शेतकऱ्याच्या पोराने मातब्बर कृषीमंत्र्याला हरवलं, त्याची गोष्ट

२५ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


मतदानाच्या दिवशीच मोर्शी मतदारसंघातली तुल्यबळ फाईट चर्चेत आली. शेतकरी संघटनेच्या तरुण उमेदवारावर हल्ला करून त्याची गाडी जाळल्याने ही चर्चा झाली. आता त्याच तिशीतल्या देंवेंद्र भुयर या तरुणाने भाजपचे मातब्बर नेते, कृषीमंत्री अनिल बोंडे यांना पराभवाचा धक्का दिलाय. शेतकऱ्याच्या पोराने मिळवलेल्या या विजयाची ही कहाणी.

अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी वरुड मतदारसंघातून विजयी झालेल्या देवेंद्र भुयार या तरुणाने शेतकऱ्यांच्या आशेला नवी पालवी फोडलीय. एका शेतकऱ्याच्या पोराने कृषिमंत्री असलेल्या नेत्याला सत्तेच्या धुऱ्यापर्यंतही पोचू दिलं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपल्या पायाची भिंगरी करणारा हा कार्यकर्ता आता सरळ विधानसभेत जाऊन पोचलाय. त्यामुळे शेतकर्‍यांच्या वेदनेला संपवण्यासाठी आता संविधानिक आधार मिळाल्याची भावना मतदारांमधून व्यक्त होतेय.

काँग्रेस महाआघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर लढत असलेल्या देवेंद्र भोयर यांनी बोंडेंना ९७७५ मतांनी हरवलं. भोयर यांना ९६ हजार, तर बोंडे यांना ८६ हजार मतं पडली.

मोलमजुरी करून शेती करणाऱ्याचं पोर

देवेंद्र महादेवराव भुयार. युवकांचा नेता. कष्टकऱ्यांचा आवाज. शेतकऱ्यांच्या वेदनेची नाळ. तडीपारीच्या कारवाईचा बळी. पंचायत समिती सदस्य. जिल्हा परिषद सदस्य. आणि आता आमदार. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येऊन लढणारा सामान्य कार्यकर्ता ते आमदार हा देवेंद्र भुयार या तरूणाचा प्रवास प्रस्थापित व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

मोर्शी तालुक्यातल्या गव्हाणकुंड या छोट्याशा गावात देवेंद्रचा जन्म झाला. सातपुडा पर्वताच्या रांगेमधे असलेलं हे गाव. इथल्या कपिलेश्वर संस्थान परिसरातील लोकांच्या भक्तीचे केंद्र आहे. गावातून वाहणारी सुकी नदी. निसर्गानं मनसोक्त उधळण केलेल्या या गावाने देवेंद्रसारख्या एका कार्यकर्त्याला आपल्या कुशीत घेतलं. अत्यंत बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या देवेंद्रचे वडील मोलमजुरी करून कशीबशी शेती करायचे.

बेभरवशाच्या शेतीचे फटके शेतकऱ्यांना कसं बसतात याचे दाहक अनुभव देवेंद्रला होते. अमरावतीत येऊन कसंबसं त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं. हे सारं करताना शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त आयुष्याच्या कहाण्या त्याला अस्वस्थ करून सोडायच्या. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात आशेची नवी पहाट आली पाहिजे म्हणून देवेंद्र जाणीवपूर्वक स्वतःला समाजकारण आणि त्यातूनच ओघाओघाने येणाऱ्या राजकारणात झोकून दिलं.

हेही वाचाः कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं!

आपल्याला आमदार व्हायचंय

देवेंद्रने आपल्याला आमदार व्हायचंय हे आधीच ठरवलं होतं. मी एक ना एक दिवस आमदार बनेलच, असं तो आपल्या मित्रांना बोलून दाखवायचा. आणि आज त्याचे ते शब्द खरे ठरलेत. आणि तेही वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी. ग्रामीण भारतातील शेतकरी शेतमजूर आणि त्यांची मुलं पेटून उठली की देवेंद्र भुयारसारख्या तरुण नेत्याचा जन्म होत असतो हे मोर्शी वरुड मतदारसंघातील जनतेने दाखवून दिलंय.

देवेंद्रने आपल्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत नेहमीच वंचितांची बाजू घेतलीय. प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या विविध आंदोलनांचा देवेंद्रवर प्रचंड प्रभाव होता. देवेंद्रच्या आंदोलनांची स्टाईलसुद्धा तशीच असायची. अशातच गावातील कबड्डीच्या सामन्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देवेंद्रने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांना गावात बोलावलं.

लोकसंग्रह असलेला २४ कॅरेट कार्यकर्ता

रविकांत तुपकर यांना याचवेळी देवेंद्र यांच्यामधला २४ कॅरेट कार्यकर्ता दिसला. आणि मग त्यांनी त्याच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विदर्भ प्रमुखाची जबाबदारी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गावोगावी पोचवण्यात देवेंद्रची भूमिका महत्त्वाची राहिलीय. सडपातळ देहयष्टी, कपाळावर टीळा आणि खांद्यावर शेला या आकर्षक राहणीमानामुळे देवेंद्रने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

राजकीय भूमिकेसोबतच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कामाची चुणूक दाखवली. रुग्णांना दवाखान्यात भरती करण्यापासून ते रक्तदान शिबिरापर्यंत देवेंद्र यांची धावपळ सुरू होती. परिणामी ग्रामीण जनतेसोबत आणि खास करून तरुणांसोबत त्यांची नाळ जुळली. शेतीच्या प्रश्नावर ते दिवसेंदिवस अधिक आक्रमक होऊ लागले.

सोयाबीनचा प्रश्न, कापसाच्या हमी भावाचा प्रश्न, दुधाचा प्रश्न अनेकदा रस्त्यावर उतरून मांडला. त्यांच्या आंदोलनाचा सत्ताधार्‍यांनी प्रचंड धसका घेतला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत सत्तेत सहभागी असतानाही देवेंद्र यांची सत्तेविरोधात आंदोलनं सुरूच होती.

हेही वाचाः २२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?

आणि आयुष्याला कलाटणी मिळालं

वरुड तालुक्यातील खानापूर इथले आत्महत्याग्रस्त शेतकरी शिवहरी ढोके यांची विधवा बायको आणि तीन मुलींसाठी एक अनोखे आंदोलन देवेंद्रच्या कल्पनेतून जन्माला आलं. या कुटुंबाला राहायला घर नव्हतं. लोकवर्गणी आणि खासदार राजू शेट्टी यांच्या सहकार्यातून या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देवेंद्रच्या पुढाकाराने हक्काचं घर बांधून मिळालं.

गृहप्रवेशाच्या दिवशी खानापुरात सात ते आठ हजार लोकांचा मेळावा घेण्यात आला. आणि या मेळाव्यातून एका युवा नेतृत्वचा जन्म झाला. बघताबघता देवेंद्र पंचायत समिती सदस्य आणि त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाला. जिल्हा परिषदेच्या सभागृहामधे अनेक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. देवेंद्रच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्यासाठी त्याच्यावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं म्हणून तडीपारीची नोटीस निघाली.

जिल्ह्याबाहेर तडीपार होताना या युवा नेत्याला निरोप देण्यासाठी एसटी बस स्थानकावर जनसमुदाय आला होता. मोर्शी मतदारसंघातील प्रस्थापित सत्तेच्या मरणयात्रेची ही पूर्वतयारी होती.

काँग्रेस महाआघाडीने केलं जीवाचं रान

खासदार राजू शेट्टी यांनी भाजपची साथ सोडली तेव्हापासूनच देवेंद्र यांनी वरुड मोर्शी मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येण्याचा चंग बांधला होता. युतीमधे जागा सुटो अथवा न सुटो मला लढायचं असा निर्धार करून त्याने गाव गाव पिंजून काढलं. आणि काँग्रेस महाआघाडीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आला.

देवेंद्रच्या विजयाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एकजुटीचं जबरदस्त दर्शन झालं. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्यासारखे यांच्यासारखे हेवीवेट नेते आहेत.

असं असताना घटक पक्षाच्या एक तरुणाला उमेदवारी मिळाल्यावर या दोन्ही नेत्यांनी आपला कुठलाही राजकीय इगो आड येऊ न देता देवेंद्रच्या पाठीवर थाप देत त्याला ‘लढ म्हणत’ बळ दिलं. या तरुण शिलेदारासाठी जीवाचं रान केलं. ग्रामीण भागातून मिळणारे जनसमर्थन आणि जेष्ठ नेत्यांचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे देवेंद्र भुयार यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली.

थेट दुहेरी लढत

तसं पाहिलं तर कृषिमंत्री असलेले अनिल बोंडे हे या मतदारसंघाच्या बाहेरचे उमेदवार होते. यावेळी पार्सल परत पाठवा हा प्रचार अत्यंत प्रभावीपणे करण्यात आला. त्यातच इथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्यामुळे दोन उमेदवारांमधे थेट फाईट झाली.

भाजप सेनेच्या सत्ताकाळात शेतकरी वर्ग प्रचंड अस्वस्थ होता. नोकर भरती बंद आहे. चहूबाजूने मरण एकतर शेतकऱ्याचं किंवा त्यांच्या मुलांचं. त्यामुळेच ग्रामीण भागात सरकारच्या विरोधामधे असलेला जनआक्रोश मतपेटीतून पुढे आला. एकीकडे अनुभवी मंत्री आणि दुसरीकडे सर्वसामान्य तरूण कार्यकर्ता या लढतीत एका शेतकऱ्याच्या पोराने कृषिमंत्र्यांना धूळ चारत मैदान मारलं.

हेही वाचाः विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?

मतदानादिवशी झाला प्राणघातक हल्ला

निवडणूक लढायला दमडी नसतानासुद्धा अनेकांनी आपल्या खिशातला पैसा लावत देवेंद्र भुयार यांच्या पाठीशी भक्कम आधार उभा केला. कार्यकर्ते धाब्यावर जाऊन जेवण्यापेक्षा घरातील भाकरीवर ते मतदारांपर्यंत पोचत होते. प्रचार सभांना स्वयंस्फूर्तीने गर्दी होत होती. दुसरीकडे ‘गेल्यावेळी मी ७० हजार मतांनी जिंकलो, आता दीड लाखाच्या मतांनी निवडून येऊ,’ असा विश्वास बोंडे बोलून दाखवत होते.

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या अनिल बोंडे यांनी २००९ मधे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विधानसभेत धडक मारली होती. २०१४ मधे भाजपच्या तिकीटावर आमदार झाले आणि मंत्रीही झाले. त्यामुळे बोंडे यंदा हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीला लागले होते. समोर नवखा उमेदवार रिंगणात असल्यामुळे बोंडे आपल्याला विजय सहज मिळेल, असं धरून चालले होते.

अशातच मतदानाच्या दिवशी सकाळीच भोयर यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाला. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली. या प्रकाराने देवेंद्र यांच्याविषयी मतदारसंघात प्रचंड सहानुभूती निर्माण झाली आणि बघता बघता मातब्बर, बलाढ्या अनिल बोंडेची विकेट कधी गेली हे भाजपच्या पंचांना समजलंच नाही.

तर आमदारकी लागेल सार्थकी

अनिल बोंडे यांनी टाकलेल्या विरोधाच्या प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार हाणणाऱ्या या अविस्मरणीय विजयाचे शिल्पकार मोर्शी वरुड मतदारसंघातले शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांची पोरं आहेत. संत्रा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत असताना कृषिमंत्री म्हणून अनिल बोंडे हे फेल गेल्याचं तो आपल्या प्रचारसभांमधून मांडत होता. आणि त्याच्या मुद्द्यांना प्रतिसाद मिळाल्याचं निकालाने शिक्कामोर्तब केलंय.

देवेंद्रच्या विजयाने शेतकऱ्यांचे प्रश्‍न अधिक आक्रमकपणे विधानसभेच्या सभागृहात मांडले जातील, अशी आशा केवळ मोर्शी, वरुडच्या शेतकऱ्यांच्याच नाही तर संपूर्ण विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालीय. येणाऱ्या काळात देवेंद्र भुयार आणि बच्चू कडू यांच्या रूपाने शेतीचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सभागृहात मांडले गेले तर निदान आत्महत्येचा वेग तरी कमी होईल. आत्महत्येचा हा वेग कमी झाला तरच भुयार यांची आमदारकी सार्थकी लागेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

हेही वाचाः 

हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?

सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण

विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला कौल देणार?

(लेखक हे शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते आणि मुक्त पत्रकार आहेत.)