा सुधारायची आहे.

या वर्षाखेरीला आणखी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि २०२४ला लोकसभेची रणधुमाळी आहे. अशा वेळी काँग्रेसला आपलं अस्तित्व पुन्हा दाखवायचंय. सध्याच्या स्थितीत काँग्रेस केवळ दलबदलू राजकारणाचा सामना करत नाहीये; तर जुने नेते आणि नवीन नेते यांच्यातल्या वैचारिक संघर्षालाही पक्ष सामोरा जात आहे.

नेतृत्वावरून अस्वस्थ असलेल्या २३ नेत्यांत काही माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमधे संघटनेची पुनर्बांधणी आणि संघटनात्मक निवडणुकीची मागणी केली होती.

पीके मोठ्या पदासाठी उत्सुक

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत गेल्यावर्षीपासून चर्चा सुरू झाली. पण त्याला जोर धरण्यापूर्वीच काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याशी संपर्क साधला. यावरून गांधी कुटुंबीय पक्षाबाहेरच्या व्यक्तीची मदतीसाठी वाट पाहात होता, हे स्पष्ट झालं.

मागच्या आठवड्याच्या बैठकीनंतर ते लवकरच काँग्रेसमधे प्रवेश करतील, असं स्पष्ट करण्यात आलं. पण दुसर्‍या बैठकीनंतरही काँग्रेस प्रवेशाबाबत ठोस निष्कर्ष बाहेर आले नाहीत. एखाद्या आठवड्यात घोषणा होऊ शकते, अशी प्रशांत किशोर यांना आशा आहे. त्यांना मोठं पद मिळत असेल, तर ते उत्सुक राहतील.

हेही वाचा: भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

अशी आहे निवडणूक स्ट्रॅटेजी

१० जनपथ इथल्या बैठकीत काँग्रेससमोर रणनीतीचा खुलासा करताना प्रशांत किशोर यांनी म्हटलं की, काँग्रेसने लोकसभेच्या ५४२ जागांपैकी ३७० ते ४०० जागांवरच अधिक लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर काही विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवायला हव्यात. ज्या ठिकाणी स्थिती चांगली आहे किंवा दुसर्‍या स्थानावर आहे, अशा ठिकाणी स्वबळाचा डाव खेळायला हवा.

ज्या ठिकाणी काँग्रेसचं महत्त्व कमी झालंय; अशा राज्यांतून, म्हणजेच उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशासारख्या राज्यात नव्याने सुरवात करायला हवी, असं ‘पीकें’चं म्हणणं आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर यांनी म्हटलं की, आपण बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा विचार केला तर तिथं एकूण लोकसभेच्या २०० जागा आहेत. या ठिकाणी लोकप्रियता असूनही भाजपकडे ५० जागा आहेत. उर्वरित ३५० ठिकाणी भाजप विरोधकांच्या आशेवर पाणी फेरू शकतो.

प्रवेशावरून काँग्रेसमधे मतप्रवाह

काँग्रेसच्या वर्तुळात मात्र या नवीन राजकीय वाटचालींवरून उत्सुकता आहे. वरिष्ठ नेत्यांमधे प्रशांत किशोर यांच्या प्रवेशावरून मतभेद आहेत. गांधी घराणं पक्षासाठी आऊटसोर्सिंगचा विचार करत आहे, ही गोष्ट त्यांना पटतच नाहीये.

सुरवातीपासूनच काँग्रेसचा मोठा गट प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाच्या विचाराला विरोध करत आहे. वास्तविक, पक्ष अगोदरच जी-२३ गटाच्या बंडखोरीचा सामना करत आहे. अशातच त्यांच्या प्रवेशानंतर पक्षातला असंतोष आणखी वाढू शकतो.

एकीकडे प्रशांत किशोर यांच्या प्रवेशावरून काँग्रेसचे बंडखोर हे पक्षाला होणारा संभाव्य फायदा आणि नुकसान या दृष्टिकोनातून पाहत आहेत. तसंच ते सल्ल्यावरून नाही, निर्णय घेण्यावरून नाही, तर पक्षाच्या विचारसरणीशी कितपत बांधिल राहतील याबाबत भीती व्यक्त करत आहेत.

त्यांना पक्षात प्रवेश न देता सल्लागार म्हणून त्यांची सेवा घ्यावी, असा काहींचा मतप्रवाह आहे. आघाडी, उमेदवारांची निवड, जागा याबाबत त्यांची कोणतीही भूमिका नसावी. या गोष्टी हायकमांडकडेच असाव्यात असं काहींचं म्हणणं आहे.

हेही वाचा: भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

जादूची कांडी फिरवणारा रणनीतिकार

प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेत्यांमधली चर्चा ही नवीन गोष्ट नाही. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचे क्लाएंट असलेल्या तृणमूल काँग्रेसने दमदार विजय मिळवला. त्यानंतर गांधी कुटुंबाबरोबर अनेकदा चर्चा झाली आहे. पण ती गोेष्ट निष्कर्षाप्रत पोचली नाही. पाच राज्यांतील दारुण पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी आपल्या रणनीती आणि दीर्घकालीन योजनेसह ‘कमबॅक’ केले आहे.

प्रशांत किशोर हे एक कुशल रणनीतिकार म्हणून ओळखले जातात. २०१४ला राजकीय उलथापालथीच्या वातावरणात मैदानात उतरलेले नरेेंद्र मेादी यांना प्रचार मोहिमेत त्यांनी मदत केली होती. तेव्हा त्यांनी दीर्घकालीन योजनेचा विचार केला होता. ‘जादूची कांडी फिरवणारे’ रणनीतिकार म्हणून त्यांची ओळख झाली. या दरम्यान त्यांनी जवळपास अर्धा डझन प्रादेशिक पक्षांबरोबर काम केलं. दुसरीकडे त्यांनी भाजपला हरवण्यासाठी मदतही केली. यात ममता बॅनर्जी यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.

जेडीयूबरोबर त्यांची अडखळत सुरवात झाली. त्यात ते उपाध्यक्षही राहिले होते. म्हणूनच त्यांची राजकीय निष्ठा एखाद्या पक्षाबरोबर फार काळ राहिली नाही. तत्कालीन जेडीयू प्रमुख नितीशकुमार यांच्यापासून फारकत घेत त्यांनी वेगळा मार्ग निवडला. प्रशांत किशोर हे आपल्या ग्राहकाकडून म्हणजेच पक्षाकडून मोठी फी आकारतात. तसंच नेत्याचे इमेज बिल्डिंग, राजकीय मोहिमा, आघाडीतही सल्ला देतात.

काँग्रेसमधे असंतोषाचे स्वर

टीकाकारांच्या मते, प्रशांत किशोर हे नेहमीच जिंकणारे पक्ष सोबत घेतात. पण उत्तर प्रदेशात काँग्रेसबाबतीत ते अपयशी ठरले. विशेष म्हणजे त्यांनी निवडणूक कधीही लढवलेली नाही. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, आपण कधीही टीवीवरचे न्यूज चॅनेल पाहत नाही, वर्तमानपत्रही वाचत नाही. ते कधीही मेल लिहीत नाहीत आणि नोट्सही काढत नाहीत. गेल्या दहा वर्षांत लॅपटॉपचा वापर केलेला नाही. ते केवळ एकमेव उपकरण वापरतात, मोबाईल फोन.

प्रशांत किशोर यांना प्रवेश दिल्यानंतर पक्षांतले मातब्बर नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावं लागेल. त्यांच्या प्रवेशावरून केवळ काँग्रेसच नाही, तर तृणमूल काँग्रेस किंवा इतर पक्षातही असंतोषाचे स्वर पहायला मिळतील. दिनेशभाई द्विवेदींसारख्या तृणमूल काँग्रेस नेत्याने पक्ष सोडताना प्रशांत किशोर यांच्या हस्तक्षेपाचा आरोप केला होता. म्हणूनच नेते मंडळी प्रशांत किशोर हे आगामी काळात एक काँग्रेस नेते म्हणून कसे वावरतात, याकडे लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा: 

शीला दीक्षितः काँग्रेसमधल्या एका कर्तृत्ववान पिढीचं जाणं

पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?

तंत्रज्ञानापासून रोखल्याने आपली मुलं गुगलचे सीईओ कसे होणार?

जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

(दैनिक पुढारीतून साभार)