मार्क झुकेरबर्गनं कंपनीच्या बदललेल्या नावाची गोष्ट

२९ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सएप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपले जवळचे सगेसोयरे झालेत. दोस्तच म्हणा ना! त्यांच्याशिवाय आपण राहू शकत नाही. थोडं कुठं खाटखुट झालं की लगेच सोशल प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. चर्चा होते. वाद होतात. अनेकवेळा एकमेकांची उणीदूणी काढण्यासाठीही याच माध्यमांचा वापर केला जातो.

मधे फेसबुक, व्हाट्सएप अचानक बंद पडलं होतं. सगळ्यांनाच एकदम काळजी वाटायला लागली. काहीजण अस्वस्थ झाले. मोबाईल रिस्टार्ट करू लागले. आता आपलं काय होणार? हा एकमेव प्रश्न होता. पण हे जागतिक संकट आहे असं समजलं आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला.

फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या फेसबुक कंपनीचं नाव बदललंय. अर्थात हे काही अचानक झालेलं नाहीय. याची कल्पना कंपनीकडून याआधीच दिली होती. तसे संकेतही मिळालेले होते.

फेसबुकचं नाव का बदललं?

२००४ला फेसबुक लॉंच करण्यात आलं. त्यावेळी या सोशल प्लॅटफॉर्मचं नाव 'द फेसबुक' असं होतं. त्यानंतर २००५ ते फेसबुक असं ठेवण्यात आलं. आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सएप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक कंपनीचे होते. आता या कंपनीचं नाव बदलून 'मेटा फ्लॅटफॉर्म इंक' अर्थात मेटा असं करण्यात आलंय.

ग्रीक भाषेत 'मेटा' शब्दाचा अर्थ 'पलीकडे' असा होतो. फेसबुकचं नाव बदललंय म्हणजे नेमकं काय झालंय याबद्दल अनेकांना प्रश्न पडलेत. म्हणजे सोशल मीडियावर कंपनीचं नवं नाव आल्यापासून वेगवेगळी चर्चा होतेय. गेल्या काही काळात फेसबुकवर सातत्याने आरोप केले जातायत. त्यातून बाहेर पडण्यासाठी फेसबुकनं हे नाव बदललं असावं असंही म्हटलं जातंय.

मार्क झुकेरबर्ग यांनी कंपनीच्या कॉन्फरन्समधे याबद्दलची स्पष्टता केलीय. 'वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एकत्र काम करत असताना आम्ही बरंच काही शिकलो. जे काही शिकलो त्यातून काही वेगळं करण्यासाठी म्हणून इंटनेटमधला हा नवा अध्याय आहे.' असं त्यांनी म्हटलंय. आपली कंपनी लोकांना तंत्रज्ञानाशी जोडणारी आहे. असं म्हणत आपला ब्रँड किंवा ऍपची नावं बदलणार नाहीयेत हेही स्पष्ट केलंय.

हेही वाचा: आपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष

'मेटावर्स' तंत्रज्ञान कंपन्यांचं आकर्षण

जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं भुरळ घातलीय. मेटावर्स म्हणजे असं डिजिटल जग जिथं आपल्याला आभासी प्रवेश मिळेल. मेटावर्सचा पहिला उल्लेख १९९२ला अमेरिकन लेखक नील स्टीफेंसन यांच्या 'स्नो क्रॅश' या कादंबरीत आला.

आपण जे इंटरनेट वापरतोय त्याचा आपल्याला जिवंत अनुभव घेता आला तर? थोडं दचकायला झालं ना? जिवंत अनुभव म्हणजे मेटावर्समधे आपला केवळ स्क्रीनशीच संबंध येत नाही तर थेट आपण आतमधे डोकावूनही पाहू शकतो. एखाद्याने आपल्याला वीडियो कॉल केला तर केवळ ती व्यक्ती आपल्याला दिसते. मेटावर्समधे आपण त्या व्यक्तीशी बोलता-बोलता स्क्रीनमधे घुसून त्याच्या आजूबाजूला नेमकं काय चाललंय हेसुद्धा बघू शकतो.

थोडक्यात काय तर आभागी जग नॉर्मल आयुष्यासारखं असेल. या आभासी वातावरणात आपल्याला हवं ते काम आपण करू शकू. नाटक, सिनेमा जे हवं ते आपल्याला बघता येईल. फक्त आपण त्याच्याशी डिजिटली कनेक्ट असू. भविष्यात आपल्याला एक मेटावर्स कंपनी म्हणून पाहिलं जाईल असं सध्या झुकेरबर्ग यांना वाटतंय.

मेटाचा मेटावर्स कधी येईल?

मेटावर्स हे इंटरनेटचं भविष्य असेल असं मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटलं होतं. हे बनवण्यासाठी १० हजार लोकांची निवड केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. यावर्षीच्या जुलै महिन्यात पुढच्या ५ वर्षांमधे आपल्याला मेटावर्स कंपनी होण्याच्या दिशेनं पावलं टाकायची आहेत याचं सूतोवाचही त्यांनी केलं.

प्रत्यक्षात कंपनीने याची सुरवात आधीच केली होती. मार्च २०१४ला कंपनीने वर्चुअल रिऍलिटी तंत्राचा वापर करून हेडसेट तयार करणारी ऑक्यूलस नावाची कंपनी विकत घेतली होती. हे हेडसेट वीडियो गेमिंगसाठी तयार केले जायचे. ऑक्यूलस ही कंपनी हॉरिजोन नावाचा एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करतेय जिथं वर्चुअल रिऍलिटी तंत्राचा वापर करून एकमेकांशी संवाद साधता येईल.

मेटाचं मेटावर्स हे अगदी सुरवातीच्या स्टेजमधे आहे. ते प्रत्यक्षात येण्यासाठी बराच काळ जाईल. हजारो कर्मचारी त्यावर काम करतील. त्यामधून लाखो रोजगार उपलब्ध होती असं झुकेरबर्ग यांना वाटतंय.

हेही वाचा: फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

कंपन्यांची गुंतवणूक, प्रायवसीचं काय?

मेटावर्सच्या पहिल्यांदाच घडतंय असं नाही नाही तर गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनीही यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलीय. अमेरिकन पॉपस्टार आरियाना ग्रँडे आणि रॅपर ट्रॅविस स्कॉट यांनी एक फोर्टनाईट या वीडियो गेममधून परफॉर्म केलं. ज्याला घरी बसून असंख्य लोकांनी पाहिल्याचं  डी डब्ल्यू साईटनं म्हटलंय.

डिसेन्ट्रलँड या ऑनलाईन कंपनी या सगळ्यात आघाडीवर मानली जाते. तर फोर्टनाईट वीडियो गेम बनवणाऱ्या ऍपिक गेम या कंपनीनेही मेटावर्समधे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायचा निर्णय घेतलाय. आभासी जगात जे काही घडतंय ते प्रत्यक्षात आपल्या समोर घडलं आणि त्याचा अनुभव आपल्याला घेता आला तर? भारी ना? अगदी कमी किंमतीत हे तंत्रज्ञान पोचलं तर तसा त्याचा वापरही केला जाईल.

भविष्यातलं महत्वाचं तंत्रज्ञान म्हणून त्याकडे पाहिलं जातं असलं तरीही आपल्या डिजिटल प्रायवसीचं काय हा प्रश्नही त्यातून निर्माण होतोय. वर्चुअल रिऍलिटी तंत्रज्ञानातून आपली माहिती जमा केली जाईल शिवाय आपल्यावरचं नियंत्रण वाढेल असंही म्हटलं जातंय. त्यामुळेच अमेरिकेच्या खासदार अलेक्झांड्रिया ओकासिओ कोर्टेझ यांनी मेटावर्स लोकशाहीसाठी कॅन्सर असल्याचं म्हटलंय.

मेटाचं बिजनेस मॉडेल

मधे एकदा अचानक फेसबुक, व्हाट्सएप काही तासांसाठी बंद पडलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं होतं. सातत्याने कंपनीवर वेगवेगळे आरोप केले जातायत. कंपनीत काम केलेल्या माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेन यांनी काही माहिती लीक करत ही वेबसाईट युवा पिढीच्या मानसिक आरोग्यासाठी एक मोठा धोका असल्याचं म्हटलं होतं.

'असोशिएट प्रेस' ही अमेरिकन न्यूज एजन्सी आहे. भारतात सोशल मीडियातून जो काही विखार पेरला जातोय त्यावर कठोर पावलं उचलण्यात फेसबुक भेदभाव करत असल्याचं या न्यूज एजन्सीनं म्हटलंय. तर सरकारचा रोष ओढवू नये म्हणून फेसबुकची धोरणं ही भेदभावपूर्ण असल्याचं अमेरिकन पेपर 'द वॉल स्ट्रीट जर्नल'नं म्हटलंय.

जगभरातली प्रतिष्ठित माध्यमं मार्क झुकेरबर्ग यांच्या एकांगी धोरणावर आक्षेप घेतायत. सातत्याने टीका करतायत. अमेरिकेच्या 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने तर मेटावर्सची घोषणा ही आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणल्याचं म्हटलंय. तर हे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणलेलं बिजनेस मॉडेल असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा: 

फेसबुक झालंय 'बुक्ड'!

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट