तुम्हाला कोरोनाविषयी काय माहितीय, ते तुम्हाला वॉट्सअप किंवा फेसबूकवरून समजलं असेल, तर थांबा. ती फेक न्यूज असू शकते. कांदा, लसूण खाऊन किंवा गोमूत्र पिऊन कोरोना जातो, यावर तुम्ही विश्वास ठेवला असाल तर तुम्हाला कोरोना फेक न्यूजच्या रोगाची लागण झालीय. हा रोग प्रत्यक्ष कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. त्यामुळे योग्य माहिती मिळवणं, हाच त्यावर उपचार आहे. असं संशोधन सांगतंय.
टीवी आणि मोबाईलवरच्या कोरोनाच्या बातम्यांना घाबरून मुंबईतल्या अंधेरीत दोनजणांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. आपल्याला कोरोनाची लागण झाली तर, यामुळे घाबरून त्यांनी कामावर जाणं बंद केलं होतं. यासंबंधी लोकसत्तामधे आलेल्या बातमीनुसार, एक तरुण आणि एक तरुणी कोरोना फेक न्यूज या रोगाने ग्रस्त झालेत. त्यांच्यावर डॉ. सागर मुंदडा यांचे मानसोपचार सुरू आहेत.
कोरोनाची अशीच भीती जगभर पसरलीय. त्याला कारण आहे फेक न्यूज. कोरोनाच्या नावावर वाट्टेल ते उपाय खपवण्याचा प्रयत्न सुरूय.
घसा कोरडा पडला तर कोरोनाची लागण लवकर होते, इथपासून ते गोमूत्र पिऊन किंवा कापुराची धुरी घेऊन कोरोना बरा होतो इथपर्यंत काहीही गोष्टी लोक परसवत आहेत. लसूण किंवा कांदा खाल्ल्याने कोरोना बरा होतो अशीही अफवा भरपूर पसरतेय. आणि यासाठी सोशल मीडियाचा फारच वापर होतो.
फक्त भारतातच नाही तर परदेशातही फेक न्यूजचं प्रमाण खूप जास्त असल्याचं लक्षात आल्यानं फेसबूक आणि वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जोरात कामाला लागलेत. फेसबूकचे सीईओ सुंदर पिचाई यांनी तर फेक न्यूज थांबवण्यासाठी २४ तास उपलब्ध असणारी एक टीमच तयार केलीय. कोरोना किंवा त्यासंबंधी असणाऱ्या कोणत्याही बातमीची शहानिशा करून ती बातमी खोटी असेल तर लगेचच फेसबूकवरून काढून टाकण्यात येतेय.
एवढे प्रयत्न करूनही फेक न्यूज कमी झाल्याचं दिसत नाही. आपल्याकडचं कडकनाथ कोंबडीचं उदाहरण हेच सांगतं. कोंबडी खाल्ल्यामुळे कोरोना होतो अशी अफवा पसरली आणि लोकांनी चिकनकडे पाठ फिरवली. त्यामुळे एरवी १८० रुपये किलोनी विकली जाणारी कोंबडी काही गावांत तर थेट २० रुपये किलो भावानं विकली जातेय. शेकडो अंडी पडून राहिलीयत. या सगळ्यात डेअरी व्यवसायिकांचं भयंकर नुकसान झालंय. आईस्क्रिम, कोल्डड्रिंक प्याल्याने कोरोना पसरतो अशी अफवा पसरल्यापासून उन्हाळ्याच्या तोंडावरच लोकांनी आईस्क्रिमकडे पाहत नाकं मुरडणं चालू केलंय.
हेही वाचा : आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!
फेक न्यूज म्हणजे केवळ खोटी बातमी नाही. तर कोरोना या वायरसविषयी चुकीची, अवैज्ञानिक किंवा अर्धवट माहिती देणं हे सुद्धा फेक न्यूजच म्हणायला हवी. अशा प्रकारच्या फेक न्यूजचा परिणाम फक्त उद्योगधंद्यांवरच नाही तर माणसांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. कोरोनासारख्या आजरांची साथ पसरली असताना सोशल मीडियावर पसरवलेल्या चुकीची माहितीमुळे लोकांचे जीव जाऊ शकतात असं एका संशोधनातून समोर आलंय.
ब्रिटनच्या युनिवर्सिटी ऑफ इस्ट एंजिला म्हणजे युईएमधे हे संशोधन पार पडलं. युईएच्या नॉरविच मेडिकल स्कूलमधले प्रा. पॉल हंटर आणि डॉ. जुली ब्रेनार्ड या दोन संशोधकांनी एक शोधनिबंध सादर केलाय. त्यात रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यासंबंधी खोटी माहिती पसरली तर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जात होता. त्यावेळी खोट्या बातम्या पसरवण्यापासून लोकांना थांबवता आलं तर आपण अनेक लोकांचे जीव वाचवू शकतो असं त्यांच्या अभ्यासातून समोर आलं.
