कुकडे काकांना पद्मभूषण रुग्णांच्या सेवेसाठी की संघाच्या?

३० जानेवारी २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


ऐन निवडणुकीच्या वर्षात जाहीर झालेल्या यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राजकीय जुळवाजुळव असल्याचे आरोप होत आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहिणीने तर याच कारणावरून हा पुरस्कार नाकारलाय. लातूरमधले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक कुकडे यांना आरोग्य क्षेत्रासाठी पद्मभूषणसारखा मोठा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातही अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

प्रणव मुखर्जी, भुपेन हजारिका, नानाजी देशमुख यांना भारतरत्न देण्यामागच्या राजकारणाची चर्चा सध्या देशभर जोरात सुरू आहे. त्यांना पुरस्कार देण्यामागे मोदी सरकारची निवडणूक समीकरणं दडल्याचं गुपित आता उघड झालंय. त्यात राजकारण असलं तरी या तिघांचंही कर्तृत्व देशाच्या या सर्वोच्च पुरस्कारासाठी पुरेसं मोठं आहे.

अनेक दशकं काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करणाऱ्या प्रणव मुखर्जी यांचा सरकारने भारतरत्न देऊन गौरव केलाय. काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न रंगवणाऱ्या मोदींनीच भारतरत्न देऊन प्रणवदांचं राजकीय क्षेत्रातलं योगदान अधोरेखित केलंय. त्यामुळे प्रणवदा केवळ संघाच्या संघशिक्षा वर्गाला उपस्थित राहिले, म्हणून त्यांना भारतरत्न दिलंय, असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय करणारं होईल. तेच हजारिकांचं संगीतातलं योगदान आणि नानाजी देशमुखांच्या चित्रकूट प्रकल्पातल्या कामाविषयी म्हणता येईल.

पद्म पुरस्कारांच्या यादीत यंदा लातूरच्या विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान आणि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोकराव कुकडे यांचंही नाव आहे. ही तमाम मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मेडिसिन आणि अफॉर्डेबल हेल्थकेअर या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिलाय, असं सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. पण देशातल्या तिसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार मिळवणारे डॉ. अशोक कुकडे आहेत तरी कोण, असा संभ्रम अभिमान वाटणाऱ्याच मराठी माणसापुढे तयार झालाय.

डॉ. कुकडे कोण आहेत?

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणाऱ्या डॉ. कुकडेंनी पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतलं. ते अव्वल क्रमांकाने एमबीबीएस, एमएस झाले. संघाचंच एक युनिट असलेल्या ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक अप्पा पेंडसे यांनी त्यांना ग्रामीण भागात जाऊन संघसेवा देण्याचा सल्ला दिला. अप्पा पेंडसे हे डॉ. कुकडे यांच्या पत्नी डॉ. ज्योत्स्ना यांचे मामा. त्यांच्या सूचनेनुसार सदाशिवपेठी वातावरणात वाढलेले कुकडे सपत्नीक लातूरला आले.

डॉ. रामभाऊ आलूरकर पतीपत्नी आणि कुकडे पतीपत्नी हे चार संघ स्वयंसेवक लातूर शहरात आले. ते वर्ष होतं १९६४. त्यावेळी शहरात पंडित नेहरूंनी उद्घाटन केलेलं कस्तुरबा गांधी रूग्णालय लातूरकरांच्या सेवेत होतं. सोबतीला छोटेमोठे दवाखानेही होते.

पुढच्या काळात या संघ स्वयंसेवकांमधे डॉ. गोपीकिशन भराडिया हे लातूरकर डॉक्टरही सामील झाले. १२ खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहून त्यांनी तिथेच दवाखाना सुरू केला. पुढे ट्रस्ट उभारून विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान आणि संशोधन केंद्राची स्थापना केली, असं डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांनी एका लेखात सांगितलंय.

स्वयंसेवकांना अफॉर्डेबल हेल्थकेअर

विवेकानंद हॉस्पिटलमधे गेल्या अनेक वर्षांपासून दर गुरुवारी स्वस्तात उपचार केले जातात. यानिमित्ताने हॉस्पिटलमधे येणारे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना साप्ताहिक प्रार्थना, प्रबोधनाचा लाभ दिला जातो, अशी माहिती लोकसत्ताचे लातूर बातमीदार प्रदीप नणंदकर यांनी दिली.

