कुरूप: पारलिंगी स्त्रियांच्या आत्मभानाची कविता

२२ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


दिशा पिंकी शेख यांच्या 'कुरूप' या कवितासंग्रहाने मराठीला एक नवा प्रवाह मिळवून दिला आहे. अजून खूप अंधार कोपरे उजळायचे आहेत. या समुदायातल्या खूप वेदना, दुःख अजून बाहेर यायचंय. त्याची कोंडी या कवितासंग्रहाने फोडलीय. 'कुरूप' ही या सगळ्याची एक पायवाट मानायला हवी.

लिंगाधारित भेदभावाचा बळी ठरलेल्या एलजीबीटीक्यू व्यक्ती समूहातल्या पारलिंगी स्त्रियांचा एक मोठा वर्ग आपल्या देशामधे आहे. 'तृतीय पंथी', 'हिजडा', 'मिठ्ठा', 'छक्का' आणि 'किन्नर' या नावांनी तो ओळखला जातो आणि याच नावांनी हिणवलाही जातो.

या वर्गातल्या स्त्रिया वयाच्या दहाव्या, बाराव्या वर्षापर्यंत पुरुष म्हणूनच आपल्या घरात आणि समाजात वावरतात. नैसर्गिक लिंग वाढीच्या काळात त्यांच्यामधे हा बदल जाणवतो आणि पुरुषाची स्त्री झाल्याचा वरकरणी भास होतो. यालाच इंग्रजीत 'ट्रान्स जेंडर' आणि मराठीत पारलिंगी असा शब्द वापरला जातो.

पारलिंगी असणं दोष नाही

गर्भात राहिलेल्या बाळाला स्त्री, पुरुष किंवा पारलिंगी अशा स्वरूपाची ओळख ही निसर्गतःच लाभलेली असते. यातली काही बाळं पूर्णपणे पुरुष असतात, काही पूर्ण स्त्रिया असतात तर काही दोन्ही असतात म्हणजेच उभयलिंगी असतात. म्हणजेच बाह्य रूपावरून जरी एखादं मूल पुरुषासारखं दिसत, बोलत असलं तरी त्याची अंतर्गत जाणीव ही स्त्रीत्वाची असू शकते. पुरुष असूनही ज्याला आपण स्त्री आहोत असं वाटतं किंवा आपल्या भावना या स्त्रियांसारख्या आहेत अशी जाणीव होते, अशा स्त्रियांना पारलिंगी स्त्रिया म्हणता येईल.

अशा स्त्रियांना समाजातले काही लोक किन्नर, छकडा, हिजडा म्हणून हिणवतात. एवढंच काय सख्खे आईबापही अशा लेकरांना, पोटच्या गोळ्यांना समाजभयास्तव घरातून हाकलून देतात. अक्षरशः त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना रस्त्यावर यावं लागतं. भीक मागावी लागते. त्यांना सर्वसामान्य माणसांसारखं हाताला काम न मिळाल्यामुळे उपेक्षेचं, अवहेलनेचं आणि वेदनेचं वंचितांसारखं जगणं जगावं लागतं. त्यातूनच त्यांचा एक स्वतंत्र समूह उदयाला आला आहे.

हेही वाचा: छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष

पारलिंगींच्या हक्काची चळवळ

रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी टाळी वाजवून भीक मागणं, लग्न, बारसं अशा प्रसंगी नृत्य करून चार पैसे मिळवणं आणि पोटाची खळगी भरणं हेच त्यांचं जीवन बनलंय. या समूहालाही मन आहे, भावना आहेत, त्यांचेही स्वतंत्र जीवन आहे ही जाणीव समाजातल्या काही कार्यकर्त्यांना झाली आणि त्यातूनच त्यांच्या हक्कांची, स्वातंत्र्याची चळवळ देशात उभी राहिली.

मानवी हक्कांसाठी झगडणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या वंचित समूहाच्या प्रश्‍नांना वाचा फोडली. न्याय मागितला. न्यायालयानेही या वर्गाचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं आणि स्त्री, पुरुष या लिंगांबरोबरच पारलिंगी हे एक लिंग अस्तित्वात असल्याचं जाहीर केलं.

