डॉ. पीके वॉरियर: विज्ञानाची जोड देत त्यांनी आयुर्वेदाला आधुनिक बनवलं

१४ जुलै २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. पीके वॉरियर यांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालंय. वयाची शंभरी गाठलेल्या वॉरियर यांनी केरळच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीला जगभर पोचवलं. आयुर्वेद आणि एलोपॅथी यांच्यात समन्वय साधत आयुर्वेदाला विज्ञान आणि आधुनिकतेची जोड देण्याचं श्रेय त्यांना जातं. लाखो लोकांवर त्यांनी उपचार केले. यात जसे बडे राजकीय नेते होते तसेच सर्वसामान्य लोकही होते.

एलोपॅथीच्या उपचार पद्धतीवर टीका केल्यामुळे रामदेवबाबा मध्यंतरी चर्चेत होते. एलोपॅथीला त्यांनी मूर्ख विज्ञान असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करायची मागणीही झाली. इंडियन मेडिकल असोसिएशननंही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यामुळे आयुर्वेद की एलोपॅथी ही चर्चा बराच काळ होत राहिली.

याच आयुर्वेद आणि एलोपॅथी यांच्यात समन्वय साधत आयुर्वेदाला जागतिक पातळीवर पोचवलं ते डॉ. पीके वॉरियर यांनी. वयाची शंभरी गाठलेल्या वॉरियर यांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालंय. केरळ राज्याला आयुर्वेदाची मोठी परंपरा आहे. ती परंपरा आणि आयुर्वेदाचा घरून मिळालेला वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला.

राजकीय नेत्यांपासून ते अगदी सर्वसामान्य, अनाथ अशी प्रत्येक व्यक्ती त्यांच्यापर्यंत सहज पोचू शकायची. उपचारांकडे त्यांनी व्यवसाय म्हणून बघितलं नाही. त्यामुळेच त्यांच्यातली माणुसकी शेवटपर्यंत जिवंत राहिली.

कमी वयात संस्थेची जबाबदारी

डॉ. पीके वॉरियर यांचा जन्म ५ जून १९२१ ला केरळमधल्या मलपूरम जिल्ह्यातल्या कोट्टकम इथं झाला. पन्नीमपिल्ली कृष्णा वॉरियर असं त्यांचं नाव. आपल्या सहा भावंडांमधे ते सगळ्यात लहान. कोट्टकम आणि कोझीकोडे इथून त्यांनी सुरवातीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कोट्टकम इथल्याच आर्य वैद्य पाठशाळेतून आयुर्वेदाचं शिक्षण घेतलं. त्यात पदवी मिळवली.

महात्मा गांधींजींच्या भारत छोडो आंदोलनाने ते प्रभावित झाले होते. त्यात सहभागी होण्यासाठी म्हणून त्यांनी घर सोडलं होतं. कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. कवयित्री आणि लेखिका असलेल्या माधवकुट्टी के. वॉरियर यांच्याशी त्यांनी लग्न केलं.

१९५४ मधे कोट्टकममधल्या आर्य वैद्य पाठशाळेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. डॉक्टर म्हणून उत्तम प्रकारची भूमिका त्यांनी निभावलीच पण त्याचसोबत संस्थेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संस्थेला नवी उभारी दिली.

हेही वाचा: या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय

आयुर्वेदाच्या समृद्ध परंपरेचा वारसदार

केरळ आयुर्वेदाचे ब्रँड बनलेल्या डॉ. पीके वॉरियर यांना त्यांचे काका वैद्यरत्न पी. एस. वॉरियर यांच्याकडून आयुर्वेदाचा वारसा मिळाला. तेही आयुर्वेदाचार्य म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या हयातीत आयुर्वेद उपचार पद्धतीला वैज्ञानिक, आधुनिकतेची जोड दिली. त्यांचा जन्म १८६९ चा. पूर्ण कुटुंब संगीत, चित्रकला, संस्कृत साहित्याची ओढ असलेलं.

पी. एस. वॉरियर यांनी २० व्या वर्षी आयुर्वेदाचं शिक्षण घेतलं. कोट्टकम इथं एक छोटंसं हॉस्पिटल थाटलं. त्याच हॉस्पिटलमधे त्यांनी डॉ. वर्गीस नावाच्या डॉक्टरकडून एलोपॅथी उपचार पद्धत शिकून घेतली. केवळ पारंपरिक वैद्य पद्धतीत ते अडकले नाहीत. तर त्यांनी आयुर्वेदिक उपचार आणि औषधांना वैज्ञानिक जोड दिली. त्याचाच भाग म्हणून १९०२ मधे कोट्टकम इथं आयुर्वेदिक औषधं बनवण्यासाठी आर्य वैद्य शाळेची स्थापना केली. आयुर्वेदातला हा एक महत्वाचा टप्पा होता.

आयुर्वेद आणि एलोपॅथी या दोन उपचारपद्धतीत समन्वय साधायचा प्रयत्न त्यांनी केला. त्याला एलोपॅथीशी जोडलं. आयुर्वेदिक शिक्षणासाठी म्हणून त्यांनी १९१७ ला आयुर्वेद पाठ शाळेची स्थापना केली. तिथं वेगवेगळ्या जाती, धर्मातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. आयुर्वेदाला वैज्ञानिक दृष्टीकोन देण्यासाठी म्हणून धन्वंतरी नावाचं मॅगझीनही काढलं. त्यासोबत गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्कॉलरशिप सुरू केल्या.

१९३२ ला आर्य वैद्य शाळेच्या परिसरात एक मंदिर उभारलं. हा काळ सामाजिक घुसळणीचा होता. अशावेळी अनिष्ट सामाजिक प्रथा परंपरांना नकार देत सगळ्याच जाती, धर्मातल्या लोकांसाठी त्यांनी हे मंदिर खुलं केलं. तोच धागा पुढं घेऊन जाण्याचं काम डॉ. पीके वॉरियर यांनी केलं.

आधुनिक काळाशी जोडण्याचं श्रेय

आज आर्य वैद्य पाठशाळा भारतातलं एक महत्वाचं आयुर्वेदिक उपचार आणि संशोधन केंद्र म्हणून उभं राहिलंय. आयुर्वेदासंबंधीच्या संशोधनासाठी म्हणून ही संस्था जगभर नावाजली जातेय. त्याला वैज्ञानिक आणि आधुनिक रूप देण्याचं काम या संस्थेनं आणि पी. एस. वॉरियर यांच्यानंतर पीके वॉरियर यांनी केलंय.

कोट्टकममधली ही संस्था पेशंट, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं केंद्र बनलंय. पेशंटवरचे उपचार हे इथं प्राथमिक कर्तव्य मानलं जातं. तिथं मोफत आरोग्यविषयक सल्ले दिले जातात. भारतभर या संस्थेची २२ आयुर्वेदिक केंद्र आहेत. ८ लाखापेक्षा अधिक लोकांवर इथं दरवर्षी उपचार केले जात असल्याची माहिती संस्थेच्या वेबसाईटवर वाचायला मिळते.

डॉ. पीके वॉरियर यांनी काळाप्रमाणे बदलत आयुर्वेदाला आधुनिक रूप दिलं. वैज्ञानिक पद्धतीने त्याचा अभ्यास केला. आजूबाजूच्या बदलत्या जगाचा अंदाज घेऊन त्यांनी तसे बदल आपल्या उपचारपद्धतीतही केले. त्यामुळेच सार्वजनिक आरोग्यातला विसाव्या शतकातला महत्त्वाचा टप्पा असलेल्या अल्मा अता जाहीरनाम्याचं त्यांनी जोरदार समर्थन ते करू शकले. त्यादिशेनं पुढे प्रत्यक्ष पावलंही टाकली.

हेही वाचा: गीतांजली राव : वयापेक्षा जास्त शोध लावणारी ‘किड ऑफ द इयर’

आयुर्वेद आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवलं

आर्य वैद्य पाठशाळा वैद्यरत्न पी. एस. वॉरियर आयुर्वेद कॉलेज झालं. या कॉलेजमधे वैज्ञानिक प्रगती आणि तंत्रज्ञानातल्या नवीन संकल्पना रुजवल्या गेल्या. त्यातूनच इथली उत्पादनं त्याच्या चाचण्या करण्यासाठी म्हणून प्रयोगशाळा उभी राहिली.  वनस्पतींच्या दुर्मिळ प्रजाती तसंच कॅन्सरच्या वेदना कमी करण्यासाठी टाटा सारख्या जगप्रसिद्ध संस्थासोबत औषधांचं संशोधन सुरू झालं. संशोधनासाठी म्हणून भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने त्यासाठी मान्यता दिली.

१९९६ मधे पीके वॉरियरना रशियन मेडिकल असोसिएशननं एका आयुर्वेदिक सेमिनारचं निमंत्रण दिलं. तसंच १९९८ ला त्यांना न्यूयॉर्कमधल्या दोन दिवसीय आयुर्वेद परिषदेत उपस्थित रहायची संधी मिळाली. तिथं त्यांनी '२१ व्या शतकातलं आयुर्वेद - आरोग्याचं प्रतिमान' या विषयावर मांडणी केली. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अधिकाऱ्यांसमोरही त्यांनी भाषण दिलं. त्यामुळे आयुर्वेद आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलं.

आयुर्वेदाच्या व्यापारीकरणाला त्यांनी कायम विरोध केला. कुणाशीही तडजोड केली नाही. वेगवेगळ्या सामाजिक चळवळींशीही जोडून घेतलं. त्यामुळेच त्यांच्यातली विचारी व्यक्ती कायम जिवंत राहिली. कोट्टकममधल्या हॉस्पिटलमधे जगभरातून पेशंट येतात. त्यांची आपुलकीने चौकशी केली जाते.

वैद्यकीय साहित्याला नवी ओळख

'भारतीय औषधी झाडांच्या ५०० जाती' या विषयावर त्यांनी ५ खंड लिहिले. आयुर्वेदातलं वैज्ञानिक संशोधन आणि या विषयातल्या त्यांच्या अभ्यासामुळे त्यांना केरळमधल्या जगप्रसिद्ध कालीकट युनिवर्सिटीनं डी.लिट दिली. त्याच युनिवर्सिटीमधे विभागप्रमुख म्हणून त्यांनी आयुर्वेदाला सगळीकडे पोचवायचं काम केलं.

पीके वॉरियर यांनी केलेली भाषणं, लिखाण हे समकालीन वैद्यकीय साहित्याला नवी ओळख देणारं ठरलं. त्यांच्या भाषणांचा संग्रह असलेलं 'पदमुद्रकल' या नावानं मल्याळममधे एक पुस्तकही आलं. कॉलेज, युनिवर्सिटीमधल्या आयुर्वेदिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडेही त्यांनी लक्ष दिलं. त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरले. त्यामुळेच आर्य वैद्य शाळा हे विज्ञानातलं आणि पीके वॉरियर आयुर्वेदातलं एक महत्वाचं नाव बनलं.

१९८१ आणि २००३ मधे त्यांनी अखिल भारतीय आयुर्वेद काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं. २००८ ला स्मृतीपर्व नावाच्या आत्मकथेसाठी म्हणून त्यांना केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. पुढे प्रतिष्ठित धन्वंतरी पुरस्कारही मिळाला. तसंच आयुर्वेदातल्या योगदानासाठी म्हणून भारत सरकारने त्यांना १९९९ ला पद्मश्री आणि २०१० ला पद्मभूषण दिला.

हेही वाचा: 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

बाळासाठी सुरक्षित असेल का कोरोनाग्रस्त आईचं दुध?

आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?

ताप मोजणाऱ्या बंदुकीनं कोरोना वायरसवर अचूक निशाणा साधता येईल?