गुढीपाडव्याला वाचुयाचः राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत

०६ एप्रिल २०१९

वाचन वेळ : १२ मिनिटं


गेली काही वर्षं गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरेंचं भाषण वाजतगाजत असतं. यंदा तर त्यांच्या भाषणाची खास वाट पाहिली जातेय. त्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०१८ ला राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलाखत महत्त्वाची ठरलीय. जागतिक मराठी परिषदेने आयोजित केलेली ही मुलाखत गाजली. त्यातली ही निवडक प्रश्नोत्तरं, मराठी मनाचा शोध घेणारी.

राज ठाकरेः आपण देशाचा इतिहास पाहिला तर प्रत्येक राज्य, प्रत्येक राज्यातील नेते त्यांच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा ते आपल्या राज्याला मानतात आणि मग ते देशाचा विचार करतात. महाराष्ट्र नेहमी देशाचा विचार करत आला पण महाराष्ट्राचा विचार नाही झाला?

शरद पवारः महाराष्ट्राचा विचार झाला नाही यासंबंधानं थोडा वादविवाद होऊ शकतो. पण ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रातल्या अनेक नेतृत्त्वांनी आधी देशाचा विचार केला. या भिंतीच्या पलीकडं एक संस्था आहे, गोखले इन्स्टिट्यूट सर्वंट्स ऑफ इंडिया. त्या ठिकाणी एका वास्तूच्या उद्घाटनासाठी मी सकाळी गेलो होतो. तिथं बोलत असताना मी गोखलेंसंबंधी एक गोष्ट सांगितली.

ती म्हणजे, या महाविद्यालयाच्या वास्तूच्या पाठीमागे असलेल्या एका टेकडीवर एक स्मारकासारखा दगड आहे. त्या दगडाचं वैशिष्ट्य असं की, १९०५ मधे नामदार गोखले आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी तिथं शपथ घेतली. ‘आपण देशाचा नेहमी विचार करायचा. जात, धर्म, व्यक्ती, राज्य, भाषा, या महत्त्वाच्या आहेतच. पण यापेक्षा राष्ट्र महत्त्वाचं आहे. म्हणून देश पहिला आणि नंतर बाकीच्या गोष्टी...’ हे सूत्र गोखल्यांनी शपथ घेताना तिथं सांगितलं आणि ते त्यांनी अखंडपणानं पाळलं.

गोखले हे एक दिशा देणारे, बुद्धिमंत, परिवर्तनाचा विचार मांडणारे सर्वश्रेष्ठ नेते होते. ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी जे सांगितलं तो विचार प्रत्येक मराठी माणसानं केला पाहिजे. राष्ट्र हे राष्ट्र आहे. महाराष्ट्राचा मला अभिमान आहे, तो अभिमान मी कायम ठेवेन. महाराष्ट्रासाठी हवं ते योगदान मी देईन, पण ते योगदान देत असताना मी देशाला कधी विसरणार नाही. 

राज ठाकरेः आपण बोलता ते बरोबर आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस देशाचा विचार पहिल्यांदा करतो, यात काही शंका नाही. पण बाकीची राज्यं असं करताना दिसत नाहीत. उदाहरण देतो. थोडसं सविस्तर. या देशाचे पंतप्रधान बाहेरच्या देशातून आलेल्या कोणत्याही पंतप्रधानाला अहमदाबाद दाखवतात. देश दाखवत नाहीत. गुजरातला नेतात, पण बाकीची राज्यं दाखवत नाहीत. महाराष्ट्र, देशाचा विचार करत आला पण बाकीची राज्यं आपल्या राज्यापुरताच मर्यादित विचार करतात, अशा वेळेला महाराष्ट्राचं आणि मराठीचं नुकसान होतंय असं नाही का वाटत?

शरद पवारः काही प्रमाणात त्याची झळ आपल्याला बसली, ही वस्तुस्थिती आहे. असं समजा की पुण्यातील एखाद्या व्यक्तीवर महाराष्ट्राची जबाबदारी पडली तर त्यानं केवळ पुण्याचा विचार करून चालणार नाही. त्याला मराठवाड्याचा, कोकणाचा, विदर्भाचाही आणि मुंबईचाही विचार करावा लागेल. ही व्यापकता त्यानं दाखवली पाहिजे. तीच गोष्ट राज्य पातळीवर काम करणाऱ्या सगळ्या घटकांनी केली पाहिजे. हे आपण सतत करत आलो, त्याची काही किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली नाही असं नाही.

आज जे केलं जातंय, त्याबद्दल आम्ही संसदेत अगदी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय सदस्यांमधे जाहीरपणे नाही पण खासगीत बोलत असतो. अबक देशामधे आला तर दोन गोष्टी घडतील. कोणत्या दोन गोष्टी? तर त्याला घट्ट मिठी मारली जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला अहमदाबादला नेलं जाईल. हा एक चर्चेचा आणि थोडासा चेष्टेचा विषय झालेला आहे.

देशाचं नेतृत्त्व करायचं असेल तर अहमदाबादचा आणि गुजरातचा अभिमान अवश्य ठेवा. पण फक्त गुजरात आणि अहमदाबाद एवढंच नजरेसमोर ठेवू नका. तुम्ही देशाचे प्रमुख आहात. आज ही भावना मी सत्ताधारी पक्षाच्या संसदीय सदस्यांमधेही पाहतोय.

हेही वाचाः गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन

राज ठाकरेः डिसेंबर १९९२ मधे बाबरी मशीद पडली आणि महाराष्ट्रात दंगली झाल्या. १९९३ मधेही जानेवारीत दंगल झाली. त्यावेळेला आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं. खरं म्हणजे आपण केंद्रात मंत्री राहून देखील महाराष्ट्राची स्थिती आवाक्यात आणू शकला असता. नक्की आपल्यात आणि नरसिंह राव यांच्यात काय झालं?

शरद पवारः ही गोष्ट खरी आहे की, ही सगळी आग मुंबईला लागली होती आणि ती थांबत नव्हती. एन. के. पी. साळवे, जे आता हयात नाहीत. ते आम्हा सर्वांचे हितचिंतक होते. तसेच नरसिंहरावांचेही अत्यंत जवळचे मित्र होते. ते सकाळीच माझ्याकडे आले. मला म्हणाले, ‘नरसिंह रावांना तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही चला.’ आम्ही दोघंही त्यांच्याकडे गेलो. मी डिफेन्स मिनिस्टर होतो.

मला नरसिंह रावांनी सांगितलं, ‘देशाचं अर्थकारण बदलण्याच्या दृष्टीनं मी काही महत्त्वाचे निर्णय आणि धोरणं आखली आहेत. त्याचं जगात स्वागत होतंय. परंतु जगाचं लक्ष दिल्लीपेक्षा आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे अधिक आहे. आणि मुंबई पेटलीय. हा संदेश जगामधे जाणं, ही जगातील भांडवली गुंतवणूक करण्याची आस्था असलेल्या घटकांच्या दृष्टीनं अत्यंत चिंताजनक बाब आहे. म्हणून त्यांना एक विश्वास द्यायला पाहिजे. तो विश्वास द्यायचा असेल, तर महाराष्ट्र सावरायचं काम तुम्ही केलं पाहिजे.’

पण त्याला माझी तयारी नव्हती. आमची चर्चा सकाळी जवळपास दहाला सुरू झाली ती दुपारी चारपर्यंत चालली. मी नाही म्हणत होतो आणि ते आग्रह करत होते. शेवटी त्यांनी मला एकच सांगितलं, ‘ठीक आहे तुम्ही ठरवा, पण मला आश्चर्य वाटलं की तुम्ही अशी कशी भूमिका घेता.’

हेही वाचाः गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं

मी विचारलं, ‘का वाटलं आश्चर्य?’ ते म्हणाले, ‘ज्या महाराष्ट्रानं तुम्हाला मोठं केलं, ज्या मराठी माणसानं तुम्हाला इथपर्यंत आणलं, ज्या मराठी माणसानं तुम्हाला तीन वेळा मुख्यमंत्री केलं, आणि ते राज्य जळत असतानासुद्धा, त्या आपल्या बांधवांसाठी महाराष्ट्रात जावं असं तुम्हाला वाटत नाही, याचं मला आश्चर्य वाटतं.’ खरं सांगतो, मी त्या वाक्यानं अस्वस्थ झालो आणि मी त्यांना ‘हो’ म्हटलं आणि परत महाराष्ट्रात आलो.

राज ठाकरेः सर्वसाधारपणे इतर राज्यांमधे बघतो, त्यावेळी बंगाली माणूस रवींद्रनाथ टागोर म्हटलं की एकत्र येतो. पंजाबमधला माणूस गुरू नानक म्हटलं की एकत्र येतो. वेगवेगळ्या राज्यांमधे वेगवेगळे असे काही हुक्स आहेत की जिथं ही सर्व समाजातली माणसं एक होतात. असा महाराष्ट्राचा हूक काय वाटतो आपल्याला की ज्यामुळं लोक एकत्र येतील?

शरद पवारः छत्रपती शिवाजी! हे एक नाव असं आहे की देशाच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस एक होईल. न्यूयॉर्कमधे मराठी लोकांनी शिवजयंती साजरी केल्याची बातमी मी आजच टीवीवर पाहत होतो. तिथं फिल्म दाखवत होते शिवाजी महाराजांच्या संदर्भात.

राज ठाकरेः पण आपण जेव्हा भाषणाला उभे राहता तेव्हा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं का नाही म्हणत?

शरद पवारः महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे, याबद्दल कोणाच्या मनात शंकाच नाही. ती चिरकाल अशा प्रकारची गोष्ट आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांचा प्रकर्षानं उल्लेख करण्याचं कारण की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासंबंधीची त्यात काळजी आहे. हे तीन लोक असे आहेत की त्यांनी कायम सामाजिक ऐक्य आणि सामाजिक प्रबोधन या दोन गोष्टींच्या संबंधानं अतिशय कष्ट केलेत. लोकांना एकसंघ ठेवलं.

खरं सांगायचं, तर तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनीही सामाजिक ऐक्यासाठी आणि सांप्रदायिक विचार बाजूला फेकून देण्यासाठी प्रचंड योगदान दिलेलं आहे. त्यांची भाषा तिखट होती. तुम्ही लोक नेहमी सांगता की, आमची ठाकरी भाषा आहे. या ठाकरी भाषेचा अनुभव आम्हालाही खूप आहे. तो भाग सोडून द्या. पण समाजातल्या विघातक प्रवृत्तींच्या विरोधात त्यांनी ती ठाकरी भाषा वापरलीय.

शाहू-फुले-आंबेडकर यांनीदेखील सबंध समाजमन एकसंघ करण्यासाठी जातपात धर्म याचा लवलेशही मनात न ठेवता मराठी माणूस एकत्र कसा य़ेईल, याची काळजी त्यांनी घेतली. आजही त्याची गरज आहे. मध्यंतरी आपल्या राज्यात जे काही प्रकार घडले ते हेच सांगतात की, अजूनही आपल्याला शाहूंच्या, फुलेंच्या आणि आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण करून देण्याची गरज आहे. ते नाही केलं आणि संघर्ष झाला तर महाराष्ट्र दुबळा होईल. काही झालं तरी महाराष्ट्र दुबळा होऊ द्यायचा नाही. राजकारण असेल नसेल, सत्ता असेल नसेल, पण महाराष्ट्र हा मजबूतच ठेवला पाहिजे. तो तसा मजबूत ठेवण्याची ताकद या विचारांमधे आहे. म्हणून यांचा उल्लेख मी करतो.

राज ठाकरेः वसंतराव नाईक ११ वर्ष, सुधाकरराव नाईक अडीच वर्ष, कन्नमवार दीडएक वर्ष आणि आज देवेंद्र फडणवीस तीन-साडेतीन वर्ष. इतके मुख्यमंत्री विदर्भातून महाराष्ट्राला लाभल्यानंतरही विदर्भ स्वतंत्र व्हावा, अशी मागणी का होते?

शरद पवारः त्याचा इतिहास जरा वेगळा आहे. मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव इथलं सामाजिक चित्र, इथला इतिहास आणि विदर्भ-मराठवाड्यातल्या गोष्टी यात एक फरक आहे. मराठवाड्यात अनेक वर्ष निजामाचं राज्य होतं. निजामाच्या राजवटीमधे तिथली मानसिकता वाढलेली आहे. पण मराठवाड्यातल्या लोकांच्या मनात निजामाच्या राजवटीसंबंधी आकस आणि नाराजी होती. त्यांचं आकर्षण उर्वरित महाराष्ट्राकडे होतं. त्यामुळं मराठवाड्यातच कुणी ‘स्वतंत्र मराठवाडा करा’ असं म्हटलं तर त्याला मराठवाड्याचा प्रतिसाद मिळत नाही.

विदर्भाची परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण विदर्भातील नागपूर पलीकडील अकोल्यापर्यंतच्या भागात एकेकाळी मध्य भारत नावाचं स्वतंत्र राज्य होतं. या राज्याची मातृभाषा, राज्याची भाषा हिंदी होती. हा संबंध हिंदी भाषिकांचा प्रदेश होता. त्यातही दोन भाग आहेत.

वर्धा, यवतमाळ अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या भागाला मराठी भाषिक ‘वऱ्हाड’ म्हणतात. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागाला ‘विदर्भ’ म्हणतात. विदर्भाचे असे दोन भाग पडतात. या विदर्भात आजही हिंदी बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गोंदियात सभेला मी जातो तेव्हा मराठी बोललं तर लोक ऐकतात पण हिंदीत बोललं तर सुखावतात.

हेही वाचाः गुढीपाडवाः शिवपार्वती विवाहाचा वारसा सांगणारा हजारो वर्षं जुना उत्सव

राज ठाकरेः अजून एक महत्त्वाचा आणि गंभीर विषय. मध्यंतरी मुंबईला किंवा कुठंतरी एका कार्यक्रमामधे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं म्हणाले की, मुंबई-बडोदा आम्ही एक्सप्रेस हायवे करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही २२ हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. नरेंद्र मोदींनी निवडणुकीआधी कधीही नाही पण नंतर एक अचानक साक्षात्कार झाल्यासारखं मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचं जाहीर केलं.

संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून गुजरातला जी एक जखम आहे, की मुंबई आम्हाला मिळाली नाही, त्याच्यासाठी हे सगळे मार्ग सुरू आहेत? की मुंबई बाजूला करण्याचं एक षड्यंत्र यामागे लपलंय का? नाहीतर मला सांगा. मुंबईला आज बुलेट ट्रेनची आवश्यकता नाहीये. मला सांगा साहेब, पटकन अहमदाबादला पोचलात सकाळीच काय करायचं काय अहमदाबादला? काय ढोकळे खायचे, का फापडा खायचा, का काय करायचं? कशाचा कशाला काही पत्ता नाही आणि आपण जर बुलेट ट्रेन आणायची असेल तर जो लांबचा प्रवास आहे, मुंबई-दिल्ली, मुंबई-कलकत्ता तर मी समजू शकतो. पण यांच्या डोक्यात पहिलं अहमदाबादच येतं. यांच्या डोक्यात पहिल्यांदा बडोदा येतं. त्यांच्या मनातलं त्यांच्या मनात राहू दे.

मला जी भीती वाटते, ती अशी की या सगळ्यात मुंबई वेगळी करण्याचं षडयंत्र आहे का? कारण त्यांनी जो पट्टा निवडला आहे, तो तसा आहे. आपण मघाशी जे नाव घेतलं, जे जुना राम नाईकांचा जो मतदार संघ आहे वसई-विरार पर्यंत जो जाणारा तो सगळा पट्टा आपल्याला यातून दिसतो. काय वाटतं आपल्याला?

शरद पवारः त्याबाबतही चर्चा खूप झाली. आम्ही बुलेट ट्रेनला विरोध केला नाही. पण आम्ही अशी भूमिका घेतली की बुलेट ट्रेन करायची असेल तर दिल्ली-मुंबई करा. महाराष्ट्राला एकसंघ करणारी चंद्रपूर - नागपूर - मुंबई - पुणे - कोल्हापूर अशी बुलेट ट्रेन करा. आज तुम्ही फक्त अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन करता याचा अर्थ तुम्ही जे म्हणाला की अहमदाबादला जाऊन काय ढोकळा खायचा का, तर अहमदाबादला कुणी जाणार नाही. मुंबईला येतील. मुंबईची गर्दी वाढेल.

राज ठाकरेः मला हाच धोका दिसतोय. प्रश्न असा आहे की इथून आपले लोक जाणारच नाहीयेत, तिथून इथं येतायंत.

शरद पवारः दुसरी गोष्ट अशी की मुंबई-अहमदाबाद या ट्रेनमधे पहिल्या वर्गात किंवा फास्ट ट्रेन मधे बसणाऱ्यांची संख्या पाहिली तरी एखाद्या नव्या ट्रेनची सुद्धा आवश्यकता नाही, हा निष्कर्ष केंद्रीय विभागात काढला गेलेला आहे. त्यामुळं कारण नसताना ते केलेलं आहे. 
आणि दुसरं म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही.

राज ठाकरेः आपण सगळेजण त्या विषयासाठी आहोतच. परंतु माझं असं म्हणणं आहे, हे ज्यांचं षड्यंत्र सुरू आहे, त्यांच्या डोक्यात पहिला विचार गुजरातशी संबंधित येतो. महाराष्ट्रात पूर्वापार गुजराती लोक उत्तम मराठी बोलतात. ते या मातीशी एकरूप झालेले आहेत. परंतु मुंबई आणि पुण्याकडे बाहेरून जे लोक येत आहेत, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, तो मला साधा, सरळ, सोपा दिसत नाही.

शरद पवारः ही गोष्ट खरी आहे. पण मुंबई म्हणजे काय, पुणं म्हणजे काय तर देशाचं अर्थकारण. त्या अर्थकारणावर आपला कब्जा असला पाहिजे, असा दृष्टिकोन काही घटकांचा आहे. त्या घटकांना प्रोत्साहित करण्यासंबंधीची भूमिका देशाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्या घटकांकडून होते की काय? अशी शंका लोकांच्या मनात यायला लागलीय. त्यामुळं तुम्ही म्हणता तो विचार अस्वस्थ करणारा आहे. पण त्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत. पण तो प्रयत्न आहे, असं सरळ सरळ दिसतंय.

एकेकाळी मी वसई, विरार या भागात जायचो. तेव्हा या सगळ्या पट्ट्यात ख्रिश्चन किंवा मराठी माणूस दिसायचा. आता त्याठिकाणी बोर्डसुद्धा मराठीतच दिसतात असं नाही. गुजराती बोर्डही दिसतात. मी गुजराती भाषेचा द्वेष करत नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात गुजराती भाषेचं आक्रमण या परिसरात व्हायला लागलंय, याचा अर्थ कष्ट करण्यासाठी जसा उत्तराखंडमधून, यूपीमधून किंवा बिहारमधून आपल्याकडे माणूस येतो, तसा हा इथं कष्टाला येत नाही, तो अर्थकारणासाठी येतो. महाराष्ट्र अर्थकारणाच्या दृष्टीनं अत्यंत योग्य भूमी आहे, त्यामुळं त्यावर नियंत्रण ठेवावं, ही त्यामागे भावना असेल तर जागरूक राहावं लागेल.

राज ठाकरेः नरेंद्र मोदींबद्दल आपलं पूर्वी काय मत होतं आणि आज काय आहे?

शरद पवारः त्यांच्या जमेच्या काही गोष्टी आहेत. या नेत्याकडे कष्ट करण्याची प्रचंड तयारी आहे. सकाळी लवकर उठणार. तयार होणार.

राज ठाकरेः मी सुरू केलंय. पण यानं पंतप्रधान होता येतं?

शरद पवारः तर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते कष्ट भयंकर करतात. कष्ट करून मेहनत करणं ऑफिसमधे जास्तीत जास्त वेळ देणं वगैरे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या अत्यंत जमेच्या बाजू आहेत. गुजरातमधे त्याचा फायदा झाला. गुजरातच्या विकासात त्यांचं योगदान होतं, ही त्यांची जमेची बाजू ठरली. मला स्वतःला असं वाटतं की गुजरात राज्य चालवणं आणि भारत देश चालवणं यात फरक आहे.

आपल्या राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण असे भाग आहेत. या राज्यात असं काही फार भाग नाहीत. कच्छ किंवा इतर काय. पण राज्य चालवणं हे एखाद्या व्यक्तीला सहज शक्य आहे. योग्य व्यक्ती आणि चांगले अधिकारी सोबत घेऊन तो ते चालवू शकतो. पण देश चालवायचा म्हटल्यानंतर स्थिती वेगळी असते.

पंतप्रधान गुजरातमधला असेल तर त्याला कच्छ, काठेवाड, अहमदाबाद, सूरत माहीत आहे. पण त्याला ईशान्य भारत किंवा भारतातल्या इतर भागातले जिल्हे तितकेच माहीत असतील, असं नाही. त्यामुळं देश चालवायचा असेल तर तुम्हाला एक टीम लागते. त्यात कुणी केरळमधला असेल, कुणी दक्षिणेतला असेल, कुणी महाराष्ट्रातला असेल, कुणी ईशान्य भारतातला असेल, कुणी बंगालमधला असेल, कुणी यूपीचा असेल. अशा टीमच्या माध्यमातून देश चालवता येतो.

मला असं दिसतंय की, आजच्या राज्यकर्त्यांना टीम म्हणून काम करण्याची भूमिका दिसत नाही. टीमचा अभाव असला तर बाकीच्या सहकाऱ्यांमधे प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी, ‘जरा विचारून घ्या. जरा त्यांच्या कानावर घाला.’ अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. याचा अर्थ टीम म्हणून काम करण्याबाबत आजच्या नेतृत्वाकडून हवी तशी कामगिरी केली जातेय की, नाही याची शंका आहे. देश चालवायला अशी शंकेची अवस्था योग्य नाही.

हेही वाचाः गुढीपाडव्याला गुढीपाडवाच राहू दे, त्याला हिंदू नववर्ष कशाला बनवताय?

राज ठाकरेः साहेब, काँग्रेसचं काय भवितव्य वाटतं? राहुल गांधींबद्दल आज काय मत आहे तुमचं?

शरद पवारः पहिल्यांदा एक गोष्ट खरी आहे की जुनी काँग्रेस आणि आजची काँग्रेस यात फरक आहे. जुनी काँग्रेस देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात पोचलेली संघटना होती. स्वातंत्र्यासाठी योगदान देणारी आणि नंतर संसदीय लोकशाही या देशात उभी करणारी संघटना होती. आज अनेक राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेस नाही.

अनेक जिल्हे असे आहेत, की ज्या ठिकाणी काँग्रेस दुबळी झाली आहे. तिथं नेतृत्व उभं करण्याचं आव्हान राहुल गांधी या तरुणापुढं आहे. या तरुणाला पार्लमेंटमधे मी गेली पाच-दहा वर्ष बघतो आहे. गेल्या काही वर्षात आणि आजच्या वर्षात फरक असा दिसतो की, आज त्याची विषय समजून घेण्याची, देशाच्या विविध भागात जायची, तिथल्या जाणकारांमधे सुसंवाद करायची आणि शिकण्याची तयारी आहे, असं मला दिसतंय. 

माझ्या व्यक्तिगत जीवनाचं तुम्हाला सांगतो, ज्या विषयाचं आपल्याला समजत नाही, त्या विषयाचा जाणकार आपल्यापेक्षा लहान वयाचा, लहान पदाचा असला तरी त्याच्याकडून तो विषय समजून घेण्यात मला कधी कमीपणा वाटत नाही. मी संरक्षणमंत्री झाल्यावर मला डिफेन्स मिनिस्ट्रीच्या रँक्स माहीत नव्हत्या. ‘लेफ्टनंट जनरल’ की ‘लेफ्टनंट’ मोठा हेही मला समजत नव्हतं. मी शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी जनरल थोरात आणि जनरल परांजपे यांची भेट घेतली.

जनरल थोरात हे भारताच्या आर्मीचे नंबर दोनचे गृहस्थ. खरंतर ते आर्मीचे चीफच व्हायचे होते. पण काही राजकारणामुळं ते होऊ शकले नाही. ते कोल्हापूरजवळ राहायचे. पुण्यात जनलर परांजपे राहात होते. मूळगावकर हेही पुण्यातच राहात होते. त्यांचा लोणावळ्याला बंगला होता. ते एअरफोर्सचे प्रमुख होते. मी दिल्लीवरून निघालो. मुंबईवरून पुण्याला आलो आणि थेट कोल्हापूरला गेलो. विद्यार्थ्यासारखं दोन दिवस थोरात यांच्याकडे बसलो आणि डिफेन्सची सगळी माहिती समजून घेतली. परांजपे आणि मूळगावकर यांच्याकडूनही घेतली.

राजकारणामधे विविध विषय असतात. त्या सगळ्या विषयांचे तुम्ही तज्ज्ञ असू शकत नाही. पण देश चालवायचा म्हटल्यावर तो विषय जाणून आणि समजून घेण्याची आवश्यकता असते. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आज मला राहुल गांधी हे असा प्रयत्न करण्याच्या नादाला लागल्याचं दिसतंय. त्याचं एकच उदाहरण सांगतो.

पुण्याजवळ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे. उसाच्या आणि साखरेच्या संदर्भातलं संरक्षण करणारी ही संस्था. मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. एके दिवशी सकाळी माझ्या बैठकीमधे निरोप आला की, राहुल गांधी येणार आहेत. ते आले. त्यांनी तिथं दोन तास घालवले. ऊस म्हणजे काय? त्याची पद्धत काय? कारखाना म्हणजे काय? साखर म्हणजे काय? अशी सगळी माहिती त्यांनी विचारली. यूपी आणि महाराष्ट्राच्या उसात काय फरक आहे? वगैरे. एनीवे पण आत्ता त्यांची भावना, ज्यातलं आपल्याला समजत नाही ते समजून घेण्याची आहे. ती भावना ठेवून त्यांनी पुढं काही पावलं टाकली आणि देशातल्या तरुण पिढीनं त्यांना प्रोत्साहित केलं, तर कदाचित काँग्रेसला चांगले दिवस येतील. पण देशाच्या दृष्टीनं एक मजबूत दुसरा पक्ष असण्याची गरज आहे. आज आम्हा सगळ्यांचे छोटे पक्ष आहेत, पण भारतीय जनता पक्षाला पर्याय देण्याची ताकद काँग्रेसकडे आहे.

हेही वाचाः गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?