डॉ. संगीता मोरे: मराठवाड्यातल्या लिहित्या हातांना सर्वदूर पोचवणाऱ्या अभ्यासक

२३ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


औसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग.

डॉ. संगीता मोरे २००२ ला एमफील करण्यासाठी पुणे युनिवर्सिटीत आल्या. त्यावेळी त्यांची आणि माझी ओळख झाली. त्या मराठवाड्यातल्या, म्हणून ओळख पुढेही कायम राहिली. एमफीलनंतर त्यांनी पुण्यातच डॉ. नागनाथ कोतापल्ले सरांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली. 'प्रतिष्ठान' या नियतकालिकाच्या वाङ्मयीन कामाचा अभ्यास त्यांनी आपल्या पीएचडी पदवीसाठी केला. त्यातून पुढे दोन स्वतंत्र पुस्तकांची निर्मिती झाली.

प्राध्यापक नसल्याची खंत नव्हती

‘प्रतिष्ठान’चं वाङ्मयीन कार्य’ आणि ‘प्रतिष्ठानची सूची सप्टेंबर १९५३ ते ऑगस्ट २००३’ हे दोन ग्रंथ डॉ संगीता मोरे यांच्या बुद्धिमत्तेची आणि अभ्यासाच्या शिस्तीचा प्रत्यय देतात. ‘सूची’लेखन याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं. याबाबतीत डॉ सु. रा. चुनेकर सर त्यांचे आदर्श होते.

सप्टेंबर २००३ च्या पुढच्या काळातल्या प्रतिष्ठानच्या कामाची सूचीही दरम्यानच्या काळात त्यांनी तयार केली. हैदराबाद इथल्या ‘पंचधारा’ नियतकालिकाच्या पुरवणी सूचीचं काम लॉकडाऊन संपताच त्या हातात घेणार होत्या. सगळी पात्रता असूनही डॉ. संगीता मोरे यांना सिनियर कॉलेजमधे कायमस्वरूपी प्राध्यापकाची नोकरी मिळाली नाही.

लातूर जिल्ह्यातल्या काही कॉलेजमधे कधी तासिका तत्वावर तर कधी ठराविक काळासाठी कंत्राटी पद्धतीने त्या शिकवत राहिल्या. आपण प्राध्यापक होऊ शकलो नाहीत याची खंत न बाळगता त्यांनी स्वत:ला ज्ञानाच्या निरनिराळ्या क्षेत्रात व्यस्त ठेवलं.

हेही वाचा: आरपार जगणं मांडणाऱ्या गौरी देशपांडे

१० वर्षांचं प्रकाशन, १५० पुस्तकं

मैत्री प्रकाशन ही प्रकाशन संस्था सुरु केली आणि आपल्या प्रकाशनामार्फत दर्जेदार पुस्तक निर्मिती केली, पुस्तक वितरणात यश मिळावं यासाठी प्रकाशनाची वेबसाईट अलीकडेच त्यांनी सुरु केली होती. ‘रुजवात’ हे नियतकालिक त्यांनी काही काळ चालवलं, चार्ली चॅप्लिन यांनी आपल्या लेकीला लिहिलेल्या पत्राचा मी केलेला अनुवाद त्यांनी पोस्टर स्वरूपात प्रकाशित केला होता.

दुष्यंत कटारे, सुनीता सांगोले, मारुती घुगे, शिवाजी जवळगेकर, नरेश कोरे, तेज नाईक, अभिजित पाटील, नरेश पिनामकर, सुनील साळुंखे, भीमराव पाटील, विजय करजकर, दादाराव गुंडरे, कल्याण कदम, संगीता देशमुख अशा मराठवाड्यातल्या लेखक समीक्षकांचे आणि प्राध्यापकांची पुस्तकं मैत्री प्रकाशनाने जाणीवपूर्वक प्रकाशित करून सगळीकडे पोचवली. त्यांनी १५० पेक्षा जास्त पुस्तकांचं मागच्या दहा वर्षात मैत्री मार्फत प्रकाशन केलं.

छोट्या गोष्टींची नेमकी मांडणी

डॉ. संगीता मोरे यांना फिरायला आवडायचं. वेळ आणि संधी मिळेल तेव्हा त्या ओरिसापासून कर्नाटकपर्यंत फिरून यायच्या. ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळं पाहणं, त्यांच्या स्थापत्याचा, भौगोलिक रचनांचा अभ्यास करणं हा त्यांचा छंद होता. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाला त्यांनी याबद्दल एक प्रकल्प सादर केला होता.

अलीकडे त्या खाद्यसंस्कृतीवर संशोधन करत होत्या, खाद्यसंस्कृती आणि तिची जात धर्म विशिष्टता यासंदर्भाने प्रत्येक फोनवरच्या चर्चेत त्या नवी माहिती देत. वेळ, अमावस्येचे प्रादेशिक धागेदोरे त्या फार नेमकेपणाने उकळून दाखवायच्या. लिंगायत आणि हिंदू धर्मातले खाद्यपदार्थ तयार करण्याच्या पद्धतीचा भेद याबद्दलही त्यांनी अभ्यास केला होता.

डॉ. जयद्रथ जाधव यांनी संपादित केलेल्या ‘लातूर: वसा आणि वारसा’ या ग्रंथासाठी त्यांनी ‘लातूर जिल्ह्यातल्या मठ यावर एक दीर्घ लेख लिहिला आहे. हा लेख मुळातून वाचला पाहिजे म्हणजे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या नेमकेपणाविषयी डॉ. संगीता मोरे किती काटेकोर असायच्या हे लक्षात येईल.

प्रतिष्ठान, पंचधारा आणि मुराळी या नियतकालिकात त्यांचे संशोधन लेख प्रकाशित झालेत. अभ्यासविषयाच्या मुळापर्यंत जाणं आणि शेवटी स्वत:चं असं स्वतंत्र वक्तव्य संदर्भासह मांडणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.

हेही वाचा: दिल्लीत रंगलेल्या ट्रान्सजेंडर कवी संमेलनाची गोष्ट

मांडणी स्पष्ट, मुद्देसूद असायची

चर्चासत्र आणि ऑनलाईन कार्यक्रमात भाषणबाजी न करता दिलेल्या विषयावर गांभीर्याने रिसर्च सादर करणं त्यांना महत्वाचं वाटायचं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिवर्सिटीच्या दोनेक चर्चासत्रात निमंत्रित तज्ज्ञ म्हणून त्या उपस्थित होत्या. अलीकडे अमरावतीहून आयोजित एका ऑनलाईन कार्यक्रमात त्यांनी भारत काळे यांच्या ‘ऐसे कुणबी भूपाळ’ या कादंबरीची नवी कृषीकेन्द्री मांडणी केली होती.

भारत काळे यांच्याकडे मराठी कादंबरी समीक्षकांनी पुरेसं लक्ष दिलं नाही, असं त्यांचं मत होतं. डॉ. राजेंद्र थोरात यांनी पुण्यात आयोजित केलेल्या चर्चासत्रात ‘वाचन संस्कृती’ या विषयावर सडेतोड मांडणी केली होती. महिला दिनाच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातल्या एका कॉलेजने आयोजित केलेल्या कार्यक्रमातलं त्यांचं व्याख्यान अत्यंत स्पष्ट आणि मुद्देसूद होतं.

पुरस्काराच्या राजकारणाचा अनुभव

स्पष्टवक्तेपणा ही डॉ. संगीता मोरे यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक ओळख होती. त्यांनी मराठी विश्वकोशासाठी मराठवाड्यातल्या लेखकांच्या नोंदी लिहिल्या आणि त्यानंतर नोंदीतला एकही शब्द बदलायला संपादकाना परवानगी दिली नाही. किंवा विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोशातल्या माहितीशी सतत छेडछाड केली जाते म्हणून चार दोन नोंदीनंतर विकिपीडियासाठी नोंद लेखन करणं त्यांनी बंद केलं.

कवी लेखकांच्या संघटनांविषयीही त्यांची मतं ठाम होती. साहित्य पुरस्काराच्या निमित्ताने कसं राजकारण चालतं याच्याशी त्यांचा जवळून संबंध आला. उत्तम पुस्तकाला जेव्हा पुरस्कार दिला जात नाही सगेसोऱ्यांची पुस्तकं पुढे केली जातात, तेव्हा त्याबद्दल आपला स्वतंत्र आक्षेप त्यांनी समिती सदस्य म्हणून पाठवला होता.

आवडलेल्या पुस्तकावर भरभरून बोलण्याचा त्यांचा स्वभाव होता. लातूर मसापशाखेशी त्या संबंधित होत्या. लातूर शहरातल्या साहित्यिक कार्यक्रमात त्या आवर्जून हजेरी लावायच्या.

हेही वाचा: प्रा. रंगनाथ तिवारीः साहित्यातली संस्कृती

कष्टकऱ्यांशी जिव्हाळ्याचं नातं

डॉ. संगीता मोरे शेती करायच्या. अलीकडे काही वर्षापूर्वी त्यांनी शेतामधे टुमदार घर बांधलं होतं. आपल्या आई वडलांसोबत त्या शेतातल्या घरी रहायच्या. आपल्या मित्रांनी आपल्या शेतातल्या घराला भेट द्यावी असं त्यांना वाटायचं आणि म्हणून त्या बहुतेक मित्र मैत्रिणींना आमंत्रण देत.

