महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास

२१ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय.

भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत पुन्हा चर्चेला उधाण आलंय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ज्यांच्याशी वार्षिक करार केला जाणार आहे त्यात धोनीचा समावेश केला नाही. त्यामुळे धोनीला निवृत्तीचा इशारा देण्यात आलाय का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. बीसीसीआयने आपल्या धोरणानुसार खरं तर हा निर्णय घेतलाय.

वर्ल्डकपनंतर धोनीने मॅचच खेळली नाही

क्रिकेट वर्ल्डकप संपल्यापासून धोनीने एकही मॅच खेळली नाही. अशावेळी बीसीसीआय त्याच्याशी कसा काय करार करणार? हा साधा प्रश्न आहे. पण धोनीला अपवाद करायला हवं. कारण तो असामान्य आहे आणि त्याचं कर्तृत्व मोठं आहे असा अनेकांचा यावर जबाब आहे. पण मंडळ असं कुणाहीबाबत अपवाद ठरवायला निघत नाही.

भारतात एखाद्याची प्रदीर्घ कारकीर्द झाली की त्याला प्रतिपरमेश्वर मानलं जातं. आणि त्याने कधीच निवृत्त होऊ नये अशी त्याच्या असंख्य चाहत्यांची इच्छा असते. पण हा बालिशपणा झाला. खेळाडू कितीही गुणी आणि कर्तृत्ववान असला तरी शेवटी वय त्याला गाठतंच आणि त्याची शारीरिक क्षमता कमी होतेच. याला कुणीही अपवाद ठरूच शकत नाही. त्यामुळे तो खेळाडू खेळत रहावा असं कितीही वाटत असलं तरी ते संघहितासाठी उपयुक्त ठरत नाही.

क्रिकेट हा शेवटी सांघिक खेळ आहे हे चाहत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा खेळाडूनेसुद्धा आपण टीमवर बोजा तर झालो नाही ना याचं भान ठेवायला हवं. शेवटी निवृत्तीचा निर्णय हा ज्याचा त्याने घ्यायचा असतो. तो घेणं जड जातं हे खरंय. लहान वयापासून ज्या खेळात आपण रमलेले असतो आणि ज्या खेळाने आपलं आयुष्य बदलून टाकलेलं असतं त्या खेळाला झटक्यात सोडायचं ही गोष्ट सोपी नसतेच. तरीही समंजसपणे निवृत्ती स्वीकारून तरुण होतकरूंना संधी द्यायचा वेळीच विचार जो खेळाडू करतो तोच मानात रहातो.

हेही वाचाः सलग २१ ओवर निर्धाव टाकणाऱ्या बापू नाडकर्णींची लाईफ जर्नी सांगणारी मुलाखत

निवृत्त का झालास की निवृत्त कधी होणार?

विजय मर्चंट नेहमी सांगायचे ‘तू निवृत्त का झालास?’ हा प्रश्न मला विचारला गेला पाहिजे. ‘तू निवृत्त कधी होणार?’ हा नाही. स्वतः विजयभाई एक तंत्रशुद्ध ओपनर म्हणून यशस्वी झालेले असताना त्यांनी स्वतःहून निवृत्तीत घेतली. म्हणजे त्यांनी नुसतं वाचाळवीर व्हायचं टाळलं. हाच आदर्श ठेऊन महान सुनील गावस्कर यांनीसुद्धा फारशी चर्चा होण्याआधीच निवृत्त व्हायचा निर्णय जाहीर केला. १९८८ मधे पाकिस्तानविरुद्धची चेन्नईत टेस्ट मॅच खेळताना त्याने झुंजार ९६ रन्स काढले. आणि सांगितल्यानुसार त्याने ही आपली शेवटची टेस्ट मॅच ठरवली.

सर्वांनाच असं जमत नाही. गुंडाप्पा विश्वनाथ आणि अगदी कपिलदेव यांनी निवृत्त व्हावं असं सारखं म्हटलं जात होतं. कपिलदेव सर्वाधिक कसोटी बळींच्या विश्वविक्रमासाठी तरसत होता. शेवटी शेवटी त्याला झपाझप बळी मिळत नव्हते. पण एकदाचा तो रिचर्ड हेडलीच्या विक्रमाच्या भोज्याला शिवला आणि त्याला लगेचच निवृत्त व्हावं लागलं.

द्रविडने दाखवला बीसीसीआयला इंगा

महान सचिन तेंडूलकर बाबतही निवृत्तीची चर्चा २०११ च्या वर्ल्डकप विजयानंतर लगेच सुरु झाली. मग २०१३ मधे विंडीजला भारतात पाचारण करण्यात आलं आणि मुंबईत घरच्या प्रेक्षकांसमोर टेस्ट खेळत सचिनने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सर्वांचा निरोप घेतला. संदीप पाटील तेव्हा निवड समितीचा अध्यक्ष होते. संदीप आणि सचिन दोघांमधे निवृत्तीच्या विषयावर चर्चा झाल्याच्या बातम्यांनी तेव्हा धुमाकूळ माजवला होता.

राहुल द्रविडने बाणेदारपणे निवृत्त होताना जेव्हा त्याला वन डे टीममधे फार वर्षांनी निवडलं होतं तेव्हा आपला इंगा दाखवला होता. आणि आपण निवृत्त झाल्याचं सांगत त्याने निवड समितीला चपराक दिली होती. लक्ष्मण आणि अनिल कुंबळे यांना आपला फॉर्म जात चालल्याची जाणीव झाली आणि त्यांनी वेळीच निवृत्ती जाहीर केली.

मात्र सौरव गांगुलीला खूप आधीच प्रशिक्षक पदावर नेमलेला ग्रेग चॅपेल निवृत्त करायला निघाला होता. गांगुली त्याला पुरून उरला. त्याने भारतीय टीममधे पुनरागमन केलं आणि नागपूरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली शेवटची टेस्ट मॅच असल्याचं त्याने सांगितलं. या टेस्टमधे त्याने ८५ आणि ० रन काढले. पण कॅप्टन धोनीने ही मॅच जिंकायला भारताला जेव्हा एका विकेटची गरज होती तेव्हा गांगुलीला नेतृत्व करायचा मान दिला होता.

हेही वाचाः फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?

गांगुली आणि धोनी यांच्यातलं राजकारण

विशेष म्हणजे धोनी आणि गांगुली तसंच इतर ज्येष्ठ खेळाडू म्हणजे सचिन, द्रविड, कुंबळे, लक्ष्मण यांच्यात एक दरी निर्माण झाली होती. मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी क्षेत्ररक्षणात चपळ असलेले खेळाडू उपयुक्त ठरतात. नुसते रन काढणारे बॅट्समन नाही. असा धोनीचा रोख होता. तो सरळ सरळ या वय झालेल्यांना उद्देशून होता. हे ‘तत्व’ लक्षात घेऊन या सर्वच समंजस खेळाडूंनी एका पाठोपाठ एक निवृत्त होणं पसंत केलं.

गंमत म्हणजे धोनी तसा नवखा असूनही त्याच्याकडे टीम इंडियाची कॅप्टनशीप द्यायला निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष असलेल्या दिलीप वेंगसरकरला सुचवणारी हीच मंडळी होती. आता स्वतः धोनी थकल्याचं स्पष्ट होतंय आणि नेमका सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. साहजिकच धोनीला आता फार काळ सहन केलं जाणार नाही.

ऑस्ट्रेलियाकडून शिकावं प्रोफेशनलिझम

भारतात बीसीसीआय पुढाकार घेऊन श्रेष्ठ ठरलेले खेळाडू असतात त्यांना विश्वासात घेऊन आधी सांगत नाहीत की आता तुम्हाला थांबायचंय. निवड समितीसुद्धा असा खेळाडू आता फारसा टिकणार नाही हे लक्षात घेऊन तरतूद करायला म्हणजे दुसऱ्या कुणाला तयार करायचा प्रयत्न करत नाही. ऑस्ट्रेलियात मात्र पक्का व्यावसायिकपणा जपला जातो.

ऑस्ट्रेलियात अलन बॉर्डर नंतर मार्क टेलर, मग स्टीव वॉ, नंतर रिकी पाँटिंग मग मायकेल क्लार्क आणि पुढे स्टीव स्मिथ यांच्याकडे अगदी सुलभरीत्या नेतृत्व सोपवलं गेल्याचं दिसून आलं. आधीच्या कॅप्टनला कधी थांबायचं ते समजावलं जातं. आणि सफाईने त्याची जागा घेईल असा दुसरा कुणी तयारही केलेला असतो. ही साखळी ठेवल्याने ऑस्ट्रेलिया बरीच वर्ष क्रिकेट विश्वात आपला दबदबा राखून आहे.

भारतात हिशोब चुकवण्याचं, सुडाचं वाटावं असं राजकारण सर्वच बाबतीत चालतं. खेळाडूसुद्धा लोभी आणि स्वार्थी झालेत. निवृत्त झाल्यावर दर सामन्यागणिक मिळणारा पैसा तर थांबतोच शिवाय पुरस्कर्ते, जाहिरातकर्ते हेही दूर जातात. प्रत्येक पुरस्कर्ता आणि जाहिरातकर्ता हा खेळाडूशी करार करताना पहिली कुठली अट ठेवतो तर ती असते जोवर हा खेळाडू टीम इंडियात आहे तोवर हा करार लागू राहील ही. साहजिकच हे श्रेष्ठ बनलेले खेळाडू आपल्या निवृत्तीचा निर्णय जेवढा पुढे ढकलता येईल तेवढा बघतात.

हेही वाचाः जगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे

खेळावरच्या प्रेमाचं काय करायचं?

रणजी, दुलीप स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंविषयी तर कुणालाच आस्था नसते. त्यांनी कधी निवृत्त व्हावं कधी नाही याबाबत कुणी त्यांना सांगत नाही. मुंबईचा एक यशस्वी फास्ट बॉलर होता अब्दुल इस्माईल. तो आणि पांडुरंग साळगावकर या दोघांना भारतीय निवड समितीच्या चुकीच्या धोरणामुळे टेस्टमधे खेळायची संधी कधीच मिळाली नाही. तर जेव्हा इस्माईलने रिटायरमेंट घ्यायचं ठरवलं तेव्हा त्याच्या नावावर रणजी स्पर्धेत १९८ बळी होते. 

इस्माईलने आपलं रिटायरमेंटचं पत्र मुंबई क्रिकेट असोशिएशनकडे दिलं. हे पत्र शांतपणे स्वीकारले गेलं आणि फाईल केलं गेले. इस्माईल अजून काही काळ खेळण्याच्या क्षमतेचा होता. पण इथे कुणाला याबाबत आस्था तर हवी होती. ज्यामुळे त्याची निवृत्ती रोखली गेली असती. तेव्हा भारतात दोन्हीकडून चुका होताना दिसतात. खेळाडू एक तर नको तितके ताटकळतात आणि दुसरीकडे मंडळ आपल्याकडून त्यांना विश्वासात घेत नाही. जोवर सुवर्णमध्य निघणार नाही तोवर महान ठरलेले खेळाडू केविलवाणेपणे निवृत्त झालेले दिसणार आहेत.

अर्थात ज्यांचं खेळावर प्रेम असतं ते नंतर कॉमेंटरेटर, कॉलमिस्ट, अम्पायर, मॅच रेफरी म्हणून निवड समिती सदस्य, प्रशिक्षक अशी कुठली तरी भूमिका घेऊन खेळाशी संबध ठेऊन राहतात. सर्वांना हे जमतंच असं नाही. खेळावरच्या प्रेमाला मात्र काहींच्या बाबतीत सीमा नसते. या दृष्टीने एकच उदाहरण देता येईल. विजय मांजरेकर. हे महान बॅट्समन होते. त्यांचं क्रिकेटवर भारी प्रेम होतं. निधनानंतर त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्या बॅट्स चितेवर ठेवल्या गेल्या होत्या. खेळावरचं एखाद्याचें प्रेम हे एवढं अफाट असू शकतं.

धोनी ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्डकपमधे खेळण्यासाठी उत्सुक आहे. आज तो करारासाठी अपात्र ठरला असेल. पण टीममधे निवड होण्यासाठी अपात्र ठरलाय असं म्हणता येत नाही.

हेही वाचाः 

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

कपिल देव: भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा 'देव'

सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल?

अंबाती रायडूमधेच तोंडावर राजीनामा फेकून मारण्याची हिंमत