कोरोनाच्या डबल म्युटेशनमुळे धोका वाढलाय?

०७ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


भारतात कोरोना वायरसचा एक नवा प्रकार आढळून आलाय. वायरसच्या जनुकीय रचनेत दोन प्रकारचे बदल आढळून आलेत. यालाच डबल म्युटेशन म्हटलं जातंय. ४ एप्रिलला कोरोना पेशंटच्या आकडेवारीने अचानक लाखभराचा आकडा गाठला. त्यामागे हा डबल म्युटेशन वायरस असल्याचा अंदाज बांधला जातोय. वायरसमधल्या या नव्या बदलामुळे सगळ्यांची काळजी मात्र वाढलीय.

कोरोना वायरसच्या जनुकीय रचनेत बदल व्हायच्या बातम्या आपण याआधी अनेक वेळा ऐकल्यात. हे म्युटेशन नैसर्गिक असल्याचं म्हटलं जात होतं. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात भारतातल्या अनेक पेशंटमधे डबल म्युटेशन आढळून आल्याची माहिती केंद्राच्या आरोग्य खात्याने दिली. आणि सगळ्यांचं टेंशन वाढायला लागलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं हे कारण तर नाही ना अशी चर्चा सगळीकडे व्हायला लागली.

डबल म्युटेशन, डबल इन्फेक्शनही?

जगभरात कोरोना पेशंटची संख्या वाढतेय. फेब्रुवारी महिन्यात भारतात कोरोना पेशंट अचानक वाढू लागले. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र आणि पंजाबमधे वाढणारी संख्या चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं होतं. लगोलग कोरोना वायरसमधल्या डबल म्युटेशनची बातमी येऊन धडकली. त्यामुळे कोरोनामुळे हवालदिल झालेल्यांच्या काळजीत अधिक भर पडली.

म्युटेशनमुळे वायरसच्या रचनेत बदल होतो. या बदल झालेल्या वायरसलाच नवीन स्ट्रेन किंवा वेरियंट असं म्हणतात. सध्याच्या कोरोना वायरसमधे बदल होत असून त्याचाच एक नवा प्रकार आढळल्याचं आरोग्य खात्याने मार्चच्या शेवटी म्हटलं होतं. याला डबल म्युटेट वायरस असं म्हटलं जातंय. डबल म्युटेशन म्हणजे एकाच प्रकारच्या कोरोना वायरसच्या रचनेत दोन प्रकारचे बदल होणं.

कोरोना वायरसमधे याआधीही असे बदल झालेत. आफ्रिका, इंग्लंड, ब्राझील या देशांमधे वायरसची नवी म्युटेशन आढळून आली होती. आफ्रिका, ब्राझीलमधली म्युटेशन अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं गेलं. पण आताच्या नव्या प्रकारात एकाचवेळी दोन महत्वाचे बदल आढळून आलेत. हे डबल म्युटेशन म्हणजे डबल इन्फेक्शन असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा: लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

जिनोम सिक्वेन्सिंगची चर्चा

पेशंटची वाढती संख्या विचारात घेऊन भारतात जिनोम सिक्वेन्सिंग करायची मागणी जोर धरतेय. जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे वायरसचा नवे प्रकार ओळखण्यासाठी केलेली एक ठराविक प्रक्रिया. या पद्धतीचा वापर करून वायरसची जनुकीय रचना समजून घेतली जाते. भारतात याचं काम 'द इंडियन सार्सकोव २ कॉन्झॉर्टियम ऑन जिनॉमिक्स' हा दहा प्रयोगशाळांचा गट करत असल्याची माहिती बीबीसी मराठीवर वाचायला मिळते.

या नव्या प्रकारात सध्या ई४८४क्यू आणि एल४५२आर अशी दोन म्युटेशन आढळून आलीत. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी देशातल्या १८ राज्यातून १०,७८७ नमुने घेण्यात आले होते. यातल्या ७७१ नमुन्यांमधे कोरोनाचे धोकादायक ठरू शकतील असे प्रकार आढळून आल्याचं केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटलंय. महाराष्ट्रातूनही १२०० नमुने पाठवण्यात आले होते. त्यातल्या २०६ कोरोना पेशंटमधे ही दोन प्रकारची म्युटेशन आढळून आली.

म्हणजेच महाराष्ट्रातल्या एकूण १५ ते २० टक्के नमुन्यात म्युटेशन आढळून आलीत. पण केवळ या म्युटेशनमुळे कोरोना पेशंटची संख्या वाढली, असं म्हणता येणार नाही असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलंय. तर वायरसची जनुकीय रचना समजून घेण्यासाठी म्हणून देशभर जिनोम सिक्वेसिंगचं प्रमाण वाढवलं असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलंय.

धोक्याबद्दल तज्ञांमधे मतमतांतरं

४ एप्रिलला कोरोनाच्या आकडेवारीने अचानक लाखभराचा आकडा गाठला. त्यामागे हा डबल म्युटेशन वायरस असल्याचं म्हटलं जातंय. हा वायरसचा प्रकार आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करून संसर्ग वाढवतो असं म्हटलं जातंय. त्यामुळे काळजीत अधिकच भर पडली. वायरसमधे अशी दोन म्युटेशन आढळतील असं 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स'च्या रणदीप गुलेरिया यांनी आधीच म्हटलं होतं. डिसेंबर २०२० लाच त्यांनी याबद्दल माहिती दिली होती.

अर्थात केंद्रीय आरोग्य खात्याने मात्र फार कमी नमुन्यांमधे हा नवीन प्रकार आढळून आल्याचं म्हटलंय. शिवाय त्याचा संबंध वाढणाऱ्या पेशंटशी जोडता येणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. दुसरीकडे 'सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, हैदराबादचे प्रमुख राकेश मिश्रा यांनी डबल म्युटेशन वायरस मोठ्या प्रमाणात पसरत असून हा काळजीचा विषय असल्याचं म्हटलंय.

तर डबल म्युटेशनचं ट्रिपल म्युटेशन झालं तर मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता वाढेल असं महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलंय. त्यामुळे या नव्या म्युटेशनबद्दल सध्यातरी मतमतांतरं असल्याचं दिसून येतंय.

हेही वाचा: 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?