आज ११ एप्रिल, यशवंत सुमंत यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. प्रा. सुमंतांचं व्यक्तिमत्त्व बहुतांशी प्रा.राम बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे होते. सुमंतसर मॉडर्नमधे असल्यापासूनच मला तसे जाणवत होते. बापट सरांप्रमाणेच सुमंतसरांना संगीत, समांतर नाट्यचळवळ आणि साहित्याच्या इतर प्रकारांतही रुची होती. पण कामाच्या व्यापामुळे त्यांना या रुचींसाठी फुरसतीचे क्षणच मिळू शकले नाहीत.
प्रा. डॉ. यशवंत सुमंत आणि प्रा. सुहास पळशीकर हे पुणे विद्यापीठाच्या आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात एम.ए.चे विद्यार्थी होते. पुण्याच्या दोन कॉलेजमधे राज्यशास्त्राचे व्याख्याते म्हणून काही वर्षे काम केल्यावर दोघंही प्राध्यापक म्हणून विद्यापीठाच्या त्याच विभागात एम.ए.च्या विद्यार्थ्यांना शिकवू लागले. पुढे ते याच विभागाचे प्रमुख बनले. अगोदर प्रा. सुमंत आणि ते गेल्यावर प्रा. पळशीकर.
विद्यार्थिदशेपासून अखेरपर्यंत दोघंही घनिष्ठ सहकारी, मित्र आणि परस्परांचे वैचारिक-सहभागीदार. दोघांच्या १९७१-७६ या विद्यार्जनकाळात मी या विभागात संशोधक- सहायक म्हणून होतो. त्या दोघांचा ‘विद्यार्थी’ म्हणून विभागातला वावर, प्राध्यापकवर्गाबरोबरची मनमोकळी चर्चा, जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती, प्रा. व. मं. सिरसीकर, प्रा. राम बापट, डॉ. तवले, प्रा. क्षिरे, प्रा. लिमये, डॉ. ना. रा. इनामदार यांचं त्यांना मिळणारं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन, आमच्याशीही विनम्रतेची वागणूक आणि चर्चा हे सारं मला जवळून न्याहाळता आलं.
महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला महाराष्ट्राच्या विद्यापीठांमधील राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी विधिमंडळ कार्याची माहिती, प्रत्यक्ष कामकाजाचं दर्शन, विविध तज्ज्ञांची व्याख्याने आणि त्यानंतर प्रश्नोत्तररूपी चर्चा अशा अभ्यासवर्गाला दर वर्षीप्रमाणे आमच्या चार विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक म्हणून मी १९७३ ते ७५ या दोन वर्षांत गेलो होतो. पहिल्या वर्षाच्या तुकडीत दोन विद्यार्थिनी आणि रंजन मथाई या विद्यार्थ्यांबरोबर यशवंत सुमंतही होते.
प्रा. ग. प्र. प्रधान हे परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि या अभ्यासवर्गाचे एक सूत्रधारही होते. व्याख्यानांतून तसंच विविध पक्षांच्या आमदारांशी झालेल्या प्रश्नोत्तरांमधून सुमतांनी घेतलेला सहभाग लक्षणीय होता. त्यांचे प्रश्न आणि शंका मूलभूत स्वरूपाच्या होत्या. इतर सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींमधे सुमंत हे लक्षणीय सहभागी ठरून बहुतेक प्राध्यापकांनी त्यांचं उत्स्फूर्त कौतुक केल्याचं आठवतं. तेव्हाच मला वाटलं होतं की, हा असाधारण विद्यार्थी पुढे नामवंत होईल.
सुमंत-पळशीकरांची एम.ए.ची अंतिम परीक्षा जवळ आली असताना मी एक दिवस त्यांच्या अभ्यासाबद्दल चौकशी केली. ‘उत्तरं लिहिताना तुमची कोणती पद्धत?’ असं मी विचारल्यावर, ‘प्रश्नांच्या अनुरोधाने सविस्तर लिहिणार, हे योग्य आहे का?’ असं त्यांनी मला विचारलं. ‘ठीक आहे, पण उत्तराचं स्वरूप निबंधात्मक व्हावं’ असं म्हणताच ‘सर, आम्हाला सविस्तरपणे सांगा-’ म्हणून त्यांनी आग्रह केला.
चहाच्या सुट्टीत जवळच्या कँटीनमधे कोपऱ्यातल्या टेबलापाशी बसून दोघांना सविस्तर मार्गदर्शक सूचना केल्या. त्यांना त्या वेळी केलेल्या सूचना इथंही सांगणं आमच्या पदव्युत्तर परीक्षेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, म्हणून त्यांचा उल्लेख करणं योग्य ठरेल असं वाटतं.
मी दोघांना सांगितलं होतं, ‘निबंधात्मक उत्तर लिहिण्यामुळे परीक्षकांच्या सर्व अपेक्षा पुऱ्या करता येऊन उत्तर उत्कृष्ट होतं. अर्थात, विषयाची तुमची समज आणि क्रमिक अभ्यासक्रमाचा तुमचा अभ्यास परिपूर्ण झालाय, हे गृहीत धरलेलं आहे. प्रत्येक उत्तराची सुरवात ‘प्रास्ताविक’ परिच्छेदानं करून प्रश्नाचा आशय तीन-चार वाक्यात द्यावा. दुसऱ्या परिच्छेदापासून उत्तराचे मुद्दे त्यांच्या महत्त्वाच्या क्रमानुसार द्यायचे. ते देताना क्रमिक पुस्तकांमधील तज्ज्ञांनी दिलेली मते, स्पष्टीकरणे अथवा टीका हे सर्व त्यांची नावं देऊन थोडक्यात द्यावं.’
‘पुस्तकांमधील तसंच आपल्या प्राध्यापकांनी दिलेली उदाहरणं या स्पष्टीकरणामधेच द्यावीत. सर्व मुद्दे वेगवेगळ्या परिच्छेदांत लिहून झाल्यावर शेवटून अलीकडच्या परिच्छेदात सद्य:स्थितीतील प्रश्न-विषयाचं महत्त्व द्यावं. शेवटच्या परिच्छेदात विद्यार्थ्याने/विद्यार्थिनीने स्वत:चं मूल्यमापन थोडक्यात द्यावं.’ अशा प्रकारे उत्तरं लिहून झाल्यावर मिळालेले गुण मला जरूर सांगा, असं सुचवल्यावर दोघांनीही मनापासून आभार मानले, तेव्हा त्यांच्या नजरेत उमेद प्रतिबिंबित झाली होती.
हेही वाचाः महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
विद्यापीठात संशोधन-सहायकाच्या जागा संशोधन प्रकल्पासाठी पाच वर्षांपुरत्या, ठराविक रकमेच्या, अनुदानरूपी पगाराच्या म्हणजेच पगार आणि स्केल नसलेल्या असत. प्रकल्प पुढे चालू राहिल्यास या जागाही पुढे चालू राहत. मात्र १९७५-७६ मधे सर्वच विषयांतील प्रकल्प अनिश्चित काळासाठी तहकूब केल्यामुळे पुणे विद्यापीठातल्या आम्हा सर्व ८१ सहायकांना महाविद्यालयात व्याख्यात्यांच्या जागांसाठी प्रयत्न करावे लागले.
विभागप्रमुख प्राध्यापक आणि महाविद्यालयातील विजिटिंग लेक्चरर्सनी आम्हाला मदत केल्याने, तसंच विद्यापीठात काम केलं असल्याने आणि बारावीची कनिष्ठ महाविद्यालये सुरू होत असल्याने कनिष्ठ आणि वरिष्ठ वर्गांसाठी अध्यापक म्हणून आमच्यापैकी बहुतेकांना या नोकऱ्या मिळाल्या. मलाही पुण्याच्या शिवाजीनगरमधील मॉडर्न महाविद्यालयात ‘अर्थशास्त्रा’चा व्याख्याता म्हणून सहजपणे निवडलं गेलं. कारण समाजशास्त्रातही मी एम.ए. केलं होतं. पुढे दोन-तीन वर्षांतच प्रा. सुमंत हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून मॉडर्नमधे रुजू झाले आणि मी आनंदून गेलो, आमच्या आवडत्या माजी विद्यार्थ्याच्या आगमनाने!
साऱ्या नवागत अध्यापक-प्राध्यापकांमधे सुमंतसर वेगळेपणामुळे उठून दिसायचे. स्मितहास्यपूर्ण चेहऱ्यावर शोभेलसा चष्मा नि दाढीही! देहबोलीतील सहजता, स्वभावातील ऋजुता नि शांत-हळुवारपणे सहाध्यापकांशी बोलताना जाणवणारी बुद्धीची चमक- या साऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व आम्हा सर्व सहकाऱ्यांना आवडे आणि याहीपेक्षा विद्यार्थ्यांना जास्त आवडे! तासावर जाताना विषयभागाचे मुद्दे लिहिलेला बापटसरांची आठवण करून देणारा चतकोर कागद हातात असायचाच! बोलताना हा भाग सोपा करून सांगतानाच चालू राजकीय-सामाजिक परिस्थितीतलं त्यांचं महत्त्व ते सांगत.
विविध राजकीय पक्ष आणि गटनेते, कार्यकर्ते, संघटना, शासनसंस्था यांचा सहभाग वा त्यांच्यामुळे होणारा सामाजिक परिणाम उदाहरणांसह स्पष्ट करायचे. त्यांचा तास औपचारिक, तंत्रबद्ध नसायचा; अनौपचारिक संवाद साधून, विद्यार्थ्यांच्या चौकसपणाला चालना देऊन, त्यांचं शंकानिरसन करून विषयात गोडी निर्माण करणारा असा त्यांचा प्रत्येक तास असायचा. मित्रत्वाच्या नात्याने वागणारे, बुद्धीला चालना देणारे, अवांतर वाचनासाठी नि समाजवास्तव जाणण्याची प्रेरणा देऊन विद्यार्थी-व्यक्तिमत्त्व विकासाला हातभार लावणारे आणि विद्यार्थिकेंद्रित अध्यापन करणारे सुमंतसर अल्पावधीतच विद्यार्थिप्रिय झाले.
इतके की, पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून पद घेतल्यावर निरोप देताना विद्यार्थी-विद्यार्थिनींना अश्रू आवरले नाहीत! मॉडर्नमधील त्यांचे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्याही मित्रमैत्रिणी विद्यापीठात त्यांचे पदव्युत्तर विद्यार्थी बनले. विशेष म्हणजे, यांपैकी काही जण परिवर्तन चळवळीतले कार्यकर्ते म्हणून पुढे आले.
हेही वाचाः साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
मॉडर्नमधील सेवाकाळात इतर विषयांबद्दलही औत्सुक्य आणि अभिज्ञता असणारे सुमंतसर आमचे विभागप्रमुख प्रा. मुकुंद महाजन, मानसशास्त्राच्या प्रा. वनारसे, इतिहासाचे प्रा. म. आ. कुलकर्णी, मराठीचे डॉ. भीमराव कुलकर्णी, प्रा. द. दि. पुंडे, प्रा. वि. भा. देशपांडे तर इंग्रजीचे प्रा. सीताराम रायकर यांच्याशी अनौपचारिक चर्चा करत. प्रा. पुंडे तर त्यांचे निकटचे स्नेही बनले. आंतरशाखीय ज्ञानाच्या आदान-प्रदानाची त्यांना वाटू लागलेली आवश्यकता अशा सहज संवादांमधून व्यक्त होई.
सुमंतसर कोथरूडला राहायला आल्यावर घरी येण्याचा मला आग्रह करायचे. ठरवलेल्या दिवशी त्यांच्याकडे गेलो असता दारातच थबकलो. डोळे मिटून, एकाग्रतेने, ते सतारीवर बोल उमटवत होते! त्या अवस्थेचा भंग होऊ नये म्हणून मी मांजरपावलानं आत येऊन खुर्चीवर बसलो आणि प्रा. राम बापट यांची आठवण झाली. तेही संगीतप्रेमी होते! थोड्याच वेळाने चहा घेताना सुमंतांनी माझ्या घरच्यांची चौकशी केली. पुढच्या बोलण्यात मीही त्यांच्या पीएच.डी.बद्दल विचारपूस केल्यावर, ‘कर्मवीर वि.रा.शिंदे यांच्या विचारकार्याचा अभ्यास करायचाय’ असं त्यांनी सांगितलं.
त्यांच्या विचारदिशेच्या दृष्टीने अगदी योग्य अशी अभ्यासव्यक्ती कर्मवीर शिंदे आहेत असं वाटल्यामुळे, ‘जरूर करा. मूलगामी विचार मांडण्याबरोबरच प्रत्यक्षात पीडितांसाठी ‘डिस्प्रेड क्लास मिशन’मधून फार मोठं कार्य करूनही महाराष्ट्रातल्या इतर विचारवंतांच्या तुलनेत उपेक्षित राहिलेल्या कर्मवीरांवर तुम्ही लिहायलाच हवं’ असं मी आग्रहपूर्वक म्हणालो. त्यावर स्मितहास्य करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान अजून आठवतं. नवविवाहित असताना सुमंतांनी पुन्हा एकदा घरी नेलं होतं. ‘सौ.’ची ओळख करून दिल्यावर, विचारपूस झाल्यावर माझ्या पीएच.डी. अभ्यासाबद्दल त्यांनी विचारलं.
त्यांना म्हटलं- आपल्याच विद्यापीठ विभागात असताना डॉ. तवलेंच्या मार्गदर्शनाखाली नाव नोंदवूनही विषय नक्की झाला नव्हता. पण आता ‘भारतातील दारिद्य्रा’वर राज्यशास्त्रीय चौकटीत, या आर्थिक संकल्पनेचा आणि सोडवणुकीचा ऊहापोह करताना त्याची सामाजिक- समाजशास्त्रीय चिकित्सा करावी, असं वाटतंय. मात्र पूर्वतयारी झाल्याशिवाय सरांना भेटता येणार नाही आणि हेच जमत नाहीय. सुमंतसरांनी या बोलण्यावर उत्साहित होऊन ‘सर, तुम्ही हे जमवाच. असा आंतरशाखीय अभ्यास भारताच्या वास्तवाच्या संदर्भात आवश्यकच आहे. या दृष्टीनेच मला तुमच्याकडून अर्थशास्त्राची ओळख करून घ्यायची आहे,’ असे ते म्हणाले. यासाठी आपण जरूर बसू; मात्र एका बैठकीत हे शक्य नाही; तीनचारदा तरी बसावं लागेल, असं सांगून दोघांना मन:पूर्वक शुभेच्छा देऊन मी निरोप घेतला.
त्यानंतर काही वर्षांनी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात बापटसरांबरोबर सुमंतसरांची भेट झाली आणि नंतर २०१३मधे कॉ. शरद पाटील यांच्या क्रांतिकारी चळवळीवरच्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं, तेव्हा प्रेक्षकांत असूनही नंतर भेटून बोलणं काही होऊ शकलं नाही. विद्यापीठ विभागात नंतर एकदा भेट झाल्यावर ‘आपल्याला बसायचं आहे, हे विसरलो नाही; सवड मिळताच तुम्हाला फोन करतो’, म्हणाले. काही दिवसांनी विभागात त्यांना मुद्दामहून भेटायला गेलो असता, ते कार्यकर्त्यांच्या अभ्यासवर्गासाठी पुण्याबाहेर गेल्याचं कळलं. नंतर त्यांचं आजारपण... आमचं हे ‘बसणं’ राहून गेलं ते गेलंच, याची फार खंत वाटते.
हेही वाचाः शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?
मॉडर्न महाविद्यालयातून विद्यापीठात प्राध्यापकपदी अध्यापन आणि विभागाच्या संशोधनात कार्य सुरू झाल्याने सुमंतांचे विचार आणि कार्यविश्व विस्तारत गेलं. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले आणि त्यांचे स्वत:चे पूर्वीचे जिज्ञासू विद्यार्थी आणि विभागातील नामवंत ज्येष्ठ प्राध्यापक- संशोधकांच्या वैचारिक सहवासामुळे त्यांचं वाचन, चिंतन आणि अध्यापनाची उंची वाढत गेली. त्यांनी राज्यशास्त्र विभागात सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांतून आंतरविद्याशाखीय आदान-प्रदान आणि समाजहितैषी अनुमानांवर भर देण्याचा प्रयत्न सहकाऱ्यांसह केला.
विशेषत: बहुआयामी विचारवंत प्रा. राम बापट जे त्यांचे विद्यार्थिदशेतले आवडते गुरू होते तसंच काटेकोर संशोधक आणि परखड विश्लेषक डॉ. य. दि. फडके यांच्या लेखनाचा, व्याख्यानांचा आणि चर्चांमुळे सुस्पष्ट झालेल्या दोघांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव सुमंतांचा वैचारिक विकास घडून येण्यात झाला आहे, असं म्हणता येईल. महाराष्ट्रातल्या बहुतेक साऱ्या राजकीय-सामाजिक विचारवंतांचे विचार आणि कार्याचा, विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचा सखोल, सुक्ष्म आणि मुळातील सत्यशोधक संदर्भ काटेकोरपणे तपासून केलेला अभ्यास यातून सामाजिक शास्त्रीय संशोधनाच्या प्रमाणभाषेतून केलेले त्यांच्यासारखे लेखन दुर्मिळ झाले होते.
अशा लेखनातून आणि त्यांच्यावरील व्याख्यानांमधून दिसून येणारी कठोर तार्किक, मात्र विवेकी आणि विश्लेषक वृत्ती दर्शविणारे यदिंसारखे संशोधक, प्राध्यापक विरळाच. सुमंतसरांच्या मूलगामी अभ्यासू वृत्तीला संशोधनात्मक लेखनाची, तसंच सत्यान्वेषी विचारांची पद्धतशीर मांडणी करणाऱ्या वक्तृत्वाची जोड मिळाली ती य.दिं.मुळेच, असं वाटतं. मात्र सुमंतांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वनिर्मितीत प्रा. राम बापट यांच्या अशाच व्यक्तिमत्त्वाचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. तो जाणवतो तो दोघांमधील साम्यस्थळांमुळे.
जागतिक राजकीय आणि भारतीय राजकीय विचारप्रणाली, आंतरराष्ट्रीय राजकारण, घडामोडी, चळवळी, संघर्ष, नेते आणि विचारवंत यांचं अध्यापन आणि त्यावरील विवेचनाची व्याख्यानरूपाने अभिव्यक्ती करणाऱ्या प्रा. बापटसरांचा त्यांचे आवडते विद्यार्थी आणि आताचे सहप्राध्यापक सुमंत यांच्यावर सर्वाधिक प्रभाव होता. आपल्या क्षेत्राबरोबरच अप्रत्यक्षपणे संबंधित अशा इतर सामाजिक शास्त्रांतील ग्रंथ-नियतकालिकांचे वेगवान परिशीलन आणि विविध क्षेत्रांतल्या थोरो, व्हाईहेड, इमर्सन, रस्किन, रसेल, सार्त्र, काम्यू, फ्रॉइड, मार्क्स, लेनिन, माओ आदी तत्त्वज्ञ आणि विचारवंतांचं मूळ लिखाण वाचण्याचा बापटसरांचा प्रचंड आवाका स्तिमित करणारा होता. सुमंतांनीही हीच वाट चोखाळली. अशा वाचनचिंतनातून येणारी प्रगल्भता हे महत्त्वपूर्ण साम्य आपल्याला दोघांमधे दिसते.
विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयातले शेकडो ग्रंथ आणि नियतकालिकं बापटसरांच्या हाताखालून गेली आहेत. विभागात त्यांच्या खोलीतल्या टेबलावर चतकोर, सौम्य रंगातील कोऱ्या कागदांची चवड उजव्या हाताला पेपरवेटखाली ठेवलेली नेहमी दिसे आणि त्यातील कागदांवर रोजच्या वाचनानंतर केलेली संक्षिप्त टिपणं वर्गावरच्या तासांसाठी तसंच बाहेरची व्याख्यानं, परिसंवाद, चर्चांसाठी बरोबर घेतली जायची. सुमंतसरांनीही या सवयीचं अनुकरण केलं.
जगातील श्रमिक क्रांतिकारकांचे विचार आणि चळवळींप्रमाणे भारतातील श्रमिकांच्या आणि सामाजिक समतेच्या चळवळींचे विश्लेषण आणि आशयाचं निरूपण बापटसर व्याख्यानांमधून करत असत; तेव्हा ऐकणाऱ्यांना अतिशय सावध-लक्षपूर्वक, त्यांच्या पल्लेदार आणि जड- अवजड शब्दांनी भरगच्च असलेली अतिदीर्घ वाक्यं शेवटच्या शब्दापर्यंत ऐकण्याची कसोटी पार पाडावी लागे. एकेका वाक्यात त्यांच्या सखोल ज्ञानाचं व्यापक तसंच मूलगामी चिंतनाचं नि आशयघन विश्लेषणकौशल्याचं दर्शन घडे. सुमंतसरांच्या व्याख्यानांतही हे विशेष असायचे. पण ते थोडक्यात, सोप्या भाषेत मांडण्याची ते शिकस्त करायचे.
हे कोरोना स्पेशलही वाचाः
कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना
युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
सामाजिक परिवर्तनाला परिस्थितीनुरूप योग्य वळण लागण्यासाठी सुशिक्षित, विचारी आणि विवेकी, ध्येयासक्त, कार्यप्रवण तरुणाईने संघटित होऊन, वेळप्रसंगी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी चळवळीतून कार्य करायला हवं, ही बापट नि सुमंतांची समान विचारधारा होती. बापटसर ‘युक्रांद’ची प्रेरणा बनून डॉ. राजेंद्र व्होरा, कुमार सप्तर्षींसारखे विद्यार्थी-कार्यकर्ते त्यातून प्रभावी कार्य करू लागले. तर सुमंतसरांना ‘विचारवेध’ संमेलनं आणि परिवर्तन-चळवळीतील किशोर बेडकिहाळ यांच्यासारखे विद्यार्थी आणि कार्यकर्ते मिळाले. दोघांनीही कार्यकर्त्यांच्या प्रबोधनातून समाजप्रबोधनाला आणि त्यातून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून समस्यानिवारण आणि परिवर्तनाला चालना देत ‘उक्तीबरोबर कृती’ला महत्त्व दिले.
डॉ. अनिल अवचट, जगदीश गोडबोले, जयवंत लेले, मेधा कोतवाल, गेल ऑम्वेट यांसारखे संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासू कार्यकर्ते बापटसरांचे मार्गदर्शन आणि सहभागासाठी नेहमी येत असलेले पाहिलंय. सुमंतसरांचे महाविद्यालयीन आणि विद्यापीठातले अनेक विद्यार्थी आज परिवर्तन चळवळींमधे आहेत. आणि सुमंतांच्या जाण्यानंतर त्यांनी ‘सुमंत मित्र मंडळ’ स्थापून त्यांच्या वैचारिक साहित्याची निर्मिती आणि परिवर्तनशील कार्यकर्ता प्रशिक्षणाची धुरा उचललीय. ‘विचारवेध’सारख्या प्रबोधनकार्याची सातत्यता टिकून राहील, याची यामुळे खात्री वाटते.
अशा रीतीने प्रा. सुमंतांचे व्यक्तिमत्त्व बहुतांशी प्रा. राम बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे होते. सुमंतसर मॉडर्नमधे असल्यापासूनच मला तसं जाणवत होतं. बापट सरांप्रमाणेच सुमंतसरांना संगीत, समांतर नाट्यचळवळ आणि साहित्याच्या इतर प्रकारांतही रुची होती. पण ‘विचारवेध’ आणि परिवर्तन-चळवळीतील कार्यकर्त्यांमधे प्रबोधनात्मक देवाण-घेवाण, ऐक्य आणि त्यांच्या अभ्यासवर्गांद्वारा प्रशिक्षणासाठी त्यांनी अखेरपर्यंत केलेली जिवापाड मेहनत यामुळे त्यांना या रुचींसाठी फुरसतीचे क्षणच मिळू शकले नाहीत.
हेही वाचाः मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे
प्रा. सुमंतसर हे ‘विचारधनाची पेढी’ होते. विविध विषयांतील अभ्यासक-संशोधक, पदव्युत्तर विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि विशेष करून पीडित-शोषित-वंचित आणि तळागाळातील कष्टकरी समाजघटकांसाठी झोकून देऊन काम करणाऱ्या परिवर्तनवादी, क्रांतिलक्ष्यी कार्यकर्त्यांना त्यांतून आपापल्या क्षेत्रासाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक विचार घेता येत. त्यांच्यापुढील सुमंतांची व्याख्यानं आणि त्यानंतरच्या अनौपचारिक चर्चांमधून त्यांच्या विचारक्षमता वाढून कृतिशीलता निर्माण होई.
या विचारधनातील सुमंतांकडून भर दिले जाणारे विषय असत : जात-वर्ग अनुबंध आणि वास्तवता, धर्मनिरपेक्षता, उत्तर- आधुनिकता, नवउदारमतवाद, राष्ट्रवाद, वसाहतवाद, भांडवलशाही आणि जागतिकीकरण. या सगळ्या संकल्पना आणि त्यातील आंतरसंबंध नि संघर्ष अगदी सोपे करून सुमंत मांडत. विविध विचारवंतांतील व्याख्यानांनंतरच्या शंकासमाधानात मार्क्स, गांधी, आंबेडकर, कर्मवीर शिंदे, आगरकर, टिळक, विनोबा, सावरकर, साने गुरुजी अशांच्या विचारांना तसंच कार्यालाही आपण निरपेक्ष- तटस्थपणे अभ्यास करून समजून घेतलेले नाही; त्यांच्यातील परस्परपूरकता, आजच्या काळातील प्रस्तुतता ओळखून समन्वयाकडे वाटचाल करायला हवी’, हे ते सातत्याने सांगत. एवढ्यावरच न थांबता, ‘विविध चळवळींनी सामाजिक शक्तींचं संघटन घडवून आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी वैचारिक देवाण-घेवाण करून समन्वयी कार्य करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे’, असा आग्रह ते धरीत.
सुमंतांची मूलग्राही दृष्टी त्यांच्या पुढील विचारमांडणीतून दिसून येते- ‘जातिव्यवस्था, विषमता, भांडवलशाहीतील अविवेक यांनी ग्रासलेल्या आधुनिक भारतात समताधिष्ठित समाजनिर्मितीचे परिणामकारक कार्य करण्याच्या शक्यता शोधायला हव्यात. त्यासाठी भारतीय आधुनिकता आणि परंपरा यांच्यासंदर्भात निश्चित अशी भूमिका घेतली पाहिजे. या दोन्ही प्रक्रियांची भारतीय समाजात बेमालूम सरमिसळ झाल्याचं वास्तव लक्षात ठेवायला हवं.’
‘केवळ आधुनिक मूल्यांचा आग्रह अथवा साक्षेपी विश्लेषण न केलेल्या पारंपरिक मूल्यांचा आग्रह धरणारं राजकारण यशस्वी होऊ शकणार नाही. येथील परंपरांमधे पुरोगामित्वाची लक्षणं असणाऱ्याही काही गोष्टी आहेत. मात्र त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन बहुजन समाजाला शेतकरी, कष्टकरी आणि वंचित-शोषितांना संघटित करायला हवं. त्यांना बरोबर घेऊनच समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य यांवर आधारित राजकारण करता येऊ शकतं.’
हेही वाचाः शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!
आपल्या विविधांगी अभ्यास आणि संशोधनप्रकल्पांच्या अनुभवांतून सुमंतांचे हे मत बनले होते.
यातूनच मग ते आपला पुढचा विचार मांडतात, ‘महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला येथील पुरोगाम्यांनी परंपरेच्या चौकटीत अडकवून न ठेवता गंभीरपणे घ्यायला हवं. एक फार मोठी आणि क्षमतापूर्ण अशी ही ‘सामाजिक शक्ती’ आहे. त्याचप्रमाणे, आंबेडकरी चळवळीतील दोष घालवून गांधी-आंबेडकर यांच्या विचारांमधील बहुजनवादी कल्याणाच्या शक्यता शोधून, समन्वयी राजकारण होत राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने भारतीय समाज आधुनिकतेकडे जाण्यासाठी समाजातील विधायक आणि रचनात्मक कार्याचं अधिकाधिक ‘संस्थाकरण’ व्हायला हवं. अत्यावश्यक असणारी ही संस्थाकरणप्रक्रिया फारशी घडून न आल्याने चांगली लोकहितकारी कार्ये दीर्घ काळ टिकू शकत नाहीत.’
राज्यशास्त्राचे विश्लेषक, अभ्यासक नि दीर्घ काळ अध्यापन केलेल्या सुमंतांनी राज्यशास्त्र अभ्यासक, प्राध्यापक आणि संशोधकांनी मार्गदर्शक असा महत्त्वाचा विचार अनेकदा मांडलेला आहे. ते म्हणतात- ‘भारतात राज्यशास्त्राचा समग्र आणि समतोल विकास व्हायला पाहिजे. सर्व विषयभाग आणि उपभाग यांना त्यात स्थान हवं. दुर्लक्षित झालेल्या भाग, उपभागांवर अधिक अभ्यास आणि संशोधन व्हायला पाहिजे. कारण राजकीय प्रक्रियेचे ते अंगभूत घटक आहेत. राज्यशास्त्रात समग्रता येण्यासाठी इतर सामाजिक आणि मानव्यशास्त्रांतील संबंधित अंगांच्या उपशाखा राज्यशास्त्रात आणून आंतरशाखीय अभ्यासाची प्रत्यक्ष सुरवात करता येईल. या दृष्टीने ‘राजकीय मानववंशशास्त्र’, ‘राजकीय मानसशास्त्र’, ‘राजकीय नाट्यशास्त्र’, ‘राजकीय समाजशास्त्र’ अशा उपशाखा विकसित होण्याची गरज आहे.’
राजकीय विचार/विचारप्रणाली’ या विशेष अभ्यासभागाबद्दल ते म्हणतात, ‘राजकीय विचारांचा भारतात झालेला विकास हा सिद्धांतपातळीवर जाणारा नाही, याची खंत वाटते. या दृष्टीने अधिक संशोधनपूर्ण लिखाण होत गेलं पाहिजे.’ त्यांच्या अलीकडच्या काही तात्त्विक लेखनातून आणि व्याख्यानांमधून सिद्धांतन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची चाहूल लागते.
प्रा. सुमंतांच्या वैचारिक विकासप्रक्रियेचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न तोकडाच वाटेल, इतका तिचा आवाका व्यापक आहे. ऐन वैचारिक उमेदीत असताना ते आपल्यातून गेले, ही खंत वाटतच राहील.
हेही वाचाः
वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत
ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच
आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?
गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला
शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा
लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी
जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी
(साप्ताहिक साधनाच्या २२ एप्रिल २०१७ च्या अंकातून साभार.)