शिंदे, ठाकरे संघर्ष शिवसेना नावाच्या ब्रँडसाठी!

१७ जुलै २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटं पाडण्यासाठीच या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली आहे. शिंदे गटाला आता उद्घव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ब्रँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती केवळ ही छत्री चालावी म्हणून!

शिवसेनेतल्या बंडाळीचा दुसरा अंक न्यायालयात आणि तिसरा जनतेच्या न्यायालयात सादर होईल. महाराष्ट्राला या दोन्ही अंकांची प्रतीक्षा आहे. तोपर्यंत या बंडाळीचं बोट धरून जी सोंगं सादर होतायत त्यावरून उद्याचा अंदाज बांधता येतो.

बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून संघर्ष सुरू आहे. उद्धव यांच्या बाजूने ठाकरे आडनाव आहे आणि शिवसैनिक ज्याला तीर्थक्षेत्र मानतात ते ‘मातोश्री’ निवासस्थान आहे. याचा अर्थ साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं अधिष्ठान त्यांंच्या मागे भक्कम उभं आहे. असं अर्थात उद्धव यांना वाटतं. शिंदे तसं मानत नाहीत. कोण ठाकरे, असा उद्दाम सवाल फक्त त्यांनी केलेला नाही; मात्र त्याही पुढे जात आम्हीच शिवसेना आहोत, आमचीच शिवसेना खरी, असं शिंदे सतत सांगत आहेत.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी शिंदे दिल्लीत गेले तेव्हा शिंदे यांचे सूत्रसंचालक देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलेलं विधान मोठं सूचक आहे. ‘आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेशी युती केली आहे,’ असं फडणवीस म्हणाले. थोडक्यात, ठाकरेंना पूर्णत: बाद करायचं आणि शिवसेना हायजॅक करायची याचा पूर्ण आराखडाच शिंदे गट आणि भाजपने मिळून तयार केलेला दिसतो. त्याचे शिवसेनेवर होणारे परिणाम हळूहळू दिसू लागलेत.

हेही वाचा: उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

शिंदेनिष्ठेचं शक्तिप्रदर्शन

शिंदे गटाला जाऊन मिळाले म्हणून आमदार संतोष बांगर यांची हकालपट्टी उद्धव ठाकरे यांनी केली. शिंदे सरकार सत्तारूढ होईपर्यंत बांगर यांची आमदार म्हणून हकालपट्टी शिवसेनेने केली नाही. परवा बांगर यांची हकालपट्टी झाली ती हिंगोलीचे जिल्हाप्रमुख म्हणून. शिवसेनेच्या पक्षरचनेत पक्षप्रमुख, शिवसेना नेता, उपनेता, संपर्कप्रमुख या पदांनंतर पाचव्या क्रमांकाचे हे पद आहे. या पदावरून हकालपट्टी होताच बांगर यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिले.

ते म्हणाले, ‘मला जिल्हाप्रमुखपदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही.’ मग, कुणाला आहे? बांगर मग गाड्यांचा मोठा ताफा घेऊन मुंबईत धडकले. परंपरेनुसार त्यांचं शक्तिप्रदर्शन ‘मातोश्री’बाहेर किंवा शिवसेना भवनासमोर व्हायला हवं होतं. बांगर यांनी त्यासाठी मलबार हिलचं सह्याद्री विश्रामगृह निवडलं. कारण, शिंदेनिष्ठेचं शक्तिप्रदर्शन करणारे बांगर आपले वर्‍हाड घेऊन मुंबईत धडकले ते मंत्रिपदासाठी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांना सामोरे गेले. हिंगोलीच्या जिल्हाप्रमुखपदी बांगरच राहतील, अशी घोषणा शिंदे यांनी केली. ती कोणत्या अधिकारात? शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख कधी झाले? की सेनेचे ४० आमदार फोडले म्हणजे शिवसेनेचा सातबाराच नावावर झाला? याची उत्तरं मागायला जाल तर न्यायालयाकडे बोट दाखवलं जाईल.

शिवसेना ताब्यात घ्यायची योजना

मुळात शिवसेना कुणाची, याचा फैसला न्यायालयात प्रलंबित नाही. तिथं तो होणारही नाही. निवडणूक आयोगाच्या समोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमनेसामने उभे ठाकतील तेव्हाच हा फैसला होईल. याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या दप्तरी आणि कायद्याच्या कोणत्याही कक्षेत शिवसेनेचे पक्षप्रमुख आज तरी उद्धव ठाकरे आहेत.

उद्धव यांनी एका जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी करायची आणि शिंदे यांनी त्याला पुन्हा जिल्हाप्रमुख म्हणून बसवायचं यातून बंडखोरांना काय साध्य करायचं आहे? शिवसेनेवर उद्धव ठाकरे यांचं उरलंसुरलं नियंत्रण खिळखिळं करायचं आणि शिवसेना नावाचा हा ब्रँड ताब्यात घ्यायचा अशी शिंदे गटाची योजना दिसते.

बांगर प्रकरणाने जे चित्र शिवसेनेचं उभं राहिलं ते विचित्र आहे. पक्षशिस्त मोडून पडली आहे. पक्ष, पक्षप्रमुख, पक्षाचं बंधन म्हणा की, शिवबंधन यांना महत्त्व राहिलेलं नाही. शिंदे गटाला सामील होणारा शेवटचा शाखाप्रमुखही उद्धव ठाकरे काढून टाकतील आणि शिंदे त्याला पुन्हा शाखाप्रमुख म्हणून बसवतील.

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

महासत्तेशी ‘प्रासंगिक करार’

शिंदे गटाला उद्घव ठाकरे नकोत. ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ‘ब्रँड’ म्हणून शिवसेना मात्र हवी आहे. हीच संथा शिंदे यांनी आपल्या पाठीराख्यांना दिली. त्यातून शिवसेना विस्कटण्याची स्थिती निर्माण होऊ पाहतेय. पक्षप्रमुखाला कुणी जुमानत नाही, पक्षादेश चालत नाहीत. ठाकरे हाकलतील तर शिंदे पुन्हा बसवतील, हा संदेश हिंगोलीतून देत अख्खी शिवसेना संभ्रमित करून टाकण्याचा डाव शिंदे गटाने टाकलेला दिसतो.

आज जे सुरू आहे त्यात कडवट शिवसैनिक आहेत कुठे? शिंदे गटाचं बंड आणि त्याविरुद्ध निकराने झुंजणारा पक्षसेनानी ही तुंबळ हा सैनिक आखाड्याबाहेर बसून पाहतो आहे. यातून शिवसेनेची पक्षाघाती अवस्था होऊ घातली आहे. या पक्षाघातातून शिवसेना बचावली, तरी ती रांगणारी, सरपटत चालणारी शिवसेना उद्या खुद्द शिंदेंच्याही उपयोगाची नसेल. अर्थात, आज महासत्तेशी ‘प्रासंगिक करार’ असल्यामुळे हा धोका त्यांच्या लक्षात येण्याचं कारण नाही.

प्रासंगिक करारवाले शिवसैनिक

शिंदे गटाच्या बंडाळीत हा नवा शिवसैनिक समोर आला. अलीकडेच शिवसेनेत आलेले आणि लगेच राज्यमंत्री झालेले कडवट शिवसैनिक अब्दुल सत्तार सुरतेतून शिवसेनेवर स्वारी करण्यासाठी रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना भेटले. गप्पागप्पांत म्हणाले, ‘आमचा तिकडचा म्हणजे शिवसेनेसोबतचा ‘प्रासंगिक करार’ संपत आलाय.’ तिथंच उपस्थित असलेल्या जयंत पाटलांच्या तो संकेत लक्षात आला. ‘तिकडचा संपला असेल तर आमच्याकडे या’, असं आवतन त्यांनी सत्तारांना दिलं; पण सत्तार आधीच शिंदे गटाचं निमंत्रण घेऊन बसलेले होते.

सत्तेसाठी प्रासंगिक करारावर शिवसैनिक होणारी अशी माणसं शिवसेनेत घेऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कारभारी चौकडीने संघटनेचं किती मोठं नुकसान केलं, याचं हे उदाहरण. दीपक केसरकर, उदय सामंत, शंभूराज देसाई, तानाजी सावंत असेच प्रासंगिक करारवाले शिवसैनिक. आयुष्य वेचणाऱ्या शिवसैनिकांना डावलून अशा हिशेबी शिवसैनिकांना सेनेने सरकारमधे बसवलं. या प्रासंगिक करारवाल्यांनीच मोठा कठीण प्रसंग शिवसेनेसमोर आज उभा केला. कारण, त्यांचा प्रासंगिक करार आज साक्षात महासत्तेशी आहे.

'एकनाथ शिंदे म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना' असं प्रमाणपत्र जेव्हा फडणवीस देतात तेव्हा त्यांच्या मुखातून साक्षात महासत्ताच बोलत असते. सध्या सरकारमधे शिंदे आणि फडणवीस दोघेच आहेत. फडणवीस शिंदे यांना सोबत घेऊन जाताना पाहिलं की, अण्वस्त्रांचा, महासंहारक क्षेपणास्त्रांचा रिमोट कंट्रोल ठेवलेली सूटकेस घेऊन फिरणारे महासत्तांचे प्रमुख आठवतात. फडणवीस आता कोणतं बटण दाबणार आणि कोणतं क्षेपणास्त्र आदळून शिवसेनेची आणखी किती शकलं उडवणार, याचा भरवसा  नाही.

हेही वाचा: राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

हिंगोलीचा वेगळा पॅटर्न

या संकटात शिवसेनेला, ठाकरेंना फक्त शिवसैनिकच तारू शकतो. बांगर यांच्या शक्तिप्रदर्शनाची हवाच सोडून देणाऱ्या हिंगोली जिल्ह्याने ही आशा जागवली. बांगर सह्याद्रीवर आपली ताकद दाखवत असताना हिंगोली जिल्ह्यातल्या सेनेचे पदाधिकारी उद्धव यांच्यासोबत शिवसेना भवनात दणदणीत बहुमताने उपस्थित होते.

हिंगोलीतल्या ५ तालुका प्रमुखांपैकी ४ तालुकाप्रमुख ठाकरेंसोबत आणि  केवळ एक तालुकाप्रमुख शिंदेंसोबत होते. पाचही  उपजिल्हा प्रमुख शिवसेना भवनात होते. १५ जिल्हा परिषद सदस्यांपैकी १४ जण ठाकरेंसोबत आणि १ शिंदे यांच्यासोबत होते.

सेनेच्या राजकारणात परभणी हे वेगळं रसायन आहे आणि हिंगोली जिल्हा परभणीतूनच जन्माला आला असल्यामुळे हे रसायन हिंगोलीतही भिनलेलं दिसतं. बंडखोरांना धुळीस मिळवून इथं नवं नेतृत्व नेहमीच उभं राहात आलंय. खासदार अशोक देशमुख, सुरेश जाधव ज्यांना आठवत असतील त्यांना हा संदर्भ लक्षात यावा.

शिंदे छत्रीमागे दिल्लीश्वर

जिल्ह्याजिल्ह्यातले शिवसैनिक शिवसेनेमागे, मातोश्रीसोबत असेच एकवटतील का? प्रश्न आहे. शिवसेनेशी जी फंदफितुरी केली त्याला शिंदे गट बंड म्हणत नाही. हा उठाव आहे असं शिंदे मुंबईत म्हणाले. दिल्ली दरबारी दाखल झाल्यानंतर म्हणाले हा नुसता उठाव नाही, ही शिवसेनेत झालेली क्रांती आहे.

कडवट शिवसैनिकाने या फितुरीला शिंदळकी ठरवलं तर आणि तरच शिवसेना नावाचा ब्रँड ठाकरेंकडेच राहील. तो स्वतःकडे राखणं आज उद्धव यांच्यासाठी फार कठीण आहे. कारण शिवसैनिकांना देण्यासारखं उद्धव यांच्याकडे तूर्त  काही उरलेलं नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे मात्र महाशक्ती आहे, साक्षात देवेंद्र आहेत आणि त्यांच्या त्यागातून लाभलेली सत्तेची छत्री आहे.

लाभाची पदं मिळणार म्हणून ठिकठिकाणचे सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक या 'शिंदे छत्री' खाली उद्या गोळा झाले तर तो चमत्कार नक्कीच नाही! कारण शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटे पाडण्यासाठीच तर या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना  दिल्लीश्वरांनी केली. शिवसेनाप्रमुखांचं मंतरलेलं, भारलेलं सभापर्व उभं करणारा शिवसैनिक ही 'शिंदे छत्री' झुगारून देत शिवसेनेच्या भगव्याखाली, मातोश्रीसोबत उभा ठाकला तर तो मात्र ठाकरी चमत्कार ठरेल!

हेही वाचा: 

प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीने फडणवीसांचे सत्तास्थापनेचे मनसुबे उधळले

पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती

संघर्ष करायचा की शरणागती पत्करायची, हे ठाकरे कुटुंबाला ठरवावं लागेल

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही