एक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं?

३० एप्रिल २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न.

मुंबईच्या सहा, ठाण्याच्या चार, उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकसह चार, तसंच शिर्डी, मावळ, शिरूर या पश्चिम महाराष्ट्राशी राजकीयदृष्ट्या जोडलेल्या तीन अशा एकूण १७ जागांवर आज मतदान झालं. या चौथ्या टप्प्यातल्या सगळ्याच्या सगळ्या १७ जागांवर आता भाजप आणि शिवसेनेचेच खासदार आहेत. त्यामुळे या टप्प्यात खरी परीक्षा झाली ती युतीचीच.

या टप्प्यात प्रामुख्याने शहरी मतदारसंघ आहेत. शिवाय शहरांच्या प्रभावातले मतदारसंघ आहेत. दुसरीकडे धुळे, नंदूरबार, दिंडोरी आणि पालघर हे मोठी आदिवासी लोकसंख्या असणारे मतदारसंघही आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दोन टोकांवरचे मतदारसंघ असणारा हा टप्पा लक्षणीय ठरला.

या मतदारसंघातल्या पत्रकारांशी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी बोलून, तसंच काही जागांवर फिरून केलेला हा एक्झिट अंदाज. ही काही सर्वे करून मांडलेली आकडेवारी नाही. तर निवडणुकांचा वर्षानुवर्षं अनुभव असणाऱ्यांनी सांगितलेले ठोकताळे एकत्र केलेत. त्यातून आजच्या मतदानाची हवा कोणत्या दिशेने होती, हे फक्त कळू शकेल. 

दक्षिण मुंबईचं दान देवरांच्या पदरात?

नरेंद्र मोदींच्या सरकारला अंबानींचं सरकार म्हटलं जातं. त्या मुकेश अंबानींनीच काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या मिलिंद देवरांना मतदान करायचं आवाहन जाहीरपणे केलं. यावरून या मतदारसंघाची हवा दिसली. पण अरविंद सावंतांची सगळी मदार गिरणगावातल्या अस्सल शिवसैनिक मतदारांवर होती. पण शिवसैनिकांचा नेहमीचा त्वेष दिसला नाही. उलट मनसेचे कार्यकर्ते एकदम फॉर्मात दिसले. मुस्लिम मतदारांचं एकगठ्ठा मतदान तसंच मराठी, गुजराती, मारवाडी मतांमधली फूट यामुळे देवरांचं पारडं सध्यातरी जड दिसतंय.

हेही वाचाः मुंबई का किंग कौन? मराठी मतदार तर नाही ना!

दक्षिण मध्य लढत एकतर्फी नाही

शिवसेनेसाठी मुंबईतला सर्वाधिक खात्रीचा मतदारसंघ म्हणून दक्षिण मध्यकडे पाहिलं जात होतं. तरुण, डॅशिंग, अभ्यासू राहुल शेवाळे काँग्रेसच्या एकनाथ गायकवाडांना सहजपणे उताणं करतील, असं वाटत होतं. पण शिवसेनेच्या बूथवर नेहमीसारखा उत्साह आणि तरुणांची गर्दी दिसली नाही. शिवाय मनसेची साथ, दलित मुस्लिम मतांची बेरीज आणि मोदींविषयीचा राग यातून गायकवाडांनी शेवाळेंना अडचणीत आणलं. पण इलेक्शन मॅनेजमेंटमधे वाकबगार असणारे शेवाळे परिस्थितीचा वेळीच अंदाज घेऊन तयार होते. त्याचा फायदा त्यांना मतदानात होताना दिसला.

५ वाजताच्या अंदाजानुसार धारावीत मतदानाची टक्केवारी खूपच कमी असणं शेवाळेंच्या पथ्यावर पडलंय. तरीही लढत अटीचटीची आहे. गायकवाड निवडणुकीत कुणाच्याही नकळत चूपचाप फासे टाकतात, ते नीट पडले असतील तर २००४ सारखी परिस्थिती होऊ शकते. तेव्हा त्यांनी मनोहर जोशींना हरवलं होतं. त्याचा भल्याभल्यांना अंदाज आला नव्हता.

हेही वाचाः मोदींना पंतप्रधान बनायचं, तर मुंबई जिंकावी लागेल

उत्तर मध्यमधे पुन्हा दत्त महिमा?

सुनील दत्त इथून निवडणूक लढवायचे तेव्हा हा मतदारसंघ जोगेश्वरीपर्यंत होता. पण आता बदललेल्या भागातली समाजरचनाही त्यांच्या लेकीला प्रिया दत्तना सोयीचीच आहे. या मतदारसंघातले जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार मागच्या निवडणुकीत उदासिन राहिल्यामुळे तिथे मोदी लाटेचा असर दिसला होता. आता मात्र तशी परिस्थिती नाही.

मुस्लिम मतदान जोरात झालंय. त्याला कष्टकरी दलित, उत्तर भारतीयांची साथ मिळू शकते. शिवाय शिवसैनिकांनी भाजपला अपेक्षित मदत केलेली नाही. पण याला उत्तर म्हणून भाजपने पूनम महाजनांसाठी आपलं हक्काचं पांढरपेशा मतदान अत्यंत मेहनत घेऊन उतरवलंय. त्याचं प्रतिबिंब विलेपार्लेच्या आकडेवारीत दिसतंय.

हेही वाचाः मतदानात शहरी लोक का मागे राहतात?

वायव्य मुंबईत कीर्तीकर की निरुपम?

मुंबईतली सर्वाधिक टफ फाईट वायव्य मुंबईत झालीय. संजय निरुपम हे मुळात शिवसैनिक असल्याने ते सेना स्टाईलनेच अत्यंत मेहनतीने, तयारीने आणि आक्रमकपणे मैदानात उतरतात. तसंच यंदाही झालं. मात्र मराठी, गुजराती, मारवाडी आणि उच्चभ्रू मतं त्यांना आपला उमेदवार म्हणून स्वीकारू शकली नाहीत. काँग्रेसचे अनेक जुने पदाधिकारीही त्यांच्या सोबत नव्हते. त्याचा त्यांना फटका बसला.

पण सध्याचे खासदार गजानन कीर्तीकरांसाठी ही फाईट सोपी नव्हती. मुस्लिम, दलित यांचं बहुतांश मतदान विरोधात जाताना दिसलं. बहुजन समाज पक्षाचे सुभाष पासी चाललेच नाहीत. पण उत्तर भारतीय मतात मोदी फॅक्टरमुळे उभी फूट पडताना दिसली. पण कीर्तीकरांना दगा देऊ शकतो तो सेनेचा जुना कट्टर मतदारच. विशेषतः त्यांची नवी पिढी कीर्तीकरांच्या पाठिशी कितपत उभी राहते, यावर याचा निकाल ठरणार आहे.

हेही वाचाः यंदाच्या मतदानामधे मुस्लिमांची भूमिका कळीची, कारण

उत्तर मुंबईत ग्लॅमरने संघटनेला रडवलं

नरेंद्र मोदींना वाराणसीत मिळालं नव्हतं तितकं लीड घेऊन गोपाळ शेट्टी २०१४ ला जिंकून आले होते. पण उर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्या नाकातोंडात पाणी येईपर्यंत जोरदार मुसंडी मारलीय. सुरवातीच्या टप्प्यात मुस्लिम, दलित आणि झोपडपट्टीवाल्या मतदारांना आपल्याकडे खेचून उर्मिला यांनी शेवटच्या टप्प्यात मराठी कार्ड चालवलं. या सगळ्यामुळे गोपाळ शेट्टी यांना निवडणुकीत पहिल्यांदाच चुरशीच्या लढतीचा अनुभव मिळाला.

अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी आली नसली तरी या मतदारसंघात किमान ५ टक्के मतदान वाढलंय. हे मतदान उर्मिलाकडे गेलं असेल, तर मात्र शेट्टींसाठी चिंतेची गोष्ट आहे. पण काँग्रेसचा किल्ला असणाऱ्या मालाडमधे कमी मतदान झालंय. तर शेट्टींच्या बोरिवलीत दणक्यात मतदान झालंय. त्यामुळे शेट्टींचं पारडं जड आहे. शिवाय उर्मिला असली तरी चाडेचार लाखांचा लीड तोडणं सोपं नसतंच.

हेही वाचाः महाराष्ट्रातली सर्वात टफ फाईट औरंगाबादेत होतेय

ईशान्य मुंबईत भाजपचा गड शाबूत राहणार?

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ईशान्य मुंबई भाजपचा भक्कम गड बनलाय. पण त्या मतदारसंघात मराठी मतदारांचंही प्रमाण मोठं आहे. शिवाय इथे नवे टॉवर मोठ्या संख्येने बनताहेत. त्यामुळे पाच वर्षांपूर्वीच्या मतदानाच्या गणितावर या मतदारसंघाची गणितं बांधणं कठीण बनलंय.

किरीट सोमय्यांच्या जागी आलेले मनोज कोटक यांनीही खूप मेहनत घेऊन निवडणूक लढवली. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील मेहनतीत खूपच कमी पडलेले दिसतात. मराठी मतांचं ध्रुवीकरण करून निवडणूक जिंकायचं त्यांचं गणित होतं. पण मध्यमवर्गीय मराठी मतं आकर्षून घेईल असा अजेंडा त्यांच्याकडे नव्हता. पण राज ठाकरे फॅक्टरमुळे मनसेबरोबर शिवसेनेचीही मतं मोठ्या प्रमाणात फिरली असतील तरच त्यांना थोडाफार चान्स आहे. बाकी या मतदारसंघाला कमळावर शिक्का मारायची जुनी सवय आहे.

हेही वाचाः वाराणसीत काँग्रेसने प्रियंका गांधींना तिकीट का दिलं नाही?

ठाणे, कल्याण पुन्हा शिंदेशाहीच्या दिशेने

शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हा जुना विश्वास आहे. एकनाथ शिंदेंनी तो वारसा ताकदीने पुढे चालवलाय. पण यावेळेस ठाण्यात त्यांना अनपेक्षित लढतीला सामोरं जावं लागलं. तुलनेने कल्याणला अपेक्षेप्रमाणे सेनेचा मार्ग सोपा होता. पूर्ण महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे कल्याणलाच सर्वाधिक कमी मतदान झालंय. त्यामुळे कल्याणवर सेनेचं शिक्कामोर्तब झालंय, असं म्हणायला वाव आहे.

ठाण्यात मात्र राष्ट्रवादीचे आनंद परांपजेंचं घड्याळ टिकटिक वाजत का होईना पण चालत राहिलं. शिवसेनेचे राजन विचारे आणि परांजपे या दोघांनीही खासदार म्हणून केलेल्या कामाची तुलना झाली. त्यात परांजपे उजवे ठरले. शिवाय त्यांचा शहरी, उच्चभ्रू तोंडवळाही काही पॉकेटमधे फायद्याचा ठरला. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोघांच्याही पारंपरिक वोटबँकमधे त्यांनी फाळका मारलाय. पण तो शिवसेनेला हरवण्यासाठी पुरेसा ठरेल अशी परिस्थिती नाही.

भिवंडीत मुस्लिम मतदान टावरेंना तारणार

भिवंडी या मतदारसंघाची रचना काँग्रेसच्या सोयीची झालेली आहे. तिथला मुस्लिम मतदार एकगठ्ठा मोदींच्या विरोधात उतरला असेल, तर फारशी मेहनत न करताही सुरेश टावरे यांची खासदारकी नक्की मानायला हवी. भिवंडीत महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडे एकहाती सत्ता आहेच. शिवाय भाजपचे कपिल पाटील आणि टावरे दोघेही आगरी असल्यामुळे त्यांच्यात ती मतं विभागली जाण्याची शक्यता आहे. कपिल पाटलांच्या विरोधात शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. तो फटकाही पाटलांना बसतोय. मात्र मुस्लिम ध्रुवीकरणाच्या विरोधात हिंदू मतांना बूथपर्यंत घेऊन जाण्यात भाजप यशस्वी झाला असेल तर कपिल पाटलांना संधी आहे. 

हेही वाचाः पुढचे चार टप्पे ठरवणार मोदी जिंकणार की हरणार?

पालघरमधे ठाकूरांची रिक्षा की धनुष्यबाण?

मागच्या दोन्ही निवडणुकांचं गणित कागदावर मांडलं तर पालघरमधे काँग्रेसमधून शिवसेनेत वाया भाजप आलेले राजेंद्र गावित यांचं पारडं जडच आहे. पण हिंतेद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे सगळ्या विरोधकांचे एकत्रित उमेदवार म्हणून समोर आलेत. शहरी भाग जाधवांबरोबर तर ग्रामीण भाग गावितांबरोबर असं गणित आहे. त्यातल्या विक्रमगडसारख्या भाजपचं उत्तम काम असणाऱ्या विधासभा मतदारसंघात चांगलं मतदान झालंय.

पण ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीत शहरी नालासोपारा मतदारसंघात सरासरीपेक्षा १० टक्के मतदान कमी झाल्याचं नोंदवलंय. पण तिथेच रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचं टीवी चॅनल दाखवत होते. त्यामुळे तिथे अंदाज लावणं कठीण झालंय. शहरी मतदारसंघातलं मतदान खरंच चांगलं झालं असेल, तर मात्र रिक्षा शर्यतीत नक्की असेल.कारण शहरी मतदान ग्रामीणच्या तुलनेत जवळपास २ लाखांनी जास्त आहे.

हेही वाचाः प्रस्थापितांना धक्का हा महाराष्ट्रातल्या मतदानाचा ट्रेंड आहे?

शिरूरमधे अँटी इन्कम्बन्सीचा आढळरावांना फटका?

शिरूरमधे गेल्यावेळी ५९.७३ टक्के मतदान झालं. ते आता ५९ टक्क्यांच्या घरात पोचलंय. यात हडपसर, भोसरी या शहरी मतदारसंघातून ५४ टक्के, तर दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगावमधून सर्वाधिक ६७ टक्के मतदान झालं. आंबेगावमधे वाढलेल्या या मतदानाने शिवसेनेची ही सीट धोक्यात आलीय. शिवसेनेने तीन वेळचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना मैदानात उतरवत फ्रेश चेहरा दिला. आढळराव पाटील तसंच सत्ताविरोधी फॅक्टर चालल्यामुळे त्याचा कोल्हेंना फायदा होताना दिसला. आढळरावांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या नाराजीचीही भर पडली.

हेही वाचाः शरद पवारांसाठी बारामतीपेक्षाही मावळ, शिरूर, शिर्डी महत्त्वाची

पार्थ मावळमधे पवारविरोधी लाट रोखणार?

मावळमधे गेल्या वेळच्या ६०.११ टक्के मतदानाच्या तुलनेत सरासरी ५८.२१ टक्के मतदान झालं. याच पाचेक लाख मतदारसंख्या असलेल्या पनवेलमधे सर्वात कमी ५५ टक्के मतदान झालं. तर कर्जतमधे ६०.४० टक्के मतदान नोंदलं गेलं. चिंचवड आणि पिंपरीतही ५७ टक्क्यांच्या घरात मतदान झालं. शिवसेनेने खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा मैदानात उतरवलंय. तर राष्ट्रवादीने अजित पवारांचा मुलगा पार्थला उमेदवारी दिलीय.

यात बारणेंविरोधात अँटी इन्कम्बसी फॅक्टर असताना त्याचा लाभ उठवण्यासाठी राष्ट्रवादीने तरुण पार्थना मैदानात उतरवलं. पण ही खेळी पवार फॅमिलीविरोधात काही प्रमाणात उलटताना दिसली. हा प्रस्थापित विरोधी फॅक्टर वर्षानुवर्षं या मतदारसंघातली सत्तापदं भोगणाऱ्या पवार कुटुंबाच्या विरोधात चांगला चालताना दिसला. इवीएममधे कोणती अँटी इन्कम्बन्सी चालते, यावर अंतिम निकाल ठरेल. 

शिर्डीत मतदानात विखेंपेंक्षा थोरात वरचढ

एससींसाठी राखीव असलेल्या शिर्डीमधे यंदा मतदान दोनेक टक्क्यांनी घटलंय. गेल्यावेळी ६३.८० टक्के मतदान झालं होतं. ते ६१ वर पोचलंय. शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यात सरळ लढत झाली. पण इथला सामना रंगला तो शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमेनरचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामधेच. 

रात्री उशिरापर्यंत आलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार थोरातांनी श्रीरामपूरपाठोपाठ संगमनेरमधे ६४.२५ टक्के एवढं सर्वाधिक मतदान करून घेतलं. श्रीरामपूरमधे कांबळे हे आमदार आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर पिचड यांचा प्रभाव असलेल्या अकोलेतही ६२.४० टक्के मतदान झालं. विखेंच्या शिर्डीत मात्र ५९ टक्केच मतदान झालं. भाजपचा आमदार असलेल्या नेवाशात तर सर्वांत कमी ५३ टक्के मतदान झालं. 

मतदारसंघनिहाय मतदानाची एकूण टक्केवारी आणि सदाशिव लोखंडे यांच्याविरोधातला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर बघता शिर्डीची जागा राखणं शिवसेनेसाठी अडचणीचं झालंय. तसंच भाजपकडून इच्छुक असलेले शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अपक्ष उमेदवारीचाही शिवसेनेला फटका बसतोय. 

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

नंदूरबारमधे हिना गावितांना मोदी फॅक्टरच तारू शकतो?

गेल्यावेळी मोदीलाटेत विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या हिना गावितांना यंदाची निवडणूक मात्र खूप जड गेली. सलग नऊ वेळा जिंकलेल्या माणिकराव गावित यांचा पराभव करून लोकसभेतल्या सगळ्यात तरुण खासदार होण्याचा मान हिना गावितना मिळाला. यंदा मतदान अडीचेक टक्क्यांनी वाढून ६८.०५ टक्क्यांवर गेलंय. त्यामुळे काँग्रेसचा गड असलेल्या नंदूरबारमधे हिना या वडील विजयकुमार गावित यांच्या पुण्याईवर पुन्हा जिंकून येणार का, हे अजून गुलदस्त्यातच आहे. पण मतदानाचा आणि निवडणुकीचा एकूण ट्रेंड त्यांच्यासाठी धोक्याचा आहे.

काँग्रेसने इथून आपले जुने आमदार के. सी. पाडवी यांना मैदानात उतरवलं. हिना यांच्या उमेदवाराला भाजप संघटनेत प्रभाव असणाऱ्यांनीच विरोध केला. त्यातून जिल्ह्यात अनेक वर्ष भाजपचा किल्ला लढवणाऱ्या सुहास नटावदकर यांनीच बंडखोरी केली. त्यामुळे गावितांच्या लढतीची सुरवातच अडचणींनी झाली. पण या अगोदरही मराठा क्रांती मोर्चावरून गावितांबद्दल लोकांमधला असंतोष समोर आला. या सगळ्या अडचणींवर मात करता करताच मतदानाचा दिवस उजडला. गेल्या वेळसारखाच मोदी फॅक्टर चालल्यास मात्र हिना गावितांचा विजय कुणी रोखू शकत नाही. 

बागलाणच्या साथीने भामरे धुळ्याचा गड राखणार?

धुळ्यामधे गेल्या वेळच्या तुलनेत तीनेक टक्क्यांनी कमी मतदान होऊन ते ५५.७१ टक्क्यांवर पोचलं. भाजपकडून केंद्रीय मंत्री सुभाष भामरे आणि काँग्रेसकडून आमदार कुणाल पाटील यांच्यात थेट लढत झाली. गेल्यावेळी मोदीलाटेत अमरिश पटेल यांच्या विरोधात भामरे सहज जिंकून आले. पण यंदा भामरेंना समोरचा उमेदवारही मराठा असल्याने निवडणुकीचं मैदान खूप जड गेलं. केंद्रीय मंत्री असूनही मतदारसंघात कुठलाही मोठा विकासप्रकल्प न आणल्याबद्दल त्यांच्याविरोधात नाराजीचा सूरही दिसला. तसंच ग्रामीण भागात सरकारविरोधी असंतोषाचा फटकाही भामरेंना बसतोय. 

तसंच भाजप आमदार अनिल गोटे हे भामरेंविरोधात मैदानात उतरलेत. पण भाजपचा प्रभाव असलेल्या बागलाणमधे झालेलं सर्वाधिक ६३ टक्के मतदान ही भामरेंसाठी समाधानाची बाब आहे. मुस्लिमबहुल मालेगाव मध्य मधे सर्वांत कमी ४७ टक्के मतदान झाल्याने काँग्रेसच्या चिंता वाढल्यात. पण एकूण मतदानात सरकारविरोधी, भामरेविरोधी असंतोष वळवण्यात कुणाल पाटलांना यश आल्यास भामरेंची सीट धोक्यात येऊ शकते.

दिंडोरीत चव्हाणांची नाराजी कुणाला तारणार?

दिंडोरीत गेल्या वेळसारखंच ६२ टक्क्यांच्या घरात मतदान झालंय. राष्ट्रवादीचे धनराज महाले, भाजपच्या डॉ. भारती पवार आणि भाकपचे आमदार जीवा पांडू गावित यांच्यात प्रमुख लढत झाली. पण खरा सामना रंगला तो महाले आणि पवार यांच्यामधे. यात पवार यांचं होम पीच कळवणमधे दिंडोरीपाठोपाठ सर्वाधिक ६७ टक्के मतदान झालंय. ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे. पण विधानसभेसाठी इच्छुक असलेले त्यांचे दीर भावजय ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे हे मतदान नेमकं कुणाचं हे कोडं आहे.

सलग तीन वेळा निवडून आलेले हरिश्चंद्र चव्हाण यांनी तिकीट कापल्याने थेट नेतृत्वाला अंगावर घेतलं होतं. त्यांच्या नाराजीचा भाजपला तोटा होताना दिसला. शेतकऱ्यांमधली नाराजी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेली ताकद बघता भारती पवारांचा विजय सहज शक्य दिसत नाही. तसंच महाले यांचे वडील खासदार होते. त्यांना मानणारा मतदारही आहे. तसंच भुजबळांचा येवला मतदारसंघ ही महालेंसाठी जमेची बाजू आहे. तर नरेंद्र मोदींच्या सभेमुळे शेतकऱ्यांची सरकारवरची नाराजी ईवीएममधे न उमटल्यास पवारांचा विजय सोपा होऊ शकतो.

इगतपुरी भुजबळ कुटुंबाचं नाक वाचवणार?

नाशिकमधल्या मतदानाची टक्केवारी ही तीनेक टक्क्यांनी घटलीय. इगतपुरी या आदिवासीबहुल मतदारसंघात सर्वाधिक ६२ टक्के मतदान झालंय. त्या खालोखाल सिन्नरमधे ६० टक्क्यांच्या घरात मतदान झालं. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्यात यावेळेस थेट लढत झाली नाही. कारण सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची अपक्ष उमेदवारी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पवन पवार यांच्यामुळे इथली लढत चुरशीची बनली.

सिन्नरमधे वाढलेल्या मतदानावरून कोकाटेंच्या ट्रॅक्टरचा फॅक्टर चालताना दिसतोय. याचा अर्थ हेमंत गोडसे यांना फटका बसलाय. मराठा मतं विभागली गेलीत. वंचितमुळे भुजबळांचीही काही मतं विभागली गेली. पण भाजपला मानणाऱ्या शहरामधल्या नाशिक पूर्व आणि पश्चिममधल्या मतदानाची टक्केवारी वाढली नाही. तर इगतपुरीमधे वाढलेली मतदानाची टक्केवारी ही भुजबळ यांच्यासाठी जमेची बाजू आहे. कारण ती मतं कशी वाढवायची याचं टेक्निक त्यांना चांगलं माहीत झालंय.

हेही वाचाः 

एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा

जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले?