संडासांतून क्रांती घडवणारे डॉ. बिंदेश्वर पाठक

१७ ऑगस्ट २०२३

वाचन वेळ : ७ मिनिटं


संडास म्हटलं की आजही अनेकजण नाक मुरडतात. पण हेच संडास नसल्याने रोग पसरतात, त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार होतात, मुली शाळेत जात नाहीत, एवढंच नाही तर अस्पृश्यता सोसून माणसांना हा मैला साफ करावा लागतो. त्यामुळेच संडासाबद्दलची घृणा काढून, माणसाच्या आयुष्यात संडासाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्यांनी 'सुलभ इंटरनॅशनल' उभं केलं, त्या डॉ. बिंदेश्वर पाठक यांचं नुकतंच निधन झालं.

देशाच्या राजधानी नवी दिल्लीमधे अनेक ऐतिहासिक स्थळं आणि संग्रहालये आहेत. पण या सगळ्याहून अनोखं असं एक म्युझियम महावीर एन्क्लेव्ह भागात आहे. हे आहे संडासांचं म्युझियम. होय, संडासांचं म्युझियम! कुठेही नेता येणाऱ्या पोर्टेबल संडासापासून सोन्याचा वर्ख लावलेल्या संडासापर्यंतच्या जगभरातील हजारो संडासांच्या माहितीसह भन्नाट संग्रह इथं पाहता येतो.

माणसाला प्रतिष्ठा द्यायची असेल तर त्याच्या आयुष्यातील संडास या महत्वाच्या जागेला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, ही या म्युझियम मागची संकल्पना आहे. आपलं संपूर्ण आयुष्य देशभर नव्हे तर जगभर संडास बांधत राहिलेल्या डॉ. बिंदेश्वर पाठक नावाच्या अवलियानं केलेलं हे महान काम आहे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना पद्मभूषण आणि जगभरातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.  

लाखो संडास आणि कोट्यवधी माणसाचा वापर

जर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी एक उद्देश ठरवलं नाही तर, माणसाचं आयुष्य हे निरर्थक आहे. पण जर तुम्ही एक उद्देश निश्चित करून त्या दिशेने सतत प्रयत्न केलेत, तर तुम्ही क्रांती घडवू शकता, अशी मांडणी जागतिक कीर्तिचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. व्हिक्टर फ्रँकल यांनी त्यांच्या लेगोथेरपीमधे केली आहे. डॉ. बिंदेश्वर पाठक यांना असंच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट मिळालं आणि त्यांनी क्रांती घडवली.

ही क्रांती होती, संडास बांधण्याची क्रांती. हा १९६५ च्या दरम्यनचा काळ आहे. त्यावेळी देशात मोठ्या प्रमाणात उघड्यावर संडासला जाण्याची पद्धत होती. शहरी भाग वगळता गावात संडास असे नव्हतेच. शहरातही अनेक ठिकाणी लोक उघड्यावरच संडासला जात होते. या सगळ्यामुळे माणसाचं माणूसपण हरवतंय. त्याची प्रतिष्ठा पणाला लागतेय, हे डॉ. पाठक यांना खटकत होतं.

याच अस्वस्थतेतून पुढे सुलभ इंटरनॅनशलची स्थापना झाली.  आज देशात हजारो सुलभ शौचालये आहेत.  जिथल्या लक्षावधी संडासांचा वापर २ कोटींहून अधिक लोक करताहेत. एवढंच नाही तर अमेरिकेनेही सैनिकांसाठी संडास बांधण्यासाठी त्यांची मदत मागितली होती. युनायटेड नेशन्सने त्याची दखल घेतलीय. त्यांचे हे काम आज जगन्मान्य झालं असलं, तरी त्याची सुरुवात प्रचंड अवघड होती. त्यांना घरच्यांसह अनेकांकडून अपमान सहन करावा लागलाय. 

मैला साफ करणाऱ्या बाईंना स्पर्श केला आणि...

ही गोष्ट डॉ. पाठक यांच्या लहानपणाची आहे. गावातली एक महिला गावात बांबूची टोपली आणि झाडू घेऊन फिरायची. ती गावात इतस्ततः पडलेला कचरा, मैला वगैरे साफ करायची. जेव्हा ती महिला घराच्या इथून जायची, तेव्हा त्यांची आजी त्या जमिनीवर पाणी शिंपडायची. लहानपणी त्यांना कळलं नाही, पण नंतर त्यांना कळलं की आजी ती जमीन शुद्ध करते.

त्यांच्या मनाला ही गोष्ट भयंकर लागली. माणसासारखी माणूस असलेल्या त्या बाईंच्या स्पर्शानं जमीन अशुद्ध होते हे मानणं, म्हणजे अमानवी आहे असं त्यांना वाटलं. एक दिवस ते त्या बाईंच्या पाया पडले.  हे पाहताच घरी प्रचंड गदारोळ झाला. सात वर्षाच्या त्या मुलाला प्रचंड ओरडा सहन करावा लागला. थंडीच्या दिवसात गंगोदक घातलेल्या पाण्याच्या बादल्या त्यांच्या अंगावर ओतल्या गेल्या. एवढंच नाही तर शु्द्ध होण्यासाठी गोमूत्र आणि शेणाने बनवलेलं पंचगंव्य त्यांना प्यावं लागलं.

ही गोष्ट त्यांच्या डोक्यातून काही केल्या गेली नाही. माणसाचा मैला ही काही घाण नाही. ती साफ करणं हे पुण्याचं काम असून, त्याबद्दल अस्पृश्यता मानणं हेच पाप आहे, ही त्यांची ठाम धारणा बनली. त्यांनी आयु्ष्यात या गोष्टीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची असं ठरवलं आणि ते कामाला लागले. त्याबद्दल त्यांची प्रचंड हेटाळणी झाली. पण या सगळ्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपलं काम जगात सिद्ध करून दाखवलं.

गांधी विचारांनी जगण्याची प्रेरणा दिली

१९४३ मधे जन्मलेले डॉ. बिंदेश्वर पाठक हे बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील रामपूरमधील बघेल गावचे रहिवासी होते. त्यांचे वडील आयुर्वेदाचार्य आणि आजोबा ज्योतिषी होते. डॉ. पाठक यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्यावर त्यांच्या आईचा, योगमाया देवी यांचा जास्त प्रभाव होता. माणूस स्वतःसाठी जन्माला येत नाही तर इतरांना मदत करण्यासाठी जन्माला येतो, ही आईची शिकवण त्यांनी शेवटपर्यंत जपली.

पाठक यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर ते पाटणा येथे गेले, तेथून त्यांनी बी.एन. कॉलेजमधून समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली. याच दरम्यान ते पाटणा येथील गांधी शताब्दी उत्सव समितीच्या भंगी मुक्ती प्रकोष्ठ म्हणजे मैला साफ करणाऱ्यांना या कामातून बाहेर काढ्याच्या कामात ते स्वयंसेवक म्हणून रुजू झाले. गांधी विचारांनी त्यांना आयुष्याची प्रेरणा मिळाली होती.

खरं तर त्यांना मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठातून क्रिमिनोलॉजीमधे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं होतं. परंतु गांधी शताब्दी उत्सव समितीच्या सांगण्यावरून त्यांनी पाटण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. तिथेच त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण आणि नंतर 'सफाई कर्मचाऱ्यांच्या अपमानास्पद कामातून मुक्ती' या विषयावर अभ्यास करून पीएचडी मिळवली. 

दरम्यान, गांधी समितीचे सरचिटणीस सरयू प्रसाद यांनी पाठक यांना अस्पृश्यता निवारणासाठी बिहारच्या बेतिया जिल्ह्यात पाठवले. तिथं एक अशी घटना घडली ज्याने त्यांच्या कामाला दिशा मिळाली.

उघड्यावरील संडास बंद करेन, हेच ध्येय

तिथल्या बाजारात एका बैलाने एका मुलावर हल्ला केला. तिथं असलेले लोक त्या मुलाला वाचविण्यासाठी धावले. पण तितक्यात कोणी तरी बोलले तो हाताने सफाई करणाऱ्या कामगाराचा मुलगा आहे. हे कळताच, मदतीला पुढे गेलेले लोक पाठी हटले. त्या जखमी मुलाला मदत करायला कुणीच पुढे येईना. शेवटी पाठक यांनी त्या मुलाला दवाखान्यात नेले. त्या प्रसंगानंतर त्यांनी निश्चय केला, ही प्रथा बंद करणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय असेल.

महात्मा गांधी स्वतः मैला स्वच्छ करत असत. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन डॉ. बिंदेश्वर यांनी अस्पृश्यतेचा हा कलंक दूर करण्यासाठी संडास या विषयावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. १९६८ मधे त्यांनी डिस्पोजेबल कंपोस्ट टॉयलेट बनवले, जे घराभोवती मिळणाऱ्या साहित्यापासून कमी खर्चात बनवता येते. ही एक मोठी क्रांतिकारी गोष्ट होती. यामुळे देशातील प्रत्येक घरात संडास बांधणं शक्य झालं.

१९७० साली सुलभ इंटरनॅशनल सर्व्हिस ऑर्गनायझेशनची पायाभरणी झाली. इथं संडास या विषयावर मुलभूत संशोधन आणि प्रसार करण्याचं काम आखलं गेलं. या कामाला १९७३ मधे मोठं वळण मिळाले. बिहारच्या आरा नगरपालिकेने त्यांना नगरपालिकेच्या आवारात दोन शौचालये बनविण्यास सांगितले. या कामाचे प्रचंड कौतुक झाले आणि तिथून सुलभ शौचालये बनू लागली. आज देशभर ही शौचलये आहेत.

आत्महत्या करावी अशीही वेळ आली होती

जेव्हा त्यांनी सुलभच्या कामाला सुरुवात केली, तेव्हा लोकांना त्याचं कौतुक होतं. पण त्यातून फार काही हाताशी लागत नव्हता. लोकांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक फारशी काही बदलली नव्हती. त्यातच सरकारी नोकरशाही व्यवस्थांमुळे निधीही मिळत नव्हता. कामासाठी निधी हवा होता. पण हातात काहीही नव्हते. शेवटी त्यांनी गावातील जमीन आणि माझ्या पत्नीचे दागिने विकले.

एवढंच नव्हे तर संस्था चालवण्यासाठी मित्रांकडून पैसेही घेतले. 'हा माझ्या आयुष्यातील हा काळ खूप कठीण होता. त्यावेळी आत्महत्येचा विचारही मनात येऊन गेलो होता. सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं नाही. त्यामुळे अनेकदा जेवण टाळलंय. समोर नीट काम नव्हतं तेव्हा डिप्रेशनमधूनही गेलो’, असं पाठक आवर्जून सांगतात.

पण, नंतर १९७३ मधे बिहारमधील आरा नगरपालिकेचं काम मिळालं आणि कामाला गती मिळाली. बादलीतून मानवी मैला वाहून नेण्याचे संडास बंद करून पाठक यांनी सांगितलेले दोन खड्ड्यांचे संडास बांधण्याचे बिहारनं ठरवले. १९७४ मधे बिहार सरकरानं तस परिपत्रकच काढलं आणि सर्वत्र सुलभचे संडास बांधले जाऊ लागले. १९८० पर्यंत एकटया पाटण्यात २५ हजाराहून अधिक जण सुलभ वापरत होते, याची आंतरराष्ट्रीय माध्यामांनीही नोंद घेतली आणि डॉ. बिंदेश्वर पाठक हे नाव जगाला ज्ञात झाले.

ज्या कामानं लग्न मोडणार होतं, त्यानंच इतिहास घडवला

डॉ. पाठक आपल्या लग्नाची एक भारी गोष्ट सांगतात. त्यावेळी लग्न हे घर बघून होत असे. पाठक यांचंही लग्न तसंच ठरलं. पण जेव्हा पाठक यांच्या सासऱ्यांना कळलं की, माझा जावई संडास बांधतो, मैला साफ करणाऱ्यांसोबत काम करतो तेव्हा ते प्रचंड खवळले. आम्हाला फसवलं गेलंय, अशी त्यांची भावना झाली.  यावरून ते चक्क लग्न तोडायला निघाले होते. 

त्यावेळी डॉ. पाठक यांना सासरेबुवांना उत्तर दिलं, 'मी इतिहासाचं पान उलटण्याचा प्रयत्न करतोय. एक तर यात यशस्वी होईन किंवा स्वतःला त्यात संपून जाईन. पण काहीही झालं तरी मागे फिरणार नाही.’ आपले शब्द खरे करत त्यांनी याच अस्पृश्यतेच्या भावनेविरोधात लोकधारणा बदलण्याचे ऐतिहासिक काम केले. 

डॉ. बिंदेश्वर पाठक हे केवळ सुलभ शौचालयेच बनवत नव्हते, तर त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल टाकले. १९८८ मध्ये त्यांनी काही हाताने मैला साफ करणाऱ्यांना नाथद्वारा मंदिरात नेले आणि तेथे त्यांच्या हातून पूजा केली. लोकांनी याला विरोध केला. पण डॉ. पाठक ठाम होते आणि पूजा पूर्ण झाली. हे एक ऐतिहासिक पाऊल होते, ज्याचे देशभरातून कौतुक झाले.

डॉ. पाठक यांचं काम संपायला हवं

आज डॉ. पाठक यांच्या सुलभ संस्थेने १०,१२४ हून अधिक सार्वजनिक शौचालये, १५.९१ लाखांहून अधिक घरांमधे शौचालये, ३२,५४१ हून अधिक शाळांमध्ये शौचालये, २४५४ झोपडपट्ट्यांमधे शौचालये, २०० हून अधिक बायोगॅस संयंत्रे, १२ हून अधिक आदर्श गावांसाठी नियोजन केलं आहे.  या सगळ्यातून दहा हजाराहून अधिक लोकांना हाताने मैला उचलण्याच्या कामातून बाहेर काढलंय.

डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्या प्रयत्नांमुळेच संयुक्त राष्ट्र संघाने १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून निश्चित केला. डॉ. पाठक यांना पद्मभूषण,  गांधी शांतता पुरस्कारासह देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एवढंच नाही, तर २०१४ मधे सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानामागेही डॉ. पाठक यांची प्रेरणा होती.

आज डॉ. पाठक आपल्यात नाहीत. पण त्यांचं काम अद्यापही बाकी आहे. कारण देशातील संडास या विषयीची घृणा अद्यापही संपलेली नाही. २०२२-२३ या वर्षी समाज कल्याण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १९९३ पासून मानवी मैला हाताळणाऱ्या १०३५ लोकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे डॉ. पाठक यांनी सुरू करून दिलेलं काम पूर्ण करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.