संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो

१० जानेवारी २०२०

वाचन वेळ : १४ मिनिटं


लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असं जेव्हा जेव्हा घडतं, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं, अशा शब्दांत ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं.

१०. ११ आणि १२ जानेवारी असे तीन दिवस उस्मानाबादेत अखिल भारतीय साहित्य संमेलन मोठ्या झोकात सुरू होतंय. पहिला दिवस गाजतोय तो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या भाषणाने. आजच्या काळातला साहित्यिकांनी कसं वागावं, याविषयी एक महत्त्वाचा विचार या भाषणातून मांडला गेलाय. 

या महत्त्वाच्या भाषणातली राजकीय, सामाजिक भूमिका मांडणारा हा आपण सगळ्यांनी वाचायलाच हवा असा भाग. 

मी कसा घडलो?

वसईतल्या एका अशिक्षित, परंतु सुसंस्कृत शेतकरी कुटुंबामधे माझा जन्म झाला. मराठी माध्यमाच्या शाळेत माझं शिक्षण झालं. फादर थॉमस स्टीफन्स यांनी ‘ख्रिस्तपुराण’ या महाकाव्यात म्हटलं,

‘म्हणोनि आमीं तुमी सर्व जनीं ।
बंदुवर्ग ऐसे मानावे मनीं ।
फ्रिंग्री हिंदु आदीं करुनि ।
येकमेकांचे बंदु ।’ (भाग १-३ ओवी ६४)

अशा प्रकारे सर्वधर्म मैत्रीच्या वातावरणात मी मोठा झालो. पुढं रेव्हरंड नारायण वामन टिळक हे तुका नामक सेतूवरुनी ख्रिस्तचरणी आले आणि महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती समाजाला त्यांनी भजनं आणि भक्तिगीते शिकवली. त्यांचं एक भजन मला आठवतं.

ख्रिस्त गुरु माऊली गं माय माझी ख्रिस्त गुरु माऊली ।

टिळकांनी आम्हांला परमेश्वराला ‘गुरु माऊली’ म्हणायला शिकवलं. लक्ष्मीबाई टिळकांनी त्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्राद्वारे प्रभू ख्रिस्ताचं कसं अभ्यासपूर्ण अनुकरण करावं, हे आम्हांला दाखवून दिलं. त्यांचा ख्रिस्ताकडचा प्रवास पाहून माझी श्रद्धा दृढ झाली. कॅथॉलिक परंपरेतले रेवरंड फादर जे. एस. मिरांडा, बिशप डॉमनिक डिआब्रियो यांनी आम्हांला कॅथॉलिक नियतकालिकांद्वारे मराठी भाषेची गोडी लावली.

ख्रिस्ती साहित्याचा हा चार दशकांचा वारसा आमच्यापर्यंत येऊन पोचलाय. त्या सर्वांचं ऋण शब्दांच्या पलीकडचं आहे. पुढे मला माझ्या अभ्यासात संत साहित्याची ओळख झाली. माझा आध्यात्मिक पिंड घडवण्यात संत साहित्याचं आणि सर्व धर्मग्रंथांचं फार मोठं योगदान आहे. माझं एक बोट प्रभू येशूच्या हातात असलं, तरी दुसरं बोट आपल्या संतांच्या हातात आहे.

हेही वाचाः वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण

म्हणून पुढाऱ्यांचंही अभिनंदन करायला हवं

प्रत्येक क्षेत्राचे स्वतंत्र व्यासपीठ असते. त्यांचे व्यासपीठ त्या त्या क्षेत्रापुरते मर्यादित असते आणि असले पाहिजे. आपण कधी कधी राजकीय व्यक्तींना अनेक प्रकारच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर बसवत असतो. उस्मानाबादच्या संमेलनाच्या व्यासपीठावर स्थानापन्न न होण्याचा निर्णय राजकारणी मंडळीने मोठ्या मनाने घेतलेला आहे. एक नवीन पायंडा उस्मानाबादच्या संमेलनातून सुरू होतोय. त्याबद्दल पुढाऱ्यांचं आणि उस्मानाबादकरांचं अभिनंदन!

राजकारण ही लोकशाहीतली महत्त्वाची प्रक्रिया आहे. एखाद्या देशाचे भवितव्य त्या देशाच्या भल्या-बुऱ्या राजकारणावर अवलंबून असतं. निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपले नागरी जीवन राजकारण्यांच्या हवाली करत असतो. म्हणून साहित्यिक या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोललं, लिहिलं पाहिजे. अशा वेळी मौन राखणं हा भेकडपणा आहे.

समर्थ रामदास यांनी आपल्या ‘दासबोध’ या ग्रंथात म्हटलंय,

मुख्य ते हरिकथा निरूपण
दुसरे ते राजकारण
तिसरे ते सावधपण
सर्व विषयी ।

राजकारण का करावं आणि कसं करावं, याचा वस्तुपाठ समर्थांनी घालून दिलाय. पोप अकरावे पायस (१८५७-१९३९) यांनी आपल्या एका लेखात म्हटलं होतं, ‘ज्यांना राजकारणात रस आहे, जे राजकारणात सक्रिय भाग घेतात, त्यांनी अतिशय अवघड परंतु अतिशय सन्माननीय अशा राजकारणाच्या कलेत पारंगत झालं पाहिजे.’ पोप पायस यांच्या या विधानाला हिटलर आणि मुसोलिनी यांची पार्श्वभूमी होती.

ज्यूंचा संहार होत असताना पोप पायस बारावे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल संदिग्धता व्यक्त केली जाते. सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी त्याकाळचे सगळे दस्तऐवज आता खुले केलेत. योग्य वेळी सत्य बाहेर येईलच. जेव्हा समाजात असाधारण परिस्थिती निर्माण होते, हुकूमशहा आणि लष्करशहा यांचा उदय होतो, मानवी हक्क, प्रतिष्ठा आणि जीवन पायदळी तुडवलं जातं तेव्हा साहित्यिक, विचारवंत, धर्माचार्य या सर्वांनी एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे.

लेखणीत नैतिकता असते, त्यांचा समाजमनाला धाक

आपल्याकडचं उदाहरण म्हणजे स्वामी अग्निवेश. ते एका धर्मसंघटनेचे अध्यक्ष आहेत. तरीही मानवी हक्कांची पायमल्ली होताच त्यांनी लोकशाही मार्गाने आपला विरोध दर्शवला. त्यांच्यावर तथाकथित धर्मवाद्यांनी हल्ले केले. पोलंडमधे एकाधिकारशाहीचा कहर झाला तेव्हा पोप दुसरे जॉन पॉल यांनी ठाम भूमिका घेतली आणि लोकशाहीचा पुरस्कार केला. १९८१मधे पोप दुसरे जॉन पॉल यांच्यावर प्राणांतिक हल्ला झाला आणि आर्चबिशप रोमेरो यांची निर्घृण हत्या झाली. कारण त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती.

ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेता देवी या बंगाली लेखिका होत्या. बंगाली साहित्यामधे त्यांनी मोलाची भर घातली आहे. मात्र स्वत:ला अभ्यासिकेत कोंडून न घेता, त्यांनी रस्त्यावर उतरून गोरगरिबांसाठी संघर्ष केला. नयनतारा सहगल या गाजलेल्या लेखिका आहेत. भारतात अलिकडे अनेक प्रकार घडत आहेत, ज्यांमुळे कायद्याची पायमल्ली होते, लेखनस्वातंत्र्य मर्यादित केलं जातं. त्याबद्दल त्या आपलं मत स्पष्टपणे मांडतात. त्यामुळे अनेकांना त्यांना कार्यक्रमांना बोलावण्याची भीती वाटते.

