कतारमधला फुटबॉल वर्ल्डकप वादात का सापडलाय?

२० नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


क्रीडास्पर्धांमधली अतिशय महत्वाची स्पर्धा फिफा फुटबॉल वर्ल्डकप मध्यपूर्वेतल्या कतारमधे होतेय. २०१०ला या स्पर्धेचं यजमानपद कतारकडे आलं. तेव्हापासून या स्पर्धेची चर्चा होती. मधे अनेक निर्बंध, वादाचे प्रसंगही आले. त्यातून वाटा काढत अखेर कतारमधे फुटबॉलच्या महायुद्धाला सुरवात झालीय. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच कुण्या आखाती देशामधे ही स्पर्धा होतेय.

फिफा फुटबॉल वर्ल्डकप जगातल्या मोठ्या क्रीडास्पर्धांपैकी एक. सध्या याच फुटबॉलचा महासोहळा मध्यपूर्वेतला आखाती देश असलेल्या कतारमधे भरलाय. राजधानी दोहा इथून ३० किलोमीटरवर असलेल्या अल बायत स्टेडियममधे २० नोव्हेंबरला अगदी दिमाखात या स्पर्धेचं उद्घाटन झालंय. फिफाच्या या थरारामधे ३२ देशांच्या टीम सहभागी झाल्यात.

जगातल्या श्रीमंत देशांच्या यादीत मोडणाऱ्या कतारकडे २०२२च्या फिफा वर्ल्डकपचं यजमानपद आलं. हे वर्ष होतं २०१०. तेव्हापासून मागची १२ वर्ष फिफाच्या आयोजनामधे कतारनं स्वतःला झोकून दिलं होतं. मधे अनेक निर्बंध, वादाचे प्रसंगही आले. त्यातून वाटा काढत अखेर कतारमधे फुटबॉलचं हे महायुद्ध होतंय. इतिहासात पहिल्यांदाच कुण्या आखाती देशामधे फिफाचा वर्ल्डकप होणं ही यातली विशेष गोष्ट.

१२ वर्ष प्रतिक्षेची

फुटबॉलप्रेमींचं लक्ष लागून राहिलेल्या कतारचा इतिहास तसा फार जुना आहे. सुरवातीला कतार हे शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या ओस्मानी साम्राज्याचा भाग होतं. १९२३ला ओस्मानीचं पतन झालं. त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या शेवटी कतारनं ब्रिटनचं मांडलिकत्व स्वीकारलं. संपूर्ण राजेशाही असलेल्या कतारला १९७१ला स्वातंत्र्य मिळालं. अल थानी या शाही कुटुंबाकडे अगदी १८४७पासून कतारची सत्ता होती.

श्रीमंत देश असलेल्या कतारमधे मोठ्या प्रमाणात खनिज आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. खरंतर दुसऱ्या महायुद्धानंतर इथं तेलाच्या निर्यातीला वेग आला. पुढे हेच कतारच्या श्रीमंतीचं मूळ बनलं. अल जजीरा, कतार एअरवेज या विमान कंपन्यांनी त्यात मोलाची भर घातली. इथल्या लोकांचं राहणीमानही उच्च दर्जाचं आहे. पर्यायाने कतारची अर्थव्यवस्थाही विकसित देशांमधे मोडतेय. याच श्रीमंतीच्या डामडौलामुळे संपूर्ण आखाती जगात कतारनं आपली वेगळी छाप पाडलीय.

कतारची लोकसंख्या अवघी २९ लाख इतकी आहे. यातले जवळपास ११ टक्के नागरिक हे कतारी आहेत. तर उर्वरित रहिवासी हे स्थलांतरित आहेत. इस्लामिक देश असलेल्या कतारमधे शरिया कायदा चालतो. हा कायदा सर्वांसाठी बंधनकारक आहे. अल थानी कुटुंबाच्या निरंकुश सत्तेशिवाय इथं कुणाचं फारसं काही चालत नाही. त्यामुळेच कतारकडे फिफाचं यजमानपद आलं त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

राजधानीचं शहर खेळांचं केंद्र

फुटबॉलप्रेमींची पावलं सध्या कतारची राजधानी आणि मोठं शहर असलेल्या दोहाकडे वळलीत. कतारच्या एकूण लोकसंख्येतली जवळपास ६० टक्के जनता या शहरात राहतेय. इथंच फिफाचा फुटबॉल वर्ल्डकप होत असल्यामुळे शहराचा झगमगाट फुटबॉलप्रेमींना मोहात पाडतोय. त्यामुळे सोशल मीडियातही हे शहर ट्रेंडिंगला आहे.

मध्यपूर्वेतल्या खेळांचं महत्वाचं केंद्र म्हणून दोहा शहर ओळखलं जातं. इथंच २००६ला आशियायी खेळ झाले होते. त्याचं यजमानपदही याच कतारने भूषवलं होतं. २०११च्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या अनेक मॅचही इथंच झाल्या होत्या. आताच्या फिफाचा वर्ल्डकपही दोहा शहरात होत असल्यामुळे इथल्या प्राचीन परंपरा आणि आधुनिक वास्तुकलेचे नमुने फुटबॉलप्रेमींना भुरळ घालतायत.

या शहराचं वैभव असलेल्या गगनचुंबी इमारती ऐतिहासिक अवंत-गार्दे वास्तुकलेची आठवण करून देतात. तर मोठाले मॉल या शहरांतर्गत असलेल्या एका वेगळ्याच जगाची सफर घडवतात. सुक वकिफ नावाचा जुना बाजारही याच दोहा शहरात आहे. शहरातलं 'इस्लामिक आर्ट म्युझियम' वेगवेगळ्या वास्तूकलांचा एक उत्तम नमुना आहे. युनेस्कोच्या वारसा यादीतलं 'खोर अल-अदद' आणि इथल्या वाळवंटातली सफारी हा  पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय राहिलाय. फिफाच्या निमित्ताने हे वैभव लक्ष वेधतंय.

फिफासाठी फुटबॉल स्टेडियम

२०१०ला कतारकडे २०२२च्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपचं यजमानपद आलं. अगदी तेव्हापासून कतारचं सरकार कामाला लागलं. फिफा फुटबॉल वर्ल्डकपसाठी ६ स्टेडियम नव्याने बनवली गेली. तर २ स्टेडियमची नव्याने डागडुजी करण्यात आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलाय. यातल्या नव्याने बांधलेल्या ६ स्टेडियमचे फोटो सध्या जगभरात वायरल होतायत ते त्यांच्या हटके अंदाजामुळे.

'लुसेल स्पोर्ट्स एरिना' हे या फुटबॉल वर्ल्डकपमधलं मुख्य स्टेडियम. फुटबॉलच्या १० मॅच या स्टेडियममधे खेळवल्या जातील. याची प्रेक्षक संख्या ही ८० हजार इतकी आहे. दुसरं महत्वाचं स्टेडियम आहे ते म्हणजे 'अल बायत'. इथंच फिफा वर्ल्डकपचं उद्घाटन झालंय. याची क्षमता जवळपास ६० हजार इतकी आहे. तर १९७६ला बनवलेलं खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम खेळांच्या खास सुविधांसाठी म्हणून ओळखलं जातं.

जवळपास ९७४ कंटेनरचा वापर करून बनवलेलं 'स्टेडियम ९७४' सगळ्यांसाठी आकर्षणाचं ठरतंय. केवळ वर्ल्डकपसाठी म्हणून ते बनवलं गेलंय. तर अल रय्यान शहरातलं 'एज्युकेशन सिटी स्टेडियम' अनेक फुटबॉलप्रेमींना भुरळ घालतंय. विशेष म्हणजे स्टेडियमच्या वरती पूर्णपणे हिऱ्यांचं आच्छादन केलं गेलंय. फुटबॉल वर्ल्डकप झाला की ते अशा देशांना दिलं जाईल जिथं खेळांच्या सुविधांची वानवा आहे.

दोहा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं 'अहमद बिन अली स्टेडियम'ही नजरेत भरणारं आहे. याची प्रेक्षक संख्या जवळपास ४० हजार इतकी आहे. कतारच्या सांस्कृतिक प्रतिकांना समोर ठेवून या स्टेडियमची आखणी करण्यात आलीय. तर पारंपरिक तकीया टोपीच्या आकाराचं 'अल तुमामा स्टेडियम'ही त्यातल्या कलाकुसरीमुळे फुटबॉलप्रेमींना आपल्याकडे खेचतंय.

घाम आमचा, झगमगाट तुमचा

फिफा फुटबॉल वर्ल्डकपसाठी कतार सरकारने जवळपास २२० अरब डॉलर इतका खर्च केल्याचं मनी कन्ट्रोल या वेबसाईटवर वाचायला मिळतं. यात नव्याने बनवलेली स्टेडियम, एअरपोर्ट, रस्ते, हॉटेल, आधुनिक स्वरूपाची अंडरग्राउंड वाहतूक व्यवस्था अशा गोष्टींसाठी हा खर्च करण्यात आलाय. तर खेळाडूंसाठी 'द पर्ल' नावानं भलेमोठे काॅम्प्लॅक्स उभारले गेलेत. त्यासाठी १५ अरब डॉलर तर मेट्रोसाठी ३६ अरब डॉलरचा खर्च करण्यात आलाय.

मागच्या १० वर्षांमधे कतारमधे फुटबॉल वर्ल्डकपसाठी या सगळ्या पायाभूत सुविधा उभारल्या जात होत्या. परदेशातून कामगार मागवले गेले. त्यासाठी कतार सरकारने  कामगारांसाठी बनवलेल्या काफ्का व्यवस्थेत बदल केला. काफ्का व्यवस्थेअंतर्गत नोकरी बदलण्यासाठी परदेशी कामगारांना आपल्या मालकांची परवानगी घेणं बंधनकारक होतं. या सगळ्या जाचक अटी हटवून मजदूरीचा दर वाढवला गेला. त्यामुळे आकर्षक रोजगारापोटी जगभरातले मजूर कतारमधे दाखल झाले होते.

पण वेळोवेळी कतारमधून कामगारांच्या शोषणाच्या बातम्या बाहेर यायच्या. ठरलेलं वेतनही त्यांना मिळायचं नाही. पुरेशा सुविधांअभावी हजारो कामगारांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी २०२१ला आलेल्या गार्डियनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंकेच्या जवळपास ६५०० मजुरांचा कतारमधे मृत्यू झालाय. मानवाधिकार संस्था असलेल्या ऍमनेस्टी इंटरनॅशनलनं हा शोषणाचा मुद्दा वेळोवेळी पुढे आणलाय. त्यामुळे कतार सरकारचा भांडाफोड झाला.

वादाच्या भोवऱ्यात कतार सरकार

कतारमधलं सरकार मुळातच कट्टरपंथी विचारांचं आहे. हेच धोरण सरकार पुढं नेतंय. इतर देशांना ब्लॅकमेल करून फिफा फुटबॉल वर्ल्डकपचं यजमानपद आपल्याकडे खेचल्याचा आरोपही कतार सरकारवर वेळोवेळी झालाय. तसंच परदेशी कामगारांच्या शोषणाच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत असतानाही सरकारनं काहीच केलं नसल्याचं कायम बोललं गेलंय.

फिफा फुटबॉल वर्ल्डकपसाठी कतारला आलेल्या देशोदेशींच्या पत्रकारांना त्रास दिल्याच्या बातम्याही आता बाहेर येतायत. एलजीबीटीक्यू समूहाचं वर्ल्डकप बघण्यासाठी स्वागत असल्याचं एकीकडे कतारचे परराष्ट्र मंत्री म्हणतात. पण दुसरीकडे या वर्ल्डकपचे कतारचे दूत असलेल्या खालिद सलमान यांची समलैंगिकतेसंदर्भात वादग्रस्त विधानं केली.

फिफा फुटबॉल वर्ल्डकपच्या आडून कतार सरकारने अरब जगतात आपली प्रतिमा अधिक ठसठशीत करायचा प्रयत्न केलाय. पण दरम्यानच्या काळात तयार झालेले वाद, वर्ल्डकपवर अनेक देशांनी घातलेला बहिष्कार, मानवी हक्कांची पायमल्ली यामुळे कतार सरकार वादाच्या भोवऱ्यात अडकलं. या पार्श्वभूमीवर मोठ्या झगमगाटात फुटबॉलची ही वर्ल्डकप स्पर्धा कतारच्या दोहा इथं होतेय.