संगीतकाराइतकं 'हार्मनी'चं महत्व कोण जाणतं!

१४ मे २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.

प्रिय भाजप सदस्यहो,

एक नागरिक म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. माझा समाज-राजकीय विचार तुमच्याहून वेगळा आहे. आपण एकमेकांशी अखंड वाद घालत राहू; पण तरीही आपल्याला परस्परांविषयी आदर राखता यायला हवा कारण मानवता हाच तर आपल्या ध्येयातला समान धागा आहे. भारताविषयी आपल्या सर्वांनाच प्रेम आहे हे गृहीत धरुन नागरिकत्वाच्या, सहभावाच्या नात्याने तुमच्याशी बोलतोय.

देश सध्या टकमक टोकावर उभा आहे. हजारो लोक मरताहेत. कित्येक लोकांचा मृत्यू झालाय, हे आपल्या गावीही नाही. जे ठणठणीत, बरे आहेत त्यांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी आपण झगडतो आहोत. हे सगळं अभूतपूर्व आहे आणि हा अंधार दूर लोटत आपल्याला वाट काढायलाच हवी. म्हणजेच आपण आपले दोष समजून घ्यायला हवेत.

कर्तव्य पार पाडताना अक्षम्य दुर्लक्ष होतंय, हे आपण नजरेला आणून द्यायला हवं. हे करण्यासाठी कोविडोत्तर काळातल्या विश्लेषणाची गरज नाही. आता सर्वाधिक गरज आहे. आता या सगळ्यात सुधारणा करायला हवी. या महासाथीला शास्त्रीयदृष्ट्या आणि आस्थेने कसं सामोरं जायचं हे आपल्या हातात होतं आणि आजही आहे. लाखो लोकांचे जीव टांगणीला लागलेत.

हेही वाचा: प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

नरेंद्र मोदी हे फक्त तुमच्या पक्षाचे नेते नाहीत, ते आपले सर्वांचे देशाचे पंतप्रधान आहेत. या संवैधानिक भूमिकेचा विसर पडताच कामा नये. तुमच्या पक्षाचे तारणहार म्हणून त्यांच्याकडे न पाहता, संपूर्ण देशाचे नेते म्हणून त्यांच्याकडं पहा. माझ्यासाठी दोन क्षण असा विचार करा. अनेक दशकानंतर असं कणखर, शक्तिशाली नेतृत्व तुमच्या पक्षाला लाभलं आहे ज्यांनी एकदा नव्हे, दोनदा तुम्हाला बहुमत मिळवून दिलं आहे, हे काही काळासाठी बाजूला ठेवा.

मोदी दुसऱ्या कोणत्या पक्षाचे असते तर तुम्ही असे शांत बसला असतात? त्यांच्यामुळे हजारो स्थलांतरित मजूरांना अन्नपाण्याविना शेकडो किलोमीटर चालत जाण्याची वेळ आली असती तरी तुम्ही मौन धारण केलं असतं? तुम्ही पंतप्रधानांना आणि सरकारला या गैरव्यवस्थापनाबद्दल धारेवर धरलं नसतं?

ज्यांच्यामुळे लसीकरणाचा कार्यक्रम रखडलाय आणि लोक खाजगी कंपन्यांच्या दयेवर अवलंबून आहेत, अशा पंतप्रधानांना तुम्ही प्रश्न विचारले नसते? देशाच्या राजधानीतच ऑक्सिजन उपलब्ध नाही, हे पाहून तुम्ही उद्विग्न झाला नसता? सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करुन ऑक्सिजन द्यायला सरकारला आदेश द्यावे लागतात, हे पाहून तुम्हाला धक्का बसला नसता?

हेही वाचा: मोहम्मद अझीजः चेहरा नसणाऱ्या माणसांचा आवाज

काही राज्यांमधला कोविड डाटामधला घोळ पाहून तुम्ही चौकशीची मागणी केली नसती? नियोजनशून्य कारभारामुळे आणि शास्त्रीय सल्ल्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असं तुम्ही म्हणाला नसता? आणि या सगळ्या भीषण अवस्थेत मंत्री सरकारची चांगली प्रतिमा टिकून रहावी म्हणून प्रयत्न करत आहेत आणि विरोधी विचाराच्या लोकांच्या सोशल मिडिया अकाउंटसची गळचेपी करण्यात व्यस्त आहेत! दरम्यान सरकार सेंट्रल विस्टा या संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या प्रकल्पात व्यस्त आहे.

राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका कशा पार पडल्या ते सोडा, पण कोविड संसर्गाचे आकडे उच्चांक गाठत असताना लाखोंची गर्दी गोळा करुन पंतप्रधान सभा घेत होते, हे धक्कादायक नव्हतं का? त्यांनी स्वतःच असा वस्तुपाठ घालून दिल्यावर नागरिकांनी कोविड प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून आपण नागरिकांना दोष देऊ शकतो का?

आंतराष्ट्रीय माध्यमं आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करताहेत, असं तुमचं मत आहे, यावर माझा विश्वास नाही. ती चित्रं खरी आहेत, ती माहिती, त्या स्टोरीज खऱ्या आहेत. प्रेतांची रास जळतेय, हे खरं आहे. लोक श्वास घेण्यासाठी झगडताहेत. लोक मदतीची याचना करताहेत इतर लोकांकडून, सरकारकडून नाही.

हेही वाचा: लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

हे पाहून तुम्हाला धक्का बसत नाही? तुमचं हृदय हेलावून जात नाही? तुम्ही आणि मी या महासाथीत कित्येक मित्र गमावले पण तरीही या सगळ्या अराजकाला केंद्र सरकार जबाबदार आहे, असं म्हणताना तुमची जीभ अडखळते. जीव वाचवण्यापेक्षा तुमच्या नेत्याची प्रतिमा वाचवणं तुम्हाला महत्त्वाचं वाटतं? अंतर्गत लोकशाहीविषयी तुमचा पक्ष नेहमी बोलतो. ती प्रत्यक्षात यावी म्हणून तुम्ही आता का बोलत नाही? विशेषतः आता?

कर्तव्य कुचराई करण्यात राज्य सरकारंही जबाबदार आहेतच; पण कोविड महासाथ हाताळण्याची प्रमुख जबाबदारी केंद्राची आहे. मार्च २०२० मधे केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. तेव्हापासून सहकार्यशील संघराज्यवाद दिसण्याऐवजी मोदी सरकार खोडाच घालताना दिसतेय.

केंद्र सरकार हे कोणत्याही राज्यापेक्षा शक्तिशाली आहे आणि या परिस्थितीवर नियंत्रण राखण्याची, दुवा साधण्याची सर्वाधिक जबाबदारी केंद्राचीच आहे. या ऐक्यभावनेच्या विश्वासासह पंतप्रधानांनी एकदाही संवाद साधला नाही. दुसऱ्या बाजूला बसलेल्या आपल्याच सहकाऱ्यांवर ते केवळ आगपाखड करत असतात.

प्रत्येक नागरिकाचं मी संरक्षण करेन, असं ते पुन्हा पुन्हा म्हणत राहिले. माझ्या सगळ्या कृत्यांची जबाबदारी माझी आहे, असंही ते सांगत राहिले. आपण अतिशय साधारण कुटुंबातून आलेलो असल्याने कष्टकरी जनतेच्या हालापेष्टा आपण जाणतो, असंही ते म्हणाले. मात्र ते अक्षरशः आम्हा सर्व नागरिकांना जोजवल्यासारखं करताहेत.

हेही वाचा: आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

‘मन की बात’ मधे ते आधीच ठरलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात तर मीडियातल्या त्यांच्या मुलाखतीही ‘पूर्वनियोजित’ असतात. एकही खुली पत्रकार परिषद का घेत नाही, असा सवाल तुम्ही त्यांना का करत नाही? मोदी वगळता जगभरातले सगळे नेते पत्रकार परिषदांना सामोरे जाताहेत.

कोविड १९ चं संकट जेव्हा आलं तेव्हा मोदी सगळ्या पक्षांची मोट बांधू शकले असते. धोरणं, निर्णय, कृती, व्यवस्थापन याची जबाबदारी वाटून देता आली असती. शतकांमधून कधीतरी अशी महासाथ येते. त्याचं आधी सारं नियोजन कोणीच करु शकत नाही मात्र किमान आपण ही लढाई एकत्र लढली असती. आपण नागरिक खासदार निवडतो, पक्ष नाही, हे आपण विसरुन गेलो आहोत. मोदींना आपण ‘स्टेटसमन’ आहोत, असं दाखवून देता आलं असतं.

अवघड प्रश्न विचारण्याची विशिष्ट एक योग्य वेळ नसते. प्रत्येक दिवशी तुम्ही शांत राहता आणि हजारो लोक मरतात. आता या कारभारात तातडीने सकारात्मक, रचनात्मक हस्तक्षेप केला नाही तर परिस्थिती भयंकर प्रकोपाला जाऊ शकते, हे आपल्याला माहीत झालं आहे.

तुम्हाला भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल.

हेही वाचा: 

डायना राजमुकुटाची गरज नसलेली राजकन्या

आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?

पेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार

भारतातली विविधता बाजूला सारून देश एक कसा होणार?