एक कैफियत: मराठी साहित्य, संस्कृतीचा ठेवा रूजवणारी गझल

२१ जुलै २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे.

'एक कैफियत' हा डॉ. बाळासाहेब लबडे यांचा महाजन पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेला गझलसंग्रह आहे. गझलेचा मी साधा सर्वसामान्य आस्वादक आहे. अभ्यासक नाही. आस्वादक म्हणून मला या गझला प्रचंड आवडलेल्या आहेत. भल्याभल्यांना मात देतील अशा या गझला आहेत. या गझलसंग्रहाची अर्पणपत्रिकाही त्यांचा सहचारिणीला अर्पण केलेली आहे.

त्यांच्या गझलेत असलेली प्रेमभावना ही उत्कट स्वरूपाची आहे. शब्दयोजना अचूक प्रतिमा, प्रतिक, रूपक यांनी सजलेली आहे. गझलेचा आकृतीबंध महत्त्वाचा आहे. त्यातल्या भावना तरल आहेत. संवेदनशील आहेत. कोमल सुकोमल आहेत. शब्दकळा मृदु मुलायम असल्यामुळे ती रसिकांच्या अंतरंगाला भावणारी आहे.

तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे. प्रेम ही मुळातच उदात्त भावना आहे. तिला उजागर करणारी ही गझल महत्वपुर्ण आहे. 'प्रेयसीचं मृदू पदलालित्य म्हणजे गझल' या व्याख्येला पुरेपूर न्याय देणारी ही गझल आहे. या गझलसंग्रहात एकूण ८७ गझला आहेत. ज्या गझलांमधून जीवनाचे अनेकाविधरंग चित्रित झाले आहेत.

हेही वाचा: बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

सार्वत्रिकता गझलेचं वैशिष्ट्य

'नजर ही चोरटी धुंद ही साजणी
लाजली हासली अधर झाकाळले'

या शेरामधे स्त्री-पुरुषांच्या मनातील भाव सुंदरपणे व्यक्त झाले आहेत. ही गझल एक सुंदर भावगीत आहे, जे कोणाच्याही मनातल्या प्रेमाची भावना उजागर करेल.

'आत दिसलीस तू गायली प्रार्थना
मानले देव मी ना तुला गाळले'

अभिव्यक्ती आणि रचनेची सुंदरता या गझलेतून दिसून येते. प्रेम ही तर स्वागताची प्रक्रिया आहे. त्यांच्या गझलेचा भाव हा आर्ततेचा ईश्वरापर्यंत पोचवण्याचा आहे. गझलेचं तंत्र, दृश्य चित्र वेगळं आहे. प्रत्येक रसिकाला आपली प्रेयसी समोर दिसते ही गझलेची सार्वत्रिकता हेच त्यांच्या गझलेचं वैशिष्ट्य आहे. यात त्या गझलकाराचं यश आहे, असं मला वाटतं.

‘आत दिसलीस तू गायली प्रार्थना ’ या ओळीतच वाह!वा क्या बात! म्हणावं लागतं. इथं सच्च्या प्रियकराचं, प्रेमिकेचं, पतीचं हे निर्मळ मन आहे, ते यातून व्यक्त झालंय. आत असणारी ‘जी’ सखी आहे ती खरी आहे. ती काही गझलकार खोटी लिहीत नाही. तो प्रांजळपणे, नितळपणे, लिहितो आहे.

दिशा दाखवणारी गझल

ए. के. शेख यांची प्रस्तावना खूप महत्त्वाची ती राष्ट्रीय एकात्मता मांडणारी आहे. जर ती आत दिसेल तर तिची प्रार्थना. ही प्रार्थना जर तो सच्चेपणाने करत असेल असा गझलकार जगातला सच्चा प्रेमिक एक तो गझलकार असू शकतो. त्यांची भूमिका काय आहे? देव मानून तो तिला प्रार्थितो आहे, हे दुर्मीळ चित्र आहे जे या गझलेच्या शेरामधून येते आहे.

जगात प्रेम ही उदात्त भावना. जी त्यांच्या प्रेमविषयक गझलांमधून व्यक्त झाली आहे. जे दुर्मीळ चित्र आहे जे यातून एक कैफियतमधून येते. सुंदर गझला बाळासाहेब लबडे यांनी लिहिल्या आहेत. त्यात वैविध्यता आहे. त्यातून मानवी जगण्याची विविध रुपं, जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडलंय. हा गझल संग्रह मला प्रचंड आवडला आहे.

'ह्या वारीच्या जयघोषाचे रिंगण भरते
मी कोमल देहावर चार्‍या ढाळत जातो'

वारीची भक्ती, विठ्ठलाची भक्ती, आणि दुसरी प्रेमाची भक्ती, यात फरक आहे. तो फरक विरोधात्मकरितीने गझलकाराने मांडलेला आहे. प्रेम भक्ती आणि विठ्ठलभक्ती यांचं एकत्र नाट्य पेलणं ही गझल आहे. जी समर्थपणे बाळासाहेबांनी लिहिली आहे.

अनेकांवर मात करणारी ही गझल आहे. लबडेंच्या गझलमधले प्रश्न हे अतिशय जटिल आहेत. ते मूलभूत आहेत. यातले प्रश्न हे माझ्या मेंदूचे भूगे करणारे आहेत. त्याची उत्तरं ही वेगळी असतात. अनेक प्रकारच्या उत्तरांची दिशा दाखवणारी गझल म्हणजे बाळासाहेब लबडे यांची गझल आहे.

हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

तरीही अनेक प्रश्न अनिर्णित

'तुझ्याविना आई पुकारू कुणाला?' हा त्यांचा आईविषयीचा प्रश्न आहे. जगातल्या कोट्यवधी लोकांना या प्रश्नाचं उत्तर देता येईल का? या प्रश्नाचं उत्तर कुसुमाग्रज, माधव ज्युलियन काय किंवा कोणीही आईवर कविता लिहिणार्‍या कुणाकडेच या प्रश्नाचं उत्तर नाही हा प्रश्न अनिर्णित आहे. पण तो कवीचा अंत:करणामध्ये गूढ दडून बसला आहे.

'प्रेमही कोणती नशा आहे?' या प्रश्नाचं उत्तरसुद्धा कोणी देऊ शकत नाही. ही सफलता आहे की विफलता आहे. याचं उत्तर हे ज्याचे त्याने ठरवायचं आहे. ‘शपथेवर भरवसे ठेवू कसे?’ या ओळीतून कोनावर भरवसा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सामाजिक, राजकीय, व्यक्तीच्या बोलण्यावर भरवसा ठेवायचा का? हा खरा प्रश्न आहे. 'माणसाने तोडल्या का सान गर्भातील कलिका?' हा त्यांचा प्रश्न तर मनातून आहे.

ईश्वराला प्रेयसी असणं ही तर अफलातून कल्पना आहे, जी त्यांनाच सुचू जावो. भयंकर प्रतिभेचा हा गझलाकार आहे. माणूस मारण्यासाठी असतो का? संस्कृतीचं वय का? सुसंस्कृत विकसित माणसं अशी का वागतात? हा खरा प्रश्न आहे. माणूस हा किती क्रूर होतो आहे? सगळे नातेवाईक कुठे असतात? अशावेळी दुसरा एक सनातन प्रश्न आहे का पोसते ही कीड जनता? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

संस्कृतीला जागं करणारा गझलकार

माणसाच्या मनाला एक मन असतं. माणसं का रडतात? एक अनामिक वेदना, जी वेदना बालकवीला जाणवली तीच वेदना बाळासाहेबांना जाणवली. कितीही मोठा माणूस असला तरी तो वेदनेने रडत असतो. बाळासाहेब हे खोलवर लपलेली सललेली बोचलेली वेदना मांडतात.

'वर वर जशी खरी नसतात माणसे
जर खोदली भुते असतात माणसे'

जीवनाला उलटंपालटं करून मांडणारा गझलाकार म्हणजे बाळासाहेब लबडे जो सत्य मांडतो आहे. ते सत्य आपल्या अंगावर येतं पण ते मान्य करण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही. माणसांमधे सावकारी वाढलेली आहे हे सत्य ते मांडतात. प्रश्न पडला पाहिजे. तो मांडला पाहिजे. उत्तरं नंतर पाहू.

संस्कृतीला गदागदा हलवणारा हा गझलाकार आहे. जो तुमच्या आमच्या मनातले प्रश्न, सल मांडतो आहे. वेगळ्यापणाने, दाहकपणाने मांडतो आहे. तुकारामांनी काठी म्हणून आपल्या अभंगात रांगडे शब्द का वापरले? हा महत्त्वाचा प्रश्न गझलाकाराने विचारला आहे. तुकारामांनी जे शब्द वापरलेत ते विद्रोही आहेत. तसेच शब्द महात्मा फुले यांनी ही वापरले आहेत. अशा प्रकारचा सात्त्विक संताप का येतो आहे? हा प्रश्न गझलाकाराने उभा केला आहे.

गाथा ही पुन्हा एकदा वाचली पाहिजे. गाथेमधेच त्याचं उत्तर मिळेल अशी आशा गझलकाराला आहे. गाथा ही लोकांचं मन आहे. चरित्र आहे. ‘मी एकटा किती करणार एल्गार' ही मर्यादा या गझलाकारास माहीत आहे. त्या मर्यादित राहून हा गझलाकार लिहितो आहे हे महत्त्वाचं आहे.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

गझलेत शांतीचा संदेश

डॉ. लबडे यांच्या गझलेला चिंतनाची डूब आहे. माणसात जी भुतं लपलेली आहेत त्याचा शोध लबडे यांनी घेतला आहे. स्मशानातच भुतं असतात असं नाही तर माणसातही भुतं असतात हा लौकिक विचारही गझल मांडते.

माणसं जे माणसांचे गळे कापतात. युद्ध होतं. माणूसच माणसाला संपवतोय ही भुताटकी आहे. जगाचा विनाश युद्धात आहे. ही गझल शांतीचा संदेश देते. समाजातला जातिभेद नष्ट झाला पाहिजे असं प्रामाणिकपणे गझलाकाराला वाटतं, त्यामुळे तो म्हणतो -

'मानेल लोकास भावंडेच आम्ही
घट्टी झाली जात छळते वेस बापू'

वेस छळते. गावाबाहेरच्या लोकांना आत येऊ देत आहे. मनात भेदभाव आहे. जात आहे. समाजात ही विषमता- विसंवाद आहे. माणसांचं हे वागणं अस्वस्थ करणारं आहे. माणसांची मूळं माणसं कापत आहेत. 'ओल हैराण मातीत माझील' ती छळते आहे.

साहित्य, संस्कृतीचा ठेवा

गझल माणसाला आतून हलवते आणि संस्कृतीला ती अंतर्मुख व्हायला लावते हे या गझलेचं यश आहे. सुरेश भटांच्या वारशामधे बाळासाहेब लबडेसारखे चांगले गझलाकार पुढे येत आहेत ही महत्त्वाची घटना आहे, ते म्हणतात -

'काळ्या अंधाराला आता तुडवत गेलो
दु:खालाही मी सोन्याने मढवत गेलो'

ही अंतरीची वेदना आहे जी बाळासाहेब लबडे यांनी प्रभावीपणे मांडली आहे. त्याच्या अनेक गझला प्रभावी आहेत त्यातले काही शेर पाहता येतील - 'एवढी ही शेवटी घ्यावी सलामी मालकांनो, राहिल्या हो मारण्याला फक्त तुटक्या या वहाना' असे कितीतरी शेर सांगावेत तेवढे कमीच आहेत. त्याबद्दल मला काय सांगावं हे कळत नाही.

‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा गझल संग्रह आहे. या गझल संग्रहाने मराठी गझल समृद्ध झाली आहे. ही शुद्ध अंत:करणाची, साहित्य, संस्कृतीचा ठेवा रुजवणारी ही गझल आहे.

गझलसंग्रहाचे नाव: एक कैफियत
गझलकार: प्रा. बाळासाहेब लबडे
प्रकाशन: महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे
पानं: १०४ किंमत: २१०

हेही वाचा:

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?