त्यांची ओळख तृतीयपंथी अशी शासकीय पातळीवरून केली गेली असली तरी मानवी हक्कांचे कार्यकर्ते त्यांना तृतीयपंथी मानायला तयार नाहीत. कारण इथं ही विषमता त्यांना दिसून येते. पुरुष प्रथम, स्त्री द्वितीय आणि आम्ही तृतीय असं का? ही विभागणी निसर्गानेच केल्यामुळे आमची 'तिसरी' ओळख नको. 'तृतीयपंथी' म्हणून नको, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून सध्या 'पारलिंगी' हा शब्द रूढ झालाय.

शब्द वेडी दिशाचा प्रवास

भारतात विविध कारणांवरून समाजात भेदभाव आहेत. वर्ण, धर्म, जातीवरून, कथित 'खानदाना' वरुन, गरीब-श्रीमंत अशा वर्गावरून तसंच प्रदेश, भाषेवरून, रंग, वंशावरून आणि लिंगावरूनही. हे सर्व भेदभाव मिटवण्यासाठी आणि एकजिनसी-एकात्म भारत निर्माण करण्यासाठी दलित, आदिवासी, स्त्रीवादी, शेतकरी, कष्टकरी अशा विविध वंचित समूहांच्या चळवळी निर्माण झाल्या. या जाणीवजागृतीतूनच पार लिंगी समूहाच्या चळवळींचा जन्म झाला.

२००० नंतर अशा प्रकारच्या चळवळींनी समाजात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. या चळवळींचं प्रमुख माध्यम म्हणजेच सोशल मीडिया. अशा समाज माध्यमातूनच पुढे आलेली पार लिंगी समूहातली स्त्री कार्यकर्ती म्हणजेच दिशा पिंकी शेख होय.

'शब्द वेडी दिशा' या नावाने फेसबुकवर लिहून त्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली. स्वतःची मतं, स्वतःचे विचार, भावना कवितांच्या माध्यमातून दिशा मांडत राहिल्या. त्यांच्या वैयक्तिक शब्दांना सामूहिक स्वरूप लवकरच प्राप्त झालं. दिशा सर्वांची लाडकी झाली. बिनधास्तपणे व्यक्त होणारी ही कवयत्री कार्यकर्ती झाली. 'शब्द वेडी दिशा ते बुद्धमीरा; व्हाया दिशा पिंकी शेख' हा ऊर्ध्वगामी प्रवास एका कार्यकर्तीचा आहे, तसाच तो एका समूहाचाही आहे.

दिशा शेख हे नाव आता सर्वांना परिचित झालंय. बहुचर्चित 'वंचित बहुजन आघाडीच्या' त्या प्रवक्त्या आहेत. पारलिंगी समूहासाठी त्यांनी केलेलं काम लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची 'तृतीय पंथी विकास महामंडळाच्या' सदस्यपदी निवड केलीय. भारत सरकारच्या साहित्य अकादमी सारख्या संस्थेने काही दिवसांपूर्वी ट्रान्स जेंडर कविसंमेलन आयोजित केलं होतं  त्यात दिशाचा सहभाग लक्षणीय होता. भारतात सर्वत्र त्यांचे कार्यक्रम होत आहेत.

हेही वाचा: `होय, मी हिजडा` असं दिशाने गडकरींना का सुनावलं?

पारलिंगींचं दुःख मांडणारं कुरूप

फेसबुकच्या माध्यमातून जनमानसात पोचलेल्या दिशा पिंकी शेख यांचा 'कुरूप' हा पहिला काव्यसंग्रह मुंबईच्या नामांकित शब्द प्रकाशनाने ८ मार्च २०२१ला जागतिक स्त्री मुक्ती दिनाचं औचित्य साधून प्रकाशित केला आहे. पारलिंगी समूहाचं दुःख मांडणारा भारतातला पहिला काव्यसंग्रह म्हणून या काव्यसंग्रहाचं महत्त्व आगळंवेगळं आहे.

त्यापूर्वी 'मी हिजडा मी लक्ष्मी' हे याच समूहातल्या लक्ष्मी त्रिपाठी यांचं आत्मकथन आलेलं आहे. तसंच 'किन्नरांचा वाडा' ही संतोष उदमले यांची कादंबरीही आलेली आहे. मात्र कवितेच्या क्षेत्रात हा मान दिशा शेख यांनी पटकावलाय.

पारलिंगी समूहासाठी लक्ष्मी त्रिपाठी, गौरी सावंत, शमिभा पाटील आणि दिशा पिंकी शेख अशा काही कार्यकर्त्यांनी दिलेलं योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यातही दिशा पिंकी शेख या प्रत्यक्ष तळागाळात जाऊन सामान्य माणसाचे प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.

'कुरूप' ठसठसणारी वेदना

नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथल्या विमुक्त भटक्या समूहातल्या एका पालात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे भटकंती त्यांच्या पाचवीलाच पुजलेली. दहा-बारा वर्ष मुलगा म्हणून व्यतीत केल्यानंतर आपल्यामधे एक स्त्री दडलेली आहे, याची जाणीव त्यांना झाली. तिथूनच एका नव्या पर्वाला सुरवात झाला. घरापासून सुरू झालेला वेगळ्या वाटेचा प्रवास पुढे त्यांना पारलिंगी समूहात घेऊन गेला. तिथं दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष समाजात वावरताना आणि भेदभावांशी लढताना आलेले अनुभवच त्यांनी आपल्या कवितेतून मांडले आहेत. त्या लिहितात-

'आयुष्याच्या वाटेवर
माझ्या वाट्याला आलेल्या काट्यांमुळे
प्रवास नाही थांबला; पण काही काटे
पायात तसेच राहून गेले
ज्यांचं आज 'कुरूप' झालंय
वरवर पाहता या कुरुपामुळे
जखमा भरल्यात
असं वाटत असलं तरी
हे 'कुरूप' कधीकधी ठसठसतं
ती ठसठसणारी वेदना
म्हणजे माझी कविता'

पारलिंगी समूहातील स्त्रियांच्या दुःखांचा उद्गार म्हणजे दिशा पिंकी शेख यांची ही कविता होय. या समूहातल्या स्त्रिया मुखाने बोलण्याऐवजी आपल्या 'टाळी'तूनच अधिक बोलत असतात. व्यवस्थेने त्यांना लुगडं नेसवून रस्त्यावर टाळी वाजवत भीक मागत उभं केलंय. समाज त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहतो. ना धड स्त्री ना धड पुरुष अशी त्यांची अवस्था. पण ही अवस्था निसर्गानेच केलेली असल्यामुळे ती समाजाने स्वीकारली पाहिजे ही साधी अपेक्षा.

हेही वाचा: ‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

स्वप्नांचा चुराडा करणारी पुरुषसत्ता

जगण्यासाठी जोडीदार मिळावा ही तशी पशु पक्ष्यांपासून ते माणसांपर्यंत सर्वांचीच भावना असते. या समूहातल्या स्त्रियांनीही जोडीदाराचं स्वप्न पाहिलेलं असतं. असाच एक जोडीदार या कवितेतल्या 'तिला' मिळाला. ती त्याला आपलं सर्वस्व मानत होती; मात्र त्याला तिच्याकडून काय हवं होतं हे तिच्याच तोंडून ऐका -

'संसार हा शब्द
मी माझ्या वाट्याला येऊ दिला नाही
मी फक्त त्याची प्रणयातली सोबती
हट्ट हा शब्द जगायला कधीच मिळाला नाही
मी आपली सतत तडजोड करत आले
त्याचा किमान सहवास तरी मिळावा म्हणून
कारण जेव्हा जेव्हा मी
पत्नी व्हायचा प्रयत्न केला
त्याने माझं स्त्री असणं नाकारलं
त्याला फक्त अंथरुणातच
मी बाई म्हणून पाहिजे होते...'

या नादान, लबाड आणि स्वार्थी पुरुषसत्ताक व्यवस्थेने 'तिच्या' स्वप्नांचा कसा चुराडा केला हेच कवयित्रीने इथं मार्मिकपणे मांडलंय. या पुरुषसत्ताक व्यवस्थेला फक्त आपल्या खाली कोणीतरी हवं आहे. मग ती स्त्री असो; किंवा पारलिंगी स्त्री असो. फक्त आपल्या वर कोणी असू नये हेच या व्यवस्थेचे कारस्थान कवयित्रीने इथं उघड केलंय.

अपमानाचं जगणं नाकारणारा एल्गार

निसर्गानेच आपल्याला अर्धी स्त्री आणि अर्धा पुरुष बनवलेलं आहे ही जाणीव तिला आहे. कवयत्री लिहिते -

'माय मरो नाही तर मावशी
दुःख कवटाळून रडण्याचा अधिकार मला नाही
कारण मी हिजडा आहे
तोंडावरचं हसू आणि हातातली टाळी
सतत खिदळत राहिली पाहिजे
कुठलीच शोकांतिका गाण्याचा अधिकार
मला नाही कारण मी हिजडा आहे
नाते हा शब्दच मुळात माझ्यासाठी नाही
मी फक्त लोकांच्या मनोरंजनाचं साधन
व्यक्ती म्हणून व्यक्त होण्याचा अधिकार
मला नाही कारण मी हिजडा आहे
स्वातंत्र्या सारख्या दिसणाऱ्या आवरणात
जगायचं न दिसणाऱ्या साखळदंडांचा आवाज
करण्याचा अधिकार मला नाही
कारण मी हिजडा आहे'

वाचकांच्या अंगावर थेट चालून येणाऱ्या दिशा पिंकी शेख यांच्या या कविता म्हणजे व्यवस्थेवर निरंतर बरसणारा पेटता अंगार आहे. व्यवस्थेनं दिलेलं अपमानाचं जगणं नाकारण्यासाठी पुकारलेला हा सामुहिक एलगार आहे. ही कविता समतेची मागणी करते. निसर्गाने दिलेले जीवन आहे त्या स्वरूपात स्वीकारले पाहिजे हे आवर्जून सांगते. 'हिजडा' म्हणून हिणवण्यापेक्षा माणूस म्हणून समजून घ्या. आम्हालाही सर्वसामान्यांसारखे जीवन जगू द्या अशी अपेक्षा व्यक्त करते आणि ती रास्त आहे.

सरकारने या समुदायाला आधार कार्ड, रेशन कार्ड द्यावं, मतदान कार्ड द्यावं तसंच राहण्यासाठी घरकुलं द्यावीत याचबरोबर सरकारी नोकरीमधे आरक्षण द्यावं अशा मागण्या या समुदायाच्या आहेत. सरकारबरोबरच आता समाजानेही बदलण्याची वेळ आलीय. सर्व प्रकारचे भेदभाव मिटवून माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याची वेळ आली आहे, हेच ही कविता सूचवत आहे.

हेही वाचा: बाई समलिंगी असते तेव्हा...

कुरूपची बोलकी अर्पणपत्रिका

'कुरूप' म्हणजे तळपायात काटा मोडल्यानंतर आणि तो काढल्यानंतरही त्याचा जो अणुकुचीदार भाग पायातच राहतो त्याची झालेली जखम होय. जी वर वर भरुन निघालेली दिसते; मात्र आतून ठणकत असते. जखमेवरचं मांस वारंवार कापून टाकावं लागतं. पुन्हा ती जखम भरते, ही प्रक्रिया सुरूच राहते. या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे रूपहीन.

एखादी व्यक्ती दिसायला सुंदर नसणं. कुरूप म्हणजे विद्रूप. पारलिंगी स्त्रियांच्या जीवनाचं असंच काहीसं झालंय. ही वेदना आतून ठसठसणारी आहे. दिशा पिंकी शेख यांचं या निमित्ताने मला विशेष अभिनंदन करावंसं वाटतं, कारण त्यांनी एका वंचित समुहाच्या दबलेल्या स्वराला आवाज दिला आहे. या संग्रहाची अर्पणपत्रिका मोठी बोलकी आहे. कवियत्री लिहिते- 'माझ्या समुदायातील ज्या मैत्रिणींना त्यांच्या व्यथा शब्दांत मांडता आल्या नाहीत, त्या सगळ्या जणींना..!'

दिशा शेख यांनी आपलं संपूर्ण जीवन पारलिंगी समूहाच्या न्याय हक्कांसाठी पणाला लावलंय. त्या लढ्याचा एक भाग म्हणून या काव्यसंग्रहाकडे पाहिलं पाहिजे. कवयत्री केवळ आपल्याच समुदायाच्या दुःखाची टिमकी वाजवत बसत नाही; तर एकूणच समाजाची दुःखं ती जगाच्या वेशीवर टांगते. प्रसंगी राजकीय भूमिका घेते. समग्र शोषणमुक्त समाजाची, समतावादी समाजाची मागणी करते हे मला फार महत्त्वाचं वाटतं.

बोलीभाषा काव्यसंग्रहात जागोजागी

दिशाची भटकंती खूप सुरु असते. पश्चिम महाराष्ट्र पासून ते मराठवाड्यापर्यंत. त्यामुळे त्यांच्या भाषेला खास मराठवाडी बोलीचा 'टच' आहे. ही भाषा खासकरून पार लिंगी समाजाची आहे.

'दरबदर', 'हगणं मुतणं', 'पाश', 'कोशात निजलेली अळी', 'फक्त आंथरुणापुरती बाई', 'प्रेमाच्या रूढी जात गंजलेल्या बेड्या', 'सतत खिदळणारी ती', 'पिढीजात परंपरेची गुलाम', 'शब्दांचे बेईमान होणे', 'शब्दांचे रुसणे', 'प्रणयाचे आणि प्रेमाचे किस्से', 'तोल सावरणे' , 'पाय घसरणे', म्हातारपणाच्या काळजीने आधीच म्हातारी होणे', 'रिस्क घेणे', 'फोटो बाजी करणे', 'फलाट पाडणे'.

'नुसती वैतागवाडी साला', 'भाड्या' , ' मेल्या मुडद्यायहो', 'ये भोक खानारा' , 'भेनचोद' ' खाटकाच्या वाणाच्या', 'चिंगुस मारवाडी साला', ' मादरचोद', 'फुकट झव्या', 'भाड खावा', 'तुह्या शेमन्यात किडे पडो' अशा शिव्या,  'मय्यत', 'मोहब्बत',  'आशियाना',  'जितभित', 'बाईल बुद्ध्या',  'आब जाणे' अशी खास पारलिंगी समुदायात वापरली जाणारी बोलीभाषा या काव्यसंग्रहात जागोजागी दिसून येते. व्यवस्थेवरचा राग भाषेतून जोरदारपणे व्यक्त झाला आहे.

दिशा पिंकी शेख यांच्या या काव्यसंग्रहाने मराठीला एक नवा प्रवाह मिळवून दिला आहे. अजून खूप अंधार कोपरे उजळायचे आहेत. या समुदायातल्या खूप वेदना, दुःख अजून बाहेर यायचंय. त्याची कोंडी या काव्यसंग्रहाने फोडली आहे. ही पायवाट मानायला हरकत नाही. मानवमुक्तीच्या चळवळीतल्या एक महत्त्वाच्या कार्यकर्त्या कवी दिशा पिंकी शेख यांनी यापुढेही खूप खूप लिहत राहावं.

कवितासंग्रह - कुरूप
कवयित्री - दिशा पिंकी शेख
प्रकाशन - शब्द पब्लिकेशन, - मुंबई

हेही वाचा: 

तुमचं आमचं सेमच असतं

तृतीयपंथी हसीना मान जायेगी, पण समाज?

आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही

क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा

‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’

जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल