होस्नी मुबारक: इजिप्तवर ३० वर्ष हुकूम राबवणारा शांतताप्रिय सत्ताधीश!

२७ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


अरब जगातल्या इजिप्त देशावर ३० वर्ष सत्ता गाजवणारे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा २५ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पाश्चिमात्य देशात शांतताप्रिय राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मुबारक यांनी इजिप्तमधे मात्र हुकूमशाही राजवट राबवली. २०११ मधे प्रचंड हिंसक जनआंदोलनानंतर त्यांना पायउतारा व्हावं लागलं. शेवटी ‘इतिहास माझी नोंद घेईल’ असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या पश्चात घेतलेली त्यांची ही नोंद.

इजिप्त हा अरब जगतातला महत्त्वाचा देश. आखाताच्या पट्ट्यात इजिप्तचं भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचं आहे. अशा इजिप्तवर जवळपास ३० वर्ष सत्ता गाजवणाऱ्या होस्नी मुबारक यांचं राजधानी कैरो इथं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झालं. इजिप्तच्या सरकारी टीवीनं यासंबंधीची बातमी दिलीय. मुबारक यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजलं नसलं तरी जानेवारी महिन्यात त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून ते बाहेर न आल्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलं.

अरबांच्या जगात भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या इजिप्तला फारच महत्त्व आहे. सुएझ कालवा संघर्ष असो की अरब - इस्राईल युद्ध किंवा अगदी अरब लीग मधल्या घडामोडी या सगळ्यात केंद्रस्थानी इजिप्तच होता. त्यामुळेच इथले राज्यकर्ते नेहमीच अरब जगाचं नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असतात. होस्नी मुबारक हे त्यापैकीच एक.

हेही वाचा : अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?

मुबारक इजिप्तचे उपाध्यक्ष झाले

होस्नी मुबारक यांचा जन्म ४ मे १९२८ ला नाईल नदीच्या खोऱ्यात वसलेल्या एका खेडेगावात झाला. लष्करी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९४९ मधे ते इजिप्तच्या हवाईदलात भरती झाले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांच्या कारकिर्दीतल्या सुएज कालवा संघर्षाचे होस्नी मुबारक हे साक्षीदार होते. पुढे आपल्या पराक्रमाच्या जोरावर १९७२ मधे ते हवाईदलाचे प्रमुख झाले.

 १९७३ ला इजिप्त आणि सिरिया या दोन देशांच्या नेतृत्वाखाली अरब देशांनी अचानकपणे इस्राईलवर हल्ला चढवला. योम किप्पूर या ज्यूंच्या कॅलेंडरमधल्या पवित्र दिवशी इस्राईल बेसावध असल्यानं सुरवातीला सिनाई प्रांतात इजिप्तने जोरदार मुसंडी मारली. अरबांचा हा अनपेक्षित हल्ला इस्राईलसाठी मोठा धक्काच होता.

या हल्ल्याच्या नियोजनात होस्नी मुबारक यांनी प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे ते रातोरात नॅशनल हिरो झाले. याचं फळ म्हणून १९७५ मधे इजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष मोहम्मद अन्वर सादात यांनी होस्नी मुबारकांना इजिप्तचे उपाध्यक्ष घोषित केलं.

अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळवली

अन्वर सादात यांच्या 'शॉक पॉलिसी' नुसार १९७९ मधे इजिप्तने कोणाच्याही ध्यानीमनी नसताना इस्राईलसोबत 'कॅम्प डेविड शांतता करार' केला. होस्नी मुबारक यांना वैयक्तिकरित्या हा करार मान्य नव्हता. या करारामुळे अरब जग दोन गटात विभागलं जाईल असं त्यांचं मत होतं. तरीही देशाचं धोरण म्हणून हा करार पूर्णत्वास नेण्यास मुबारक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या करारामुळे चिडलेल्या इस्लामिक कट्टरपंथीयांनी १९८१ मधे अन्वर सादात यांची हत्या केली. या हल्ल्यात मुबारकसुद्धा जखमी झाले. त्यानंतर मुबारक यांनी इजिप्तची सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली आणि इजिप्तमधे आणीबाणी जाहीर केली. सादात यांच्या हत्येनंतर केवळ आठच दिवसात मुबारक इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष बनले.

होस्नी मुबारक यांनी आपल्या कारकीर्दीत इस्राईलसोबत शांततेच्या धोरणास प्राधान्य दिलं. तसंच इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधे सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दहशतवादाला विरोध केला. त्यांच्या या प्रयत्नामुळे मुबारक हे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचे एक विश्वासू सहकारी बनले. मुबारक यांच्या काळात अमेरिकेकडून इजिप्तला भरघोस आर्थिक मदत मिळत गेली.

हेही वाचा : मोदी-ट्रम्प दोस्तीच्या अमेरिकन मस्करीवर हॉटस्टारने बंदी का घातली?

मीडियाला पारतंत्र्यात ढकलणारा हुकूमशाह

अरब जगतात शांततेसाठी प्रयत्न करणारे मुबारक इजिप्तमधे मात्र एखाद्या हुकूमशहासारखे वागत. १९८७, १९९३ आणि १९९९ मधे त्यांनी सार्वमत घेतलं. म्हणजे थोडक्यात निवडणुका घेतल्या. पण या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षांच्या पदासाठी ते एकटेच उमेदवार होते. २००५ ला इजिप्तमधे त्यांनी बहुपक्षीय निवडणुका घेतल्या. पण संपूर्ण निवडणूक यंत्रणेवर त्यांचंच नियंत्रण असल्यानं त्यांनी पाशवी बहुमत मिळवलं. त्यांनी केवळ नावापुरत्या निवडणुका घेतल्या. त्यावरून आंतररष्ट्रीय स्तरावर मुबारक यांच्यावर मोठी टीकाही झाली.

मुबारक यांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून राजकीय विरोधकांचं दमन केलं, असाही आरोप त्यांच्यावर केला जातो. कुणी विरोध केला तर त्याच्यावर खटले भरून त्याची तुरुंगात डांबून छळवणूक करण्यात येत होती. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात होते. मार्शल लॉ वर भर देऊन आपल्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांनी वॉरंटशिवाय अटक करण्याचा सपाटाच लावला होता. या विरोधकांना लष्करी न्यायालयाच्या माध्यमातून कडक शिक्षा दिल्या जात होत्या.

आपल्या जवळच्या लोकांकडून होणाऱ्या भ्रष्टाचारावर त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. इजिप्तमधल्या मीडियावर त्यांचा मोठा कंट्रोल होता. तिथल्या मीडियावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर निर्बंध आणले. त्यांचं सगळं स्वातंत्र्यच काढून घेतलं होतं. मुबारक यांच्या ३० वर्षाच्या कारकिर्दीत इजिप्तमधे मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांची पायमल्ली झाली.

क्रोनी कॅपिटॅलिझम उभारला

देशामधे आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी मुबारक यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा केल्या. पण त्याचा फायदा फक्त काही उद्योगपती, लष्करी अधिकारी आणि मुबारक यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनाच झाला. अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून मदतीच्या नावाखाली आलेला प्रचंड निधी हा गरजूंपर्यंत कधी पोचलाच नाही. तो वरच्या वरच गायब होत होता. मुबारक यांच्या कुटुंबाकडे देशातल्या अमाप संपत्तीचं केंद्रीकरण झालं होतं.

त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे देशांमधे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येमुळे बेरोजगार तरुणांचं प्रमाण अधिकच होते. गरिबीची तीव्रता आणि आर्थिक विषमता वाढत होती. महागाई दुहेरी आकड्यात पोचली. २००६ नंतर रोज एखाद दुसरा कामगार संप होतच होता. मुबारक यांची राजवट ही अनियंत्रित राजवट आहो असं त्यांचं टीकाकार म्हणत असत.

मुबारक यांची राजवट क्रोनी कॅपिटॅलिझमचा उत्तम नमुना होती. देशातलं सरकार आणि देशातल्या उद्योजक, व्यावसायिकांमधे जवळचे संबंध असतील आणि सरकारच्या योजना या व्यावसायिकांच्या खिसे फुगवण्याच्या कामाला येत असतील तर त्याला क्रोनी कॅपिटॅलिझम असं म्हटलं जातं. हा भांडवलशाहीचा एक प्रकार असतो.

हेही वाचा : इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मेयर

अरब स्प्रिंगच्या वाऱ्याने व्हावं लागलं पायउतार

दरम्यान अरब जगतात 'अरब स्प्रिंग'चे वारे वाहू लागले. ट्युनिशियातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग बघताबघता इजिप्तमधे पोचली. २५ जानेवारी २०११ मधे मुबारक यांच्याविरोधात इजिप्तमधे आंदोलन सुरू झालं. यामधे तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली. त्यामधे अनेकांचा मृत्यू झाला.

आंदोलकांची एकच मागणी होती आणि ती म्हणजे मुबारक यांनी सत्तेतून पायउतार व्हावं. आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम होते. इजिप्तमधे अठरा दिवस चाललेल्या या हिंसक आंदोलनाचा रेटा बघता शेवटी परिस्थितीचा अंदाज घेऊन ११ फेब्रुवारी २०११ ला मुबारक यांनी राजीनामा दिला. इजिप्तमधे सर्वाधिक काळ सत्तेवर राहणाऱ्या राज्यकर्त्याच्या राजकीय कारकीर्दीचा एका अर्थाने हा अंतच होता.

मुबारक यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा

सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर २०१२ मधे आंदोलनादरम्यान सुमारे ९०० आंदोलकांची हत्या केल्याचा ठपका ठेवून मुबारक यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्यात कोर्टाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१४ मधे आणखी एका खटल्यात ते आणि त्यांचा मुलगा जमाल मुबारक यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या तुरुंगवासातला त्यांचा बराच काळ लष्करी हॉस्पिटलमधेच गेला. इजिप्तच्या सैन्यदलामधे मुबारक यांच्याप्रती सहानुभूती बाळगणारा एक मोठा गट होता. शेवटी २०१७ मधे इजिप्तच्या सर्वोच्च न्यायालयाने मुबारक यांची सर्व खटल्यातून निर्दोष मुक्त केली.

होस्नी मुबारक यांचे अरब जगातल्या राष्ट्रप्रमुखांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मुबारक यांचा उल्लेख 'माझा मित्र' असा केला. इस्रायलशी शांतता राखण्यासाठी मुबारक यांनी जे प्रयत्न केले त्यांचंही त्यांनी कौतुक केलं. पॅलेस्टाईनचे नेते मोहंमद अब्बास यांनीही मुबारक यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.

अरब जगात अल जझिरा या न्यूज चॅनेलने मोठी विश्वसनियता कमावलीय. या न्यूज चॅनेलने एका बातमीत होस्नी मुबारक यांची इजिप्तमधली कारकीर्द ही क्लिष्ट स्वरूपाची होती, असं म्हटलंय. ‘मुबारक यांनी संरक्षण आणि स्थैर्य यावर भर दिला. पण भ्रष्टाचार, राजकीय दडपशाही, आर्थिक समस्यांचं निराकरण करणं त्यांना जमलं नाही. गमाल अब्देल नासेर आणि मोहम्मद अन्वर सादात यांची कारकीर्द इजिप्तच्या नागरिकांच्या कायम लक्षात राहिल. या दोघांचा करिष्मा आणि त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीचा अभाव मुबारक यांच्याकडे आहे. केवळ कार्यकाळाच्या बाबतीत मुबारक हे या दोघांच्या पुढे आहेत.’

हेही वाचा : पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

इतिहास माझी नोंद घेईल

बीबीसीच्याही एका बातमीत मुबारक यांचा उल्लेख 'युद्ध आणि शांततेचा इजिप्शियन मुत्सद्दी' असा केलाय. सैनिकी पार्श्वभूमी असली तरीही अरब जगतात शांतता टिकवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. विशेषतः इस्त्राइल-पॅलेस्टाईन संघर्षामधला त्यांचा समेटाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. पण आंतरराष्ट्रीय पटलावर मुबारक यांनी शांततेचे प्रयत्न केले असले तरी अंतर्गत पातळीवर मात्र सत्तेसाठी नागरिकांभोवती पोलादी मूठ करकचून आवळून धरली होती, असंही बीबीसीच्या बातमीत म्हटलंय.

नासेर आणि सादात या इजिप्तशियन राष्ट्राध्यक्षांसारखी प्रतिमा निर्माण करायला मुबारक यांना जमलं नसलं तरी शेवटपर्यंत वचन दिल्याप्रमाणे आयुष्यभर त्यांनी देशाची सेवा केली. 'या प्रिय देशात मी जगलो, या देशासाठी मी लढलो आणि इथल्या मातीचं, सार्वभौमत्वाचं आणि हितसंबंधाचं मी कायम संरक्षण केलं. याच देशाच्या मातीत मी मरेन आणि इतिहास माझी नोंद घेईल.' असं ते २०११ मधे राजीनामा देताना म्हणाले होते. ‘हिस्ट्री विल जज मी’ हे त्यांचं शेवटचं वाक्य!  मुबारक यांच्या मृत्यूनंतर इजिप्तच्या सैन्यदलाने आपण एक 'वॉर हिरो' गमावल्याची भावना व्यक्त केलीय.

हेही वाचा : 

आखाती देश बनताहेत आत्महत्येचा सापळा

यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका

चे गवेराची मुलगी दिल्लीत येऊन काय बोलली?

फुटीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तान आंदोलनांनी अस्वस्थ

ओबीसी असल्याचं सांगणाऱ्या मोदींनीच मागासवर्गीयांचा निधी कमी केला!