सुरेश जाधव: कोविशिल्ड बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा कणा

१८ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या लसींचा शोध लावण्यात आला त्यापैकी एक कोविशिल्ड होती. प्रशासनाने लसीकरणाची प्रक्रिया राबवताना आपला पुरेपूर राजकीय फायदाही पाहिला. स्वतःचं कौतुक करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या सरकारने या लसीमागे राबणाऱ्या हातांना मात्र कायमच उपेक्षित ठेवलं. या लसीच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करणारं मराठमोळं नाव होतं डॉ. सुरेश जाधव.

वॉशिंग्टनच्या विमानतळावर उतरलेले ते भारतीय शास्त्रज्ञ हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सीत बसले. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी टॅक्सी ड्रायवरशी गप्पा मारायला सुरवात केली. गप्पा मारता मारता त्यांनी सहजच आपल्या संस्थेविषयी आणि कामाविषयी त्या ड्रायवरला सांगितलं. हॉटेलपाशी गाडी थांबल्यावर त्यांनी आपलं भाडं दिलं पण त्या चालकाने भाडं घ्यायला नकार दिला. त्या शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं पण त्यामागचं कारण ऐकल्यावर त्यांचा उर अभिमानानं भरून आला.

तो ड्रायवर बुर्कीना फासो या लहान आफ्रिकी देशाचा रहिवासी होता. या देशात मेंदूज्वराच्या आजाराने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी भारतातल्या एका मेडिकल संस्थेमधून या रोगावरची प्रतिबंधक लस तिकडे पाठवली गेली. ही लस घेतल्यामुळे त्या ड्रायवरचं कुटुंब वाचलं होतं. माझ्या देशातल्या करोडोंचा जीव वाचवणारं औषध तुम्ही बनवलंत, त्या बदल्यात ही फुल ना फुलाची पाकळी म्हणत त्या चालकाने नम्रपणे भाडं घ्यायला नकार दिला.

ती भारतीय संस्था होती पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट तर या संस्थेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारे ते शास्त्रज्ञ होते डॉ. सुरेश जाधव. डॉ. जाधव यांचं नुकतंच निधन झालंय. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.

हेही वाचा: कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात

एकविसाव्या वर्षी औषधनिर्मिती क्षेत्रात

डॉ. सुरेश जाधव हे मूळचे विदर्भातल्या अमरावतीचे. तल्लख बुद्धिमत्तेचे धनी असलेल्या जाधवांनी नागपूर युनिवर्सिटीमधून फार्मसीची पदवी आणि पीएचडी मिळवली. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळात संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर काही काळ त्यांनी नागपूर आणि हाफकिन संस्था, मुंबई इथं औषधनिर्मिती विभागात प्राध्यापक म्हणून काम केलं.

वयाच्या तिसाव्या वर्षी जाधव पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधे नोकरीच्या मुलाखतीसाठी गेले. ती मुलाखत सायरस पूनावाला यांनी घेतली होती. मुळात तेव्हा त्यांना या नोकरीची फारशी गरजही नव्हती. सहज द्यायची म्हणून त्यांनी ती मुलाखत दिली. काही दिवसांनी पूनावालांनी कॉल करून त्यांची निवड झाल्याचं कळवलं. जाधवांसाठी ही मोठी संधी होती. त्यांनी सिरमची नोकरी स्विकारली आणि तिथं जे चिकटले, ते कायमचेच!

याच इन्स्टिट्यूटमधे आपल्या कौशल्याच्या आणि अनुभवाच्या जोरावर जाधवांनी अभूतपूर्व यश मिळवलं. आपल्या संशोधनातून निर्माण झालेल्या लसींमुळे त्यांनी जगभरातल्या करोडो लोकांचे जीव वाचवले. कित्येक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन समित्यांमधे त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना 'डॉ. जाधव हे जागतिक बाजारपेठेत सिरम इन्स्टिट्यूटचा चेहरा बनले', असं संस्थापक सायरस पूनावाला म्हणतात.