ज्यांच्या लेखणीत नैतिकता ठासून भरलेली असते आणि वृत्तीमधे एकप्रकारचा बेडरपणा असतो, त्यांचा समाजमनाला धाक वाटतो. ज्यांच्याविषयी धाक वाटावा असे किती साहित्यिक आपल्या आजुबाजूला आहेत? आपल्या महाराष्ट्रात आपण नेहमी दुर्गाबाईंची आठवण काढतो. दुर्गा भागवत यांना साहित्यातील ‘रणरागिणी’ असं म्हटलं जातं. कारण त्या भूमिका घेत आल्या अन् भूमिका लढवत आल्या.

जेव्हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच होतो, तेव्हा समाजामधे धर्माच्या नावाने भेदाभेद केला जातो आणि समाजाचं वांशिक शुद्धीकरण करण्याचा निर्णय घेतला जातो. जेव्हा एखाद्या प्रदेशाला नजरकैदेचं स्वरूप येतं, दोष नसताना अश्राप नागरिकांची उपासमार होते, त्यांचे उपजिविकेचे साधन हिरावून घेतले जाते तेव्हा विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी गर्जना केली पाहिजे. ‘राजा, कठोर आत्मपरीक्षणाची वेळ जवळ आलीय.’

प्रतिगामी शक्तींचा सहज पराभव होत नाही

मानवाचा इतिहास हा अन्यायाचा, गुलामगिरीचा, विषमतेचा आणि भेदभावाचा आहे. लिंग, वंश, जात, धर्म आणि जन्मस्थान या कारणांवरून माणसाने माणसावर, सबलांनी दुर्बळांवर, उच्च वर्णीयांनी कनिष्ठांवर, पुरुषांनी स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केलेत आणि अन्यायाची ही मालिका अजूनही खंडित झालेली नाही. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आपले सुरूच आहे. मात्र शत्रू खूप प्रबळ आहे. त्याला सात जीव आहेत.

प्रतिगामी शक्तींचा सहज पराभव होत नाही. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रितीने हा अन्याय सुरू असतो. त्याची कारणमीमांसा बदलत जाते, परिस्थिती बदलत जाते, परंतु अन्याय बदलत नाही. उदा. आधुनिक काळामधे इलेक्ट्रॉनिक्स साधनांद्वारे होणारं शोषण. 

१४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री आपण नियतीबरोबर ऐतिहासिक करार केला. त्यावेळी अवघं जग झोपी गेलं असता, भारत देश मात्र जागा होता. आपल्या स्वातंत्र्याच्या जन्मघटिकेची प्रतीक्षा करीत होता. तो क्षण आला आणि स्वातंत्र्याचा आनंद आपण उपभोगला.

हेही वाचाः न्या. लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी अमित शाहांचं टेन्शन वाढवणार?

विविधतेत एकता हीच आपली अस्मिता

जे स्वातंत्र्य आपण अनुभवलं, ते आपल्या भावी पिढ्यांनाही उपभोगता यावं, त्यासाठी आपल्या घटनाकारांनी अथक कष्ट करून २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधानाची निर्मिती पूर्ण केली. आणि २६ जानेवारी १९५० रोजी संविधानाची कार्यवाही सुरू झाली. आपल्या संविधानातील उद्देशिका म्हणजे एक महाकाव्यच आहे. भारतीय घटनेने स्वीकारलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मूल्यांच्या प्रकाशात आपल्याला नव्या संस्कृतीच्या मंदिराची उभारणी करायची आहे.

वास्तविक, कोणतीही राज्यसंस्था किंवा व्यक्ती, कितीही शक्तिशाली असो, एक मानव म्हणून आपण आईच्या उदरातून हे हक्क घेऊन जन्माला आलेलो आहोत. या हक्कांमुळे प्रत्येक भारतीयाला प्रतिष्ठा प्राप्त झालीय. भारत हे बहुवांशिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक राष्ट्र आहे.

गेली हजारो वर्षे भारताने ही विविधतेतली एकता जपलीय, जोपासलीय आणि भारतीय घटनेनेही ती मान्य केलीय. विविधतेतली एकता हीच भारताची जगाला ओळख आहे, तीच आपली अस्मिता आहे. भारतीय संविधानाला एका रथाची उपमा दिली, तर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सामाजिक न्याय ही चार मूल्ये त्या रथाची चार चाके आहेत, सहा मूलभूत हक्क त्या रथाचे सहा अश्व आहेत.

सेक्युलॅरिझम हा भारतीय घटनेचा आत्मा

‘सेक्युलर’ या इंग्रजी शब्दाला काही जण आक्षेप घेतात. या इंग्रजी शब्दाचा उगम युरोपमधे झालाय. तिथे सेक्युलर म्हणजे केवळ इहवाद किंवा धर्मविहीनता असा केला जातो. आपली सेक्युलर ही कल्पना त्याहून खूप भिन्न आहे. तिचा अर्थ सर्वसमावेशकता म्हणजे सर्वांना समान वागणूक आणि कुठलाही एक धर्म राष्ट्रधर्म नाही, असा आहे.

पंडित नेहरूंनी सेक्युलॅरिझमची ही भारतीय संकल्पना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा स्पष्ट केलीय. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशकताही) हा भारतीय घटनेचा आत्मा आहे. तो रथाचा सारथी आहे. जोपर्यंत सारथी सुरक्षित आहे, तोपर्यंत आपल्या देशाच्या अखंडतेला कुठलाही धोका नाही, असे मला वाटते. म्हणूनच आपल्या एका हातात आपापल्या धर्माचा धर्मग्रंथ असला, तर दुसऱ्या हातात भारतीय संविधानाची प्रत असली पाहिजे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली

सर्जनशील व्यक्ती अनेकदा द्रष्टी असते. जे सर्वसामान्यांना दिसत नाही, ते त्यांना दिसत असतं. आपलं द्रष्टेपण ते कलात्मकरीत्या व्यक्त करत असतात. त्यांचा लेखन किंवा कलाविष्कार प्रक्षोभक असू शकतो. हे सर्व स्वीकारणं आणि पचवणं परंपरावाद्यांना आणि संस्कृती-संरक्षकांना प्रसंगी अवघड जातं.

लोकशाही एक जिवंत वस्तुस्थिती आहे. जिवंत व्यक्तीला आजार होतात, कधी ते प्राणांतिकही ठरतात, त्याचप्रमाणे लोकशाहीलाही आजार होऊ शकतो. २५ जून १९७५ ला आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि ती १८ महिने पुरली. उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध राजनारायण हा खटला अलाहाबाद उच्च न्यायालयामधे चालवला जाऊन १२ जून १९७५ रोजी निर्णय दिला गेला.

त्यामधे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर मतदानामधे गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवला गेला आणि सत्ता सोडावी लागण्याची शक्यता दिसू लागताच त्यांनी आणीबाणी जाहीर केली. त्याआधी चालवलेल्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीमधे लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी लष्कराला कायदेभंग करण्याचा सल्ला दिला होता. तोही घातक होता.

आणीबाणीला निकराचा विरोध

मूठभर स्वातंत्र्यप्रिय कार्यकर्त्यांनी ‘आणीबाणी’ला निकराने विरोध केला. त्यांना गजाआड जावे लागलं. तरीही तुरुंगांच्या भिंतीच्या उंचीपेक्षा त्यांची लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह अधिक उंच होता. त्या १८ महिन्यांच्या कालावधीत अनेक लोकशाहीप्रेमी नागरिकही गजांआड केले गेले. त्या कालावधीत त्यांनी लिहिलेलं साहित्य नंतर प्रकाशित झालं आणि ते लोकप्रियही झालं.

आणीबाणीच्या कालावधीत माझं वास्तव्य पुण्याला ‘स्नेहसदन’ इथे होतं आणि मी ‘साप्ताहिक साधना’मधे माझ्या नावानिशी आणीबाणीविरोधी उपरोधिक पत्रं लिहीत होतो. ‘इंदिराजी, सिंपली ग्रेट!’ या नावाने मी ‘साप्ताहिक साधना’कडे एक पत्र पाठवलं. २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. तरी अजूनही पोलिसराज सुरूच होतं. ‘साधना’ने २७ मार्चच्या अंकात माझं पत्र प्रसिद्ध केलं. त्यानंतर माझ्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागला. हे पत्र माझ्या ‘नाही मी एकला...’ या आत्मचरित्रात पृष्ठ क्रमांक ११० वर आहे.

आणीबाणी उठवण्याच्या जवळपास शेवटच्या काळात पोलिसांना माझा थांग लागला आणि ‘साधना’मधे लिहिणारी ती व्यक्ती मीच आहे का, असं त्यांनी मला विचारलं. मी त्यांना सांगितलं, ‘मी कुठल्याही एका पक्षाचा सदस्य नाही. मी नैतिक मूल्ये मानणारा एक भारतीय आहे. त्या भूमिकेतून मी ते लिहिलंय. त्याची जी काही शिक्षा असेल, ती भोगण्यास मी तयार आहे.’

ते मुकाट्याने परत गेले आणि पुन्हा फिरकले नाहीत. लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असं जेव्हा जेव्हा घडतं, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं.

हेही वाचाः नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान

बातमीमागचं पेड आणि फेक सत्य

आपण भारतीय स्वभावाने भाबडे आणि भावनाशील आहोत. राजकीय नेत्यांनी केलेल्या घोषणाबाजीचा आपण डोळे बंद करून स्वीकार करतो. त्यांचं स्तोम माजवतो. ‘उक्ती आणि कृती’ याच्यात मेळ आहे की नाही, हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. म्हणून तर संतांनी आपल्याला सांगितलंय ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.’

प्रसार-साधनांचा लोकांच्या मनांवर आणि मतांवर खूप प्रभाव पडत असतो. प्रसिद्ध झालेली प्रत्येक बातमी ही काही लोकांना धर्मवचनाप्रमाणे वाटते, परंतु आज ‘पेड न्यूज’ आणि ‘फेक न्यूज’ असे प्रकार चालू झालेत. कधी कधी राजकीय पक्षांची भूमिका बातम्यांच्या स्वरूपात अगदी पहिल्या पानावर झळकत असते. हादेखील लोकशाहीवर केलेला एक छुपा हल्ला आहे. तोसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे.

विचारांची गंगा उलट्या दिशेने

आपल्याकडे संविधानासारखं धन आहे. त्यानुसार आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुभवत आहोत. ‘जगातली सर्वांत मोठी लोकशाही’ अशा शब्दांत आपण आपलीच पाठ थोपटून घेत आहोत. हे सगळं खरंय. परंतु दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट्या दिशेने वाहू लागते. आपला प्रवास सहिष्णुतेतून असहिष्णुतेकडे, विशालतेकडून संकुचितपणाकडे आणि अहिंसेकडून हिंसेकडे होऊ लागतो.

काहींच्या भावना अतिशय हळव्या असतात. त्या पटकन दुखावल्या जातात. धर्म, जात, भाषा, प्रांत, ऐतिहासिक व्यक्ती यांच्याविषयी चिकित्सक भाष्य केलं की, संबंधित गट उसळून उठतात. कायदा हाती घेतात, प्रसंगी हिंसाचाराचा अवलंब करतात.

अहिंसेकडून हिंसेकडे चाललेल्या अशा प्रवासाची अलीकडची उदाहरणे म्हणजे नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या झालेल्या भेकड हत्या. कुणाच्या ताटात काय आहे? कुणाच्या वाटीत काय आहे? यावर एखाद्याचे जगणे किंवा मरणे अवलंबून असावे ही अतिशय दु:खद बाब आहे. काही ठिकाणी जमावाकडून गायीच्या नावाने विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या हत्या करण्यात आल्या आहेत.

हाडाच्या संशोधकांची कुचंबणा

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी गायीविषयीची केलेली चिकित्सा अतिशय पुरोगामी आहे. गाय जगली पाहिजे, तसा माणूसही जगला पाहिजे. म्हणून गायीच्या नावाने केलेल्या हत्या हा सावरकरांच्या विचारांचा केलेला पराभव आहे. देशभरात झालेल्या इतर २०८ पत्रकारांच्या हत्यासुद्धा तशा निषेधार्ह आहेत. तसंच विभूतिपूजा, कर्मठपणा, पोथिनिष्ठा वाढत आहे. त्यामुळे हाडाच्या संशोधकांची कुचंबणा होते. विचारवंतांचा कोंडमारा होतो.

विविध प्रकारच्या दडपणांमुळे शास्त्रशुद्ध संशोधन आणि धर्मचिकित्सा करणं अवघड होतं. ही देशाची सांस्कृतिक हानी आहे. निखळ आणि शास्त्रशुद्ध संशोधन करण्यासाठी निर्मळ वातावरणाची गरज असतं. आपल्याकडे मुळात संशोधक वृत्तीचा हवा तितका विकास झालेला नाही. संशोधनामुळे नवी आणि निराळी माहिती उपलब्ध होते. त्यामुळे धर्मग्रंथांचं, ऐतिहासिक गोष्टींचं, व्यक्तींचं वस्तुनिष्ठ पुनर्मूल्यांकन करता येतं.

याचे उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ते ज्यू धर्मात वाढले. ‘जुना करार’ हा त्याकाळच्या ज्यू लोकांचा धर्मग्रंथ. त्यात अनेक परमसत्यं आहेत. त्याचबरोबर काही आक्षेपार्ह विधानंसुद्धा आहेत. प्रभू येशूंनी त्या विधानांची चिकित्सा केली अन् तिथे जे जे मानवताविरोधी होतं, त्यात बदल केला आणि तसं शिकवलं.

हेही वाचाः लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?

धर्मचिकित्सांना प्राणांचंही मोल मोजावं लागते

जुन्या करारात मोझेसने ‘डोळ्यासाठी डोळा’ अशी शिकवण दिली होती. त्याची पार्श्वभूमी अशी होती, प्राचीनकाळी एखाद्याच्या अपराधाबद्दल संपूर्ण गावाला सामुदायिक शिक्षा केली जात असे. मोझेसने त्यात बदल केला आणि ‘एकासाठी एक’ हा नियम केला. प्रभू येशूंनी आणखी एक पाऊल पुढं टाकून शत्रूला क्षमा करून त्याच्यावर प्रेम करण्याचा आदेश दिला. 

प्रभू येशूंनी धर्मग्रंथांची प्रतिष्ठापना माणसाच्या अंत:करणात केली. मासिक धर्मासंबंधी ज्यू समाजात प्रचंड सोवळेओवळे होते. त्याकाळात बाईला अशुद्ध समजलं जात होतं. तिला घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. मासिक धर्माने पीडित एक बाई येशूंकडे आली. प्रभू येशूंनी तिला स्पर्श केला आणि सोवळ्या-ओवळ्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले. त्यामुळे तत्कालीन धर्ममार्तंडांचा रोष झाला. प्रभू येशूना सुळावर चढवण्यामागे तेही एक कारण होतं. थोडक्यात धर्मचिकित्सा करणाऱ्यांना प्रसंगी आपल्या प्राणांचंही मोल मोजावं लागतं.

आपला देश बहुधार्मिक आहे. प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ आहेत. त्या धर्मग्रंथांना काळाचा आणि तत्कालीन संस्कृतीचा संदर्भ आहे. धर्मग्रंथांतली काही वचनं कालबाह्य होऊ शकतात. त्या वचनामुळे मानवी स्वातंत्र्याचं, प्रतिष्ठेचं आणि हक्कांचं उल्लंघन होऊ शकतं. धर्मग्रंथातल्या अशा वचनांची शास्त्रशुद्ध चिकित्सा झाली पाहिजे आणि ती चिकित्सा त्या त्या धर्मातल्या धर्मपंडितानी केलेली उत्तम.

दुसऱ्याचं मत विरोधी असलं, तरी ते मांडण्याचा त्याचा हक्क कुणी हिरावून घेऊ शकत नाही. या संदर्भात फ्रेंच विचारवंत वॉल्टेअरचे एक वचन उद्बोधक आहे. ते वचन असं आहे, ‘तू जे बोलतोस, ते मला मान्य नाही. तथापि तुला तुझी भूमिका मांडता यावी म्हणून मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढत राहीन.’

स्वत:ची भूमिका पक्की आणि ठाम असली की, आपल्याला निराळ्या विरोधी मताची भीती वाटत नाही. उलट निराळ्या विचारांचं स्वागत केलं जातं. अशा प्रकारचा उदारमतवाद हे प्रगल्भतेचं लक्षण असतं. अशा वातावरणातच लोकशाही मूल्यांचं संवर्धन होत असतं.

हेही वाचाः आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?

आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत का?

भारतीय घटनेने आपल्याला मूलभूत स्वातंत्र्य बहाल केलंय. ‘तुम्हाला सत्य कळेल आणि सत्य तुम्हांला बंधमुक्त करील,’ याऐवजी ‘सत्य तुम्हाला कळणार नाही, सत्य तुम्हाला अंधारात ठेवील,’ अशी काही उद्योगपतींची भूमिका आहे. त्या भूमिकेमुळे प्रसारमाध्यमे आपल्या कयात ठेवता येतात. सत्य सांगण्याचा, गैरकृत्यं उघड करणाऱ्या वाहिन्यांच्या पत्रकारांचा आवाज दडपला जातो. त्या वाहिन्या त्यांना सोडाव्या लागतात किंवा अशा निर्भिड पत्रकारांना साम, दाम, दंड, भेद वापरून बोलायला बंद केलं जातं.

कधी आपल्याला प्रश्न पडतो, आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत का? आत्माविष्कार करण्यासाठी कलाकार, पत्रकार आणि साहित्यिक मुक्त आहेत का? एक प्रकारच्या अदृश्य दडपणाखाली तर आपण वावरत नाही ना? त्यावेळेस जर्मन कवी मार्टिन न्यूमायर यांनी लिहिलेली कविता तत्कालीन परिस्थितीवर विदारक प्रकाश टाकते.

जर्मनीमधे नाझी पहिल्यांदा कम्युनिस्टांवर येऊन थडकले, धडकले
मी कम्युनिस्ट नव्हतो म्हणून गप्प बसलो.
त्यानंतर ते ज्यू लोकांवर येऊन घसरले
साहजिकच, ज्यू नव्हतो ना मी मग गप्पच बसलो.
नंतर कर्मचारी संघटनांवर ते अगदी तुटून पडले
आपण म्हणजे, मी ‘ब्र’सुद्धा काढला नाही.
आपला कर्मचारी संघटनाशी काय संबंध?
ते मग कॅथोलिकांच्या पाठीस हात धुवून लागले
अगदी... तरीपण मी काहीच म्हटलं नाही
मी प्रोटेस्टंट होतो
अखेरीस...
म्हणजे आता ते माझ्या मागे लागले आहेत
आणि काय
यावेळेस आवाज उठवण्यासाठी
हाळी देण्यासाठी माझ्यासाठी काय
पण अगदी कुणासाठी कुणीच उरलं नाही...?

प्रतिक्रिया म्हणून हिंसेचं समर्थन नको

मूलतत्त्ववादाने जगभर आपलं विद्रूप डोकं वर काढलंय आणि आपल्या ऑक्टोपसी पंजात सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा संकोच केला जातोय. समाजात पद्धतशीरपणे उन्माद निर्माण केला जातो. भावना भडकावल्या जातात. हिंसाचाराची प्रकरणं घडतात आणि ‘क्रिया-प्रतिक्रिया’ हा न्याय लावून हिंसेचं समर्थन केलं जातं. हे सर्व आपण प्रत्यक्ष पाहात आहोत.

‘अहिंसा परमो धर्म:’ ही आपल्या देशाची शिकवण आहे. संत तुकाराम म्हणतात, ‘कुणाही जिवाचा न घडो मत्सर.’ नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत प्रत्येकाला जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. ‘वाऱ्याची पेरणी करा आणि झंझावाताची कापणी करा’ अशी ‘बायबल’मधे एक म्हण आहे. म्हणून प्रभू येशूने क्षमाधर्माचा पुरस्कार केला.

हिटलरने द्वेषाच्या विखाराची पेरणी केली आणि त्याने हिंसेचं उदंड पीक घेतलं. ‘आर्य वंश सर्वश्रेष्ठ’ हा विचार त्याने मांडला. तो विचार तत्कालीन जर्मन तरुणांना भावला. हिटलरने जर्मनी आणि युरोपच्या इतर देशांमधे मिळूनमधे सुमारे ६० लाख ज्यूंचा संहार केला. एली वायझेल आणि व्हिक्टर फ्रँकेल यांच्यासारख्या काही विचारवंतांनी त्या नरकवासातून बाहेर पडल्यावर छळछावण्यांतील क्रौऱ्याची वर्णने आपापल्या ग्रंथात केलीत. ती वाचून आपल्या अंगावर शहारे येतात.

हिटलरचं तत्त्वज्ञान सांगणारे माणुसकीचे मारेकरी

हिटलरच्या काळी बहुसंख्य जर्मन विचारवंत गप्प बसले, परंतु डिआट्रिच बॉनहॉफर, जेम्स डेल्प आणि इतर काहीजण मात्र हिटलरच्या विरोधात उभं राहिले. त्याबद्दल त्यांना आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागली. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कुणीही हिटलरच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करू शकत नाही. तो राक्षसीपणा होईल. ज्यांना हिटलरचं तत्वज्ञान मान्य आहे, ते माणुसकीचे मारेकरी असतात. विचारवंतांची निष्क्रियता हा विसाव्या शतकावरील एक लाजिरवाणा कलंक आहे.

रोगाचं अचूक निदान झालं की, त्यावर जालीम इलाज करता येतात. आजच्या घडीला आपल्या देशाचे खरे शत्रू दुसरा धर्म, दुसरी जात, दुसरा देश नाही तर बेकारी, बेरोजगारी, शेतकर्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी, अनावृष्टी आणि दुष्काळ, ग्रामीण-शहरी यांच्यातील वाढलेली दरी, धर्मांधता आणि त्यामुळे होणारे उत्पात इत्यादी आहेत.

आर्थिक क्षेत्रातील घसरण, बंद होत चाललेले उद्योगधंदे, लघुउद्योगांवर आलेली संक्रांत, त्यामुळे निर्माण झालेले बेकारांचे तांडे आणि त्यांचे उद्ध्वस्त होत चाललेले संसार ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजाच्या सहनशीलतेची हद्द होत आहे.

कवी गिरिजाकुमार माथुर म्हणतात,

सब्र करने की हद भी
एक दिन टूट जाती है
जब कुछ नहीं होता
तब क्रांति हो जाती है

लेखकाची भूमिका हुजऱ्याची, नाही तर द्रष्ट्याची

आपले राज्यकर्ते त्याची वाट पाहात आहेत काय? सैतानाप्रमाणे क्रांती आपल्याच लेकरांचा घास घेत असते, हे आपण लक्षात ठेवू या. सत्य म्हणजे जणू एक तळपती तलवार असते. ते पवित्र असते. सत्य हीच महान साहित्यिकांची जीवनप्रेरणा असते. त्यामुळे अनेकांना विशेषत: लोकशाहीच्या विरोधकांना सत्य मानवत नाही आणि पचतही नाही.

साहित्याच्या निर्मितीसाठी लेखकावर कुठल्याही प्रकारची बंधने नकोत. जेव्हा त्याच्यावर बंधने येतात, तेव्हा त्याचे लेखन पोपटपंची ठरण्याची शक्यता जास्त असते. लेखकाला हुजऱ्याची भूमिका पार पाडायची नसते; तर त्याला द्रष्ट्याच्या भूमिकेत जावं लागतं. त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता आहे. मातृभाषा हे आपल्यासाठी सहजसोपं असं अभिव्यक्तीचं साधन आहे.

हेही वाचाः 

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!

आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती

यवतमाळ साहित्य संमेलनः आता बहिष्काराचाही निषेध वायरल

सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!