या संशोधनात काम करणारे पॉल हंटर म्हणतात, ‘कोविड-१९ म्हणजेच नव्याने पसरलेल्या कोरोना वायरसविषयी लोकांनी अंदाजपंचे अनेक गोष्टी सांगितल्यात. वायरस कसा तयार झाला, कशामुळे त्याची लागण होते आणि त्याचा प्रसार कसा होतो याविषयी इंटरनेटवर चुकीची माहिती आणि अफवाही पसरवण्यात आलीय. चुकीच्या माहितीसोबत चुकीचा सल्लाही दिला जातो आणि असा मेसेज फार लवकर पसरतो. त्यानं माणसाच्या वागण्यात बदल होतो. यानं खरंतर जोखीम वाढते.’ द गार्डियन`सह अनेक इंग्रजी वेबसाईटवर त्यांचं हे म्हणणं प्रकाशित झालंय.
खरंतर, इन्फ्ल्युएन्झा म्हणजे शीतज्वर, मंकीपॉक्स म्हणजे कांजण्यांचा एक प्रकार आणि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर पसरणारा नोरा वायरस या आजारांबद्दल हे संशोधन चालू होतं. पण या संशोधनातून समोर आलेल्या गोष्टी या कोविड-१९ शी लढतानाही उपयोगी पडतील असं संशोधकांचं म्हणणं आहे.
हंटर पुढे म्हणतात, ‘एखाद्या षडयंत्राचा भाग म्हणून फेक न्यूज तयार केलेली असते. त्यातून समाजातल्या काही लोकांचा राजकीय किंवा आर्थिक फायदा होणार असतो. पण अशी बातमी कधीही तथ्यावर आधारलेली नसते.’ गंमत म्हणजे या संशोधनानुसार लक्षात आलंय की ब्रिटनमधले ४० टक्के लोक हे अशा खोट्या बातमीवर विश्वास ठेवतात. अमेरिका आणि इतर देशांकडे पाहिलं तर ही संख्या आणखी वाढलेली असेल. भारतात असा सर्वे केला तर सगळ्या देशांपेक्षा जास्त टक्केवारी आपल्याकडे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
‘पश्चिम आफ्रिकेत इबोलाची लागण झाली तेव्हाही तिथे अशाच प्रकारच्या अफवा पसरवल्या जात होत्या. त्या अफवांवर विश्वास ठेवणारे लोक सुरक्षितता बाळगायची सोडून इबोलानं मेलेल्या व्यक्तीचा अत्यंत चुकीच्या पद्धतीमं अंत्यविधी करत होते. इथं ब्रिटनमधे आपल्या मुलाला कांजण्या झालेल्या असतानाही फेक न्यूजच्या आहारी जाऊन शाळेत पाठवणाऱ्या पालकांची संख्या १४ टक्के होती.’
हेही वाचा : जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?
हंटर आणि ब्रेनार्ड यांच्या टीमनं आधी रोग नसताना लोक कसे वागतात त्या सामान्य परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी एक मॉडेल तयार केलं. त्यासोबतच वेगवेगळे रोग कसे पसरतात, लोकांना त्याची लागण झाल्यानंतर लक्षण दिसेपर्यंत लागणारा वेळ आणि रोगातून बरं होण्यासाठी लागणारा वेळ या सगळ्याचाही अभ्यास केला. शिवाय, सोशल मीडियावर कोणती पोस्ट किती वेळा वायरल होते त्यातली खरी माहिती कोणती असते, याही गोष्टी तपासल्या.
‘विश्वसनीय स्रोतांकडून माहिती मिळवण्यापेक्षा लोक फेक न्यूजवर फार लवकर विश्वास ठेवतात.’ असं ब्रेनार्ड सांगतात. ‘चुकीची माहिती देणारे मेसेज पसरवणं १० टक्क्यांनी कमी करता आलं तरी त्याचा फार मोठा परिणाम होतो. पण यासोबतच जवळपास २० टक्के लोकांना फेक न्यूज ओळखायला आणि मिळालेल्या माहितीत तथ्य आहे की नाही हे जाणून न घेता शेअर करायचा नाही हे शिकवलं पाहिजे.’ ब्रेनार्ड यांनी त्याला फेक न्यूज प्रतिबंधात्मक लसीकरण असं म्हटलंय.
थोडक्यात, फेक न्यूज थांबवायची असेल तर ती पसरण्यापासून थांबवणं आणि लोकांना त्याचं ज्ञान देणं अशा दोन पातळ्यांवर काम करावं लागेल, असं हे संशोधक आपल्याला सांगतायत.
सध्या कोरोना वायरससंबंधी पसरणाऱ्या फेक न्यूजमधे मेसेजच्या शेवटी ‘तुम्हाला मानवी जीव वाचवायचा असेल तर हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा’ अशा प्रकारचं एक वाक्य लिहिलेलं असतं. आपण नीट लक्ष देऊन पाहिलं तर फेक न्यूजची एकप्रकारची भाषा असते. प्रत्येक फेक न्यूजमधे वाचणाऱ्याला भावनिक आवाहन केलेलं असतं. या भावनिक आवाहनाला आपण बळी पडलो तर आपणही या फेक न्यूजचे वाहक होऊन बसू हेच हंटर आणि ब्रेनार्ड यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा :
माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?
कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?
कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय