'एआय'मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

०४ सप्टेंबर २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


तुम्हाला आलेला एखादा मेसेज, फोटो किंवा विडिओ आपल्याला पटला, आवडला तर तो फॉरवर्ड करताना त्याच्या खऱ्याखोट्यापणाबद्दल आपण विचार करतो का? बहुसंख्य लोकांचं या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंचं आहे. कारण जे आपल्याला पटलं, आवडलं ते खरंच असतं हा मानवी स्वभाव आहे. या सगळ्याचा फायदा जगभरात खोटं पसरवाणारे घेताहेत. आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे, तर काय खरं काय खोटं हे कळणंही अवघड झालंय.

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी ते करतात. ते विचार करतात, तसे नेते ते निवडून देतात. अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा हा माहितीचा दुवा आता भुसभूशीत होऊ लागलाय. कारण तुमच्यापर्यंत पोहचणारी माहिती ही खरी असेल की खोटी, याची आता खात्री पटवणं अवघड झालंय.

गेल्या काही दशकात जगभरात झालेली उलथापालथ, बदललेलं राजकीय चित्र याला तंत्रज्ञान आणि माहितीचा मारा मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. आता आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे हे प्रकार आणखीच वाढणार आहेत. त्यामुळे माणसातील चांगुलपणाला, सामाजिक सौहार्दाला धक्का लावणारे, द्वेष वाढविणारे कोणतेही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी ते खरे आहेत की खोटे ते तपासून घ्या. त्यासाठी अनेक डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत.

डिजिटल फसवणूक हा व्यवसाय

सोशल मीडियाचा वापर (आपल्याकडेच नाही तर जगभरच) वाढू लागल्यावर त्यामध्ये काही समाजविघातक बाबी शिरणे अपरिहार्यच होते. सायबर गुन्हेगार इथेही सक्रिय झालेच. स्वतःची खोटी प्रोफाईल ठेवून नोकरी, विवाह, प्रवास, व्यापार किंवा मैत्रीच्याही निमित्ताने लोकांना जाळ्यात ओढणे आणि पैशांना किंवा वैयक्तिक पातळीवरील इतर गोष्टींमध्ये ठकवणे हादेखील एक मोठा व्यवसायच बनला.

याचीच पुढील आवृत्ती म्हणजे फेक न्यूज. याला 'हॉक्स' असेही नाव आहे. अशा बातम्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. राजकारण आणि अर्थकारणापासून आज पृथ्वीवर सूर्याकडून कॉस्मिक रेंजचा मारा होणार आहे, तरी सावध राहावेपर्यंत काहीही यामध्ये असू शकते. अशा बातम्यांना मसाला व्हॅल्यू ऊर्फ 'टीआरपी' जास्त असल्याने सोशल मीडियावर त्या अतिशय झपाट्याने पसरतात. अजून पुढची पायरी म्हणजे फेक व्हिडीओ.

समाजमाध्यमांमार्फत 'व्हायरल' झालेल्या फोटो किंवा व्हिडीओवरून गैरसमज होऊन त्यातून भांडणे, हिंसाचार, कोर्ट केसेस आणि अगदी दंगली उद्‌भवणे आता नवीन राहिलेले नाही. आपण पाहिलेला फोटो किंवा व्हिडीओ अस्सल आहे की मॉर्फिंग केलेला, म्हणजे संगणकीय साधने वापरून सोयीस्कररीत्या कट- पेस्ट केलेला आहे, याची खात्री न करताच त्याला पाठिंबा किंवा विरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या
जातात.

कंटेटपेक्षा इन्फ्लुएन्सर का महत्वाचे झालेत?

सध्या काय सांगितलंय यापेक्षा ते कोणी सांगितलंय यालाच महत्त्व आलंय. हा बहुधा मानवी स्वभावच असावा. कारण, 'फेक' की 'रिअल' याची खात्री करण्याची सुविधा फुकट देणारी अनेक डिजिटल साधनं हाताशी असतानाही आपण तसे करत नाही. या अशा फेक गोष्टी पसरवणं हे समाजासाठी प्रचंड घातक आणि चुकीचं कृत्य आहे.

वर्णनावरून चित्र काढण्याचे जे कौशल्य आपल्यातील काहींमध्ये असते त्याचाच हा अधिक उच्च पातळीवरचा तांत्रिक आविष्कार आहे. सोशल मीडिया, विविध अँप्स, ओरटीटी फार काय टी.व्ही.वरदेखील दाखवली जाणारी दृश्ये किंवा प्रसंग त्यांच्या मूळ रूपात असतीलच याची कोणतीही खात्री प्रेक्षकांना मिळू शकणार नाही.

खोटं खरं म्हणून दाखवलं जातंय

हे घडायला पुढची ५ ते १० वर्षे पुरेशी आहेत. पण, येत्या काही दशकांत हा प्रकार वाढत जाण्याचीच शक्यता आहे; कारण असे व्हिडीओ बनवण्यातला AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) ऊर्फ कृत्रिम बुद्धिमत्तेचा सहभाग वेगाने वाढत असल्याने, दाखवली जाणारी बाब खरी की खोटी, हे ओळखणे जवळजवळ अशक्य बनणार आहे.

उदा., अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांना अटक होताना, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉंन अश्रुधुरातून मार्ग काढताना 'एका फोटोत दिसत आहेत. हे प्रसंग पाहिल्याचे किंवा याबाबत वाचल्याचे कुणाला आठवणार नाही. नाहीच आठवणार; कारण असे काही घडलेलेच नाही. हे प्रसंग संगणकावर, 'एआय'ने बनवलेले आहेत. 

'एआय'वर आधारित 'मिडजर्नी' नावाच्या सॉफ्टवेअरने या प्रतिमा बनविल्या आहेत. त्याला पुरवलेल्या मजकुरावरून (टेक्स्ट प्रॉम्प्ट) हे सॉफ्टवेअर प्रतिमा तयार करू शकते. त्या प्रतिमा किती हुबेहूब आहेत हे आपण पाहू शकतो सध्याच चर्चेत असलेल्या आणि अनेक क्षेत्रांत उलथापालथ घडवू शकणार्‍या 'चॅट जीपीटी'चे उदाहरण घ्या.

खोटं मांडू नको, खोटं पसवू नका

'चॅट जीपीटी' हे भाषेवर आधारित एक 'एआय' सॉफ्टवेअर आहे. त्याला भाषा आणि शब्दप्रयोगांतील बारकावे व छुपे अर्थही चांगलेच समजतात. 'चॅट जीपीटी'सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेला तितक्‍याच दर्जेदार आणि अचूक ऑडिओ-व्हिडीओची जोड मिळल्याने, असे व्हिडीओ किंवा फोटो मूळचेच तसे आहेत की बनवलेले आहेत, हे सांगणे दिवसेंदिवस मुश्कील होत जाणार आहे. 

परिणामी, सत्य लपवणे, ते वेगळ्या रूपात दाखवणे किंवा स्वतःला सोयीचा असेल तेवढाच भाग सांगणेही अगदी सहजशक्य होईल. यासाठी सरकारने व स्वयंसेवी संस्थांनी खरेपणा तपासण्यासाठी काही वेबसाईटस्‌ तयार करणे जरुरीचे आहे. तसेच सायबर कायदे बदलून त्यात फेक न्यूज, व्हिडीओचा प्रसार करणार्‍या व्यक्‍तींना व संस्थांना जबर शिक्षा व्हायला हवी.

नीतिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान ही बाब शालेय, महाविद्यालयीन शिक्षणात अंतर्भूत करायची हीच वेळ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल, इंटरनेट वापरणऱ्या प्रत्येक माणसानं आपण जे काय पसरवतोय, ते खरं आहे की खोटं याचा सद्सदविवेकबुद्धीनं आणि वेगवेगळ्या माध्यमातून तपासून पाहायला हवं. शेवटी आपणंही खोटं पसवरणारे ठरणार नाही, याची काळजी प्रत्यकानं घ्यायला हवी.