महाराष्ट्राला सेक्स शिकवणाऱ्या पुस्तकाची गोष्ट

०२ मार्च २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


महाराष्ट्राला, मराठी माणसाला निरामय कामजीवनाची गुरुकिल्ली सांगणाऱ्या डॉ. विठ्ठल प्रभू यांचं बुधवारी २७ फेब्रुवारीला मुंबईत निधन झालं. कामजीवनावरची त्यांची पुस्तकं शास्त्रीय आधारावर होती. त्यामुळे ती अधिक विश्वासार्ह ठरली. त्यांचं निरामय कामजीवन हे पुस्तक तर अजूनही टॉपटेन बुक्सच्या यादीत असतं. पण हे पुस्तक काही सहजासहजी आपल्यापर्यंत आलं नाही. या पुस्तकाचाही मोठा प्रवास आहे.

डॉ. विठ्ठल प्रभू यांचा वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. त्यांनी लिहिलेली  ‘निरामय कामजीवन’, ‘यौवन ते विवाह ’, ‘तारुण्याच्या उंबरठ्यावर ’ आणि अन्य पुस्तक प्रसिद्ध झाली. ‘निरामय कामजीवन ’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८२ मधे आली. कामजीवनावर चाळीसेक वर्षांपूर्वी आलेलं हे पुस्तक किती कंटेम्पररी आहे, हे त्याच्या आतापर्यंत निघालेल्या ३४ आवृत्त्यांवरून अधोरेखित होतंय. 

लैंगिकता, शिक्षण, आरोग्य या विषयांवर त्यांनी जवळपास ३५ पुस्तकं लिहिली असून ती सगळ्यांनीच आवर्जून वाचावीत अशी आहेत. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार देऊन गौरवलंय. ‘गोष्ट एका डॉक्टरची’ या आत्मचरित्रात त्यांनी आपला वैद्यकीय क्षेत्रातला प्रवास मांडलाय. मॅजेस्टिक प्रकाशनाने काढलेल्या ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकाचा प्रवासही त्यांनी त्यात उलगडलाय. त्यांच्या आत्मचरित्रातला हा संपादित अंश.


गिरिजा कीर ‘ अनुराधा‘ मासिकाच्या संपादक होत्या तेव्हाची गोष्ट. एकदा त्या म्हणाल्या की डॉक्टर, वैद्यकीय विषयावर दर महिन्याला एक लेख लिहा. आम्ही तो अनुराधात छापू. त्यानंतर दर महिन्याला माझा एक लेख अनुराधा मासिकातून प्रकाशित होऊ लागला. वीस-तीस लेख झाल्यावर ते पुस्तक रुपाने प्रकाशित करण्याची हौस सुचली, पण प्रकाशक कोण गाठायचा, हा प्रश्न होताच.

अखेर भाच्यालाच जावई करावं, तसं ‘अनुराधा’चे संस्थापक ब्रम्हानंद नाडकर्णी यांनाच पुस्तक प्रकाशनाची गळ घातली. ते कबूलही झाले. ही आनंदाची बातमी कळवावी म्हणून मी जवळच राहणारे जयवंत दळवी यांच्या घरी गेलो. दळवी म्हणाले, ‘नाडकर्णी तुमचं पुस्तक छापतील खरं, पण त्यांच्याकडून वितरण होईल असं वाटत नाही. तुमचे लेख मी वाचलेत. बरे आहेत. मी केशवराव कोठावळेंना विचारुन पाहतो.’ संध्याकाळी आम्ही ‘प्रसाद चेंबर्स’ला गेलो. दळवींचा शब्द कोठावळे नाकारणं शक्य नव्हतं. पुस्तकाचं नाव ठेवलं, ‘आरोग्य: समज आणि गैरसमज’.

एका बातमीने हादरवलं

त्यानंतर एक वर्ष निघून गेलं. कोठावळेंकडून तोपर्यंत काहीच हालचाल झालेली नव्हती. पण मध्यंतरी एक विस्मयकारक घटना घडल्याचं कानावर आलं. एका ‘तो’ आणि ’ती’चं लग्न झालं. लग्नाची पहिली रात्र म्हणजे स्मरणीय आणि संवेदनशील घटना. तिच्या मैत्रिणींनी तिची थट्टामस्करी करीत शयनगृहात बोळवण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला चिडवायला गेल्या. तर शयनगृहाचं दार सताड उघडं! नवरा मुलगा डाराडूर झोपलेला आणि नवऱ्या मुलीचा तर पत्ताच नाही! शोधा शोध सुरू झाली.

शोधता शोधता न्हाणीघरात मंडळी पोचली. तिथे पाहतात तर काय! आढ्याला बांधलेल्या दोरखंडाला तिचं प्रेत लोंबकळत होतं. बाजूला एक चिठ्ठी. ‘माझ्यावर बलात्कार झाला. माझी अब्रू गेल्यावर आता जगण्यात काय अर्थ?’ ही बातमी ऐकल्यावर मी सुन्न झालो. हा अज्ञानाचा बळी होता.

विवाहानंतरचा स्त्रीपुरूषाचा शरीरसंबंध समाजमान्य, कायदेशीर, स्वाभाविक आणि पालकत्वासाठी अटळ असूनही तिला तो बलात्कार वाटला. नीतीची, अब्रूची जाण तिच्यात निर्माण झाली होती हे खरंच. पण विवाहानंतर काय काय घडतं याविषयी तिला काहीच माहीत नव्हतं. कुणीतरी विशेषत: तिच्या आईने हे तिला सांगणं आवश्यक होतं. कदाचित हे तिला आपोआप कळेल असंही आईला वाटलं असावं. एकूण परिणाम काय तर नाहक आत्महत्या. तिला आधी कुणी ही माहिती दिली असती, तर कदाचित तिचा मृत्यू टळला असता.

शेवटी लैंगिकतेवर लिहायचं पक्क

त्या दिवशी मी अस्वस्थ होतो. वाटलं या विषयावर आपण का लिहू नये? लगेच दुसरा विचार आला, लोक काय म्हणतील? केवळ आंबट शौकिनांसाठी लिहीत असल्याचा गैरसमज होईल. र. धों. कर्वे यांनी लैंगिक विषयावर लिहिलं तर त्यांची निंदानालस्ती झाली. रधोंचं धैर्य आपल्यात नाही. वाटलं हा विचार सोडून देऊया. पुन्हा वाटलं, अन्नाची भूक तशी कामजीवनाची भूक लागते.

दोन्हीही शारीरिक गरजा. पण अन्नाविषयी उघडपणं बोललं जातं तसं कामजीवनाविषयी का नाही? कामजीवनासंबंधी आजवरची पुस्तकं ही रंगत वाढवणारी आहेत. कामविज्ञानाची माहिती देणारी पुस्तकं अजिबात आढळत नाहीत. अखेर आपली भूमिका ठाम असावी, असा निश्चय करून लैंगिक शास्त्रावर लिहायचं नक्की केलं.

कामजीवनावरची पुस्तकं इंग्रजीतच

आता प्रश्न होता अभ्यास करण्याचा. त्यासाठी पुस्तकं हवी होती. १९४८ ते १९७० या काळात महत्त्वाचं संशोधन झालं होतं. किन्सेने बारा हजार पुरुष आणि आठ हजार स्त्रिया यांच्या कामवर्तनाचा अभ्यास करुन सांख्यिकीय सिद्धांत मांडले. मास्टर्स आणि जॉन्सन यांनी स्त्री-पुरुषांच्या कामप्रतिसादाचे प्रायोगिक पुरावे दिले. जॉन मनीने काम विकासाचा मार्ग दाखवला. हेलन सिंग कॅप्लानने काम समस्यांची उपचार पद्धती सांगितली होती. हे सर्व संशोधन अमेरिकेत झालं, तेही इंग्रजी भाषेत. तोपर्यंत हे ग्रंथ भारतात कुठे उपलब्ध आहेत हे माहीत नव्हतं.

डॉ. वसंत शेणई या मित्राचा मला फोन आला. ‘मॅकमिलन कंपनीचं ऑफिस दारुखाना इथे आहे. त्यांच्याकडे ‘सेक्स’ या विषयावर पुस्तकं पडून आहेत आणि ती विकली गेली नसल्यामुळे पाव किमतीला देऊन टाकणार आहेत.’ दारुखाना मुंबईतला प्रसिद्ध भाग नाही. पण शोधत शोधत गेलो. अलिबाबाच्या गुहेत शिरल्यावर जितका आनंद वाटला असता तितका तो मला त्या क्षणी वाटला.

किन्से, मास्टर्स आणि जॉन्सन, बर्ट आणि मीक्स, स्मिथ वगैरे प्रख्यात लेखकांची पुस्तकं अवघ्या तीनशे एकोणसाठ रुपये तीस पैसे किमतीत मिळाली. ‘फॅमिली प्लानिंग असोशिएशन’चे वैद्यकीय सल्लागार डॉ. महिंदर वात्सा एकेकाळी माझे शिक्षक होते. मला पुस्तकांची गरज आहे कळल्यावर त्यांनी त्यांच्या संस्थेत असलेली पुस्तकं वापरण्याची परवाणगी उदार मनानं दिली.

मॅकरी, कचरडोरियन, ऑस्टीन, कंफर्ट अशी अनेक पुस्तकं मला वाचायला मिळाली. जवळपास वर्षभर माझा अभ्यास चालला. विषय आवाक्यात येत नव्हता. सागरात गटांगळ्या खाव्यात तसं माझं झालं.

मराठीतल्या पुस्तकांचा शोध

अशावेळी मुंबईच्या नायगाव शाखेची ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ ही संस्था मदतीला आली. र.धों. कर्वे यांची पुस्तकं वाचली. के. पी. भागवत यांचं ‘वैवाहिक जीवन’ हेही पुस्तकं वाचलं. मराठीत वैज्ञानिक विषयांवर लिहिताना होणारी पारिभाषिक शब्दांसाठीची दमछाक बरीचशी संपली. पुस्तकात कोणती प्रकरणं लिहिणं गरजेचं आहे याचीही समज या पुस्तकांमुळे आली. तरीही इंग्रजी वैज्ञानिक शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचत नसल्यानं क्षणाक्षणाला अडचण आली. ही अडचण सुटण्यासाठी आणखी एक घटना घडली.

‘स्त्रीहितकारिणी’ या संस्थेच्या डॉ. इंदूताई परीख यांनी दाते-कर्वे यांचा ‘शास्त्रीय परिभाषा कोश’ हा पारिभाषिक शब्दांचा दुर्मिळ कोश माझ्याकडे पाठवला. आणखी एक योगायोग घडला. भारत सरकारच्या शिक्षण खात्याने वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दांचा एक शब्दकोश तयार केल्याचं कळलं होतं. माझे स्नेही डॉ. एस. पी. किंजवडेकर कामानिमित्त दिल्लीला जाणार होते. त्यांनी मला तिथून तो ‘बृहत् पारिभाषिक शब्दसंग्रह’ आणून दिला. सातशे पानांचा तो एक खजिना होता.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात एक महत्वाचं पुस्तकं हातात आलं. बाळाचार्य खुपेकरांनी लिहिलेलं ‘श्री वात्सायन मुनिप्रणीतं कामसूत्रम्’. कामसूत्र म्हणजे कामवासना चाळवणारा प्राचीन ग्रंथ अशी माझी समजूत रिचर्ड बर्टननं केलेलं रूपांतर वाचून झालेली होती. पण तसं नाही याची जाणीव बाळाचार्य खुपेकरांचा ग्रंथ वाचल्यावर झाली.

प्रकाशकांच्या शोधात

सामग्री तयार झाली आणि लेखनालाही सुरवात झाली. १९८० चा एप्रिल महिना. कागदावर मथळा लिहिला. सेक्स टॉनिक. सहज समोरच्या कॅलेंडरवर लक्ष गेलं. तो दिवस पाहिला. त्या दिवशी हनुमान जयंती. ब्रम्हचाऱ्याच्या जयंतीला ‘सेक्स टॉनिक’पासून सुरवात.

पुस्तकं मनासारखं लिहून झालं खरं, पण प्रकाशित करण्याचा धीर होईना. लोक काय म्हणतील ही भीती होती. अश्लीलतेचा खटला भरला जाईल, ही भीतीही होतीच. ग. र. मुळे यांच्या ‘अनंतरंग रतिशास्त्र’ या पुस्तकावर खटला भरला होता. पुन्हा काही लेखकांची मतं आजमावण्यासाठी कवी प्रफुल्लदत्तांसह गेलो. एक लेखक म्हणाले, ‘दादरला कबूतरखान्याजवळ एक प्रकाशक आहेत. त्यांच्याशिवाय इतर कुणी प्रकाशक तुमचं पुस्तकं प्रकाशित करणार नाही.’

लेखनाला कोठावळे बंधूंची साथ

प्रा. वि. ह. कुळकर्णींनी आपल्या सुनेच्या उपस्थितीत पुस्तकातील उतारे धडाधड वाचून दाखवले आणि म्हणाले पुस्तकं खुप माहितीपूर्ण आहे. जरूर छापा. पुढे विजय तेंडूलकरांकडे आम्ही गेलो. ते म्हणाले, ‘पुस्तकं छापल्यावर ते तुमचं राहत नाही. काय टीका होईल ते सांगता येत नाही. मात्र इतकं खरं की, तुमचं पुस्तकं लोक वर्तमानपत्रात गुंडाळून नेतील’. त्यांनी सांगितलं ते त्या काळानूसार खरं होत, म्हणून पटलंही.

एका नव्या लेखकाने लिहिलेला आडवाटेवरचा विषय आणि त्याच पुस्तकासाठी इतका पैसा गुंतवण्याचा निर्णय केशवराव कोठावळे आणि तुकारामशेठ कोठावळे यांनी घेतला. गुढीपाडवा, मार्च १९८२ ला ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकाची पाच हजार पुस्तकांची पहिली आवृत्ती बाजारात आली. पानं १९२ आणि किंमत तीस रूपये. सवलतीत पंचवीस रुपये.

पुस्तकावर अनपेक्षितपणे चर्चा होत राहिली

वर्तमानपत्रातून पहिला अभिप्राय आला तो जयवंत दळवींचा. दळवींच्या नाटकांना सेक्सचा आवर्जून स्पर्श असला तरी मासे खाण्यापलीकडं त्यांना इतर कोणत्याही विषयात इंटरेस्ट नव्हता याची मला खात्री होती. केवळ माझ्यावरील स्नेहापोटी आणि ही शास्त्रीय माहिती लोकांपर्यत पोचावी यासाठी त्यांनी हा अभिप्राय लिहिला. त्यानंतर अनेक वर्तमानपत्रं आणि मासिकांतून अनुकूल समीक्षणं आली. पाच हजार पुस्तकांची आवृत्ती पहिल्या सहा महिण्यात संपली. दुसरी आवृत्ती दहा हजारांची छापली. मी तर गांगरूनचं गेलो.

माझं लेखनकौशल्य हे कारण नसून समाजाची गरज हे कारण आहे याची मला जाणीव होती. कोठावळे खूश होते. पण चेहऱ्यावर तसं दाखवत नसत. दर आठवड्याला रविवारच्या अंकात भली मोठी जाहिरात यायची. पुस्तकाच्या यशाला जयवंत दळवी आणि केशवराव कोठावळे हेच कारणीभूत होते.

समजदारीच्या कक्षा रुंदावल्या

लैंगिक विषयासंबंधी गैरसमजांचं मोहोळ आहे. कारण याविषयी बोललं जात नाही. निसर्ग आपली कामगिरी चोख रीतीने करतो पण त्याचा हेतू व्यक्त होत नाही. माझ्याही मनातील गैरसमज या पुस्तकामुळे दूर झाले. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. मॅजेस्टिक गप्पांमधे दोन-तीन वेळा कामजीवन या विषयावर चर्चा झाल्या.

काळानुरूप विचारात फरक पडतो. सुरवातीला शांताबाई किर्लोस्कर किंवा सुहासिनी मुळगावकर यासारख्या एखाददुसऱ्या महिला हे पुस्तकं वाचल्याचं धीटपने सांगायच्या. आता पुस्तकं विक्रेते सांगतात, ‘निरामय कामजीवन महिलाही उघडपणे विचारतात आणि न संकोचता विकत घेतात.’ काळाचा हा महिमा असा आहे.

कौतुक किंवा टीकेचा भाग महत्त्वाचा नाही. पण जमेची बाजू म्हणजे कामजीवनाच्या समजदारीच्या कक्षा रुंदावल्या याचा मला अधिक आनंद आहे.

लैंगिकता हा विषय आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाला कसा व्यापून राहिलाय हे जाणण्यासारखं आहे. वंध्यत्व असल्यास केवळ स्त्रीला दोष देणं, लागोपाठ मुली झाल्यास पत्नीला जबाबदार धरणं, प्रेम समजून आकर्षणाला बळी पडणं, मासिक पाळीत स्त्री अपवित्र होते हे समजून देवळात न जाणं त्यासाठी गोळ्या घेणं, पोर्नोग्राफी पाहून फाजील अपेक्षा बाळगणं, पत्रिका पाहून जोडीदार निवडणं, सेक्स टॉनिक घेणं, वैदूच्या जाळ्यात सापडणं, रक्तगट विसंगतीला अवास्तव महत्व देणं, मुलगा व्हावा म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ, गोपालविधी करणं अशा कितीतरी समस्या आहेत.

सामाजिक आशयासहित लैंगिकता शिक्षण दिलं नाही तर ते उपयोगाचं नाही. सामाजिक बदल आणि वर्तनात बदल घडवून आणणं हा अशा शिक्षणाचा गाभा आहे.

तर बाईला पुरुषाची गरजही लागणार नाही

पुरुषाच्या मनातली स्त्री आणि वास्तवातली स्त्री यात फरक आहे. स्त्रीचं शरीर, मन, संप्रेरकं यांचा साकल्यानं विचार केल्यास ती माता अधिक आणि पत्नी कमी असते. कामजीवन हा विषय पुरुषांसाठी सुखाचा आणि स्त्रीसाठी शोषणाचा ठरतो. तसं न होता दोघांच्याही सुखासाठी व्हावा. जो नवरा एका शुक्राणूपलीकडे तिला काहीएक देत नाही, केवळ कामसुख ओरबडण्यासाठी जवळ घेतो, तो ती कशी स्विकारेल? गरज वाटल्यास शुक्राणूपेढीतून ती शुक्राणू आणून माता बनेल. तिला पुरुषाची गरज भासणार नाही. या शतकात असं घडलं तर आश्चर्य वाटू नये.

‘टेस्ट ट्यूब बेबी’त एकाचा शुक्राणू, दुसरीचं स्त्रीबीज, तिसरीचा गर्भाशय वापरल्यामूळे यात खरी आई कोण हा गोंधळ निर्माण होईल. एक बाप आणि दोन आया असलेलं मूलं मानलं जाईल की कसं, ते कायदा ठरवेल. एक प्रश्न मला विचारला जातो, ‘निरामय कामजीवन’नं तुम्हाला काय दिलं? या पुस्तकानं मला प्रसिद्धी दिली, ज्ञानं दिलं, शिवाय सर्वोत्तम असा आनंद दिला. अज्ञान दूर झाल्यामुळे काहींना आत्मविश्वास प्राप्त झाला.

हा लेख लिहीत होतो. त्या वेळी सांगलीतल्या विटामधून एक फोन आला. ‘तुमच्यामुळे मी वाचलो. मी आत्महत्या करणार होतो. पण तुमचं पुस्तक वाचलं. माझे गैरसमज दूर झाले. आता मी लग्नासाठी मुलगी शोधतोय. धन्यवाद देण्यासाठी म्हणून हा फोन.’ अशा आनंदापलीकडे माणसाला जीवनात काय हवं असतं?