डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

१४ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे.

भारतीय संविधानाचे जनक अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ओळख सर्वत्र सांगितली जाते. बाबासाहेब ज्या सामाजिक परिस्थितीत जन्मले आणि वाढले, त्यात यशाच शिखर गाठणं किती अवघड होत. याची आज आपण फक्त कल्पनाच करू शकतो. 

धर्माचे संस्कार बालपणापासून

बाबासाहेबांचा जन्म एका अस्पृश्य जातीत झाला. त्यांचे वडील रामजी हे ब्रिटीश लष्करात सुभेदार होते. त्यांच्या घराण्यातून कबीर पंथ आणि संत वाङ्मयाचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्याचा परिणाम म्हणून बाबासाहेब आयुष्यभर मद्यपानासारख्या व्यसनापासून दूर राहिले. विशेष म्हणजे धर्म या गोष्टीविषयी ते आयुष्यभर आस्थेनं आणि गांभीर्यानं विचार करत राहिले.

रामजी सुभेदार हे व्यासंगी, सुशील आणि धर्मशील होते. मुलांच्या शिक्षणाविषयी प्रचंड तळमळ असलेले रामजी स्वतः डोळ्यात तेल घालून छोट्या भिमाच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवत होते. घरामधला हा जिव्हाळा बाहेरच्या जगात केवळ अस्पृश्य म्हणून कधीच मिळाला नाही. 

बालपणातच अस्पृश्यतेचे चटके 

शाळेमधे स्वतःच्या हीनदीन केविलवाण्या जिण्याची जाणीव भिमाला लवकरच झाली. शाळेत आपल्याला वेगळं बसवतात, शाळेत जाताना घरातून गोणपाटं न्यावी लागतात, आपल्या वह्या पुस्तकांना शिक्षक हात लावत नाहीत. बाहेर दुकानात जाताना दुकानाच्या बाहेर उभं राहून आई कपड्यांची निवड करते. पाणी मागितलं तर ते वरून ओतलं जातं, इत्यादी अनुभवांनी त्यांच्या कोवळ्या मनावर ओरखडे उठत होते.

हेही वाचाः दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती

एकदा स्पृश्य हिंदूंच्या पाणवठ्यावर पाणी पिताना भीम सापडला. तेव्हा स्पृश्य हिंदूंनी त्याला काळानिळा होईपर्यंत बडवलं. या सगळ्या विटंबनेचं मूळ आपल्या अस्पृश्य असण्यातच आहे, हे बालवयातच भिमाला कळून चुकलं होतं. 

उच्चशिक्षणासाठीचा संघर्ष

अशा सार्‍या लाजिरवाण्या जगण्यातून शाळा शिकता शिकता पेंडसे आणि आंबेडकर या दोन ब्राह्मण शिक्षकांनी भिमावर मुलासारखी माया केली आणि मदत केली. परिस्थितीशी झगडताना वडिलांच्या उत्तेजनामुळे आणि काही शिक्षकांमुळे बाबासाहेब नेटानं अभ्यास करून मॅट्रिक झाले. 

मुंबईत दोन खोल्यांमधे कसं तरी आयुष्य काढत कॉलेजमधे दाखल झाले. वडिलांना खर्च झेपेना तेव्हा बडोद्याच्या नरेशांच्या पंचवीस रुपये शिष्यवृत्तीनं ते शिक्षण पूर्ण करू शकले .त्यांच्याच मदतीनं पुढं अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले. 

बाबासाहेबांनी पत्रात काय लिहिलं?

अमेरिकेहून वडिलांच्या मित्राला लिहिलेल्या एका पत्रात आंबेडकरांनी आपलं मन मोकळं केलंय. ते लिहितात-

‘माझ्यासारख्या अस्पृश्य तरुणाला आधी शिक्षण मिळण्याची मारामार, त्यातून एकदम परदेशी संधी मिळणं म्हणजे एकदम पर्वणीच! पण मला ती मिळाली. हा योगायोग अपूर्वच म्हणावा लागेल. इथं एक गोष्ट मला फार आश्‍चर्याची वाटते, ती म्हणजे इथं सगळ्यांच्या बरोबरीनं मला हिंडता येतं, खातापिता येतं, चालता येतं, वावरता येतं. हा एक नवाच साक्षात्कार आहे.` 

हेही वाचाः थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ

`हिंदुस्थानात सतत बाजूला बाजूला एकलकोंडा राहावं लागल्यामुळं सुरुवातीला इथं मी फारच बुजरेपणानं वागत होतो. इथलं समतेचं जीवन माझ्या दृष्टीनं फारच मोठा साक्षात्कार आहे. इथं आल्यापासून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतेय, ती म्हणजे पददलितांना शिक्षण देणं किती आवश्यक आहे. निग्रो गुलामांना न्याय मिळवून देणार्‍या अब्राहम लिंकनच्या आणि बुकर्टी वॉशिंग्टनच्या देशात मी आलोय याचा मला विलक्षण आनंद वाटतोय.’

बाबासाहेबांचे गुरू महात्मा फुले

महाराष्ट्रात समाजसुधारणेचं कार्य एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच सुरू झालं. ब्रिटिशांच्या आगमनानंतर नवशिक्षित, उच्चवर्णियांना नवज्ञानाचा परिचय झाला. जुन्या रुढी परंपरांमधल्या वेडगळ समजुतींविषयी जाण आली होती. त्यानुसार सामाजिक सुधारणा सुरू झाल्या. 

अर्थात या सगळ्याचं स्वरूप उच्च वर्गातल्या कौटुंबिक सुधारणेपुरतंच मर्यादित होतं. याला ठळक अपवाद महात्मा जोतिबा फुले यांचा ठरला. कारण जोतीरावांनी संपूर्ण समाजरचनेलाच आव्हान दिलं होतं. अस्पृश्यांच्या सुधारणेची वेगळी दृष्टी फुल्यांनी दिली होती. यामुळेच डॉ. आंबेडकर यांनी फुल्यांना गुरुस्थानी मानलं. समाजसुधारणा म्हणजे वरवरची मलमपट्टी नसून ती एक शस्त्रक्रिया आहे, असं समजून ती केली तरच या जरठ समाजावर काही परिणाम होईल, हे फुल्यांनी हेरलं होतं.

बाबासाहेब भारतात परतले

आपल्या अमेरिकेतल्या वास्तव्यात बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. केलं आणि नंतर पी.एचडी. केली. रुपयाच्या चलन स्वरुपाचा वेध घेत असताना भारतातील जातिसंस्थेचा उगम आणि ती टिकण्यास कारणीभूत असलेली यंत्रणा यांचाही त्यांनी अभ्यास केला. 

हेही वाचाः ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सेलिग्मन यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तौलनिक धर्मशास्त्र हा तर त्यांच्या आवडीचा विषय होता. बडोदा सरकारची स्कॉलरशिप पुढं थोडा काळ मिळत राहिली. परंतु तिचा कालावधी संपताच त्यांना भारतात परत यावं लागलं. आणि बडोदा सरकारच्या नोकरीत राहावं लागलं.

कितीही शिकला तरी अस्पृश्य अस्पृश्यच 

बडोद्याच्या नोकरीत असताना केवळ अस्पृश्य असल्या कारणानं ज्या हालांना त्यांना तोंड द्यावं लागलं, ते हाल केवळ अवर्णनीय होते. तिथल्या पारशी वसतिगृहात राहात असताना, एका रात्री काठ्या घेऊन पारश्यांची झुंड आली आणि त्यांनी खोली खाली करायला सांगितली. ही खोली खाली केल्यानंतर शहरातला एकही हिंदू किंवा मुस्लिम त्यांना अस्पृश्य असल्यामुळं थारा देईना. 