हे प्रबोधन देशभरातून येणारे संघ स्वयंसेवक करतात. सोबतच संघाच्या स्वयंसेवकांनाही आजारपणात इथे दाखल केलं जातं. त्यांची सेवा होते. संघ स्वयंसेवकांचे वेळोवेळचे हेल्थ चेकअपही इथे निःशुल्क पार पडतात. आरएसएसचे सहसरकार्यवाह राहिलेल्या सुरेश केतकर यांची पाचेक वर्ष विवेकानंदमधल्या कर्मचाऱ्यांनीच सेवासुश्रुषा केली.

आज विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान आणि संशोधन केंद्र मराठवाड्यातल्या अत्याधुनिक हॉस्पिट्ल्समधे गणलं जातं. सध्या जवळपास २५ पूर्णवेळ डॉक्टर आणि दोनशेहून अधिक कर्मचारी असल्याचं हॉस्पिटलच्या वेबसाइटवर नोंदवण्यात आलंय. डॉ. कुकडेंना पद्मभूषण जाहीर झाल्यावर त्यांच्या कामाचं स्वरूप स्पष्ट करताना सगळ्याच वर्तमानपत्रांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख केलाय. पण या सुविधा नेमक्या कुठल्या हे मात्र कुणी सांगितलं नाही.

देणगीदारांसोबत सरकारचाही मदतीचा ओघ

२०१६ मधे राज्य सरकारने हॉस्पिटलला शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार देऊन गौरवलंय. लोकांनी, वेगवेगळ्या संस्थांनी दिलेल्या डोनेशनमुळे रुग्णालयात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. गेल्या चार वर्षांत सरकारकडूनही निधीचा ओघ वाढलाय. विवेकानंद प्रतिष्ठानने सुरू केलेल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनाला खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा तो त्यांचा पहिलाचा लातूर दौरा होता. 

केंद्र सरकारच्या मदतीमुळे लातुरातच कॅन्सरवर कमी दरात उपचाराची सोय उपलब्ध झालीय. आता हॉस्पिटलमधे जवळपास सगळ्याच आजारांवर अत्याधुनिक औषधोपचार केले जातात. एवढंच नाही तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातले जवळपास ५० टक्के पेशंट हे विवेकानंद हॉस्पिटलमधे येतात. या योजनेअंतर्गत पेशंटला वैद्यकीय सेवा मोफत दिल्या जातात. त्याचे पैसे नंतर सरकार हॉस्पिटलला देतं. त्याशिवाय हॉस्पिटलमधे गरिबांना फी कमी आहे किंवा त्यांच्यासाठी खाटा राखीव आहेत, असं नाही. 

कुकडे काकांनी लोकांमधे सेवाभाव जागृत केला. आपल्याकडे चार माणसं एकत्र येऊन काम करणं हे सहज शक्य होत नाही. अशावेळी एखादं ट्रस्ट ५० वर्ष टिकवणं ही सोपी गोष्ट नाही, असं पूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केलेले पत्रकार नणंदकर सांगतात.

काका नाव कशामुळे?

उभ्या महाराष्ट्राला लातूरची ओळख काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी अनेक वर्ष जिल्ह्याचं एकहाती नेतृत्व केलं. अशा लातुरात परगावहून येऊन काँग्रेसविरोधी विचाराच्या संघाच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल चालवणं ही साधी गोष्ट नाही. 

चाकूरकर यांनी तर आपलीच संस्था म्हणून विवेकानंद हॉस्पिटलला सढळ हाताने मदत केली. लातुरात संघाचं काम वाढण्यामागे काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा मोठा हातभार लाभला. पत्रकारांमधे तर अशी चर्चा होते की संघाचं नवं काम सुरू झाल्यावर पहिले दहा देणगीदार काँग्रेसचेच सापडतात. अशावेळी सगळ्यांना सोबत घेऊन संघाचं काम वाढवणाऱ्या कुकडे काकांच्या संघटन कौशल्याला दाद द्यायला हवी. काँग्रेसमुक्त भारताच्या गर्जना करणाऱ्या मोदी आणि शहांनी सर्वांना सोबत घेऊन जाणं काकांकडून शिकायला हवं.

सगळ्यांना सोबत घेऊन कुकडे काकांनी लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा नदीत जलयुक्त शिवार योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतला. अनेक एनजीओंनीही याला पाठिंबा दिला. यासाठी लोकसहभागातून सहा कोटी रुपये जमले. लोकांनी त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला. काकांनी वैद्यकीय क्षेत्रात कुठलं संशोधन केलं नाही. पण त्यांच्या हॉस्पिटलने वेगवेगळे उपक्रम राबवले. कुकडे यांच्या सार्वजनिक वावरामुळे ते लातूरकरांमधे काका म्हणून प्रसिद्ध आहेत, अशी माहिती नणंदकर देतात.

नरेंद्र मोदींसोबत जुनं कनेक्शन

कुकडे काका बरीच वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक राहिले. या काळात त्यांनी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधे काम केलंय, असं मुंबई तरुण भारतच्या बातमीत म्हटलंय. त्यामुळे पंतप्रधान मोदींना काकांचं संघकार्यातलं योगदान आणि विवेकानंद हॉस्पिटल उभारणीतल्या कामाची चांगलीच माहिती आहे.

काका संघात सक्रीय असल्यामुळे देशभरातून लातुरात, मराठवाड्यात येणाऱ्या स्वयंसेवकांसाठी विवेकानंद हॉस्पिटल म्हणजे एक अड्डा होता. विलासरावांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात भाजपने आपले पाय पसरले. पण त्याआधीपर्यंत जिल्हा भाजपचं कार्यालय म्हणजे कुकडे काकांचं घर, दवाखाना, हे समीकरण लातूरकरांना चांगलं परिचयाचं आहे.

डॉ. कुकडेंनी नेमकं काय योगदान दिलं?

आता वयाची ८० वर्ष पार केलेल्या काकांनी काही वर्षांपूर्वी ‘कथा एका ध्येयसाधनेची’ नावाचं आत्मचरित्र लिहिलं. या आत्मचरित्राला डॉ. अभय बंग यांनी प्रस्तावना लिहिलीय. त्या अभय बंगांनी ब्रेथ काऊंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावत न्यूमोनियाच्या आजाराचं निदान करणं सोपं केलं. सर्चसारखी जागतिक पातळीवरची आरोग्य संस्था उभी केली. त्यांचे अनेक शोध जागतिक पातळीवरच्या लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध झालेत. दारूबंदीसाठी गडचिरोलीसाठी जिल्ह्यात चळवळ उभी केली.

आपलं संशोधन केवळ पेपर सादर करण्यापुरतं नसून ती लोकांसोबत अमलात आणायची गोष्ट आहे, असं लोकहिताचं मिशन घेऊन काम करणाऱ्या डॉ. बंग यांना गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला. याउलट कुकडे काकांना मात्र असा कुठलाच विरोध झालेला दिसत नाही. काकांनी काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांचाच पाठिंबा, विश्वास मिळवल्याने विरोधाचा प्रश्नच निर्माण होत नाही. काकांनी डॉ. बंग यांच्या कामाचं ते मोठेपण ओळखूनच त्यांच्याकडून प्रस्तावना घेतली असावी. पण सरकारने काकांना त्यांच्यापेक्षा मोठा पद्मभूषण पुरस्कार देऊन सरकारने मात्र काकांचं काम मोठं ठरवलंय.

काकांनी हा पुरस्कार म्हणजे कुठल्याही हितसंबंधांशिवाय विधायक संघटनाचा केलेला गौरव आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई तरुण भारतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलीय. काकांची ही प्रतिक्रिया काही तितकी खरी नाही. कारण काका हे संघाचं काम घेऊन तिथे गेलेत. म्हणजेच संघाचे हितसंबंध जपण्याचं मिशन त्यांनी पार पाडलंय. ते काही फार निष्णात सर्जन म्हणूनही गाजले नाहीत. त्यांनी मोठ्या शस्त्रक्रिया केल्याच्याही नोंदी नाहीत. 

मेळघाटमधे काम करणाऱ्यांना मात्र पद्मश्री

दुसरीकडे कुकडे काकांच्या सोबतच दुर्गम मेळघाटमधे काम करणाऱ्या डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलाय. संघाचीच शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आलेल्या डॉ. स्मिता यांनी मेळघाटमधे काम करणाऱ्या गांधीवादी डॉ. कोल्हे यांच्याशी लग्न केलं. आपलं सुखवस्तू जीवन सोडून त्या दुर्गम भागात कामाला गेल्या.

कोल्हे दाम्पत्य गेली ३० वर्ष मेळघाटमधे काम करतंय. खस्ता खातायंत. पण त्यांना फक्त पद्मश्री आहे आणि लातूरसारख्या महापालिका असणाऱ्या मोठ्या शहरात राहणाऱ्या कुकडे काकांना पद्मभूषण मिळालंय. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि मग भारतरत्न अशा क्रमाने गौरव केला जातो. हा काही नियम नाही. पण संकेत आहे. पण कुकडे काकांना थेट तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सरकारने मिशनरी स्वयंसेवकांना गोंजारण्याचं काम केलंय.

