कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही.
मुंबईत २००५ ला महापूर आला. हा पूर मुंबईकरांना खूप काही शिकवून गेला. भरपूर पावसामुळे सर्वच वाहतूक ठप्प झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात एकतरी एस्ट्रा सुट्टीचा दिवस येतो. यामागच्या कारणांचं विश्लेषण खूप झालं. त्यासाठी काही प्रयत्न झाले. पण ते कधीच पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत.
मुंबई महानगराची ही समस्या सोडवतो न सोडवतो तोच दुसरीकडे याहून भयंकर स्थिती निर्माण झाली. यंदा कोकण, उत्तर कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमधे पूर आले. या जिल्ह्यांना किंवा इथल्या नद्यांसाठी पूर काही नवीन नाही. इथल्या गावांत भरपूर जागा आहे, झाडं आहेत. पण हा पूर साधासुधा नव्हता.
या पूरात कित्येक दिवस लाईट नव्हती. अन्नपदार्थ, पिण्याचं पाणी नव्हतं. घरात पाणी शिरत होतं. पण पाऊस थांबला. आणि सगळं ठीक होऊ लागलं. पण कोल्हापूर आणि सांगलीत मात्र तसं काही झालं नाही. तिथली परिस्थिती हाताबाहेर गेली. असा पूर कधीच बघितला नसल्याचं अनेकजण सांगताहेत.
या महापूराने कित्येकांना बेघर, अनाथ केलं. उपासमारीची वेळ आणली. याच कोल्हापूर आणि सांगलीला पुन्हा नव्याने संसार थाटायचाय. मग आपण अशावेळी त्यांना आधार देणारच. त्यांना संपूर्ण देशातून मदत जातेय. वेगवेगळ्या माध्यमातूनही मदतीचा हात पुढे केला जातोय. मग मदत करण्यात आपलं सोशल मीडिया कसं मागे राहील.
हेही वाचा: ‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगल यानही आत्महत्या करेल!
आभासी अर्थात वर्च्युअल जगातला सगळ्यात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक. या फेसबुकवरूनही पूरग्रस्तांसाठी मदत मिळतेय. कुबेर नावाच्या ग्रुपने मिळून तब्बल ९ लाख रुपयांचा निधी गोळा केला. आणि तो पूरग्रस्तांसाठी पाठवला. एवढंच नाही तर औषधं, कपडे, अन्नधान्यसुद्धा मोठ्या प्रमाणात जमा केलं. तसंच एक गाव किंवा वाडी दत्तक घेणार आहेत. त्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याचा संकल्प या ग्रुपने बनवलाय.
संतोष लहामगे हे संगमनेरमधले बांधकाम व्यावसायिक. त्यांनीच पाच वर्षांपूर्वी फेसबुकवर कुबेर या नावाने ग्रुप बनवला. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधले आणि देश-विदेशातले मिळून सतराशे मेंबर ग्रुपमधे आहेत. सुरवातीला या ग्रुपने मेंबर्सच्या कलागुणांना मंच मिळवून देण्याचं काम केलं.
हेही वाचा: सोनिया गांधींपुढे काँग्रेसला बांधून ठेवण्याचं आव्हान
गेल्या काही वर्षांपासून हा ग्रुप समाजकार्यात सक्रिय झालाय. याच सामाजिक कार्याचा भाग म्हणून पूरग्रस्तांना मदत केली जातेय. पुराच्या संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देण्यासाठी ग्रुप अॅडमिनने ग्रुप मेंबर्सना आवाहन केलं. त्यानुसार मेंबर्सनी अवघ्या चारच दिवसात तब्बल सात लाख रुपयांचा निधी जमवला.
यात ४ रुपयांपासून ५० हजार रुपयापर्यंतची व्यक्तिगत मदत मेंबर्सनी केली. याशिवाय कपडे, औषधं आणि अन्नधान्यही मोठ्या प्रमाणावर जमा केलं. पुराच्या काळात गावांत औषधं पुरवणं गरजेचं होतं. पण तिथे पोचण्याचा कोणताच मार्ग नव्हता. त्यावेळी काही ग्रुप मेंबर्सनी कोल्हापूर विमानतळापर्यंत औषधं पोचवली. आणि पुढे ती औषधं संबंधित गावांत एअर लिफ्टने पाठवली. प्रत्यक्ष गरजूंना मदत पोचवण्याच्या कामात तिथले स्थानिक मेंबर करतायत.
कुबेर ग्रुपचे अॅडमिन आणि कुबेर सामाजिक संस्थेचे संस्थापक संतोष लहामगे यांनी ग्रुपवरच्या एका पोस्टमधे लिहिलंय, पूर ओसरल्यावर महाराष्ट्र सरकारच्या मदतीने एखादं गाव किंवा वाडी दत्तक घेऊ. आणि त्यांचे सर्वतोपरी पुनर्वसन करू. त्यासाठी ग्रुपमधून आलेल्या निधीचा वापर करू.
हेही वाचा: तंत्रज्ञानापासून रोखल्याने आपली मुलं गुगलचे सीईओ कसे होणार?
कुबेर ग्रुपने यापूर्वीसुद्धा बरंच सामाजिक कार्य केलंय. दुष्काळात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या राजूरला जल संधारणाचं काम केलं. अपंगांचे सामूदायिक लग्न सोहळे, अनाथाश्रमातल्या मुलींसाठी स्वच्छतागृह, अपंगांना साहित्याचं वाटप, दिवाळी अंकाचं प्रकाशन, गरजूंना आर्थिक मदत, रक्तदान शिबिरं, अनाथाश्रमातील मुलांना साहित्य वाटप इत्यादी बरीच कामं केलीत.
तसंच ग्रुपमधल्या मेंबरना आर्थिक वैद्यकीय मदत, मुंबईच्या दादर चौपाटीच्या गणेश विसर्जनानंतर स्वच्छता अभियान, फिरते वाचनालय, ग्रंथ दिंडी, रामशेज किल्ला स्वच्छता मोहीम, वॉटर कप स्पर्धेत श्रमदान यासह वेगवेगळे ४८ उपक्रम ग्रुपने गेल्या २ वर्षांमधे राबवलेत.
आपल्यालाही या कुबेर फेसबुक ग्रुपला आणि कुबेर सामाजिक संस्थेच्या या उपक्रमांमधे सहभागी व्हायचं असेल किंवा त्यांना मदत करायची असेल तर जरूर ९९२२१११६६६, ९८३४८३२१४०, ९८२२५३२८०८ या नंबरवर संपर्क करा.
हेही वाचा:
कॅमेरा विकत घेताय, मग हे नक्की वाचा
विद्या सिन्हाचं मन सुंदर होतं म्हणून ती सुंदर होती
काश्मीरवर तावातावाने मत मांडण्याआधी एकदा ही पुस्तकं वाचून तर बघा