त्यामुळं आंबेडकर मुंबईला परत आले. या वास्तव्यात आंबेडकरांना एक गोष्ट उमगली ती म्हणजे अस्पृश्य कितीही विद्वान झाला, मोठ्या योग्यतेपर्यंत चढला तरीही तो शेवटपर्यंत अस्पृश्यच राहतो.

हेही वाचाः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या पंचविशीत प्रत्येकाने वाचावा असा लेख

मुंबईला परत आल्यानंतर त्यांना सिडनॅहम कॉलेजमधे नोकरी लागली. रमाबाई यांच्याशी आंबेडकरांचं लग्न होऊन त्यांचा संसारही सुरू झाला होता. आंबेडकरांना बॅरिस्टर व्हायचं होतं. त्यासाठी त्यांना लंडनला जायचं होतं. नोकरीतल्या पैशातून काटकसर करून ते त्यासाठी पैशांची जमवाजमवही करत होते. 

शाहूराजे पाठिशी उभे राहिले 

अस्पृश्य समाजातल्या या उच्चशिक्षित तरुणाकडे कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचं लक्ष गेलं. ते स्वतः त्यांच्या संस्थानात अस्पृश्यांसाठी सुधारणा राबवत होतेच. शूद्रातिशूद्र समाजात आत्मविश्‍वासाचा अभाव होता. भीमरावांना मदत केली, तर अस्पृश्यांमधूनही नव्या नेतृत्वाचा उदय होऊन ते स्वाभिमानी बनतील, असा त्यांचा होरा होता. अर्थात तो बरोबरही होता. 

त्यांनी बाबासाहेबांना वर्तमानपत्र काढण्यासाठी मदत केली. १९२०ला ‘मूकनायक’ सुरू झालं आणि त्यातून मूक समाजाच्या दुःखाला वाचा फुटू लागली. मूकनायक मधल्या लिखाणावरूनच बाबासाहेबांच्या भावी वाटचालीची कल्पना येऊ शकते. शाहू महाराजांच्या मदतीनं इंग्लडला बॅरिस्टर होण्याच्या निमित्तानं गेलेले बाबासाहेब परत भारतात आले, ते एक निराळी तडफ घेऊनच. पण तोपर्यंत अस्पृश्यांचा खरा कैवारी शाहूराजा मात्र हरपला होता. 

बाबासाहेबांनी अस्पृश्यांची चळवळ सुरु केली

आंबेडकरांनी कायद्याचं अध्यापन आणि वकिली करता करता अस्पृश्यांची चळवळ उभारायचं ठरवलं. बहिष्कृत हितकारणी सभेच्या अस्पृश्य परिषदांच्या मार्फत हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध त्यांनी दंड थोपटले. अस्पृश्यांची अस्मिता जागृत केली.

आपल्या बांधवांना ते कळवळून सांगत- 

‘तुमची ही दीन अवस्था पाहून आणि करुणाजनक वाणी ऐकून माझं हृदय फाटतं. युगानुयुगं तुम्ही गुलामगिरीच्या गर्तेत गंजत, कुजत सडत पडला अहात. तरीही तुम्हाला वाटतं की आपली ही दुर्दशा देवनिर्मित आहे म्हणून? ईश्‍वरी संकेतानुसार आहे म्हणून? तुम्ही गर्भात असतानाच का मेला नाहीत? जन्माला येऊन तुम्ही जगातलं दुःखं, दारिद्रय आणि दास्य यांच्या अक्राळविक्राळ चित्रांचा भेसूरपणा आपल्या अवनत आणि अवमानित दुःखी जीवनात वाढवताय.`

`जर तुमच्या जीवनाचं पुनरुज्जीवन होत नसेल, तर जगातून नाहीसे व्हा. तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात. स्वतःच्या कर्तबगारीनं जगात उत्कर्ष करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही या देशाचे रहिवासी आहात. तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी इतर भारतीयांच्या बरोबरीनं मिळणं, हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणूनच तुम्हाला स्वाभिमानपूर्ण जिणं जगायचं असेल, तर स्वावलंबन हाच खरा आत्मोन्नतीचा मार्ग आहे.’

भारतीय वर्णव्यवस्थेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाष्य- 

‘हिंदुस्थान हा देश म्हणजे केवळ विषमतेचं माहेरघर आहे. हिंदू समाज हा एक मनोरा आहे आणि त्यात जात म्हणजे एक मजला आहे. या मनोर्‍याला शिडी नाही. एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी मार्ग नाही. या मजल्यात त्यांनी जन्मावं आणि तिथंच त्यांनी मरावं, खालच्या मजल्यातील एखादा मनुष्य कितीही लायक असो, त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही.‘

‘तसंच वरच्या मजल्यावरचा माणूस कितीही नालायक असो, त्याला खालच्या मजल्यावर लोटून देण्याची कुणाचीही छाती नाही. सचेतन त्याचप्रमाणे अचेतन वस्तू ही सारी ईश्‍वराचीच रूपे आहेत, असं म्हणणारे स्वधर्मीयांचा विटाळ मानतात.’

नामांतर, देशांतर, धर्मांतर

१९२४मधे एकापरिषदेत अस्पृश्यांची स्थिती सुधारण्यासाठी नामांतर, देशांतर आणि धर्मांतर या तीन पर्यायांची त्यांनी चर्चा केली. ‘शिका, संघटित व्हा आणि चळवळ करा’, ही त्यांच्या संदेशाची त्रिसूत्री होती. 

हेही वाचाः साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?

धर्मांतराचा पर्याय त्यांनी गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली होती. महात्मा फुले यांच्या प्रभावामुळे बाबासाहेबांची चळवळ सुरुवातीला ब्राह्मणेतर चळवळीच्या हातात हात घालून चाललेली होती. परंतु पुढे कायदे काउन्सिलातल्या विविध बिलांवरच्या चर्चेतून असं लक्षात आलं, की स्पृश्य ब्राह्मणेतरांचेही स्वतःचे हितसंबंध असतात आणि प्रसंगी तेही उच्च वर्णियांशी हातमिळवणी करून अस्पृश्यांच्या हक्कांची पायमल्ली करायला मागेपुढं पाहात नाही आणि म्हणूनच बाबासाहेबांनी आपली चळवळ स्वावलंबी बनविण्याचा निर्णय घेतला.

विरोधा ब्राह्मणांना नाही, तर ब्राह्मण्याला

बाबासाहेबांचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला होता. हे त्यांचं मत त्यावेळच्या पुरोगामी विचारांच्या ब्राह्मणवर्गालाही चांगलं पटलेलं होतं. त्यामुळंच त्यांनीही बाबासाहेबांच्या चळवळीला पाठिंबा दिला होता. यात लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांचाही समावेश होता. 

श्रीधरपंतांची मतं अतिशय पुरोगामी होती. हिंदू संघटन म्हणजे चातुवर्ण्य विध्वंसन आणि ब्रिटीश नोकरशाही, भिक्षुकशाही ही क्षुद्र वृत्तीची आहे, हे त्यांचं स्पष्ट मत होतं. तेव्हा सगळ्या सनातनी मंडळींचा विरोध असूनही श्रीधरपंतांनी गायकवाड वाड्यात अस्पृश्य मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यांची ही कृती धाडसाचीच होती.

चवदार तळ्यात पाणी पेटलं

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. त्या तळ्यातलं पाणी पशुपक्षी प्यायचे, गुरंढोरं प्यायचे, मुसलमान प्यायचे, ख्रिश्‍चन प्यायचे, पण मनाई होती ती अस्पृश्यांना. 

अस्पृश्यांना सगळे पाणवठे, विहिरी तलावातून पाणी घ्यायला बंदी होती. धर्म बुडतो, संस्कृती कलंकित होते, अशी समजूत सगळीकडे रुजली होती. या समजुतीलाच छेद देण्यासाठी डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या अनंतराव चित्रे, सहस्त्रबुद्धे, टिपणीस या सहकार्‍यांनी चवदार तळ्यावर अस्पृश्यांना घेऊन जायचं ठरवलं. आंबेडकरांसारखा एक बंडखोर नेत्यानं बेडरपणानं क्रूर, अमानुष अशा रुढी परंपरांविरुद्ध हजारो अस्पृश्यांना घेऊन एक क्रांती घडवली. 

हेही वाचाः संविधान म्हणजे काय रे भाऊ!

आंबेडकरांचा हा मोर्चा युगानुयुगं पिचत पडलेल्या गरीब लोकांसाठी होता. बाबासाहेबांनी त्या दिवशी दाखवून दिलं. कुत्र्यामांजरांना जवळ करणारा तो धर्म मार्तंड समाज स्वधर्मियांना पशुहूनही नीच वागणूक देत होता. हे घोर पातक आंबेडकरांसारख्या क्रांतिपुरुषानं जगाला त्या दिवशी उघड करून दाखवलं. 

मनुस्मृतीची होळी ते समता सैनिक दल

हिंदू धर्मातील सर्व विषमतावादी रुढीप्रथांचं समर्थन मनुस्मृतीच्या आधारे केलं जात होतं. मनुस्मृती ही त्र्यैवर्णिकांच्या हक्काचा जाहीरनामा होता, ती शूद्रातिशूद्रांच्या गुलामगिरीची गीता होती. म्हणूनच तिची होळी करण्यात आली. 

महाराष्ट्रात या घटनेनं गदारोळ उठला, उलटसुलट मतप्रदर्शन व्हायला लागलं. आंबेडकरांचं निर्विवाद नेतृत्व इथं सिद्ध झालं होतं. त्यानंतर लगेचच नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश करण्याचा सत्याग्रह झाला. त्यांचं ‘मूकनायक’ हे पत्र तोपर्यंत बंद पडलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ हे पत्र सुरू केलं. समता संघाची, समता सैनिक दलाचीही पाठोपाठ स्थापना केली. याचीच एक शाखा श्रीधरपंत टिळकांनी गायकवाड वाड्यात सुरू केली होती.

गांधी आंबेडकर वादाने देश हादरला

बाबासाहेबांनी चालविलेल्या चळवळी, त्यांचा व्यासंग, त्यांची विद्वत्ता या सगळ्या कारणांमुळे लंडनमधे १९३०मधे भरलेल्या गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं त्यांना निमंत्रण मिळालं, त्यानंतरच्या अधिवेशनातही गांधीजींसह आंबेडकर होतेच. गोलमेज परिषदेत गांधीजींनी अस्पृश्यांच्या न्याय्य मागण्यांना केलेला विरोध आणि संतापलेले आंबेडकर हे वारंवार घडत होतं. आंबेडकरांचे युक्तिवाद सडेतोड होते. 

हेही वाचाः भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?

गांधीजींचं अस्पृश्याच्या वर्गाचं पुढारीपण हे अस्पृश्यांना कृत्रिम वाटायचं. उलट आंबेडकरांचं नेतृत्व, निसर्गसिद्ध, वास्तववादी, व्यवहारनिष्ठ असं होतं. अस्पृश्यांसाठी वेगळा मतदारसंघ असावा, या आंबेडकरांच्या मागणीला, समाजात आणखी दरी पडेल, या भीतीनं गांधींनी केलेला विरोध हा दोघांमधील संघर्ष वाढविणारा ठरला. 

जुना कायदा जाळणाऱ्याने नवा कायदा घडवला

अस्पृश्यांसाठी लढतानासुद्धा त्यांचं अंतिम ध्येय हे जातिव्यवस्थेचं उच्चाटन करणं, असंच होतं. म्हणूनच आर्थिक वर्ग हा राजकारणाचा निकष मानून स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. अस्पृश्यांच्या उच्च शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 

मुंबईत सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद कॉलेज सुरू केलं. १९४७ला भारत स्वतंत्र झाला. आंबेडकरांच्या प्रतिभेचा आणि ज्ञानाचा उपयोग व्हायला हवा, असं नेहरुंसारख्या राजकीय पुढार्‍याला आणि काँग्रेसलाही वाटत होतं. 

आंबेडकर स्वतंत्र भारताचे कायदामंत्री झाले. तसंच घटना समितीचे अध्यक्षही झाले. ज्यांनी जुन्या कायद्याचं, मनुस्मृतीचं दहन केलं, त्यांच्याकडे नव्या कायद्याच्या निर्मितीचं कार्य यावं, हा एक प्रकारे काव्यात्म न्यायच होता. सतत परिश्रम करून आंबेडकरांनी तीन वर्षांत घटनेचा मसुदा तयार केला. घटनेच्या अकराव्या परिच्छेदानुसार अस्पृश्यतेला कायमची मूठमाती दिली. 

धर्मांतराबद्दल बाबासाहेब काय म्हणाले

बाबासाहेबांच्या आयुष्यातील अखेरच्या दिवसातील संस्मरणीय घटना म्हणजे त्यांचं धर्मांतर. लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केलेला. धर्मांतरविषयक त्यांचा विचार, जीवनाच्या या टप्प्यावर बराच परिपक्व झालेला होता. 

हेही वाचाः धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

फार पूर्वी महार सत्याग्रहाच्या वेळी शक्यतो लवकर अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं नाही, तर धर्मांतर करावं, असं त्यांनी म्हटलेलं होतं. स्पृश्य हिंदूंनी त्यांच्या या बोलण्यावर राग व्यक्त केला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले होते -

‘धर्मांतरासाठी आम्ही जर उत्सुक असलो असतो, तर स्वतःच्या भावी पिढ्यांचा विचार करून आम्ही ते या पूर्वीच केलं असतं. परंतु शक्यतो हिंदू धर्मात राहून सत्याच्या मार्गानं प्रयत्न करून सगळ्यात बहिष्कृत वर्गासाठी काही करावं, असं वाटतं. परंतु आमच्या सहनशीलतेलाही काही मर्यादा आहेत. आम्ही तुमच्या लाथा खाऊन तुमच्या धर्मात राहावं, असं आम्ही का म्हणावं? 

माणसामाणसात जो धर्म पंक्तीप्रपंच करतो. कोट्यवधी लोकांना त्यांचा काहीही गुन्हा नसताना गुन्हेगारासारखी वाईट वागणूक देतो. पिढ्यानपिढ्या विशिष्ट लोकांना नरकयातना भोगायला लावतो. माणूस म्हणून जनावरांइतक्याही सवलती देत नाहीत. तो धर्म आम्ही आमचा का म्हणावा?’

हिंदू कोड बिल हा वारसा

बौद्ध धर्म हा लोकशाही आणि राज्यव्यवस्थेला पूरक असल्यानं सर्व हिंदूंनी तो स्वीकारावा, इतकंच नाही, तर जागतिक पातळीवर जडवादी कम्युनिस्टांच्या वाढत्या प्रभावाला तोंड देऊन लोकशाहीचं रक्षण करण्यासाठीही बौद्ध धर्माची आवश्यकता आहे, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. 

काळाच्या ओघात भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन ही बाबासाहेबांची ऐतिहासिक महत्त्वाची कामगिरी होती. भारत बौद्धमय करण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. परंतु दुर्देवानं ६ डिसेंबर १९५६ला त्यांचं परिनिर्वाण झालं.

बाबासाहेब गेले परंतु मोठा वारसा देऊन गेले. त्यांनी तयार केलेलं हिंदू कोड बिल, त्या काळात अस्तित्वात येऊ शकलं नाही. तरी या बिलातील जवळजवळ प्रत्येक तरतूद पुढच्या काळात टप्प्याटप्प्यानं कायद्यात रुपांतरित होत गेली. 

व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे.

हेही वाचाः 

धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?

 

(लेखक ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि विचारवंत आहेत.)