एखादा दवाखाना उभारलाय म्हणून पद्मभूषण द्यायचा झाला तर लातूरच्या रुई रामेश्वरचे सुपुत्र असलेल्या डॉ. विश्वनाथ कराड यांना भारतरत्न द्यावा लागेल. कराड यांनी तर मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल उभारलाय. राज्यभरात त्यांची अनेक हॉस्पिटल आहेत. त्यांच्या दवाखान्यातही कमी पैशात औषधोपचार दिले जातात. हे काही ते स्वखुशीने करत नाहीत. असं करणं कायद्याने बंधनकारक आहे. तसंच त्यांचा पुतण्या रमेश कराड राजकारणात आहे. राजकीय हितसंबंधासाठीही या हॉस्पिटलांचा वापर होतो. मग कराड यांना भारतरत्न द्यायचा का?

काकांचं आयुष्य इतर डॉक्टरांसारखंच

रजनीकांत आरोळे, बाबा आमटे यांच्या तीन पिढ्या, डॉ. बंग यांच्या दोन पिढ्या, डॉ. हिंमतराव बाविस्कर, डॉ. कोल्हे दाम्पत्य सगळ्या सुखसोईंचा त्याग करून ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात गेले. कुठल्याही संघटनेच्या, संस्थेच्या पाठबळाविना त्यांनी आपलं काम केलं. त्यासाठी प्रचंड संघर्ष केला. 

असा संघर्ष कुकडे काकांच्या आयुष्यात सापडत नाही. काकांनी लातुरात शहराच्या अगदी मुख्य भागात हॉस्पिटल सुरू केलं. या मोठ्या शहरात जवळपास सगळ्याच सोयीसुविधा आहेत. कशाचीच चणचण नाही. वाट्याला इतर सर्वसामान्य डॉक्टरांसारखंच जगणं सोबतीला आहे. याला जोड म्हणून आरएसएसचा पाठिंबाही आहे. असा कोणताही पाठिंबा नसताना महाराष्ट्रात अनेक डॉक्टरांनी हॉस्पिटल उभी केलीत आणि आयुष्यभर रुग्णसेवा केलीय. जुन्या काळात गावागावातल्या डॉक्टरांनी आरोग्य सेवेचा स्वतःचा पॅटर्न उभा केला.

लातूरच्या बाजूलाच असलेल्या अंबाजोगाईत सुप्रसिद्ध सरकारी मेडिकल कॉलेज फार वर्षांपासून आहे. शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर यासारख्या मातब्बर नेत्यांमुळे लातुरात आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधांची मुबलकता आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या लातूर पॅटर्नमुळे शहरात खूप आधीपासूनच चांगले डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळे विवेकानंद हॉस्पिटल नसतं तर लातूरकराचं काय झालं असतं, अशी चिंता करता येत नाही.

महागड्या आरोग्य सुविधांचं समर्थन

कुकडे काकांनी अफॉर्डेबल हेल्थकेअर म्हणजे स्वस्तात आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या, म्हणून सरकारने त्यांना पद्मभूषण दिलाय. पण काका तर पुरस्कार जाहीर झाल्यावर सकाळला दिलेल्या एका मुलाखतीत वेगळंच सांगतात. वैद्यकीय सेवा महागडी झालीय, हे खरंय. पण ते अपरिहार्य आहे, असं ते दाव्याने सांगतात. यासाठी ते वैद्यकीय क्षेत्रातली गुंतवणूक प्रचंड वाढली असल्याचं कारण सांगताना वैद्यकीय सेवेतील किमती काही प्रमाणात वाढलेल्या असणारंच असं कुकडे काका म्हणतात.

महागड्या आरोग्य सुविधांचं लपून लपून समर्थन करणाऱ्या काकांना सरकारने मात्र स्वस्ताईसाठी पुरस्कार दिलाय. यावरून त्यांच्या दवाखान्यात कशा पद्धतीने स्वस्तात सुविधा दिल्या जाताहेत याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

कुकडे काकांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातल्या योगदानापेक्षा हा त्यांच्या संघनिष्ठ मिशनरी कामाचा गौरव आहे. त्यांच्या त्या निष्ठेबद्दल आणि कामगिरीबद्दल कुणीच प्रश्नचिन्ह उभं करू शकत नाही. त्यामुळे सरकारने संघनिष्ठा अशी नवी कॅटेगरी तयार करून त्यांना पद्म सन्मान द्यायला हवा होता.