सिरम हीच कर्मभूमी बनली

डॉ. जाधव यांची फक्त बुद्धिमत्ताच नाही तर नीतिमत्ताही कौतुकास्पद होती. त्यांच्या मते, लस हे सर्वाधिक प्रभावशाली साधन असून त्यामागे दोन प्रमुख कारणं होती. पहिलं, त्याचा वापर करून लोकांचा जीव वाचवता येतो. दुसरं, मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालं तर गरीबातल्या गरीब देशांनाही याचा फायदा घेता येतो. आपलं संशोधन लस बनवण्यात आणि लोकांचा जीव वाचवण्यात कामी यावं, हीच त्यांची एकमेव इच्छा होती. आणि त्यांच्या इच्छेला पूरक असं पाठबळ मिळणारं त्यावेळचं एकमेव ठिकाण होतं, ते म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट.

त्यामुळे सिरमला निवड झाल्यावर त्यांनी स्वतःहून चालत आलेल्या परदेशी शिष्यवृत्त्या नाकारून भारतातच राहायचं ठरवलं. त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटला आपली कर्मभूमी मानलं. त्यांचं आणि पूनावालांचं नातं सलोख्याचं होतं. पूनावालांनी अगदी डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. कोणत्याही कठीण परीस्थितीत पूनावाला डॉक्टरांना त्यांचं मत विचारूनच पुढचे निर्णय घ्यायचे. पूनावालांच्या या विश्वासाला डॉक्टरांनी कधीही तडा जाऊ दिला नाही.

हेही वाचा: थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर?

गोवरच्या लसीसाठी प्रयत्न

गरीब देशांपर्यंत लस निर्यात करण्यासाठी ती यंत्रणा समजून घेणं भाग होतं. १९८३मधे डॉ. जाधवांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला भेट दिली. त्यावेळी या यंत्रणेवर मर्क, सनोफी आणि जीएसके या विदेशी कंपन्यांचं वर्चस्व होतं. त्यावेळी भारतासारख्या एखाद्या विकसनशील राष्ट्रानं लस निर्यात करण्याचा निर्णय खरोखरच धाडसाचा मानला जात होता.

डॉ. जाधवांच्या या प्रयत्नाला १९९३मधे यश आलं. त्यावर्षी सिरमने गोवर प्रतिबंधक लस निर्माण करून डब्ल्यूएचओकडून प्रमाणपत्र मिळवलं. गोवर प्रतिबंधक लशीचा हा शोध सिरमसाठी महत्त्वाचा ठरला. तिथून पुढे सिरममधे बनवलेली किमान एकतरी लस दरवर्षी डब्ल्यूएचओकडून मान्य होऊ लागली. यामुळे लस निर्यातीसाठी पूरक अश्या बाजारपेठांचे दरवाजे भारतासाठी उघडले गेले.

काम, नाम आणि दाम

आपल्या नैतिक कर्तव्यांसोबतच व्यावहारिक मूल्यंही डॉक्टरांनी प्राणपणाने जपली. सिरम इन्स्टिट्यूट ही एक वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाची संस्था असली तरी तिला व्यवसायाचं कोंदण लाभलं होतं. एखाद्या रोगाचा उद्रेक झाला तर लसीला मागणी असते पण तो उद्रेक संपल्यानंतर मागणीही ओसरते आणि व्यवसाय ठप्प होतो. डॉ. जाधवांना आपला सेवाभाव जपताना संस्थेची आर्थिक बाजू सांभाळणंही भाग होतं. आणि त्यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी लीलया पेलल्या.

नफातोट्याची गणितं सांभाळताना उपलब्ध संसाधनांच्या गुणवत्तेत कसलीही कसर होणार नाही यावर डॉ. जाधव ठाम होते. कारण लस बनवण्याची परवानगी फक्त मोजक्याच कंपन्यांना होती आणि गुणवत्ता नियंत्रणाचे कायदे अतिशय कडक होते. त्यात लस बनवली तरी तिला अधिकृत मान्यता मिळणं हेही एक अग्निदिव्यच होते. पण १९९३साली डब्ल्यूएचओकडून मिळालेल्या पूर्वपात्रता प्रमाणपत्राच्या जोरावर सिरमने आंतरराष्ट्रीय बाजारात मुसंडी मारली.

सिरमची उत्पादन आणि वितरण प्रक्रिया फार उधळपट्टी होणार नाही अश्याप्रकारे रचली गेली होती. जास्तीत जास्त परिणामकारक लशींचं उत्पादन कमीत कमी खर्चात आणि मोठ्या प्रमाणात होत असल्याने गरीब देशांनाही लस पुरवण्यात डॉ. जाधव यशस्वी ठरले. साहजिकच, लस संशोधनासारख्या कमी नफ्याच्या व्यवसायातही सिरमने ४० वर्षांत जवळपास दीडहजार पटीने नफा कमावण्यात यश मिळवलं होतं. सिरमची हीच खासियत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांचा मान वाढवणारी ठरली.

हेही वाचा: ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

कित्येक वर्षांपासून सहारा उपखंडात मेंदूज्वराचा उद्रेक वाढत होता. तेव्हा बिल-मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि डब्ल्यूएचओच्या सौजन्याने नव्या लसीवर संशोधन सुरु झालं. या मोहिमेचं बजेट बरंच मोठं होतं. पण ही लस गरीब आफ्रिकी देशांना परवडणारी नव्हती. त्यावेळी असहाय्य आफ्रिकी जनतेसाठी डॉ. जाधव आणि सिरम इन्स्टिट्यूट धावून आली. डिसेंबर २०१०मधे मेनआफ्रिवॅक ही मेंदूज्वरावरची पहिली लस भारताने निर्यात केली.

तब्बल २६ देशांमधे ही लस पोचवली गेली. या लसीकरणानंतर पुन्हा आलेल्या मेंदूज्वराच्या साथीने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नफातोट्याची गणितं सांभाळूनही गरीब देशांना मदत करता येऊ शकते हे या उदाहरणातून सिद्ध झालं. डॉ. जाधवांच्या या कामगिरीने सिरमचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं.

‘कोविशिल्ड'च्या निर्मितीत योगदान

२०२०च्या पहिल्या सहा महिन्यांत कोरोनाचा उद्रेक झपाट्याने वाढला. स्वतःला महासत्ता म्हणवणाऱ्या आणि बनवू पाहणाऱ्या देशांच्या आरोग्ययंत्रणेचा फज्जा उडाला. या रोगाला कसा आळा घालायचा यावर जगभरातले संशोधक रात्रंदिवस झटू लागले. डॉ. जाधवही याला अपवाद नव्हतेच. लॉकडाऊनमुळे जेव्हा इतरांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडला तेव्हा जाधव स्वतःचा जीव धोक्यात घालून रोज इन्स्टिट्यूटमधे येऊन तासंतास संशोधन करायचे.

आजपर्यंत आपलं सगळं कौशल्य पणाला लावत त्यांनी भारतभर क्लिनिकल रिसर्च साठी यंत्रणा उभी केली. लस उत्पादनाच्या प्रक्रियेत अगदी सुरवातीच्या टप्प्यांपासून त्यांनी जातीने लक्ष्य घालायला सुरवात केली. कोरोनाशी भारताने पुकारलेल्या युद्धात ते वैद्यकीय आघाडीवर सेनापती म्हणून लढत राहिले. या कामात ना त्यांच्या आजारपणाचा अडथळा आला ना त्यांच्या वयाचा.

‘सिरम इन्स्टिट्यूटचा कणा’ ही  संकल्पना ते अक्षरशः जगले. भारतात १३२ करोड लशींचे डोस आत्तापर्यंत दिले गेले आहेत. यात ९० टक्के वाटा एकट्या कोविशिल्डचा आहे. डॉ. जाधवांनी लस संशोधनासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. सिरम इन्स्टिट्यूटला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवण्याचं श्रेय सर्वस्वी त्यांच्याकडे जातं. डॉ. जाधव अखेरपर्यंत झटत राहिले. पण त्यांची म्हणावी अशी दखल सरकारकडून घेण्यात आली नाही.

हेही वाचा: 

कुछ वायरस अच्छे होते है!

या पाच शक्तीशाली महिलांवर अवलंबून आहे कोरोनानंतरचं जग

कोरोना काळात मानसिक ताणतणावाचं नियोजन कसं करायचं?

साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय