आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत.
महात्मा गांधी धीरगंभीर नेते मानले जातात. त्यांचे विचार, तत्वज्ञान आजच्या पिढीला रुक्ष वाटते. पण गांधीजी तरुण वयात इतरांसारखेच होते. थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर. आजकाल घरटी एखादा तरी क्रिकेट खेळतो. मग गांधीजीही क्रिकेट खेळायचे का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.
दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. तसे त्यांचे फोटोही उपलब्ध आहेत. पण ते क्रिकेट खेळतानाचे पुरावे नाहीत. मात्र काहींनी ते क्रिकेट खेळायचे आणि त्यांना क्रिकेटची आवड होती असं ठासून स्पष्ट केलंय. गांधींबद्दल अनेक ठिकाणी बरंच काही छापून आलंय. जगाच्या कानाकोपऱ्यात गांधीजी पोचलेत. पण त्यांच्या क्रिकेटबद्दलच्या आवडीविषयी फारच थोडे संदर्भ आहेत.
सर्वात प्रथम १९५८ मधे गुजराती लेखक हरीश बूच यांनी त्यावर प्रकाश टाकणारा लेख लिहिला. त्यांनी रविलाल मेहता या गांधींच्या बालपणीच्या मित्राची मुलाखत घेतली. तेव्हा ते म्हणाले, ‘सोन्या म्हणजे मोहनदास खूप चांगला क्रिकेट खेळायचा. आक्रमक बॅट्समन होता आणि त्याची बॉलिंगही चांगली होती. त्याला क्रिकेट खूप समजायचं.’
पूर्वी राजकोट सिटी आणि राजकोट सदर यांच्यात मॅच व्हायच्या. असाच एक सामना मेहता हे गांधीजींबरोबर बघत असताना गांधीजींनी एक फलंदाज आता बाद होईल असं म्हटले आणि खरोखरच तो फलंदाज लगेचच बाद झाला होता. त्यांची निरीक्षणशक्ती अफाट होती. कुणी या योगायोगाच्या गोष्टी म्हणेल. पण तसं नव्हतं. गांधीजीचा खेळाचा अभ्यास चांगला होता. ते विटी-दांडूही लहान असताना खेळायचे,’ असं मेहता सांगत.
हेही वाचा : बाप एकच असतो, तो कसा बदलणार?
खरं तर गांधींचा खेळाकडे तेवढा ओढा नव्हता. व्यायाम आणि खेळ याकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायचं. याचं एक कारण म्हणजे त्यांचे वडील तेव्हा खूप आजारी असायचे. शाळा सुटली की मोहनदास लगेचच घरी जाऊन त्यांची सेवाशुश्रुषा करायला बघायचा आणि आपल्या आईला मदत करू पहायचा. या गडबडीत शरीर कमवणं आणि खेळणं त्याच्याने झालं नाही.
पुढे त्यांनी भरभर चालणं हाच व्यायाम अंगिकारला. मैलोन मैल ते न थकता चालायचे. ते लाजाळू असल्यानेही खेळापासून दूर राहिले. त्यांना क्रिकेटबद्दल तिटकारा नव्हता. पण क्रिकेटची भलावण ते करायचे नाहीत. १९१७ मधे बिहारला चंपारण्य इथे कॉलेजवयीन तरुणांपुढे भाषण करताना ते म्हणाले, ‘आपल्यासारख्या गरिबांना क्रिकेट हा परवडणारा खेळ नाही. त्यापासून लांब राहिलेलं बरं.’ गांधीजींना फुटबॉल खेळ म्हणून पसंत होता. कारण तो स्वस्तातला होता. गांधीजींमुळे बंगालमधे फुटबॉल लोकप्रिय झाल्याचं म्हटलं जातं.
हेही वाचा : गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल
मुंबईत मात्र पहिल्यापासूनच क्रिकेटचा धमाका होता आणि इथे चौरंगी, पंचरंगी सामने रंगायचे. तोबा गर्दी व्हायची. १९३० मधे गांधीजींनी दांडीयात्रा काढली आणि देश एकवटण्याचे प्रयत्न आरंभले. तेव्हा त्यांना हे सामने अडचणीचे वाटले. हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिस्ती अशा धर्मावर बेतलेल्या संघांमधे हे सामने व्हायचे. जरी कधीही या स्पर्धेच्या दरम्यान दंगेधोपे झाले नाही किंवा कटू घटना घडल्या नाहीत तरीही गांधीजी या स्पर्धेच्या विरोधात राहिले.
परिणामी तीन वर्षे ही स्पर्धा बंद पडली होती. गांधीजींचे आवाहन अनेकांनी ऐकलं आणि विजय मर्चंटसारख्या धनाढ्य पण कुशल क्रिकेटपटूने १९३२च्या पहिल्या इंग्लिश दौऱ्यासाठी निवड चाचणीला न जायचा निर्णय घेतला होता. गांधीजींचे विचार हळूहळू रुजले आणि १९४६ मधे चौरंगी, पंचरंगी सामने कायमचे बंद झाले.
१९३९ मधे इंग्लंडच्या डग्लस जोर्डीनची एमसीसी म्हणून ओळखली जाणारी टीम भारताच्या दौऱ्यावर आला असताना गांधींना आमंत्रण दिलं गेलं आणि पहिला चेंडू त्यांच्याकडून टाकायची विनंती केली गेली. त्यांनी ती मान्य केली. या जोर्डीन टीमच्या १६ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या विजय मर्चंटच्या भगिनी लक्ष्मी यांनी एकाच वहीत घेतल्या आणि त्यांनी तीच वही गांधीजींपुढे केली. तेव्हा क्रमांक १७ टाकत स्वतः गांधीजींनी स्वाक्षरी केली होती.
अनाहूतपणे ते जोर्डीनच्या टीमचे सतरावे सदस्य झाले होते. अर्थात हा गंमतीचा भाग. पण ते स्पष्ट करायचे, ‘माझा कुठल्याही स्पर्धेत खेळाला विरोध नाही. मात्र जी बाब लोकांना एकत्र आणायला अडथळा ठरते ती मी सहन करणार नाही.’
हेही वाचा : नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?
असंच एकदा गमतीत त्यांनी थोरले नवाब ऑफ पतौडी यांना एकेरी स्पर्धेचं आव्हान दिलं होतं. इफ्तिगार पतौडी हात जोडून त्यांना म्हणाले होते, ‘आपण मला क्रिकेटमधेही हरवाल. पण मी आपल्याला राजकारणात कधीच हरवू शकणार नाही.’ तेव्हा वयोवृद्ध गांधींनी हसत म्हटलं, ‘नवाबसाब, आपने तो मुझे अभी से बोल्ड कर दिया.’
गांधीजींना देशाची नस कळलेली होती. इथल्या जनतेला काय हवे, काय नको याची त्यांना चांगली माहिती होती. तसं ते मार्गदर्शन करायचे आणि आपल्या मतावर आग्रही राहायचे. आज कदाचित त्यांचे क्रिकेटबाबतचे मत वेगळे बनले असते असे अनेक भाष्यकारांना वाटते. ते आता असते तर भारतात क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे सगळे जण धार्मिक आणि जातीय भेदभाव विसरून एकत्र येतात हे पाहून ते खुश झाले असते. टीम मधेही सर्वधर्मीय असतात आणि प्रेक्षकांमधेही सर्वधर्मीय असतात याचं त्यांना अप्रूप वाटलं असतं.
हेही वाचा : बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं
गांधीजींना भावणारी आणखी एक बाब म्हणजे पंचगिरी. खेळाचे नियम हे काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत, याकडे त्यांचा कल असायचा. प्यारेलाल नय्यर यांनी एका पुस्तकात संदर्भ दिलाय. ‘राजकोटला पूर्वी रात्री जेवणानंतर चांदण्यात हिंदू, मुस्लिम तरुण एकत्र जमायचे. शीतला चौक हे सर्वांनी जमायचं ठिकाण होतं. इथे क्रिकेट रंगायचे आणि तिथे गांधीजी चक्क पंचगिरी करायचे, तीसुद्धा कडक शिस्तीने.’
खरंतर गांधीजींनी आयुष्यभर पंचगिरीच केली. त्यांनी नेहमीच नीतीमत्तेला महत्वाचं मानलं म्हणून त्यांनी ब्रिटिशांच्या जुलुमी सत्तेला बाद ठरवलं. मैदान म्हणजे भारतातला मुक्काम न सोडणाऱ्या या हट्टी ब्रिटिशाला अक्षरश: हुसकावून लावलं आणि याचबरोबर खेळातली शिस्त, एकोपा यांना महत्वाचे मानत भारतीय जनतेला या गोष्टींचे धडे सतत दिले. नीतीनियम तोडू नका, कुणावर बळजबरी करून विजय मिळवायला जाऊ नका हा त्यांचा कडक दंडक राहिला. त्यांना हिंदू, मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान यांच्यातली तेढ पसंत नव्हती.
क्रिकेट खेळणाऱ्या गांधीजींचं छायाचित्र उपलब्ध नाही किंवा पंचगिरी करतानाचेही. पण त्याचमुळे त्यांच्या खेळाविषयीच्या विचारांबद्दल अनेकांना आताही उत्सुकता आहे. याबाबतचं संशोधन जरी आहे आणि ते भविष्यातही जरी राहणार आहे.
हेही वाचा :
धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा
क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा
ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम
शस्त्र घेऊन गुंडागिरीचा सामना करायला सांगणारे गांधीजी माहीत आहेत?