निवडणुका हरलेले राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचा चेहरा कसा बनले?

०४ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


२६ जानेवारीला दिल्लीतलं शेतकरी आंदोलन हिंसक झालं. मीडियातून आंदोलन बदनाम करायचे प्रयत्न झाले. फूट पडली. मोदी सरकारने आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या राकेश टिकैत यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अधिक ताकदीने उभ्या राहिलेल्या आंदोलनाचे राकेश टिकैत केंद्रबिंदू बनले.

गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीतलं हे आंदोलन हिंसक झालं. दुसरीकडे काही चॅनलतून 'ट्रॅक्टर रॅली' बदनाम करणाऱ्या बातम्याही येऊ लागल्या. 

२६ जानेवारीच्या अगोदर वी.एम. सिंग यांच्या संघटनेच्या शेतकऱ्यांची संख्या जास्त होती. त्यांच्या राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेनं हिंसेचं कारण देत आंदोलनातून काढता पाय घेतला. सरकारला हवं होतं तेच झालं. आंदोलनात फूट पडली. 

दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर हे आंदोलन ज्या ठिकाणी चालू होतं ती जागा खाली करायचा आदेश देण्यात आला. पण शेतकरी आंदोलनाचे आणखी एक नेते राकेश लवकरच सरकारला शरण जातील, असं चित्रही मीडियातून रंगवण्यात आलं. पण झालं उलटच. भाजपच्या नेत्यांनी आंदोलनात गुंड पाठवल्याचा आरोप करत टिकैत यांनी आक्रमक भूमिका घेतली.

आणि नूर पालटला

'चाहे मुझे गोली मार दो, मैं बॉर्डर खाली नही करुंगा. मैं घर नही जाऊंगा. मैं किसान हूं और किसानही मेरा आत्मसन्मान है. जब तक मेरे गाव के ट्रॅक्टर और मेरे गाव का पानी यहा नहीं आयेगा, तब तक मैं पानी नहीं पिऊंगा. मैं यहीं पर फांसी लगा लूंगा.' त्यांची ही वाक्य शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करणारी होती. मुजोर सत्तेच्या समोर हार मानणार नाही हे सांगणारी होती. 

मीडियासमोर बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. हा वीडियो सोशल मीडियात वायरल झाला. शेतकरी संघटनेतल्या फुटीचा फायदा सरकार घेतंय असं दिसत असताना राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी आंदोलनाचा नूर पालटला. त्यांचा हौसला इतका बुलंद होता की, थेट गावागावातून त्यांच्यासाठी पाण्याचे टँकर पाठवण्यात आले.

एका रात्रीत चित्र बदललं. आंदोलनाला वेगळं वळण मिळालं. वेगवेगळे हॅशटॅग वापरून शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा देण्यात आला. शेतकरी आंदोलकांचं पाणी आणि वीज कापणाऱ्या सरकारला एक पाऊल मागं घ्यावं लागलं. तेव्हापासून राकेश टिकैत या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरले. राकेश टिकैत यांमुळे आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद बघता देशभरातल्या विरोधी पक्षांचे नेते त्यांची भेट घेत आहेत.

हेही वाचा : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

वडलांच्या संघर्षाचा वारसा

उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडच्या भागातल्या शेतकऱ्यांवर राकेश टिकैत यांचे वडील शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांच्या कामाचा प्रभाव कायम आहे. त्यामुळेच आपल्या नेत्याचा मुलगा असलेल्या राकेश टिकैत यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून अनेक शेतकरी गाझीपूरच्या दिशेनं रवाना झाले. 

महेंद्रसिंग उर्फ बाबा टिकैत यांना आजही केवळ शेतकरी आंदोलनासाठी ओळखलं जातं. त्यांनीच १९८७ मधे भारतीय किसान युनियनची स्थापना केली. त्यांनी वीज खर्चाबाबत मोठं आंदोलन केलं. एका वर्षानंतर मेरठ आयुक्तालयाला २४ दिवसांसाठी घेराव केला.  त्यानंतर सरकारी उसाचा दर २७ रुपयांवरून ३५ रुपये करावा लागला. 

ऑक्टोबर १९८८ मधे ५ लाख शेतकर्‍यांसह आठवडाभर नवी दिल्लीतल्या बोट क्लब इथं रॅली करण्यात आली. तेव्हा शेतकऱ्यांनी दिल्ली काबीज केल्याचं चित्र निर्माण झालं. शेवटी पंतप्रधान राजीव गांधीचं काँग्रेस सरकार शेतकऱ्यांसमोर झुकलं. 

त्यांचं कॅन्सरमुळं निधन झाल्यावर त्यांचा मोठा मुलगा नरेश टिकैत यांच्याकडे भारतीय शेतकरी युनियनचं अध्यक्षपद आलं. ते ज्या बालियान खापमधून येतात त्यांच्या पंचायतीच्या नियमांनुसार केवळ मोठा मुलगाच प्रमुख नेता होऊ शकतो. 

असं असलं तरीही संघटनेचे सर्व महत्वाचे निर्णय राकेश टिकैत घेतात. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून चाललेल्या शेतकरी आंदोलनाला उभं करण्यात राकेश यांची महत्वाची भूमिका राहिलीय. राकेश यांना सरकारच्या विरोधात लढा देताना पाहून वडलांचा वारसा हेच चालवू शकतात, असं वातावरण तयार झालंय. 

कोण आहेत राकेश टिकैत?

राकेश टिकैत यांचा जन्म ४ जून १९६९ ला उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमधल्या सिसौली गावात झाला. एलएलबीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मेरठ युनिवर्सिटीतून एमए केलं. शेतकऱ्यांच्या मुलांना जसं सरकारी नोकरीचं आकर्षण असतं तसंच राकेश टिकैत यांनाही होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १९९२मधे दिल्ली पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला सुरवात केली.

सगळं आयुष्य सुरळीत आणि व्यवस्थित सुरू होतं. पण एका घटनेनं आयुष्याची दिशाच बदलली. १९९३ - १९९४ मधे वडील महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलन सुरू होतं, त्यावेळीही ते यात सक्रिय झाले. 

तत्कालीन सरकारनं आंदोलन संपवण्यासाठी दबाव आणला, तेव्हा त्यांनी आपली नोकरी सोडली. वडलांच्या सोबतीनं शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले. तिथूनच शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनवण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला होता.

हेही वाचा : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २

आंदोलनं आणि तुरुंगवास

भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक वेळा लढा दिलाय. यादरम्यान त्यांना ४० हून अधिक वेळा तुरुंगवासही भोगावा लागलाय. उसाचा भाव वाढवण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या संसद भवनाच्या बाहेर ऊस जाळत निषेध केला होता. त्यामुळं त्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. मध्य प्रदेशच्या भूमी न्यायधिकरण कायद्याविरोधात दीर्घकाळच्या लढ्यात त्यांना ३९ दिवस जेलमधे डांबण्यात आलं होतं.

एकदा तर राजस्थानमधे शेतकऱ्यांना बाजरीचा भाव वाढवून मिळावा, अशी मागणी त्यांनी लाऊन धरली. ही मागणी सरकारने मान्य करायला नकार दिल्याने राकेश यांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली. त्यासाठी त्यांना जयपूरच्या तुरुंगात डांबण्यात आलं होतं. सत्तेविरोधात लढण्याचा त्यांचा अनुभव असा जुना आहे. कोणत्याही सत्तेसमोर न झुकता मजबूत उभं राहून निर्भयपणे लढाई लढण्याचं बाळकडू त्यांच्या वडलांकडून वारसानं मिळालंय.

जाट कोणाच्या बाजूने?

राकेश यांच्या आवाहनानंतर २९ जानेवारीला उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगर इथं जाट महापंचायत बोलवण्यात आली. या पंचायतीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. १० हजाराहून अधिक शेतकरी तिथं पोचले. हरयाणाच्या जाट शेतकर्‍यांनीही या महापंचायतीत भाग घेतला. आता हे शेतकरी आंदोलक राकेश टिकैत यांच्या समर्थनात वाट सापडेल त्या मार्गाने गाझीपूर सीमेकडे वाटचाल करतायत.

या आंदोलनात पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, राजस्थानमधले हजारो जाट शेतकरी विविध माध्यमातून भरघोस पाठिंबा देतायत. हरयाणातलं राजकीय समीकरण घडवणारा आणि बिघडवणारा महत्वाचा जाट हा महत्वाचा फॅक्टर आहेच. शिवाय जाट समुदाय उत्तर प्रदेशात लोकसंख्येच्या १७% आहे. तर उत्तर प्रदेश विधानसभेच्या १२० जागांवर जाट समुदायाचा प्रभाव आहे, असा दावा केला जातो. 

उत्तर प्रदेश आणि हरयाणाबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली इथल्याही राजकारणात जाट समुदायाचं विशेष महत्व आहे. आंदोलनामुळे गेली काही वर्षं जाट विरुद्ध मुसलमान, जाट विरुद्ध गुज्जर असे वाद उभे करून जाटाना आपल्याकडे खेचणाऱ्या भाजपच्या राजकारणाला यामुळे धक्का बसू शकतो.

हेही वाचा : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग ३

निवडणुकीत लोकांनी नाकारलं

विशेष म्हणजे मोदी लाटेत निवडणूक लढवणाऱ्या राकेश टिकैत यांची राजकीय कारकीर्द फारशी चांगली राहिली नाही. २००७ मधे त्यांनी यूपीच्या खतौली मतदारसंघातून काँग्रेसचा पाठिंबा घेत विधानसभा लढवली. त्यांना केवळ ९०९५ मतं मिळाली. ते सहाव्या स्थानावर होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी यूपीच्या अमरोहा इथून राष्ट्रीय लोक दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांना केवळ ९,५३९ मतं मिळाली. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं.

अशा प्रकारे राकेश यांनी दोन वेळा निवडणूक लढवूनही त्यांना अतिशय वाईटरित्या पराभूत व्हावं लागलं होतं. अर्थात हे झालं निवडणुकांचं राजकारण. जमिनीवरच्या कोणत्याही आंदोलनात प्रामाणिकपणे कष्टकरी, शेतकऱ्यांच्या बाजूनं लढताना मुजोर सत्तेच्या समोर न डगमगता नजरेला नजर भिडवून, निधड्या छातीने लढण्याची जिद्द निर्माण करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता असते. असाच दमदार चेहरा या शेतकरी आंदोलनाला राकेश टिकैत यांच्या रूपाने मिळालाय.

हेही वाचा : 

जे झालं ते चुकीचंच पण..

तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?

समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!

दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

डॉ. नरेंद्रसिंग कपानी: फायबर ऑप्टिक्सचा हा जनक आपल्याला माहीत नाही