आज कोरोनाच्या लसीची वाट बघताना लसीकरण हीच गोष्ट शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरला विसरता येणार नाही. आजच्या म्हणजे १७ मे या दिवशी २७१ वर्षांपूर्वी जन्मलेल्या जेन्नरला जग देवीरोग संपवणारा देवमाणूस म्हणतं. त्याने आपली लस मुक्तहस्ताने जगाला वाटली. त्यामुळे जगभरात दरवर्षी २० ते ३० लाख लोक वाचू लागले. म्हणून आज त्यांच्याच नावे असणाऱ्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतल्या जेन्नर इन्स्टिट्यूटला कोरोनावरच्या लसीचं तंत्रज्ञान जगाला मोफत द्यायचंय.
सध्या सगळं जग अक्षरशः कानात प्राण आणून कोरोना वायरसला रोखणाऱ्या लसीच्या बातमीची वाट पाहतंय. जगभरातले शास्त्रज्ञ सध्या ही लस शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेताहेत. त्यात आघाडीवर आहे ऑक्सफर्ड युनिवर्सिटी. या युनिवर्सिटीत कोरोना वायरसच्या लसीचं संशोधन ज्या इन्स्टिट्यूटमधे सुरू आहे, त्याचं नाव आहे जेन्नर इन्स्टिट्यूट.
फादर ऑफ इम्युनॉलॉजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. एडवर्ड जेन्नरची आज २७१वी जयंती आहे. त्याला जाऊन १९७ वर्षं झाली. आजवरच्या मानवी इतिहासात सर्वाधिक लोकांचे जीव वाचवणारा देवमाणूस म्हणून मानवजातीच्या ओठांवर त्याचं नाव पुन्हा पुन्हा येत राहणार आहे.
हेही वाचा : कोरोनाला रोखणारी लस बनवण्याचं काम कुठंवर आलंय?
ते अठरावं शतक होतं. जगभरात विशेषतः युरोपात स्मॉल पॉक्स अर्थात देवी या साथीच्या रोगानं धुमाकूळ घातला होता. हा रोग तसा याहूनही प्राचीन होता. इजिप्शियन ममीजमधेही त्या काळात तिथल्या लोकांना देवीचा संसर्ग झाल्याचे पुरावे सापडले होते. या रोगात चेहऱ्यासह अंगभर पुरळ, फोड यायचे. पुढेही आयुष्यभर त्याचे व्रण राहायचे. अनेकदा तर त्या संसर्गात आंधळेपण वाट्याला यायचं.
देवीमुळे माणूस जीवानिशी जाण्याचं प्रमाण होतं तीनपैकी एक. लहान मुलंतर त्याला हमखास बळी पडायची. जग कमालीचं हतबल झालं होतं. युरोपात लोक काहीही अचाट उपाय करायचे. अगदी रात्री खिडक्या सताड उघड्या ठेवून झोपण्यापासून ते दिवसाला १२ बाटल्या बिअर पिण्यापर्यंत. मात्र या रोगावर मात करण्याचं तंत्र कुणालाही सापडत नव्हतं.
देवीसाठी वेरिओेलेशनची उपचारपद्धती वापरली जायची. त्यात रोग्याचा अतोनात छळ व्हायचा. उपाशी राहणं, बराच रक्तस्राव असं काय काय भोगावं लागायचं. नुकताच देवीचा रोग होऊन गेलेल्या रोग्याच्या शरीरातला स्राव काढून आजारी माणसाला एक जखम करून त्यात सोडण्याचं हे तंत्र होतं. काहीच माणसांमधे यातून प्रतिकारशक्ती निर्माण व्हायची आणि ती जगायची. बाकीची मरणाच्या दाढेत लोटली जाताना बघण्याशिवाय कुणाकडे पर्याय नसायचा.
आज हा देवीचा रोग पूर्णपणे नष्ट झालाय. त्याचं कारण आहे साथीच्या रोगांना रोखण्यासाठी लसीकरणाचं तंत्र मानवजातीला सापडलंय. त्याचं श्रेय जातं डॉ. एडवर्ड जेन्नरला. आजच्याच दिवशी म्हणजे १७ मे १७४९ला एडवर्ड इंग्लंडच्या बर्कले शहराजवळ ग्लॉस्टशायर या लहानशा गावात जन्मला. त्याचे वडील रेवरंड स्टीफन जेन्नर धर्मगुरू होते.
