नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे.
आमीर खान आणि किरण रावच्या घटस्फोटाने अलीकडे घटस्फोटावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. या फिल्मी दुनियेतल्या ताऱ्यांची लग्न टिकतच नाहीत इथपासून ते पार 'लव जिहाद'पर्यंत ही चर्चा झाली आणि ट्रोलिंग वगेरे आता सिनेकलाकारानाही नवं राहिलेलं नाही. पण उलटसुलट का होईना घटस्फोटासारख्या नाजूक पण महत्वाच्या विषयावर भरपूर चर्चा होऊ लागली हे महत्त्वाचं.
पती पत्नी और घटस्फोट या आता चार भिंतीआतल्या गोष्टी तशाही राहिल्या नाहीत. पण असा अवकाश सर्वच जोडप्यांना मिळतो का? किरण आणि आमीर सेलिब्रिटी असल्याने त्यांचा घटस्फोट हा सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ शकला, बाकी सामान्य माणसांसाठी घटस्फोट ही गोष्ट सामान्य आहे का? नसली तर का नाही? आज या सगळ्याकडे कशा प्रकारे पाहायला हवं, याचाच उहापोह आमीर आणि किरणच्या निमित्ताने करायला हवा.
या बहुचर्चित घटस्फोटाने पुन्हा पती-पत्नीतल्या नातेसंबंधावर चर्चा झाली. त्याचे विविध पैलू पाहू. आमीर आणि किरणने आपण घटस्फोट घेत असलो, तरी मित्र आणि सहकारी म्हणून सोबत काम करत राहू असं सांगितलं आहे. विविध सामाजिक प्रकल्प, सिनेकलाकृतींवर सोबत काम करतानाच मुलीचं सहपालकत्व करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.
आपल्या मुलीला आई, वडील म्हणून दोघांचीही गरज आहे आणि ती आपण पूर्ण केली पाहिजे, असं दोघांनाही वाटणं ही चांगल्या, आरोग्यदायी नातेसंबंधांची खूण आणि पालकत्वाचा नवा आयाम आहे. शिवाय वैवाहिक नात्यातून बाहेर पडलं तरी मैत्री ठेवणं, सहकारी म्हणून काम करणं हेही प्रगल्भतेचं लक्षण आहे.
बरेचदा घटस्फोट घेताना जोडपी एकमेकांवर खोटे आरोप करतात. विवाहबाह्य संबंधांपासून ते मारहाण आणि अनेक आरोप केले जातात. यात कौटूंबिक हिंसाचाराचा मुद्दा पूर्ण वेगळा आहे आणि त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही.
या सगळ्यामुळे त्या जोडप्यात इतकी कटूता निर्माण होते की अनेकदा कोर्टात एकमेकांचं तोंडही पाहिलं जात नाही. याचं कारण वैवाहिक नात्यातून सहजपणे वेगळं होण्याची सामाजिक परिस्थितीच नाही. नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं.
हेही वाचा: पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे
विवाहसंस्कृतीच्या, लग्न टिकवण्याच्या या दबावाखाली मग किती तरी नात्यांमधे कौटूंबिक हिंसाचार होत असून, हुंड्यासाठी छळ होत असूनही तो सहन केला जातो.
मध्यंतरी अहमदाबादमधे साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या आयेशाचा मृत्यूपुर्वी केलेला वीडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. हा वीडिओ आठवून पाहिला तर लक्षात येईल की, कशाप्रकारे स्त्रियांवरच लग्न टिकवण्याचा दबाव असतो, मग ती स्त्री कोणत्याही धर्माची, जातीची असो.
आयेशाचा हुंड्यासाठी प्रचंड छळ केला जात होता. ती शिक्षित होती, आजच्या एकविसाव्या शतकातली आधुनिक मुलगी होती, तरी तिनं घटस्फोटाऐवजी आत्महत्या हा पर्याय जवळ केला, यावरून घटस्फोटाकडे पाहण्याची आपल्या समाजाची मानसिकता दिसून येते. मृत्यू परवडला पण घटस्फोट नको, अशी ही किडकी मानसिकता.
दोन सज्ञान व्यक्तींच्या सहजीवनासाठी लग्न हा जसा कायदेशीर पर्याय आहे, तसंच- ते नातं चिघळलं असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी घटस्फोट हा कायदेशीर पर्याय आहे, या दृष्टीकोनातून त्याकडे पाहिलं पाहिजे. ही गोष्ट इतकी सहजसोपी नसली तरी ती अधिक गुंतागुंतीची न करता इतर सर्व नाती अगदी मुलांचं पालकत्व उत्तम पद्धतीनं निभावून नेतही करता येते.
आई - वडलांच्या विभक्त होण्याचा मुलांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे आई वडलांनी मुलांसाठी नातं टिकवलं पाहिजे, असं एक सामाजिक दडपण आपल्याकडे असतंच. अशा प्रकरणात घटस्फोट न घेता मुलांसाठी आई वडील नातं टिकवत राहतात, पण ते आरोग्यदायी नसतं, त्या दोघांची घुसमट तर होते, पण या अव्यक्त घुसमटीचाही बांध कधी तरी फुटतोच. आणि त्यावेळी जर कौटूंबिक हिंसाचार झाला तर मुलांवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नाही का? तर होतो.
आई वडलांचं एका मर्यादेपलीकडे पटतच नसेल तर त्यांनी मुलासमोर गोडीगुलाबीनं वागण्यानं मुलांचीही फसवणूक होते, आणि मुलांना ते कळतच नाही, असं नाही. अशावेळी सामंजस्याने वेगळी होणारी जोडपी मात्र आपल्या मुलांशी अधिक प्रामाणिक वागतात आणि त्यामुळे त्यांच्या मुलांशी असलेल्या नातेसंबंधांमधे फारशा अडचणी येत नाहीत.
हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
सामंजस्याने वेगळी झालेली अनेक जोडपी माझ्या परिचयाची आहेत. ती आजही त्यांच्या मुलांचं पालकत्व उत्तम रीतीने निभावत आहेत. इतकंच नाही तर वैवाहिक जोडीदार म्हणून नसले तरी मित्र मैत्रिणी म्हणून एकमेकांच्या अडचणींसाठीही उभं राहत आहेत.
कोरोनाची लागण झालेल्या एका मित्राला त्याची घटस्फोटित पत्नी बरेच दिवस डबा देत होती, बरा झाल्यावरही ती, त्याला सोबत म्हणून काही दिवस त्याच्या घरी जाऊन राहिली. तर अजून कायदेशीर घटस्फोट न झालेला पण तरीही वेगळं राहणारा मित्र आणि त्याची पत्नी नुकतेच त्यांच्या मुलांसोबत सहकुटूंब सहलीला जाऊन आले.
अशी बरीच उदाहरणं आहेत. लेखिका गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर अमेरिकेत राहत असलेल्या त्यांच्या घटस्फोटित पतीनं लिहिलेलं पत्र वाचलं तर डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि वैवाहिक नात्यांतला मैत्री हा पैलू किती महत्वाचा आहे, हे कळतं. घटस्फोटानंतरही हे मैत्र संपलं नाही.
वैवाहिक नातं, त्यातले ताणेबाणे, उतार-चढाव सोपे नसतात, व्यक्तीच्या जात-वर्ग-लिंग तसंच सामाजिक स्थानाप्रमाणे त्यात फरक असणारच. तरीही या सगळ्याला सामोरं जात कटूता न बाळगता वेगळं होऊनही आपल्या मुलाचा चांगला सांभाळ कसा करता येतो, हे ‘मॅरेज स्टोरी’ या सिनेमातून उत्तम प्रकारे दाखवलंय.
नोहा बाम्बाक या अमेरिकन दिग्दर्शकाचा हा इंग्रजी सिनेमा, वैवाहिक नातेसंबंध समजून घेण्यासाठी आवर्जून पाहावा असा. यातला नायक कौटूंबिक छळ, मारहाण, शिवीगाळ असं काहीही करणारा नाही, तो स्त्रीलाच सतत राबवून घेणार पुरुषप्रधान वृत्तीचा पुरुषही नाही, दोघांची सांपत्तिक स्थितीही बरी आहे, त्यांना एक मूलही असल्याने पारंपरिक आदर्श कुटूंबाच्या व्याख्येत अगदी चपखल बसेल असं हे कुटूंब.
हे सगळं असतानाही नायिकेला घटस्फोट घ्यावासा वाटतो, कारण यशस्वी पतीच्या करिअरच्या घौडदौडीत तीही तितकीच हुशार असूनही कायम झाकोळली जाते, तिचं स्वत्वच हरवून जातं. हेसुद्धा फार महत्वाचं आहे, पण आपल्याकडे स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी असं पाऊल उचलता येण्याची परिस्थिती फार दूर आहे.
हेही वाचा: दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!
मुळात घटस्फोट घेणं ही प्रत्येकाला परवडणारी गोष्ट नाही. कारण घटस्फोटित पुरुषाचा पुनर्विवाह तुलनेने लवकर होतो, स्त्रीचा मात्र सहजासहजी होत नाही, अशा अनेक कारणांनी स्त्रियांना घटस्फोट घ्यायला माहेरून इतर कुटूंबाकडून विरोध केला जातो.
त्यात निम्न जातवर्गीय स्त्री-पुरुषांना कायदेशीर मार्ग, त्यासाठी खर्च करावा लागणारा पैसा, समजून घेणारे मोकळ्या विचारांचे कुटूंबीय इ. उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी मात्र घटस्फोट ही सोपी गोष्ट न राहता आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवणारी गोष्ट बनते.
कष्टकरी वर्गातल्या, निम्न जातीतल्या स्त्रियांनाही कोणत्याही प्रकारची सुरक्षितता उपलब्ध नसते. भरपूर शिक्षण, स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा अवकाश आणि घटस्फोट घेतल्यानंतर दुसरा चांगला जोडीदार सहज मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे या जातवर्गातल्या समूहापुढे असलेल्या अडचणी, आव्हानंही यानिमित्ताने समजून घेण्याची गरज आहे.
आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे. असा अवकाश समाजातल्या सर्वच थरातल्या लोकांसाठी उपलब्ध करता येऊ शकतो का, त्यासाठी काय प्रयत्न करता येतील, नातेसंबंधांबाबतची आपली समज कशी वाढवता येईल, यासाठी सतत प्रयत्न करत राहणं हे मात्र आपल्या हातात आहे.
घटस्फोटासारख्या कायदेशीर प्रक्रियेकडे ‘घर तुटणं’ म्हणून न पाहता प्राप्त परिस्थितीतला एक उपाय म्हणून पाहिलं पाहिजे. तसंच घटस्फोट घेणाऱ्या स्त्रियांकडेही ‘घर फोडणाऱ्या बाया’ म्हणून ज्या हेटाळणीयुक्त नजरेनं पाहिलं जातं, तेही बदलणं गरजेचं. याकरता कुटूंबातच प्रत्येक व्यवहारात लोकशाही व्यवहार असणं, नातेसंबंधांबाबत मुलांशी मोकळेपणाने चर्चा करणं असे प्रयत्न करायला हवेत. तरच घटस्फोट आणि तो घेणारे यांच्याकडे नकारात्मक नजरेनं पाहणं बंद होईल.
हेही वाचा:
अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी
आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!