नऊ जणांच्या हौतात्म्यातून झालेल्या कृषी विद्यापीठाची पन्नाशी

०२ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


यंदा पन्नाशी साजरी करणारं अकोल्याचं डॉ. पंजाबराव देशमूख कृषी विद्यापीठ नऊ जणांच्या हौतात्म्यानंतर स्थापन झालं. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी अकोल्याचं कृषी विद्यापीठ राहूरीला पळवून नेलं होतं. यातून मोठी आंदोलनं विदर्भात झाली. नऊ जण शहीद झाले. त्यानंतर १९६९ मधे सुरू झालेल्या अकोला विद्यापीठानं आज जगभर नावलौकिक कमावलंय.

विदर्भच नव्हे तर भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारीत आहे. हे ओळखून देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतीच्या विकासाला आधुनिक शिक्षणाची जोड दिली. त्याच हेतूनं पंजाबरावांनी विदर्भातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल, असं एक कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. याच संकल्पनेतून,  धडपडीतून आणि अनेकपदरी संघर्षांतून अकोला इथं २० ऑक्टोबर १९६९ ला कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. पण हा दिवस उजाडावा म्हणून विद्यापीठासाठी अनेकांना शहीद व्हावं लागलंय.

विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूरात १९०५ मधेच कृषी महाविद्यालय होतं. त्यामुळे १९६० च्या दशकात अकोल्यात कृषी विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा झाली. पण हे विद्यापीठ विदर्भात होऊ देण्यास पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विरोध केला. याला विदर्भातून प्रचंड विरोध झाला. आंदोलनं झाली. वेळोवेळी संघर्ष झाला. एवढं होऊनही शेवटी १९६६ मधे कृषी विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्रातील राहूरीला हलवण्यात आलं.

आंदोलकांवर अंदाधुंद गोळीबार

विदर्भाच्या तोंडचा घास पळवून नेण्यात आला.  विद्यापीठ विदर्भातच पाहिजे म्हणून १८ ऑगस्ट १९६७ ला अमरावतीत उग्र आंदोलन झालं. आंदोलकांवर पोलिसांनी बेधुंद गोळीबार केला. यामधे नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुऱ्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे आणि शेख रफिक हे नऊजण शहीद झाले. अनेक विदर्भवीर जखमी झाले. कृषिशिक्षणासाठीची ती एक रक्तरंजीत क्रांतीच होती. या वीरांच्या स्मरणार्थ विद्यापीठात स्मारक उभारण्यात आलंय.

लोकांचा वाढता विरोध बघून सरकारनं अकोल्यात नव्यानं कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानंतर २० ऑक्टोबर १९६९ मधे अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमूख यांच्या नावानं कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. या सर्व घटनाक्रमाला यंदा ५० वर्ष झालीयत. पन्नास वर्षांपूर्वी लावलेलं हे झाडं वटवृक्ष बनत आहे. कृषिशिक्षण, कृषिसंशोधन, कृषिविस्तार शिक्षण या क्षेत्रांमधे विद्यापीठाचा नावलौकिक झालाय.

विदर्भातल्या ११ जिल्ह्यात काम

गेल्या ५० वर्षांपासून शेतीतले धडे शिकवणाऱ्या या विद्यापीठाचे सध्या ११ जिल्ह्यांत कार्यक्षेत्र आहे. यामधे अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अकोल्यात असून प्रशासकीय सोयीसाठी दुसरा कॅम्पस नागपूर इथं उभारण्यात आलाय. गडचिरोलीतही नवा कॅम्पस उभारण्यात येणार आहे.

बिजोत्पादनाचं नवं तंत्रज्ञान विद्यापिठानं तयार केलंय. देशातलं हवामान, जमिनीची प्रत, कीटकांचा प्रादूर्भाव या सगळ्या समकालीन गोष्टींचा विचार करून विद्यापीठात नियमित संशोधन सुरू आहे. आतापर्यंत १३७१ सुधारीत पीक उत्पादन तंत्र, १५ संकरीत वाणांसह १६९ जाती विद्यापीठानं विकसित केल्यात. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठानं वेगवेगळी कृषी यंत्रं तयार केलीत. विद्यापीठाच्या या संशोधनाची दखल केवळ देशपातळीवरच नव्हे तर परदेशातही घेतली गेली, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनानं दिली.

कृषिशिक्षणाचा ध्यास ठेवणाऱ्यांसाठी पदविका ते पीएचडीपर्यंत विद्यापीठात अभ्यासक्रम आहेत. विद्यापीठातून पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आज लाखाच्या घरात आहे. यात परदेशातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. विद्यापीठाने तयार केलेले तंत्रज्ञान, संशोधन आणि शेतीसाठी उपयोगी माहिती शासकीय पातळीवरून गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले जातायत. यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग यांसह इतर शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांची मदत घेतली जातेय.

विस्तार शिक्षणामुळं लोकाभिमुख

सोबतच विस्तार शिक्षण प्रणालीमुळं विद्यापीठ जलदगतीने लोकाभिमुख होत आहे. नव्या तंत्रज्ञानासोबतच विद्यापीठ पारंपरिक माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अनेक विषय पोचवीत आहे. शेतकरी परिसंवाद, कृषी प्रदर्शन, प्रशिक्षण, मेळावे, प्रशिक्षण, कीर्तन, पथनाट्य यांच्या माध्यमातून सहज सोप्या पद्धतीनं वेगवेगळे विषय शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम सुरू आहे.

विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. माती परीक्षण, पाणी परीक्षण, पिकांचे फिरते चिकित्सालय अशा लोकोपयोगी कामात विद्यापीठ आघाडीवर आहे. हेल्पलाईन, नभोवाणी आणि इतर माध्यमांतून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती विद्यापीठकडून दिली जाते. कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी जैवतंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयांतले पदवी शिक्षण दिले जाते.

कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण उपलब्ध आहे. तसंच कृषी अभियांत्रिकी, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकीमध्ये पीएचडीची सोय आहे. कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम, कृषी विज्ञान पदविका अभ्यासक्रम, कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम, माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम असे अनेक अभ्यासक्रम विद्यापिठात आहेत. 

शेतीची गरज ओळखून संशोधन

शेतकऱ्यांची गरज ओळखून विद्यापीठात संशोधनाचे काम सुरू आहे. पिकं, फळझाडं, चारा पिकं, फुलं, भाजीपाला पिकं, वनौषधी पिकं, दुग्धव्यवसाय, कृषिमाल प्रक्रिया, शेतीस लागणारी औजारं, पाणलोट क्षेत्र विकास, मृदा संधारण, जल संधारण, क्षारयुक्त जमीन सुधारण, ठिबक सिंचन, पशू व्यवस्थापन आदींबाबतचे संशोधन केले जाते.

विद्यापीठातील १९ संशोधन केंद्र, १७ विविध तांत्रिक विभाग, ४ शैक्षणिक प्रक्षेत्रावर सध्या २६ अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प आणि ३१ राज्यशासन पुरस्कृत प्रकल्पाद्वारा राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत ८ प्रकल्प आणि राष्ट्रीय कृषिविकास योजनेअंतर्गत ८ प्रकल्प, तसेच २० तदर्थ प्रकल्पांतर्गत विविध शेती पिकांवर संशोधन कार्यक्रम सुरू आहेत.

मागं वळून पाहताना...

डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देषमुख हे दूरदृष्टीचे कर्ते नेते होते. त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाचं बीजारोपण झालं विद्यापिठाच्या रूपात. हे विद्यापीठ पन्नाशी गाठत आहे. नवनवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देऊन शेती समृद्ध करण्याचा निरंतर प्रयत्न विद्यापिठाचा आहे. विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची रेलचेल राहणार आहे.

कृषी, कृषी अभियांत्रिकी, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, वनविद्या आणि उद्यानविद्या अशा संबंधित क्षेत्रातील ज्ञानही सगळ्यांना सहजपणे उपलब्ध व्हावं, असा विद्यापीठ स्थापनेमागचा साधासोप्पा हेतू होता. हा हेतू मागं वळून पाहिल्यानंतर साध्य होताना दिसत आहे. मोठ्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या कृषी विद्यापीठाने वेगवेगळ्या संशोधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जगण्याचा संघर्ष कमी करण्यात मोलाचं योगदान दिलंय.