१३ वर्षांचा होईपर्यंत जेन्नर गावातच वाढला. १४व्या वर्षी लंडनला जॉन हंटर या सर्जनकडे शिकाऊ म्हणून तो रुजू झाला. त्याने सात वर्षं तिथं सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधे प्रशिक्षण घेतलं. १७७२मधे जेन्नर बर्कलेला परत आला. नंतरचा सगळा काळ त्यानं डॉक्टर म्हणून आपल्या जन्म गावी रुग्णसेवा केली.
या काळातही त्याचं निसर्गाबद्दलचं कुतुहल अबाधित होतं. तो कोकिळेचा अभ्यास करायचा, जीवाश्म जमवायचा. गावातल्या साध्या साध्या माणसांशी भेटत बोलत राहायचा. त्यात दूधवाल्यांपासून पाववाल्यापर्यंत सगळे लोक असायचे. एकदा सारा नॉम्स नावाची एक गवळण जेन्नरशी बोलता-बोलता म्हणाली, `आम्हा गवळणींना आमच्या त्वचेवर देवीचे वण पडून सौंदर्य गमावण्याची कसली भीतीच नसते. काऊ पॉक्स आमचं रक्षण करतात ना.`
तसा हा समज सगळ्या इंग्लंडमधे प्रचलित होता की एकदा काऊ पॉक्स होऊन गेल्यावर त्या माणसाला स्मॉल पॉक्स म्हणजेच देवीचा रोग होत नाही. जेन्नरच्या आसपासची उदाहरणंही तेच सांगत होती. गायीच्या आचळांतून दूध पिळताना त्याच्यावरच्या फोडांचा संसर्ग होऊन त्या गवळणी किंवा गवळ्यांच्या हातावर फोड यायचे. जरा चारेक दिवस ताप असायचा. इतरही बारीकसारीक लक्षणं दिसायची. हा काऊ पॉक्स असायचा.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट
कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी
कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय
एकदा या काऊ पॉक्समधून उठल्यानंतर त्या व्यक्तीला कधीच स्मॉल पॉक्स व्हायचा नाही. इकडं जेन्नरच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. तो स्वतःही वयाच्या आठव्या वर्षी देवीच्या सौम्य तडाख्यात सापडला होता. वेरीओलेशनचंच तंत्र त्याच्यावर उपचार करण्यासाठी वापरलं गेलं होतं. त्याच्या वेदना तो विसरलेला नव्हता.
ती १७९६च्या मे महिन्यातली १४ तारीख होती. कालच्या १४ तारखेला या घटनेला २२४ वर्षं झालीत. जेन्नर आठ वर्षांच्या जेम्स फिप्सकडे गेला. जेम्स गावातल्या एका माळ्याचा मुलगा होता. जेन्नरनं सारा गवळणीकडे असलेल्या गायीच्या फोडांमधला पू आणि थोडासा स्राव काढला. तो जेम्सच्या दंडावर जरा त्वचेला खरचटवत त्या जागी टोचला. जेम्स अपेक्षेप्रमाणं काही काळ काऊ पॉक्सनं आजारी पडला. त्यातून उठल्यावर जेन्नरनं देवीचा स्रावही तसाच त्याच्या त्वचेत टाकला. मात्र जेम्सला काहीच झालं नाही. काल १४ तारखेला जागतिक आरोग्य संघटनेसह साऱ्या जगानं जगातली पहिली लस टोचण्याची ही घटना सेलिब्रेट केली.
काही काळातच जेन्नरनं हेही सिद्ध केलं की काऊ पॉक्सच्या संसर्गावर मात केल्यावर देवीच्या रोगासाठीची प्रतिकारशक्तीही जेम्समधे तयार झाली होती. त्यानं रॉयल सोसायटीला १७९७ मधे आपल्या प्रयोगाबाबत बोलणारा एक प्रबंध सादर केला. त्यावर त्याला कळवण्यात आलं, ही कल्पना जरा जास्तच क्रांतिकारी आहे. त्यासाठी जरा जास्त पुरावे मिळण्याची गरज आहे.
मात्र विचलित न होता जेन्नरनं आपलं काम सुरूच ठेवलं. त्यानं स्वतःच्या ११ वर्षाच्या मुलांसह इतरही काही मुलांवर, काही मोठ्यांवर हा प्रयोग केला. १७९८मधे त्याच्या प्रयोगाचे निष्कर्ष समोर आले. त्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. जेन्नरने लॅटिन भाषेतल्या vaccaपासून आलेला वॅक्सिन हा शब्द पहिल्यांदा समोर आणला. लॅटिनमधे वेक्का म्हणजे गाय.
हेही वाचा : लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
मात्र सुरवातीला जेन्नरची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली गेली. अनेक टीकाकार, संशोधकांनी नोंदवलं की कुण्या आजारी प्राण्याच्या शरीरातला अंश माणसाच्या शरीरात टोचणं हे अतिशय अमानवी आणि अशास्त्रीय आहे. लंडनचे प्रतिष्ठित डॉक्टर या गावठी वैद्याकडे संशयाने बघायचे.
१८०२ मधे एक उपरोधिक व्यंगचित्रही प्रसिद्ध झालं. त्यात काय दाखवलं होतं माहिताय? लस टोचली गेलेल्या माणसांना गायीसारखी शिंगं उगवून आलीत आणि इतरही लक्षणं दिसताहेत. या सगळ्या वातावरणातही जेन्नर शांतपणे काम करत राहिला. वर्ल्ड सोसायटी ऑफ मेडिसिननेही जेन्नरचं संशोधन नाकारलं. जेन्नरनं निराश न होता ते स्वतःच प्रकाशित केलं.
हळूहळू लसीकरणाचे फायदे दिसू लागले. त्यातून देवीपासून संरक्षण मिळतं, हेसुद्धा सिद्ध झालं. अखेर लसीकरणाला जनमान्यता मिळाली. जेन्नरकडे लोक आदरानं बघू लागले. आणि आता त्याचा बहुतांश वेळ संशोधन आणि आपल्या लसीचा प्रचार प्रसार करण्यात जाऊ लागला. शिवाय तो पूर्वीसारखाच बागकाम आणि जीवाश्मांमधेही रमलेला असायचा.
जेन्नरच्या फ्रेडरिक ऑगस्टससारख्या काही उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या मित्रांनी त्याची इंग्लंडच्या राजाशी भेट घडवली. ब्रिटिश संसदेनं जेन्नरला १८०२मधे १० हजार पौंड तर १८०३मधे २० हजार पौंड बक्षीस दिलं. फ्रेंच जनरल नेपोलियन बोनापार्टनं आपल्या सैन्याला ही लस टोचून घेण्याची सक्ती केली.
जेन्नर शेवटपर्यंत आपल्या कामात गुंतलेला होता. आपल्या गावात त्यानं एक छोटीशी झोपडी बांधली. त्याला नाव दिलं, टेम्पल ऑफ वेक्सिनिया. इथं तो गरीब लोकांना मोफत लस तोचण्याचं काम अखंड करत राहिला. १८२३मधे त्यानं रॉयल सोसायटीसाठी त्यानं ऑब्जर्वेशन ऑन द मायग्रेशन ऑफ बर्ड्स हा निबंध लिहिला.
हेही वाचा : ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
२६ जानेवारी १८२३ला जेन्नरनं बर्कले इथं अखेरचा श्वास घेतला. १८४० साल उजाडलं तेव्हा इंग्लंडमधे लसीकरण हरेकाला सक्तीचं केलं गेलं. १९६७मधे जागतिक आरोग्य संघटनेनं मास वॅक्सिनेशन प्रोग्राम सुरू केला. आणि १९८०मधे जगातून देवीच्या रोगाचं समूळ उच्चाटन झालं.
ऑक्सफर्ड युनिवर्सिटीनं जेन्नरला एमडी पदवीनं सन्मानित केलं. युनिवर्सिटीनेच जेन्नरच्या स्मरणार्थ रॉयल जेनेरियन इन्स्टिट्यूटची स्थापना केली. हा सन्मान योग्यच होता, कारण जेन्नरच्या संशोधनामुळेच आजही दरवर्षी २० ते ३० लाख लोकांचे जीव वाचत आहेत. या जीवनदात्याला आठवतच आपला कोरोनाकाळातला मानवमुक्तीचा लढा सुरू ठेवावा लागेल.
हेही वाचा :
अनेकांतवाद हाच महाराष्ट्र विचाराचा पाया
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?
पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!
अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट
जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट
पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो
अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!