प्रत्येक माणसात सांताक्लॉज असतोच!

२५ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


नाताळ या सणाचं खासकरुन लहान मुलांमधे आकर्षण असतं. सांताक्लॉजकडून मिळणाऱ्या गिफ्टची मुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. अनेकदा सांताक्लॉज म्हणून अभिनय करणारा नट इवेंट मॅनेजमेंट कंपनीकडून पुरवला जातो. पण खरंतर दया, करुणा, मुलांविषयी प्रेम मनात असेल तर कुणीही सांताक्लॉज होऊ शकतं.

सांताक्लॉज ही एक सर्वांसाठी आनंददायी अशी कल्पना. छान लाल पोशाख करून येणारा, डोक्यावर निमुळती टोप घालणारा, गुबगुबीत असा हा सांताक्लॉज प्रत्येकाच्या घरी येतो आणि छान भेटवस्तू ठेऊन जातो असा ख्रिस्ती धर्मियांमधे समज आहे. नाताळची भेट देणाऱ्या या सांताक्लॉजची विशेष करून लहान मुलं आतुरतेने वाट बघत असतात. रात्री झोपताना त्याचीच स्वप्न घेऊन झोपतात.

आज रात्री नाताळ उत्सव सुरु होत असताना तो येईल आणि आपल्यासाठी भरपूर गिफ्ट ठेऊन जाईल असं गोड स्वप्न बघत बहुतेक लहान मुलं नाताळच्या रात्री झोपतात. सकाळी सर्वात आधी त्यांची शोधक नजर काय बघत असेल तर सांताक्लॉजने आपल्यासाठी काय काय ठेवलंय. त्याने आपल्याला आवडणाऱ्या भेटवस्तू ठेवलेल्या असतील तर मुलांची कळी खुलते आणि बहुधा हा सांताक्लॉज त्यांना निराश करत नाही.

त्यांना खूप खूप आवडणाऱ्याच नेमक्या भेटवस्तू देऊन तो गेलेला असतो. आपल्याला काय आवडतं ते त्या नाताळबाबाला कसं काय समजतं याचं कुतूहल या मुलांना लागून राहतं. त्यांच्या नाताळ उत्सवाची सुरवात आनंदाने होते. नाताळ सण वारंवार यावा असं त्यांना वाटत रहातं. बरोबर वर्ष संपत असताना सांताक्लॉज म्हणजेच नाताळबाबा येऊन जातो. म्हणून त्याच्या मनातही ‘पुढच्या वर्षी लवकर ये’ अशा तऱ्हेच्या भावना उमटतात. अर्थात नाताळबाबा यायचं तेव्हा वर्षाच्या शेवटीच येतो.

सांताक्लॉज झाला कॉर्पोरेट

नाताळबाबाची माहिती मुलांनी वाचलेली, ऐकलेली असते. लांब सफेद दाढी, मिशा राखणारा, गोबऱ्या गालांचा, चमकदार डोळ्यांचा, कनवाळू असा हा नाताळबाबा नाताळच्या काही गोष्टीही सांगून जातो. चॉकलेट, बिस्किट, केक, खेळणी, शोभेच्या वस्तू याचं मुलांना आकर्षण असतं. या गोष्टी सहज कुणी आणून देतो त्याच्या ते प्रेमात पडतातच आणि असा कुणी देणारा त्यांच्यातलाच होऊन नाचणारा, गाणारा असेल तर त्यांच्या आनंदाला पारावार रहात नाही. सांताक्लॉज म्हणूनच मुलांमधे अतिशय लोकप्रिय असतो.

अलिकडे प्रत्येक उत्सव हा कॉर्पोरेट पद्धतीने साजरा होऊ लागलाय. त्याला नाताळ अपवाद नाहीच. नाताळ सर्व धर्मीय साजरा करू लागल्याची परिस्थिती आहे. मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसोर्ट सगळीकडे आता नाताळच्या वेळी गर्दी असते. त्यात मुलंही असतात. त्यांच्या आकर्षणामधे वाढ करण्यासाठी हमखास सांताक्लॉजची योजना केली जाते. सांताक्लॉज सारखा पेहराव केलेल्याला अशा ठिकाणी नेमलं जातं.

साहजिकच त्याच्याभोवती मुलांचा वेढा पडतो. तो आपल्या लोकरीच्या पोतडीतून भेटवस्तूंची खैरात करतो. गर्दी खेचण्यासाठीची ही योजनापूर्वक वापरली जाणारी युक्ती आहे. पण इवेंट मॅनेज करणाऱ्या संस्थां यासाठी खूप कष्ट घेतात. त्यांना सांताक्लॉज खराखुरा वाटावा यासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी लागते.

हेही वाचा : ९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती?

एकावेळी किती सांताक्लॉज?

सांताक्लॉज म्हणून एखाद्याची निवड करताना डोळे कनवाळू आहेत, गाल बऱ्यापैकी गोल आहेत, जो उंच, अंगाने भरलेला आहे, ज्याला थोडं फार अभिनयाचं अंग आहे, जो कॅरोल ही नाताळची कविता म्हणू शकतो, अशा व्यक्तीला पसंती दिली जाते. या सांताक्लॉजला मानधन दिलं जातं. ज्या ठिकाणी सांताक्लॉज नेमला जातो तिथून ताशी दराप्रमाणे पैसे घेतले जातात. काहीजण व्यक्तीशः सांताक्लॉज घरी आणतात. त्या घरातून त्या मानाने कमी किंमत आकारली जाते.

अर्थात घरात सांताक्लॉज १५-२० मिनिटंच वावरतो. पण ऑफिस, हॉटेल, रिसोर्ट, मॉल इथं त्याला जास्त वेळ वापरलं जातं. तिथून पैसेही तेवढेच मोजून घेतले जातात. आज अनेक इवेंट मॅनेजमेंट करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. त्यांना सांताक्लॉज पुरवावा लागतो. त्यामुळे काही वेळा अधिक मागणी असली तर एकापेक्षा अधिक सांताक्लॉज हाताशी असणं गरजेचं ठरतं. यामुळे दोनचार व्यक्ती निवडून सांताक्लॉजची भूमिका त्यांना दिली जाते.

नाताळच्या दिवसात थर्माकोलचा वापर करून सांताक्लॉजची छबी हमखास तयार करून दर्शनी भागात ठेवली जाते. बहुधा लाल कपड्यांनी सजलेला हा सांताक्लॉज पाहिला की लहान मोठ्या सर्वांनाच आनंद होतो.

नाताळला सांताक्लॉज तर अष्टमीला कृष्ण

काही हौशी स्वतःच सांताक्लॉज होऊन मुलांना रिझवतात. घरातली मंडळी आपापसात ठरवून ही भूमिका घेतात. काही वेळा महिलासुद्धा सांताक्लॉजचा पेहराव चढवतात. ही भूमिका करताना त्यांनाही मजा वाटते. घरातल्यासारखंच शाळेतही सांताक्लॉजचं आगमन स्वागतार्ह ठरतं. त्याला पाहताच लहान मुलांना आनंद होतो. म्हणून त्यांचे शिक्षक किंवा शिक्षिका सांताक्लॉज होतात.

हुशार मुलं महिला सांताक्लॉजला सहज ओळखतात आणि बारीकसारीक चौकशी करतात. तू सांताक्लॉजची बहीण आहेस का? किंवा मुलगी का? असे बालसुलभ प्रश्न विचारून भंडावून सोडतात. त्यांच्या कल्पनेतला तो गुबगुबीत सांताक्लॉज त्यांना हवा असतो.

सांताक्लॉज पुरवणाऱ्या संस्था एरवी गोकुळ अष्टमीला कृष्ण, रामनवमीला राम, शिवजयंतीला शिवाजी पुरवायलाही तयार असतात. तेव्हासुद्धा पारखून त्या त्या भूमिका निभावणारी माणसं पाठवली जातात.

हेही वाचा : गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढण्याचं बळ कुठून मिळतं?

सांताक्लॉज होणं अवघड नाही

सांताक्लॉज हा खरोखर अस्तित्वात नाही. ही कवीकल्पनेसारखी कल्पना आहे. पण वर्षानुवर्षे ती टवटवीत राहिलीय. उलट दिवसागणिक तिला वेगवेगळ्या स्वरुपात मांडलं जातंय. प्रत्येकाला ईश्वराकडून आपलं दु:ख हरण करण्यासाठी आणि काही सुखाचे क्षण देण्यासाठी त्याच्या दूताने यावं असं नक्कीच वाटतं. 

सांताक्लॉज यातूनच जन्माला आलाय. तो आपल्या आगमनाने घटकाभर का होईना दु:ख विसरायला लावतो. थोडं फार रंजन करतो. छान भेटवस्तू देतो आणि निघून जातो. ही संकल्पना सर्वच धर्मियांना आवडणारी ठरलीय. यामुळे अनेक सोसायटी, संस्थांमधे नाताळ साजरा करणाऱ्यांची संख्या वाढलीय हे खरंय. पण त्यापेक्षा नाताळ नावासाठी नाताळ साजरा केला जात असेल तर ही बाब अधिक सुसह्य आहे असं कुणीही म्हणेल.

खरं म्हटलं तर सांताक्लॉज म्हणून अभिनय करण्यापेक्षा कुणालाही सांताक्लॉज होणं अवघड नाही. त्यासाठी हृदयात मानवता, करुणा, द्या, आनंद हवा. आपल्या कृतीतून, वागण्यातून दुसऱ्याचा विशेषतः मुलांना तुम्ही आनंद दिला की तुम्ही सांताक्लॉज झाल्यासारखेच असता. प्रत्येक माणसात सांताक्लॉज असतोच.

हेही वाचा : 

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

 युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण