भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते

०६ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?

सध्या आपण टीवी, सोशल मीडियातून फक्त आणि फक्त वर्ल्डकपचे अपडेट्स घेत आहोत. प्रत्येक भारतीयाला क्रिकेट किती आवडतं हे काही सांगायला नको. आपलं क्रिकेटप्रेम हे जगजाहीर आहे. पण आपण मॅच बघतो. त्यामुळे खूप काय, काय होत असतं. म्हणजे आपण मॅच बघितली की अनेकांना कोट्यवधी रुपये मिळतात.

मॅचमधून फायदा कुणाचा?

आपण तर टीवीवर किंवा थेट ग्राऊंडवर जाऊन मॅच बघण्यासाठी पैसे मोजतो. आणि नेटवर तर फ्रीमधे बघतो. मग त्याचा फायदा का होईल आणि कोणाला होईल, असं आपल्याला वाटेल. पण खरंच याचा फायदा इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल म्हणजेच आयसीसीला होतो. आयसीसी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचं प्रशासकीय काम बघणारी सर्वोच्च संस्था आहे. ती वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करत असते. त्यात प्रामुख्याने टी ट्वेन्टी, चॅम्पियन ट्रॉफी, वर्ल्डकप या स्पर्धांचा समावेश आहे.

या स्पर्धांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होतं असतात. या उलाढाली संपूर्ण क्रीडा विश्वाचं अर्थकारण घडवणाऱ्या आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे सहभागी होणाऱ्या वेगवेगळ्या देशांचा आयसीसीच्या उत्पन्नात महत्त्वाचा वाटा असतो. याचा फायदा त्या त्या देशांनाही होत असतो.

कोणत्याही मॅचमधे ब्रॉडकास्टींग, स्पॉन्सर, तिकीट विक्री आणि लायसनिंग आदी ४ गोष्टींवर उत्पन्नासाठी अवलंबून राहावं लागतं. आणि हे जवळपास सगळ्या आंतरराष्ट्रीय खेळांना लागू होतं. त्यात काही खेळ कमी अधिक लोकप्रिय असल्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी अधिक होतं.

हेही वाचा: पुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप?

१० सेकंदाच्या जाहिरातीसाठी २० लाख रुपये

आयसीसीला मात्र सर्वाधिक फायदा हा ब्रॉडकास्टिंगमार्फत होतो. जगातल्या १५० देशांमधे वर्ल्डकपचं लाईव ब्रॉडकास्टिंग होत. यात त्यांचे २५ ब्रॉडकास्ट पार्टनर, १२ डिजिटल पार्टनर आहेत. यातून ब्रॉडकास्ट कंपन्यांना मिळणाऱ्या जाहिरातींच्या रकमेतली काही रक्कम आयसीसीला द्यायची असते.

भारतात आयसीसीने ब्रॉडकास्टिंगचे हक्क स्टार कंपनीला दिलेत. स्टारवर स्पर्धेदरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींची रक्कम ऐरवीपेक्षा वाढवली जाते. भारताची मॅच असेल त्या दिवशी जाहिरातदार कंपन्यांकडून ब्रॉडकास्ट कंपनी १० सेकंदाच्या जाहिरतीसाठी साधारण १७ ते २० लाख रुपये, तर अन्य सामन्यासाठी ७ लाख एवढी रक्कम आकारणार आहेत.

यात जाहिरातीची १० सेकंदांची जागा मिळवण्यासाठी सुमारे ५० हून अधिक कंपन्यांची चढाओढ लागलीय. फोन पे, वन प्लस, एमेझॉन, एमआरएफ, ड्रीम इलेवन, कोकाकोला, आयसीआयसीआय, ओप्पो, सीएटायर्स, फिलिप्स, उबर इत्यादी कंपन्या जाहिरातीत अग्रस्थानी दिसतील. यंदा ब्रॉडकास्टर्सना जाहिरातीतून १२०० ते १५०० कोटींचा फायदा होण्याची शक्यता मनीकंट्रोल या बिझनेस न्यूज वेबसाईटने आपल्या एका अहवालात व्यक्त केलीय.

भारतामुळे घसघशीत कमाई

वर्ल्डकप स्पर्धेमुळे आयसीसीला सर्वात जास्त फायदा होतो. कारण यात जितक्या टीम खेळतात, तितक्या देशांमधल्या कंपन्यांचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी मॅचसाठी गुंततात. म्हणजे पार्टनरशिप, स्पॉन्सरशिप, जाहिराती इत्यादी. अशावेळी दहा टीम असतील तर दहा देशांतून पैसा येतो.

प्रत्येक देशातून किती पैसे येतील, त्यानुसार एकूण उत्पन्नाच्या काही टक्के रक्कम सर्व देशांमधे वाटली जाते. तसंच खेळ ज्या देशात लोकप्रिय असेल त्या देशातले उद्योजक जास्त पैसे गुंतवतात. त्यामुळे निर्विवादपणे भारतातून सर्वाधिक पैसे आयसीसी कमावते. भारतात क्रिकेट लोकप्रिय आहे आणि मॅच बघण्यासाठी विशेष वेळही काढला जातो. ज्याचा फायदा आयसीसीला होतो आणि भारतालाही होतो.

हेही वाचा: वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर

कुठल्या देशाला किती वाटा मिळाला?

प्रत्येक खेळांच्या जागतिक प्रशासकीय संस्थांचा मार्केट रिसर्च करणाऱ्या युन ग्लोबल युनियनच्या अहवालानुसार, गेल्या वर्ल्डकपमधे आयसीसीला एकूण २९६ अब्ज रुपयांचा महसूल मिळाला. त्यातला काही भाग हा इवेंटमधे खर्च झाला. उरलेली रक्कम स्पर्धेत सहभागी झालेल्या देशासोबत वाटण्यात आली.

२०१५ च्या वर्ल्डकपमधे १४ टीमचा समावेश होता. प्रत्येक देशातून आलेल्या रक्कमेनुसार भारताला २२%, इंग्लंडला १२%, ऑस्ट्रेलियाला ५% आणि इतर देशांना २.५ ते ३.८% रकमेचं वाटप करण्यात आलं. आणि आयसीसीने ३०% वाटा स्वत:जवळ ठेवून घेतला.

हेही वाचा: सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही

क्रिकेट लोकप्रिय असूनही आयसीसी तोट्यात

आपण तर फक्त आवड म्हणून मॅच बघतो. पण यामुळे भारत हा आयसीसीला सर्वाधिक पैसे कमावून देणार देश ठरलाय. जगात तर क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय. पण त्याचा फायदा मात्र आयसीसीला होताना दिसत नाही.

आयसीसीला २०१७ ला मिळालेल्या महसूलात २०१६ च्या ६५ लाख ४६ हजार रुपयांनी तोटा झालाय. तर २०१८ ला मिळालेल्या महसूलात २०१७ च्या तुलनेत ३१ लाख ७३ हजार रुपयांनी तोटा झाल्याचं आयसीसीच्या वार्षिक अहवालात म्हटलंय. आयसीसीच्या ऑडिट कमिटीचे अध्यक्ष एडवर्ड क्विनलॅन यांनी हा अहवालात सादर केला.

यंदा वर्ल्डकपमधे दहाच टीम का?

यंदाच्या वर्ल्डकपमधे गेल्यावेळपेक्षा चार टीम कमी करण्यात आल्यात. सुरवातीच्या चार वर्ल्डकपच्या मॅचमधे ८ टीम खेळल्या होत्या. त्यानंतर १९९२ ला ९ टीम. कधी हा आकडा बारावर गेला तर कधी सोळावर. गेल्यावेळी २०१५ मधे १४ टीम होत्या. यंदा मात्र केवळ १० टीम्सला संधी देण्यात आलीय. यात प्रत्येक टीमला प्रत्येक टीमसोबत खेळवलं जातंय. यालाच राऊंड रॉबिन पद्धत म्हणतात.

आयसीसीचा घटता महसूल बघता कमी टीम्स ठेवून प्रत्येकाला एकमेकाविरोधात खेळवलं तर जास्त पैसे मिळतील. तसंच ग्रुपमधे एखादी टीम हरली तर दुसऱ्या ग्रुपमधल्या कोणत्याच टीमबरोबर खेळता येत नाही. म्हणजेच घसघशीत कमाई करून देणारी टीम इंडिया सगळ्या टीमबरोबर खेळल्यावर उत्पन्न वाढणारच आहे.

विशेष म्हणजे भारत-पाक मॅचवेळी १०० कोटींचा गल्ला जमतो असं आयसीसीच्या पूर्वीच्या अहवालांतून दिसतं. भारत-पाक मॅच क्रिकेट रसिकांसाठी आणि मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दृष्टीने वीकेंडला ठेवण्यात आलीय. आयसीसीचा गल्ला पुन्हा १०० कोटी किंवा त्याच्यापुढे जावा हे गणित धरूनच रविवारी मॅच ठेवण्यात आलीय, हे स्पष्ट दिसतंय.

हेही वाचा: पाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय?

भारताच्या दबावामुळे चार टीमचा पत्ता कट?

भारताला २०१५ मधे एकूण महसूलाच्या २२ टक्के रक्कम मिळाली होती. खरंतर एकूण महसूलाच्या ८०% रक्कम ही भारतातून आली होती. त्यामुळे बीसीसीआयने अधिकारवाणीने पैशांची मागणी केली. त्यामुळे आयसीसी सदस्य देशांना त्यांच्या हिश्श्याचे पैसे परत द्यावे लागले. त्यामुळे यंदा राऊंड रॉबिन पद्धतीने १० टीम खेळवण्यामागे हेसुद्धा कारण सांगितलं जातंय.

आयसीसीने मात्र क्रिकेटचा दर्जा कायम रहावा म्हणून राऊंड रॉबिन पद्धतीचा अववलंब केल्याचं आपल्या वेबसाईटवर म्हटलंय. यामागे आर्थिक गणित तर आहेच पण अनेक देशातून  भारतावरही आरोप होतोय की भारताने पैशांच्या मोहापायी आयसीसीवर दबाव आणलाय. भारत खेळापेक्षा उत्पन्नावर अधिक भर देतोय. खरंतर आयसीसीला आणि इतर देशांचाही यात फायदा आहे. त्यामुळे भारतावर आरोप करण्यात काही तथ्य नाही.

डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर

आयसीसीने तोटा भरून काढण्यासाठी यंदा डिजिटल मीडियाचाही वापर सुरू केलाय. सोशल मीडियाची क्रेझ आणि त्यांचा रिच बघता आयसीसीने काही कंपन्यांबरोबर पार्टनरशीप केलीय. भारतात आयनॉक्स, बहरिनमधे नोवा, युएईमधे नोवो यावर लाईव मॅच दिसणार आहे. भारतातल्या ७ प्रादेशिक भाषांमधे वर्ल्डकपचं कवरेज होतंय.

आयसीसीच्या डिजिटल हेड आरती डबास यांनी दिव्य मराठीला दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा वर्ल्डकप डिजिटल मीडियाद्वारे ३० कोटी प्रेक्षकापर्यंत पोचणार आहे. यातून डिजिटल कंपन्यांना ३०० ते ७०० कोटींचं उत्पन्न मिळणार असल्याचं मनीकंट्रोलच्या अहवालात म्हटलंय. म्हणजेच यातूनही आयसीसीला घसघशीत फायदा होईल.

खेळ हे करिअर आहे. क्रिकेटर्सना त्यांच्या खेळाच्या कामातून पैसे मिळतात. त्यांच्या शासकीय संस्थेला म्हणजे ती एक कंपनीच असते. तिला त्यातून पैसे मिळवणं गरजेचं असतं. नाहीतर ते मॅच कशाला आयोजित करतील? त्यामुळे आयसीसी, बीसीसीआयने मॅचमधून योग्य मार्गाने पैसे कमवणं यात काही गैर नाही.

हेही वाचा:

क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर

फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?