ज्ञानाचा एकाः महाराष्ट्राचा जीवनधर्म घडवणारा वारसा 

०५ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी उत्सवाची वारी सुरू करणारे संत एकनाथ महाराजच. `वारकरी दर्पण` या त्रैमासिकाच्या ताज्या अंकात संतसाहित्याचे तरुण अभ्यासक सचिन पवार यांनी माऊली आणि नाथमहाराजांमधला महाराष्ट्र घडवणारा वारसा अधोरेखित केलाय. 

महाराष्ट्राच्या जीवनधर्माला आकार देण्यात वारकरी संतांचं महत्त्वाचं योगदान आहे. तेराव्या शतकात वारकरी चळवळ ज्ञानेश्‍वर महाराजांनी प्रवर्तित केली. नामदेव महाराजांनी तिचा अखिल भारतीय स्तरावर विस्तार केला. तीच भागवत धर्माची मोहीम संत एकनाथ महारांजानी पुढे नेली.

ज्ञानदेव आणि नामदेव महाराज समकालीन होते. ज्ञानेश्‍वर महाराज १२९६ साली तर नामदेवराय १३५० साली समाधिस्थ झाले. त्यानंतर सुमारे पाऊणे दोनशे वर्षांनी संत एकनाथ महाराजांच्या रूपाने वारकरी संप्रदायाला भक्कम नेतृत्व लाभलं. ‘आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म॥’ असं वर्म नामदेव महारांजाना सापडलं. त्याच वर्माचा धागा पकडून एकनाथ महारांजानी ‘खांब दिला भागवत’ आणि ही विचार परंपरा आणखी दृढ केली.

गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, भागवत म्हणजे एकनाथी भागवत

ज्ञानेश्‍वर महाराजांनी लोकभाषेत धर्म तत्वज्ञान सांगण्याचा पायंडा ‘ज्ञानेश्‍वरी’च्या माध्यमातून पाडला. तोच संत एकनाथ महाराजांनी पुढे नेला. कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश ज्ञानोबारायांनी भाव आणि अर्थासकट ज्ञानेश्‍वरीच्या रूपाने समाजासमोर आणला. अगदी तसाच श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश नाथबाबांनी एकनाथी भागवताच्या माध्यमातून ‘मर्‍हाठीत’ आणला. इतर संप्रदायापेक्षा वारकरी संप्रदायाने भगवान कृष्णाच्या तत्वज्ञानाला अधिक महत्त्व देत त्याचे दोन्हीहीं उपदेश सामान्यांना कळतील इतक्या सोप्या पद्धतीने मराठीत आणले. भगवान श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानावर भाष्य करून ज्ञानोबारायांचा हाही वारसा एकनाथ महारांजानी पुढे नेला. 

ज्ञानेश्‍वर-नामदेव महाराजांची मराठी एकनाथ महाराजांनी अधिक रसाळ, सोपी केली. ज्ञानेश्‍वरीच्या गहन सिद्धान्ताचा उलगडा एकनाथी भागवतात सहज सोपेपणाने होतो. भगवान कृष्णाचा पहिला उपदेश म्हणजे गीता. त्याचा ज्ञानेश्‍वरांनी केलेलाच अर्थ वारकर्‍यांना जसा प्रमाण आहे अगदी तसाच भागवताचा एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात केलेला अर्थही वारकर्‍यांना प्रमाण आहे. गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे॥ यात तुकोबांना गीता म्हणजे ज्ञानेश्‍वरी, भागवत म्हणजे एकनाथी भागवत असेच अपेक्षित असेल.

एकनाथ महाराज यांचा जन्म महान सत्पुरुष भानुदास महाराजांच्या घरात झाला आणि जनार्दन स्वामी हे गुरू लाभले. जर्नादन स्वामींच्या नित्यपाठात ज्ञानेश्‍वरी होती. महाभागवत भानुदास महाराज आणि जनार्दन स्वामी यांच्यामुळे ज्ञान आणि मांस अशा दोन्ही वंशाकडून एकनाथ महाराजांना ज्ञानेश्‍वरी निष्ठेचा वारसा मिळाला. एकनाथ महाराजांनी हा वारसा समर्थपणे पेलला.

महाराष्ट्र संस्कृतीचा श्वास मोकळा केला

वारकरी घराण्यात जन्म झाल्याने ज्ञानेश्‍वरीचे नित्यचिंतन एकनाथ महाराजांनी करणं, हे अत्यंत स्वाभाविक आहेत. ज्ञानेश्‍वरीची निर्मिती ते एकनाथ महाराजाचा अवतार या पाऊणे दोनशे वर्षांच्या काळात ज्ञानेश्‍वरीत अनेक ओव्या घुसडल्या गेल्या होत्या. ज्ञानेश्‍वर माऊलींचे अंत:करण आणि भागवत धर्माची आत्मखूण जाणणार्‍या एकनाथ महाराजांनी ही भेसळ ओळखली. त्यांनी ज्ञानेश्‍वरी प्रतिशुद्धीची मोहीम हाती घेतली. 

आज ज्ञानेश्‍वरीची शुद्ध प्रत तुम्हाला मला एकनाथ महाराजांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध आहे. ज्ञानेश्‍वरीच्या अनेक प्रतींचं संशोधन करून एकनाथ महारांजानी ज्ञानेश्‍वरी प्रतिशुद्ध केली. मराठीतील पहिले ग्रंथ संपादक हे कर्तृत्व एकनाथ महाराजांनाच द्यावं लागेल. एकनाथ महाराजांना ज्ञानेश्‍वरीचा आधार लाभला. तर ज्ञानेश्‍वरीचं संरक्षण एकनाथ महाराजांमुळे झालं, असा हा दुहेरी मामला आहे.  
अजानवृक्षाची मुळी माऊलींच्या कंठाला लागली होती. ती एकनाथ महाराजांनी दूर केली या वारकरी श्रद्धेवर कुणाचा विश्‍वास नसेल, तर आमची काही हरकत नाही. मात्र एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांचं संशोधन करून, विपुल वाङमयनिर्मिती करून महाराष्ट्राच्या जीवनधर्माचा श्‍वास मोकळा केला, हे मान्यच करावं लागेल. सार्‍या संतामध्ये सर्वाधिक ग्रंथनिर्मिती एकनाथ महाराजांनी केली. एकनाथ महाराजांच्या रूपाने ‘भानुदास कवित्व कूळवल्ली।’ मांडवावर गेली.

आणि शिवछत्रपतींनी मराठीला राजभाषा बनवलं

डॉ. सदानंद मोरे सरांनी श्री ज्ञानेश्‍वर महाराजांची भाषिक कामगिरी सांगतांना ‘ज्ञानेश्‍वर महाराजांनी मराठी भाषक स्वराज्याचा पाया घातला’ या शब्दात यथार्थ वर्णन केले आहे. ज्ञानदेवांनी मराठीच्या भाषिक स्वराज्याचा पाया घातला. त्यामुळे ज्ञानदेव हे मराठी भाषेचे पहिले शिवाजी आहेत. तर एकनाथ महाराजांचे भाषिक योगदान लक्षात घेतलं, मराठी भाषा सरंक्षण, संवर्धनासाठी केलेलं कर्तृत्व लक्षात घेतलं तर त्यांना ज्ञानदेवांनी उभ्या केलेल्या भाषिक स्वराज्याचे कर्तबगार छत्रपती असं म्हणायला काहीच हरकत नाही.

मराठी ही संतानी ज्ञानाची धर्माची भाषा बनवली. त्यासाठी ज्ञानेश्‍वरानी पैठणात तर एकनाथ महाराजांनी काशीत वाद केला कोर्ट कचेर्‍या झाल्या. न्यायालयीन लढे दिले आणि जिंकलेसुद्धा मराठी भाषेच्या मागे व्यापक लोकपाठींबा मिळवून देत मराठी भाषिकांचा आत्मविश्‍वास वाढवला. त्यातुनच पुढे जात एकनाथ महाराजांनंतर अवघ्या ४०-५० वर्षांत शिवछत्रपतींनी राजव्यवहार कोष बनवून घेतला. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून दिला. भाषिक लढाईचे संतानी उभे केलेलं कार्य शिवाजी महाराजांनी या माध्यमातून पुढे नेलं.

धर्माचं तत्वज्ञान, व्यापक मानवतेचा संदेश देताना महाप्रज्ञावान असणारे सारेच संत सामान्यांची भाषा बोलतात. त्यात एकोबा तर जातीने ब्राह्मण, ज्ञानाने श्रेष्ठ असूनही गोंधळी, भराडी, पोतराज यांची भाषा बोलतात. उच्चवर्ण आणि अफाट विद्वत्ता असूनही अलौकीका नोहावे लोकांप्रती। हा ज्ञानदेवी संस्कार एकनाथांवर होता. जातीचा, वर्णाचा अभिनिवेश न बाळगता समतेचा संदेश एकनाथ महाराजांनी दिला म्हणून प्रबोधनकार ठाकरे त्यांना ‘खरा ब्राम्हण’ म्हणतात. महात्मा गांधीच्या दलित उद्धाराची तुलना एकनाथ महाराजांशी करावी लागते. ते ‘धर्मात्मा’ म्हणवले जातात. एकनाथ महाराजांचे पहिले आधुनिक चरित्रकार राजाराम शास्त्री भागवत हे एकनाथ महाराजांच्या वंद्य मार्गाने जाण्याचा सल्ला आपल्या ज्ञातिबांधवाना देतात.

औरंगाबाद येथील श्री एकनाथ संशोधन मंदिराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ सप्टेंबर १९५१ ला पुढील संदेश पाठवला होता. त्यात ते म्हणतात ‘I am very happy to know that there has come into existence the Eknath Research Society in Aurangabad. In my young days I was very fond of the literary works of Maharashtra Saint and I can say how great a contribution the reading of this literature can make to moral rearmament of man. I wish the society every success and can promise all help from People’s Education Society.‘


अंत्यजाच्या मुलाला एखाद्या दशग्रंथी ब्राह्मणाने कडेवर उचलून घेणे ही त्या काळातली साधी घटना नक्कीच नव्हती. ज्या काळात सावली पडली तरी विटाळ होत होता, त्या काळात सर्व जाती धर्माच्या लोकांना पोटाशी धरण्याचे काम एकनाथ महाराजांनी केलं. 

थुंकणारा यवन हा धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचा प्रतिनिधी

न पाहे याती कुळाचा विचार। भक्ता करूणाकर ज्ञानाबाई॥ या माऊलींच्या कर्तृत्वाच्या वर्णन करणाऱ्या ओळी एकनाथ महाराजांनाही तशाच्या तशा लागू होतात.  यवन अंगावरी थुंकला। प्रसाद देऊनी मुक्त केला॥ हा चमत्कार आपण अनेकदा ऐकतो पण त्यातले मर्म समजून घेत नाही. तो सारा मुसलमानी राजवटीचा काळ होता. ज्या धर्मविचाराची सत्ता असते त्यातील मूलतत्त्ववादी अधिक उन्माद करत असतात. दुसर्‍या धर्म, पंथ, विचारांचा द्वेष करतात. त्यांची प्रतीकं, प्रतिमा आणि प्रचारक यांचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न करत असतात. तो अंगावर थुंकणार यवन अशा मूलतत्त्ववाद्यांचाच प्रतिनिधी आहे.

नाथबाबांनी त्याला असा प्रतिसाद दिला की त्याचे ‘हृदयपरिवर्तन’ घडून आलं. ज्ञानोबांसाठी मुक्ताईने ताटीच्या अंभगातून केलेला उपदेश एकनाथ महाराजांनी पचवला होता. त्यामुळे हे शक्य झाले.

परमार्थाची मुख्यत्वे स्थिती। पाहे गा परमशांती।
ते शांतीची उत्कट गती। दावी लोकांप्रती आचोरोनी॥

या ओव्या शांतीरुप प्रकटलेल्या ज्ञानोबांना जशा लागू पडतात तशाच त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनीही लागू पडतात. ज्ञानेश्‍वरीसह ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि आळंदीच्या कार्तिक वारीची सुरुवात करून एकनाथ महाराजांसाठी श्रीज्ञानदेवांविषयी अपार कृतज्ञता व्यक्त केली. ज्ञानेश्‍वर महाराज आणि एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्र, तत्वज्ञानात अनेक साम्यस्थळं आहेत. त्यामुळे ‘ज्ञानाचा एका’ ही लोकोक्ती अगदी सार्थ आहे.

भास्कर हांडे यांचा फोटोः आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिराच्या आवारातला नाथपार. 

(वारकरी दर्पण या अंकासाठी संपर्क सचिन पवारः ९९२२७७८०४४)