शेतातलं प्रत्येक काम त्या स्वत: करायच्या. शेतातलं असं कुठलंच काम नव्हतं जे त्यांना येत नव्हतं. गावात आणि शेतातल्या कष्टकरी माणसांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ही माणसं आणि त्यांचा मोकळा ढाकळा नैसर्गिक स्वभाव डॉ. संगीता मोरे यांना आपला वाटायचा.

बोली भाषेतून संवाद

लातुरी बोलीतल्या संवादातून त्यांनी आजूबाजूची कष्टकरी माणसं उभी केलीत. डॉ. संगीता मोरे यांच्या फेसबुक भिंतीवर असे अनेक किस्से आहेत. भाषिक अंगानेही या ऱ्हस्वकथा महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ ४ एप्रिलला संध्याकाळी साडेआठ वाजता डॉ. संगीता मोरे यांनी लिहिलेली पोस्ट – 

'आज खूप दिवसांनी गोतावळा जमा झाला. काही कारण नसताना. सहजच हा जुना गोतावळा भेटला की सगळं जगणं सजीव होतं. कोण किती मोठा आहे. कोणत्या पदावर आहे. याचा कसलाही विचार नसतो. आम्ही सगळे एका गावातले, एका वर्गातले. पाचवीपासून बीएपर्यंत एकत्र शिकलेले. सगळ्यांचे मार्ग, व्यवसाय वेगळे. पण आजही आम्ही भेटलो की अफलातून चर्चा होतात. हसून पोट दुखेपर्यंत.'

फोटो काढल्यानंतरच्या प्रतिक्रिया -

• माझ तोंड लई काळ निघालंय.
• मी बनेणंवरच हायं. तुझा मोबाइल तुझाच फोटो गोरा काढतो.
• माझ टक्कल लई चमकायलं. 
• माझ पोट लई दिसतयं. 
• येय फोटू नीट काढं. नीट मोबाइलकडं बघारे. किती वळवळ करता. 
स्थळ - याकतपूर 
वेळ - संध्याकाळ - ७.३० वाजता'

हेही वाचा: नामवर सिंहः पण बोलावं तर लागेलच

१३ मार्चला लिहिलेली पोस्ट –

'तीन दिवस झाले रोज तालुक्याला चाललाव. सरकार इमा देत पर बँकेचे लोक असं वागतात, जसं काय ते त्याच्या खिशातूनच पैसे द्यायलेत. सुरूला बँकेत गेलं तर म्हणले, तुम्ही आता इथं यायचं नई. खाली मोडला बँक झाली तिकड जायचं. मोडच्या बँकेला हुडकायला घंटा गेला. कुणाच तरी घर भाड्यान घेऊन त्याच्यात बँक सुरू केलीय. तिथं मरणाची गरदी. बारीच बारी. सगळे म्हातारे तिथ.'

'कसलं आलंय सोशल डिस्टन्सिंग अन काय. सगळे एकावर एक पालथ पडून बारीला उभे. नुसतं कागदावरच असतंय जेष्ठ नागरिक अन काय ते. या म्हणाव त्या नियम करणाऱ्याला ही बारी बघाया. मला तुझी लय सय झाली बघ ही बघून. तुला लई फुटू काढायचा नाद हाय. म्हणल कारट असत जवळतर म्हणल असत.'

'काढ बर ह्याच्या फोटू अन टाक तिकड सोशल मीडिया का काय त्येच्यावर. अन म्हणाव इथ जेष्ठ नागरिक कायदा, कोरोनाचा सोशल डिस्टन्सिंग अन बँकेत नागरिकांची सोय कुठ काय हाय. सगळा सावळा गोंधळ तिच्या आयला निहुन. कसली म्हणायची शिकली तुम्ही पोर. हेच का नियमाच्या नावाखाली नुसता कदर आणलाय.'

डॉ संगीता मोरे या उत्तम शिक्षिका होत्या हे त्यांचे विद्यार्थी सांगतील. त्या उत्तम प्रकाशक, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक होत्या हे सांगायला त्यांचं काम सगळ्यांच्या समोर आहे. त्यांचा मित्रपरिवार राज्यभर पसरलाय. खूप छोट्या गावात त्या रहात आणि तरी तिथून त्यांनी एक मोठी झेप घेतली. पण आता त्याच्या फक्त आठवणी उरल्यात.

हेही वाचा: 

 ...तर मी नक्कीच नोबेल स्वीकारला असता

ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच

 लेखक कवींनो, कळपात नका राहू, माणसांत मिसळा

त्यांच्या वर्णद्वेषाचा धिक्कार, आपल्या वर्णद्वेषाचा उदो उदो

इंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं?